Tuesday, September 26, 2017

Samas Pahila Devadarshan समास पहिला देवदर्शन


Dashak Aathava Samas Pahila Devadarshan 
Samas Pahila Devdarshan, It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about God. Who is God? Whether God is Sagun or Nirgun? The creation of this entire world is done by God. There is much more in this Samas about God.
समास पहिला देवदर्शन
श्रीराम ॥
श्रोतीं व्हावें सावध । विमळ ज्ञान बाळबोध ।
गुरुशिष्यांचा संवाद । अति सुगम परियेसा ॥ १ ॥
१) श्रोत्यांनी आतां नीट लक्ष द्यावें. हा गुरुशिष्यांचा संवाद आहे. यामध्यें शुद्ध आत्मज्ञान सोपे करुन सांगितलें आहे.   
नाना शास्त्रें धांडोळितां । आयुष्य पुरेना सर्वथा ।
अंतरी संशयाची वेथा । वाढेंचि लागे ॥ २ ॥
२) पुष्कळ शास्त्रें आहेत त्यांचा अभ्यास करतां आयुष्य कमी पडेल. तरी मन निःशंक न होता उलट संशय वाढतच जातो. 
नाना तीर्थें थोरथोरें । सृष्टीमध्यें अपारें ।
सुगमें दुर्गमें दुष्करें । पुण्यदायकें ॥ ३ ॥  
३) जगामध्यें बरीच मोठीमोठी तीर्थक्षेत्रें आहेत. त्याच्यापैकीं कांहींच्या यात्रा सोप्या, कांहींच्या यात्रा कठीण आहेत. तर कांहींच्या फार कठीण आहेत.  तीर्थयात्रा केल्यानें पुण्यसंचय होतो.   
ऐसीं तीर्थें सर्वहि करी । ऐसा कोण रे संसारी ।
फिरों जातां जन्मवरी । आयुष्य पुरेना ॥ ४ ॥ 
४) पण या सर्व तीर्थयत्रा करणारा असा जगांत कोण आहे? तीर्थयात्रा करीत माणूस जन्मभर फिरला तरी तीर्थें संपणार नाहीत. 
नाना तपें नाना दानें । नाना योग नाना साधनें ।
हें सर्वहि देवाकारणें । करिजेत आहे ॥ ५ ॥
५) देवदर्शन व्हावें म्हणून लोक अनेक तपें, अनेक दानें, अनेक योग आणि अनेक साधनें करीत आहेत.  
पावावया देवाधिदेवा । बहुविध श्रम करावा ।
तेणें देव ठाईं पाडावा । हें सर्वमत ॥ ६ ॥
६) देवांचा देव पावावा. म्हणून बहुविधप्रकारें नाना कष्ट घ्यावेत तसे केलें तरच देवदर्शन होते. असा सर्वांचा समज आहे.  
पावावया भगवंतातें । नाना पंथ नाना मतें ।
तया देवाचें स्वरुप तें । कैसें आहे ॥ ७ ॥
७) भगवंत कसा भेटेल हे सांगणारे नाना पंथ आहेत. अनेक मतें आहेत. पण भगवंताचे खरे स्वरुप आहे तरी कसें, हें समजले पाहिजे.   
बहुत देव सृष्टीवरी । त्यांची गणना कोण करी ।
येक देव कोणेपरी । ठांई पडेना ॥ ८ ॥  
८) जगांत गणना करितां येत नाही इतके देव आहेत. त्यामुळें खरा जो एक देव आहे तो कसा आहे हेम कांहीं समजत नाही.     
बहुविध उपासना । ज्याची जेथें पुरे कामना । 
तो तेथेंचि राहिला मना । सदृढ करुनि ॥ ९ ॥
९) उपासनेचें पुष्कळ प्रकार आहेत. ज्याची इच्छा ज्या उपासनेनें सफल होते , ती उपासना तो माणूस मनांत दृढ करतो. 
बहु देव बहु भक्त । इ्छ्या जाले आसक्त ।
बहु ऋषी बहु मत । वेगळालें ॥ १० ॥
१०) देव पुष्कळ आहेत तसेंच भक्तही पुष्कळ आहेत. ते भक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून देवाला आसक्त होऊन भजतात. तसेच ऋषींही पुष्कळ होऊन गेले व त्यांची मतेम पण वेगवेगळीं आहेत.   
बहु निवडितां निवडेना । येक निश्र्चय घडेना ।
शास्त्रें भांडती पडेना । निश्र्चय ठांई ॥ ११ ॥
११) त्यामध्यें आपल्याला हवें तें शोधून काढणें जमत नाही. कोणत्याही एका देवाबद्दल, उपासनेबद्दल किंवा मताबद्दल निश्र्चय करता येत नाही. शास्त्रांचा परस्परांत मतभेद असल्यानें एक निश्र्चय करण्यास त्यांचा उपयोग होत नाही.     
बहुत शास्त्रीं बहुत भेद । मतांमतांस विरोध ।
ऐसा करितां वेवाद । बहुत गेले ॥ १२ ॥
१२) शास्त्रांची संख्या पुष्कळ आहे. त्यामच्यांत पुष्कळ भेदही आहेत. त्यांच्या मतामतांमध्येंही विरोध आहे. असा शास्त्रांबद्दल वाद करतां करतां पुष्कळ लोक नाहींसे झाले.
सहस्त्रामधें कोणी येक । पाहे देवाचा विवेक ।
परी त्या देवाचें कौतुक । ठांई न पडे ॥ १३ ॥
१३) हजारों लोकांमध्यें एखादाच माणूस खरा देव शोधून काढण्यास प्रयत्न करतो. तरी खर्‍या देवाचे स्वरुप व सामर्थ्य त्यास आकलन होत नाही.   
ठांई न पडे कैसें म्हणतां । तेथें लागली अहंता ।
देव राहिला परता । अहंतागुणें ॥ १४ ॥ 
१४) अहो, असें कसें म्हणता ? सर्व माणसांना अहंता लागली आहे. त्यामुळें देव लांब राहतो. अहंकारी माणूस देवापर्यंत पोहोचू शकत नाही.  
आतां असो हें बोलणें । नाना योग ज्याकारणें ।
तो देव कोण्या गुणें । ठांई पडे ॥ १५ ॥
१५) आतां हे बोलणें पुरे. ज्याचें दर्शन व्हावें म्हणून अनेक प्रकारचे योग आहेत, तो देव कोणत्या उपायानें प्राप्त होईल ? 
देव कोणासी म्हणावें । कैसें तयासी जाणावें ।
तेंचि बोलणें स्वभावें । बोलिजेल ॥ १६ ॥
१६) देव म्हणावें तरी कोणाला ? त्या खर्‍या देवाला ओळखावें तरी कसें ? या प्रश्र्णांची उत्तरे आतां सोप्या रीतीनें सांगीन. 
जेणें केलें चराचर । केले सृष्ट्यादि व्यापार ।
सर्वकर्ता निरंतर । नाम ज्याचें ॥ १७ ॥
१७) ज्याच्या सत्तेनें हें एवढें मोठें चराचर रचलें गेलें, ज्यच्यामुळें या विश्र्वांतील सर्व घडामोडी घडून येतात, तो खरा देव होय. तो सर्वकर्ता म्हणून ज्ञानी लोक त्याला जाणतात.
तेणें केल्या मेघमाळा । चंद्रबिंबीं अमृतकळा ।
तेज दिधलें रविमंडळा । जया देवें ॥ १८ ॥
१८) आकाशांतील मेघमाळा त्यानें रचल्या, चंद्रबिंबांत त्यानेंच अमृत घातलें. त्याच देवानें रविमंडळांत तेज ओतले. 
ज्याची मर्यादा सागर । जेणें स्थापिलें फणिवरा ।
जयांचेनि गुणें तारा । अंतरिक्ष ॥ १९ ॥
१९) ज्यानें समुद्राला मर्यादा घालून दिली, ज्यानें शेषाची स्थापना करुन पृथ्वी स्थिर केली, त्याच देवानें आकाशामध्यें अनंत तारका निर्माण केल्या.
च्यारी खाणी च्यारी वाणी । चौर्‍यासि लक्ष जीवयोनी ।
जेणें निर्मिले लोक तिनी । तया नाव देव ॥ २० ॥
२०) जीवप्राण्यांचे चार प्रकार, वाणीचे चार प्रकार, प्राण्यांच्या चौर्‍यांशी योनी, आणि स्वर्ग, मृत्यु व पाताळ हे तीन लोक ज्याच्या सत्तेनें निर्मान झाले. त्या निर्मात्याला देव हे नांव आहे.  
ब्रह्मा विष्णु आणी हर । हे जयाचे अवतार ।
तोचि देव हा निर्धार । निश्र्चयेंसीं ॥ २१ ॥
२१) ब्रह्मा, विष्णु व शंकर हे ज्याचे अवतार  आहेत तोच खरा देव होय हें अगदी निश्र्चित समजावें. 
देव्हाराचा उठोनि देव । करुं नेणें सर्व जीव ।
तयाचेनि ब्रह्मकटाव । निर्मिला न वचे ॥ २२ ॥  
२२) देव्हार्‍यांतील देव खरा देव नव्हे. कारण तो कांहीं सर्व जीव प्राणी निर्माण करुं शकत नाही. हें ब्रह्मांड तो उत्पन्न करुं शकत नाही.        
ठांई ठांई देव असती । तेहिं केली नाहीं क्षिती ।
चंद्र सूर्य तारा जीमूती । तयांचेनि नव्हे ॥ २३ ॥
२३) जागोजागीं किती तरी देव आढळतात. पण त्यांच्यापैकी कोणी पृथ्वी निर्मिली नाही. किंवा चंद्र, सूर्य, तारका आणि मेघ त्याच्या सामर्थ्यानें अस्तित्वांत आलेले नाहीत.    
सर्वकर्ता तोचि देव । पाहों जातां निरावेव ।
ज्याची कळा लीळा लाघव । नेणती ब्रह्मादिक ॥ २४ ॥
२४) या सर्वांचा जो कर्ता आहे तोच देव होय. तो कर्ता म्हणून त्यास पहावयास जावे तर निराकार असल्यानें दिसत नाही. तरी तो एवढें विश्र्व निर्माण करतो. त्याची ही लिला ब्रह्मादिकांनाही कळत नाही. 
येथें आशंका उठिली । ते पुढिलीये समासीं फिटली । 
आतां वृत्ती सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ २५ ॥
२५) देवाचें हें वर्णन ऐकून श्रोत्यांच्या मनांत शंका निर्माण झाली. त्या शंकेचे निरसन पुढील समासांत केलें आहे. तोपर्यंत या समासांतील विषयाकडे श्रोत्यांनी सावधान वृत्तीनें लक्ष द्यावें. 
पैस अवकाश आकाश । कांहींच नाहीं जे भकास ।
तये निर्मळीं वायोस । जन्म जाला ॥ २६ ॥
२६) प्रथम सगळीकडे मोकळी जागा होती. तेंच आकाश होय. तें शून्यमय होते. त्या शुद्ध आकाशांत वायूचा जन्म झाला. 
वायोपासून जाला वन्ही । वन्हीपासुनी जालें पाणी ।
ऐसी जयाची करणी । अघटित घडली ॥ २७ ॥
२७) वायूपासून अग्नि निर्माण झाला. अग्नीपासून पाणी झाले. ही अघटित घटना ही त्याच्या सत्तेची करणी,
उदकापासून सृष्टि जाली । स्तंभेविण उभारली ।
ऐसी विचित्र कळा केली । त्या नाव देव ॥ २८ ॥
२८) पाण्यापासून सृष्टी निर्माण झाली. खांबांच्या आधाराशिवाय ती आकाशांत ठेवली. अशी ज्याची विलक्षण कळा तो देव होय. 
देवें निर्मिली हे क्षिती । तिचे पोटीं पाषाण होती ।
तयासचि देव म्हणती । विवेकहीन ॥ २९ ॥
२९) देवानें ही पृथ्वी निर्माण केली. तेथें दगड निर्माण झाले. त्या दगडांनाच विवेकशून्य माणसें देव म्हणतात. ( याला काय म्हणावें. ) 
जो सृष्टिनिर्माणकर्ता । तो ये सृष्टीपूर्वीं होता । 
मग हे तयाची सत्ता । निर्माण जाली ॥ ३० ॥
३०) ज्यादेवानें ही सृष्टी निर्माण केली तो या सृष्टीपूर्वींही होता. मग त्यानें आपल्या सत्तेनें हे विश्व निर्माण केले.
कुल्लाळ पात्रा पूर्वीं आहे । पात्रें कांहीं कुल्लाळ नव्हे ।
तैसा देव पूर्वींच आहे । पाशाण नव्हे सर्वथा ॥ ३१ ॥
३१) कुंभार मातीची भांडी घडवितो. भांडी घडविण्यापूर्वीं तो असतोच. कुंभांर हा कांहीं मडकीं बनत नाही. त्याचप्रमाणें विश्र्व निर्माण करणारा देव विश्वाच्या आधीपासून असतो. विश्र्व निर्माण झाल्यावर तो वेगळा राहतो. म्हणून पृथ्वीवरील दगड म्हणजे कांही देव नव्हे.   
मृत्तिकेचें  शैन्य केलें । कर्ते वेगळे राहिले ।
कार्यकारण येक केलें । तरी होणार नाहीं ॥ ३२ ॥
३२) समजा एखाध्यानें मातीच्या शिपायांचे सैन्य तयार केलें. सैन्य तयार करणारा कारागीर सैन्याहून वेगळा राहतो. अर्थात् कारण व कार्य एकरुप  करु म्हटले तरी करतां येणार नाहींत.
तथापि होईल पंचभूतिक। निर्गुण नव्हे कांहीं येक ।
कार्याकारणाचा विवेक । भूतांपरता नाहीं ॥ ३३ ॥  
३३) कार्य आणि कारण या घटना दृश्य पंचभौतिक विश्वामधील आहेत. त्या पलीकडे असणार्‍या निर्गुण स्वरुपामध्यें कार्य नाहीं तसे कारणही नाहीं. कार्यकारणाचा संबंध पंचभूतात्मक विश्वामधील घटनांना लागूं पडतो. त्यापलीकडे तो लटका पडतो. 
अवघी सृष्टि जो कर्ता । तो ते सृष्टीहूनि पर्ता ।
तेथें संशयाची वार्ता । काढूंचि नये ॥ ३४ ॥
३४) हें सबंध विश्व ज्यानें निर्माण केलें तो देव त्या विष्वाहून निराळा आहे. त्याच्या पलीकडे आहे. याबद्दल थोडादेखील संशय राहूं नये.    
खांबसूत्रींची बाहुली । जेणें पुरुषें नाचविली ।
तोचि बाहुली हे बोली । घडे केवी ॥ ३५ ॥
३५) जो माणूस कळसूत्री बाहुल्या नाचवतो तोच बाहुली बनतो हें म्हणणे देखील चूक आहे.  
छायामंडपीची सेना । सृष्टिसारिखीच रचना ।
सूत्रें चाळी परी तो नाना । वेक्ति नव्हे ॥ ३६ ॥
३६) पातळ पदद्यामागें दिवा ठेवतात. त्या दिव्याच्या उजेडानें कागदी शिपायांच्या सावल्या पडद्यावर दाखवितात. त्यास छायामंडप म्हणतात. या छायामंडपांत शिपायांचे सैन्य दाखवतात. दिसायला तें खर्‍या सैन्यासारखें दिसते. एक माणूस दोर्‍यांच्या सहाय्यानें शिपायांचीं चित्रें नाचवतो. एकच माणोस अनेक चित्रें नाचवतो. प्रत्येक चित्राला निराळा माणूस नाचवणारा नसतो.  
तैसा सृष्टिकर्ता देव । परी तो नव्हे सृष्टिभाव ।
जेणें केले नाना जीव । तो जीव कैसेनी ॥ ३७ ॥
३७) त्याचप्रमाणें हें विश्व निर्माण करणारा देव एकच आहे. विश्वांतील पदार्थांहून तो वेगळा आहे. ज्या देवानें अनेक जीव निर्माण केलें तो स्वतःच  जीव कसा असूं शकेल ?  
जें जें जया करणें पडे । तें तें तो हें कैसें घडे ।
म्हणोनि वायांचि बापुडे । संदेहीं पडती ॥ ३८ ॥   
३८) जें जें कर्म माणसाला करावें लागतें तें तें कर्म तो  कधीच होऊं शकत नाही. कर्म व ते करनारा कर्ता सदैव भिन्नच राहतात. हें ज्यांच्या ध्यांनांत येत नाही, ते अज्ञ लोक विनाकारण संशयांत पडतात.  
सृष्टि ऐसेंचि स्वभावें । गोपुर निर्मिलें बरवें ।
परी तो गोपुर कर्ता नव्हे । निश्र्चयेंसीं ॥ ३९ ॥
३९) एका कारागिराने देवळाच्या महाद्वारावर सुंदर गोपुर उभारलें. परंतु गोपुर व तें करणारा कारगिर दोन्ही एकच असूं शकत नाही. 
तैसें जग निर्मिलें जेणे । तो वेगळा पूर्णपणें ।
येक म्हणती मूर्खपणें । जग तोचि जगदीश ॥ ४० ॥
४०) त्याचप्रमाणें ज्यानें जग निर्माण केलें तो देव जगाहून पूर्णपणें वेगळा आहे. जग व जगदीश एकच आहेत हे केवळ मूर्खपणें लोक म्हणतात.  
एवं जगदीश तो वेगळा । जग निर्माण त्याची कळा ।
तो सर्वांमधें परी निराळा । असोन सर्वीं ॥ ४१ ॥
४१) थोडक्यांत जग निर्माण करणारा जगदीश हा जगाहून वेगळा आहे. जग निर्माण करणें ही त्याची मोठी कला आहे. तो सर्वामध्यें असूनही सर्वापेक्षा निराळा आहे.    
म्हणोनि भूतांचा कर्दमु । यासी अलिप्त आत्मारामु । 
अविद्यागुणें मायाभ्रमु । सत्यचि वाटे ॥ ४२ ॥
४२) म्हणून विश्वामध्यें आढळणार्‍या पंचभूतांच्या मिश्रणाहून आत्माराम अगदी अलिप्त असतो. अविद्येचा परिणाम झाल्यानें मायेनें निर्माण केलेला हा विश्वभ्रम संपूर्णपणें खरा वाटतो. 
मायोपाधी जगडंबर । आहे सर्वहि साचार ।
ऐसा हा विपरीत विचार । कोठेंचि नाहीं ॥ ४३ ॥
४३) विश्वाचा हा एवढा पसारा मायेनें निर्माण केलेलें दृश्य आहे. हें सर्वस्वी खरें आहे, असा चुकीचा विचार कोणत्याही अद्वैत ग्रंथामध्यें आढळणार नाही. 
म्हणोनि जग मिथ्या साच आत्मा । सर्वांपर जो परमात्मा ।
अंतर्बाह्य अंतरात्मा । व्यापूनि असे ॥ ४४ ॥
४४) अर्थात् हें दृश्य विश्व मिथ्या आहे आणि आत्मस्वरुप तेवढें खरें आहे. त्याच्याही पलीकडे परमात्मा असतो. अंतरात्मा सर्वांना आंतबाहेर व्यापून असतो.          
तयास म्हणावें देव । येर हें अवघेंचि वाव ।
ऐसा आहे अंतर्भाव । वेदांतीचा ॥ ४५ ॥
४५) त्या शुद्ध आत्मस्वरुपाला देव म्हणावें. त्याखेरीज बाकींचे सर्व दृश्य व्यर्थ आहे. वेदान्ताचें असे हें रहस्य आहे.  
पदार्थवस्तु नासिवंत । हें तो अनुभवास येत ।
याकारणें भगवंत । पदार्थावेगळा ॥ ४६ ॥
४६) सर्व वस्तु नाशवंत आहेत. हा तर सर्वांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि भगवंत हा अविनाशी आहे. म्हणून तो या सर्व पदार्थांहून वेगळा असलाच पाहिजे.   
देव विमळ आणी अचळ । शास्त्रें बोलती सकळ ।
तया निश्र्चळास चंचळ । म्हणों नये सर्वथा ॥ ४७ ॥
४७) सर्व शास्त्रें सांगतात कीं, देव अगदीं शुद्ध व शाश्वत आहे. अशा निश्चल शाश्वत देवाला अशाश्वत व चंचल कधींही म्हणू नये. 
देव आला देव गेला । देव उपजला देव मेला ।
ऐसें बोलतां दुरिताला । काये उणें ॥ ४८ ॥
४८) देव आला, देव गेला, देव जन्मला, देव मेला असें बोलल्यानें पापाचाच साठा केल्यासारखें होते.  
जन्ममरणाची वार्ता । देवास लागेना सर्वथा ।
देव अमर ज्याची सत्ता । त्यासी मृत्यु कैसेनी ॥ ४९ ॥
४९) जन्म व मृत्यु देवाला नाही. देव हा नेहमी आहे व त्याचीच सर्वत्र सत्ता चालते. त्याला मृत्यु कसा येणार ?   
उपजणें आणी मरणें । येणें जाणें दुःख भोगणें ।
हें त्या देवाचें करणें । तो कारण वेगळा ॥ ५० ॥
५०) जन्मास येणें व मरणें; येणें व जाणें व दुःख भोगणें हें सगळें त्या देवाच्या सत्तेनें चालते. तो या सर्वांचे कारण आहे. म्हणूनच तो सगळ्यांहून निराळा आहे. 
अंतःकरण पंचप्राण । बहुतत्वीं पिंडज्ञान ।
यां सर्वांस आहे चळण । म्हणोनि देव नव्हेती ॥ ५१ ॥
५१) अंतःकरण, पंचप्राण, पिंडांमधील आपणांस माहित असलेली अनेक तत्वें, हीं सारी अशाश्वत आहेत. बदलणारीं आहेत. म्हणून तीं देव नव्हेत.   
येवं कल्पनेरहित । तया नांव भगवंत । 
देवपणाची मात । तेथें नाहीं ॥ ५२ ॥
५२) इतकेंच काय जेथें मानवी कल्पना कमी पडतात, त्या स्वरुपास भगवंत असें नांव आहे. त्या स्वरुपामध्यें देवपणाच्या कल्पनेला देखील स्थान नाही. 
तव शिष्यें आक्षेपिलें । तरी कैसें ब्रह्मांड केलें ।
कर्तेपणें कारण पडिलें । कार्यामधें ॥ ५३ ॥
५३) यावर शिष्यानें शंका काढली. कर्तेपणा हें कारण आहे. तें सुद्धा जर कार्य ठरलें तर मग हें विश्व निर्माण झालें कसें?  
द्रष्टेपणें द्रष्टा दृश्यीं । जैसा पडे अनायांसी ।
कर्तेपणें निर्गुणासी । गुण तैसे ॥ ५४ ॥
५४) द्रष्टा दृश्य पाहतो. पण मी द्रष्टा आहें ही जाणीव झाली म्हणजे आपण द्रष्ट्यालाच पाहतो. त्यामुळें द्रष्टाच दृश्य बनतो. अशा रीतींनें द्रष्टा जसा विनासायास दृश्यांत जाऊन पडतो तसे निर्गुणस्वरुपाच्या ठिकाणीं कर्तेपणामुळें गुण दिसूं लागतात.   
ब्रह्मांडकर्ता कवण । कैसी त्याची वोळखण ।
देव सगुण किं निर्गुण । मज निरोपावा ॥ ५५ ॥
५५) या विश्वाचा कर्ता कोण ? त्याला ओळखावें कसें ? देव सगुण कीं निर्गुण ? हें मला समजून सांगावें. 
येक म्हणती त्या ब्रह्मातें । इच्छामत्रें सृष्टिकर्ते ।
सृष्टिकर्ते त्यापर्ते  । कोण आहे ॥ ५६ ॥
५६) कोणी म्हणतात कीं परब्रह्मानें केवळ आपल्या संकल्पानें विश्व निर्माण केलें. हें खरें नसेल तर त्याच्या व्यतिरिक्त विश्व निर्माण करणारें आणखी कोण आहे ? 
आतां असो हे बहु बोली । सकळ माया कोठून जाली ।
ते हे आतां निरोपिली । पाहिजे स्वामी ॥ ५७ ॥
५७) जास्त बोलणें आतां पुरें. ही सगळी माया कोठून आली, कशी निर्माण झाली याचा स्वामी, आपण खुलासा करावा.  
ऐसें ऐकोनि वचन । वक्ता  म्हणे सावधान ।
पुढेलें समासीं निरुपण । सांगिजेल ॥ ५८ ॥
५८) शिष्याचे हे बोलणें ऐकून वक्ता म्हणाला कीं तूं जरा लक्ष दे. पुढच्या समासामध्यें या प्रश्र्णांची उत्तरे मी देणार आहे. 
ब्रह्मी माया कैसी जाली । पुढें असे निरोपिली ।
श्रोतीं वृत्ती सावध केली । पाहिजे आतां ॥ ५९ ॥  
५९) परब्रह्मामध्यें माया कशी निर्माण झाली हें पुढें समजून सांगितलें आहे. श्रोत्यांनी लक्षपूर्वक श्रवण करावें.   
पुढें हेंचि निरुपण । विशद केलें श्रवण ।
जेणें होये समाधान । साधकांचें ॥ ६० ॥
६०) पुढें याच विषयाचेम विवेचन आहे. तें एकाग्र मनानें श्रवण केल्यास साधकाच्या मनाचें समाधान होईल. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देवदर्शननाम समास पहिला ॥
Samas Pahila Devadarshan
समास पहिला देवदर्शन


Custom Search