Monday, September 30, 2013

Gurucharitra Adhyay 16 गुरुचरित्र अध्याय १६

Gurucharitra Adhyay 16 
Gurucharitra Adhyay 16 is in Marathi. In this Adhyay Guru NrusinhaSaraswati is telling the importance of Guru to a Brahman muni. Here he tells a story of Dhoumya Rushi- the Guru and his three disciples Aaruni, Baida and Upamanyu. Every Guru always takes a test of his disciples whether they really are interested in learning/knowledge. In these old days it was a practice to judge the disciple’s earnest desire for acquiring knowledge. If disciple is found lazy, not so keen to learn then no knowledge was imparted to them. So here in this Adhyay 16 the importance of Guru is told. 


गुरुचरित्र अध्याय १६  
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ 
विनवी शिष्य नामांकित । सिद्धासी असे पुसत । 
सांगा स्वामी वृतांत । गुरुचरित्र विस्तारुनि ॥ १ ॥ 
शिष्य समस्त गेले यात्रेसी । राहिले कोण गुरुपाशीं । 
पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावें दातारा ॥ २ ॥ 
ऐकोनि शिष्याची वाणी । संतोषी झाले सिद्ध मुनि । 
धन्य धन्य शिष्या शिरोमणि । गुरुभक्ता नामधारका ॥ ३ ॥ 
अविद्यामायासुषुप्तींत । निजले होतें माझे चित्त । 
तुजकरितां जाहले चेत । ज्ञानज्योति-उदय मज ॥ ४ ॥ 
तूंचि माझा प्राणसखा । ऐक शिष्या नामधारका । 
तुजकरितां जोडलों सुखा । गुरुचरित्र आठवलें ॥ ५ ॥ 
अज्ञानतिमिरउष्णांत । पीडोनि आलों कष्टत । 
सुधामृतसागरांत । तुवां मातें लोटिलें ॥ ६ ॥ 
तुवां केले उपकारासी । संतुष्ट झालो मानसीं । 
पुत्रपौत्रीं तूं नांदसी । दैन्य नाहीं तुझे घरीं ॥ ७ ॥ 
गुरुकृपेचा तूं बाळक । तुज मानिती सकळ लोक । 
संदेह न करी घे भाक । अष्टैश्र्वर्ये नांदसी ॥ ८ ॥ 
गुरुचरित्रकामधेनु । सांगेन तुज विस्तारुनु । 
श्रीगुरु राहिले गौप्ये होऊन । वैजनाथसंनिधेसी ॥ ९ ॥ 
समस्त शिष्य तीर्थेसी । स्वामीनिरोपें गेले परियेसीं । 
होतों आपण गुरुपाशी । सेवा करीत अनुक्रमे ॥ १० ॥ 
संवत्सर एक तया स्थानीं । होते गौप्य श्रीगुरु मुनि । 
अंबा आरोग्यभवानी । स्थान बरवें मनोहर ॥ ११ ॥ 
असतां तेथे वर्तमानी । आला ब्राह्मण एक मुनि । 
श्रीगुरुतें देखोनि । नमन करी भक्तिभावें ॥ १२ ॥ 
माथा ठेवूनि चरणांवरी । स्तोत्र करी परोपरी । 
स्वामी मातें तारीं तारीं । अज्ञानसागरी बुडालो ॥ १३ ॥ 
तप करितों बहु दिवस । स्थिर नव्हे गा मानस । 
याचि कारणें ज्ञानास । न दिसे मार्ग आपणातें ॥ १४ ॥ 
ज्ञानाविणें तापसा । वृथा होती सायास । 
तुम्हां देखतां मानसा । हर्ष झाला आजि मज ॥ १५ ॥ 
गुरुची सेवा बहुत दिवस । केली नाहीं सायासें । 
याचिकारणें मानस । स्थिर नव्हे स्वामिया ॥ १६ ॥ 
तूं तारक विश्र्वासी । जगद्गुरु तूंचि होसी । 
उपदेश करावा आम्हांसी । ज्ञान होय त्वरितेसी ॥ १७ ॥ 
ऐकोनि मुनीचे वचन । श्रीगुरु पुसती हांसोन । 
जाहलासि तूं केवीं मुनि । गुरुविणें सांग मज ॥ १८ ॥ 
ऐसे म्हणतां श्रीगुरुमूर्ति । मुनीच्या डोळां अश्रुपाती । 
दुःख दाटले अपरमिति । ऐक स्वामी गुरुराया ॥ १९ ॥ 
गुरु होता आपणासि एक । अतिनिष्ठुर त्याचें वाक्य । 
मातें गांजिले अनेक । अकृत्य सेवा सांगे मज ॥ २० ॥ 
न सांगे वेदशास्त्र आपण । तर्कभाष्यादि व्याकरण । 
म्हणे तुझें अंतःकरण । स्थिर नव्हे अद्यापि ॥ २१ ॥ 
म्हणोनि सांगे आणिके कांहीं । आपुलें मन स्थिर नाहीं । 
करी त्याचे बोल वायी । आणिक कोप करी मज ॥ २२ ॥ 
येणेंपरी बहुत दिवशीं । होतों तया गुरुपाशी । 
बोले मातें निष्ठुरेसी । कोपोनि आलों तयावरी ॥ २३ ॥ 
ऐकोनि तयाचें वचन । श्रीगुरुमूर्ति हास्यवदन । 
म्हणती ऐकें ब्राह्मणा । आत्मघातकी तूंचि होसी ॥ २४ ॥ 
एखादा मूर्ख आपुले घरीं । मळ विसर्जी देव्हारीं । 
आपुले अदृष्ट ऐसेपरी । म्हणोनि सांगे सकळिकां ॥ २५ ॥ 
तैसे तुझें अंतःकरण । आपुलें नासिक छेदून । 
पुढिल्यातें अपशकुन । करुनि रहासी तूंचि एक ॥ २६ ॥ 
न विचारिसी आपुले गुण । तूंतें कैचे होय ज्ञान । 
गुरुद्रोही तूंचि जाण । अल्पबुद्धि परियेसा ॥ २७ ॥ 
आपुले गुरुचे गुणदोष । सदा उच्चार करिसी हर्षें । 
ज्ञान कैंचे होय मानस । स्थिर होय केवीं आतां ॥ २८ ॥ 
जवळी असतां निधानु । कां हिंडावें रानोरानु । 
गुरु असतां कामधेनु । वंचूनि आलासि आम्हांजवळी ॥ २९ ॥ 
गुरुद्रोही कवण नर । त्यासी नाही इह पर । 
ज्ञान कैंचे होय पुरें । तया दिवांधकासी ॥ ३० ॥ 
जो जाणे गुरुची सोय । त्यासी सर्व ज्ञान होय । 
वेदशास्र सर्व होये । गुरु संतुष्ट होतांचि ॥ ३१ ॥ 
संतुष्टवितां श्रीगुरुसी । अष्टसिद्धि आपुले वशी । 
क्षण न लागतां परियेसीं । वेदशास्र त्यासी साध्य ॥ ३२ ॥ 
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । माथा श्रीगुरुचरणीं ठेवून । 
विनवीतसे कर जोडून । करुणावचनेंकरुनियां ॥ ३३ ॥ 
जय जया जगद्गुरु । निर्गुण तूं निर्विकारु । 
ज्ञानसागर अपरांपरु । उद्धरावें आपणातें ॥ ३४ ॥ 
अज्ञानमाया वेष्टोन । नेणे गुरु कैसा कवण । 
सांगा स्वामी प्रकाशोन । ज्ञान होय आपणासी ॥ ३५ ॥ 
कैसा गुरु ओळखावा । कोणेपरी आहे सेवा । 
प्रकाश करोनि सांगावा । विश्ववंद्य गुरुमूर्ति ॥ ३६ ॥ 
जेणें माझे मन स्थिरु । होऊनि ओळखे सोयगुरु । 
तैसा करणें उपकारु । म्हणोनि चरणीं लागला ॥ ३७ ॥ 
करुणावचन ऐकोनि । श्रीगुरुनाथ संतोषोनि । 
सांगताति विस्तारोनि । गुरुसेवाविधान ॥ ३८ ॥ 
श्रीगुरु म्हणती ऐक मुनि । गुरु म्हणजे जनकजननी । 
उपदेशकर्ता आहे कोणी । तोचि जाण परम गुरु ॥ ३९ ॥ 
गुरु विरिंचि हर जाण । स्वरुप तोचि नारायण । 
मन करुनि निर्वाण । सेवा करावी भक्तीनें ॥ ४० ॥ 
यदर्थी कथा एक । सांगो आम्ही तत्पर ऐक । 
आदिपर्वी असे निक । गुरुसेवा भक्तिभावें ॥ ४१ ॥ 
द्वापारांतीं परियेसीं । विप्र एक धौम्य्रऋषी । 
तिघे शिष्य होते त्यासी । वेदाभ्यास करावया ॥ ४२ ॥ 
एक ' आरुणी पांचाळ ' । दुसरा ' बैद ' केवळ । 
तिसरा ' उपमन्यु ' बाळ । सेवा करिती विद्येलागीं ॥ ४३ ॥ 
पूर्वी गुरुची ऐसी रीति । शिष्याकरवीं सेवा घेती । 
अंतःकरण त्याचें पहाती । निर्वाणवरी शिष्याचें ॥ ४४ ॥ 
पाहोनियां अंतःकरण । असे भक्ति निर्वाण । 
कृपा करिती तत्क्षण । मनकामना पुरविती ॥ ४५ ॥ 
ऐसा धौम्यमुनि भला । तया आरुणी-पांचाळा । 
एके दिवशीं निरोप दिल्हा । ऐक द्विजा एकचित्तें ॥ ४६॥ 
शिष्यासी म्हणे धौम्यमुनि । आजि तुवां जावोनि रानीं । 
वृत्तीसी न्यावें तटाकपाणी । जंववरी होय तृप्त भूमि ॥ ४७ ॥ 
असे वृ्त्ति तळें खालीं । तेथे पेरिली असे साळी । 
तेथें नेवोनि उदक घालीं । शीघ्र म्हणे शिष्यासी ॥ ४८ ॥ 
ऐसा गुरुचा निरोप होतां । गेला शिष्य धांवत । 
तटाक असे पाहतां । कालवा थोर वहातसे ॥ ४९ ॥ 
जेथें उदक असे वहात । अतिदरारा गर्जत । 
वृत्तिभूमि उन्नत । उदक केवीं चढों पाहे ॥ ५० ॥ 
म्हणे आतां काय करुं । कोपतील मातें श्रीगुरु । 
उदक जात असे दरारु । केवीं बांधू म्हणतसे ॥ ५१ ॥ 
आणूनियां शिळा दगड । बांधिता जाहला उदका आड । 
पाणी जात असे धडाड । जाती पाषाण वाहोनियां ॥ ५२ ॥ 
प्रयत्न करी नानापरी । कांहीं केलिया न चढे वारी । 
म्हणे देवा श्रीहरि । काय करुं म्हणतसे ॥ ५३ ॥ 
मग मनीं विचार करी । गुरुचें शेती न चढे वारी । 
प्राण त्याजीन निर्धारीं । गुरुचे वृत्तीनिमित्त ॥ ५४ ॥ 
निश्र्चय करुनि मानसीं । मनीं ध्याई श्रीगुरुसी । 
म्हणे आतां उपाय यासी । योजूनि यत्न करावा ॥ ५५ ॥ 
घालितां उदकप्रवाहांत । जाती पाषाण वहात । 
आपण आड पडों म्हणत । निर्धारिले तया वेळी ॥ ५६ ॥ 
दोन्ही हातीं धरी दरडी । पाय टेकी दुसरेकडी । 
झाला आपण उदकाआड । मनी श्रीगुरुसी ध्यातसे ॥ ५७ ॥ 
ऐसा शिष्यशिरोमणि । निर्वाण मन करितांक्षणी । 
वृत्तीकडे गेले पाणी । प्रवाहाचे अर्ध देखा ॥ ५८ ॥ 
अर्ध पाणी जैसें तैसे । वाहतसे नित्यसरिसें । 
तयामध्ये शिष्य संतोषे । बुडाला असे अवधारा ॥ ५९ ॥ 
ऐसा शिष्य तया स्थानीं । बुडाला असे प्रवाहपाणी । 
गुरुची वृत्ती जहली धणी । उदकपूर्ण परियेसा ॥ ६० ॥ 
त्याचा गुरु धौम्यमुनि । विचार करी आपुले मनीं । 
दिवस गेला अस्तमानीं । अद्या शिष्य न ये म्हणे ॥ ६१ ॥ 
ऐसें आपण विचारीत । गेला आपुले वृत्तींत । 
जाहले असे उदक बहुत । न देखे शिष्य तया स्थानीं ॥ ६२ ॥ 
म्हणे शिष्या काय जाहले । किंवा भक्षिले व्याघ्रव्याळे । 
उदकानिमित्त कष्ट केले । कोठे असे म्हणतसे ॥ ६३ ॥ 
ऐसे मनी विचारीत । उंच स्वरे पाचारीत । 
अरे शिष्या सखया म्हणत । प्रेमभावे बोलावी ॥ ६४ ॥ 
येणेंपरी करुणावचनीं । पाचारीतसे धौम्यमुनीं । 
शब्द पडे शिष्यकानीं । तेथूनि मग निघाला ॥ ६५ ॥ 
येवोनियां श्रीगुरुसी । नमन केलें भावेसीं । 
धौम्यमुनीं महाहर्षी । आलिंगोनि आश्र्वासिलें ॥ ६६ ॥ 
वर दिधला तया वेळी । ऐक शिष्या स्तोममौळी । 
तूंते विद्या आली सकळी । वेदशास्रादि व्याकरण ॥ ६७ ॥ 
ऐसें म्हणतां तत्क्षणीं । झाला विद्यावंत ज्ञानी । 
लागतसे गुरुचरणीं । भक्तिभावेंकरुनियां ॥ ६८ ॥ 
कृपानिधि धौम्यमुनि । आपुले आश्रमा नेऊनि । 
निरोप दिल्हा संतोषोनि । विवाहादि आतां करी म्हणे ॥ ६९ ॥ 
निरोप घेऊनि शिष्यराणा । गेला आपुले स्थाना । 
आणिक दोघे शिष्य जाणा । होते तया गुरुजवळी ॥ ७० ॥ 
दुसरा शिष्य ' बैद ' जाणा । गुरुची करी शुश्रूषणा । 
त्याचे पहावया अंतःकरणा । धौम्य गुरु म्हणतसे ॥ ७१ ॥ 
धौम्य म्हणे शिष्यासी । सांगेन एक तुजसी । 
तुवां जाऊनि अहर्निशी । वृत्ति आमुची रक्षिजे ॥ ७२ ॥ 
रक्षूनियां वृत्तीसी । आणावे धान्य घरासी । 
ऐसे म्हणतां महाहर्षी । गेला तया वृत्तीकडे ॥ ७३ ॥ 
वृत्ति पिके जंववरी । अहोरात्रीं कष्ट करी । 
राशी होतां अवसरीं । आला आपुले गुरुपाशीं ॥ ७४ ॥ 
सांगता जाहला श्रीगुरुसी । म्हणे व्रीही भरले राशीं । 
आतां आणावे घरासी । काय निरोप म्हणतसे ॥ ७५ ॥ 
मग म्हणे धौम्यमुनि । बा रे शिष्या शिरोमणि । 
कष्ट केले बहुत रानीं । आतां धान्य आणावें ॥ ७६ ॥ 
म्हणोनि देती एक गाडा । तया जुंपोनि एक रेडा । 
गुरु म्हणे जावें पुढा । शीघ्र यावे म्हणतसे ॥ ७७ ॥ 
एकीकडे जुंपी रेडा । आपण ओढी दुसरीकडा । 
येणेपरि घेवोनि गाडा । आला तया वृत्तीजवळी ॥ ७८ ॥ 
दोनी खंडी साळीसी । भरी शिष्य गाडियासी । 
एकीकडे रेडियासी । जुंपोनि जोडी आपण देखा ॥ ७९ ॥ 
रेडा चाले शीघ्रेसी । आपण न ये तयासरसी । 
मग आपुले कंठासी । बांधितां झाला जूं देखा ॥ ८० ॥ 
सत्राणे तयासरसी । चालत अला मार्गासी । 
रुतला रेडा चिखलेसीं । आपुले गळां ओढीतसे ॥ ८१ ॥ 
चिखलीं रुतला रेडा म्हणोनि । चिंता करी बहु मनीं । 
आपण ओढी सत्राणी । गळां फांस पडे जैसा ॥ ८२ ॥ 
सोडूनियां रेडियासी । काढिलें शिष्य गाडियासी । 
ओढितां आपुलें गळा फांसी । पडूनि प्राण त्यजूं पाहे ॥ ८३ ॥ 
इतुकें होता निर्वाणीं । सन्मुख पातला धौम्यमुनि । 
त्या शिष्यातें पाहोनि नयनीं । कृपा अधिक उपजली ॥ ८४ ॥ 
सोडूनियां शिष्यांते । आलिंगोनि करुणाभरितें । 
वर दिधला अभिमते । संपन्न होसी वेदशास्री ॥ ८५ ॥ 
वर देतां तत्क्षणेसीं । सर्व विद्या आली त्यासी । 
निरोप घेऊनियां घरासी । गेला शिष्य परियेसा ॥ ८६ ॥ 
तिसरा शिष्य उपमन्यु । सेवेविषयीं महानिपुण । 
गुरुची सेवा-शुषूषण । बहु करी परियेसा ॥ ८७ ॥ 
त्यासी व्हावा बहुत आहार । म्हणोनि विद्या नोहे स्थिर । 
त्यासी विचार करीत तो गुरु । यांते करावा उपाय एक ॥ ८८ ॥ 
त्यासी म्हणे धौम्यमुनि । तुज सांगतो म्हणोनि । 
नित्य गुरें नेऊनि रानीं । रक्षण करी तृणचरे ॥ ८९ ॥ 
ऐसे म्हणतां गुरुमुनि । नमन करी त्याचे चरणी । 
गुरें नेऊनियां रानीं । चारवीत बहुवस ॥ ९० ॥ 
क्षुधा लागतां आपणासी । शीघ्र आणिली घरासी । 
कोपें गुरु तयासी । म्हणे शीघ्र येतोसि कां रे ॥ ९१ ॥ 
सूर्य जाय अस्तमानीं । तंववरी राखी गुरें रानी । 
येणेपरी प्रतिदिनीं । वर्तावें तुवां म्हणतसे ॥ ९२ ॥ 
अंगीकारोनि शिष्यराणा । गुरें घेवोनि गेला राना । 
क्षुधाक्रांत होऊनि जाणा । चिंतीतसे श्रीगुरुसी ॥ ९३ ॥ 
चरतीं गुरें नदीतीरी । आपण तेथें स्नान करी । 
तयाजवळी घरें चारी । असती विप्रआश्रम तेथे ॥ ९४ ॥ 
जाऊनियां तया स्थाना । भिक्षा मागे परिपूर्ण । 
भोजन करी सावधान । गोधन रक्षी येणेपरी ॥ ९५ ॥ 
येणेंपरी प्रतिदिवशी । रक्षूनि आणी गुरें निशीं । 
वर्ततां ऐसे येरे दिवशीं । पुसता झाला धौम्यमुनि ॥ ९६ ॥ 
गुरु म्हणे शिष्यासी । तूं नित्य उपवासी । 
तुझा देह पुष्टीसी । कवणेपरी होतसे ॥ ९७ ॥ 
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सांगे शिष्य उपमन्य । 
 भिक्षा करितो प्रतिदिन । विप्रांघरीं तेथे देखा ॥ ९८ ॥ 
भोजन करुनि प्रतिदिवसीं । गुरें घेवोनि येतों निशीं । 
श्रीगुरु म्हणती तयासी । आम्हां सांडूनि केवी भुक्ती ॥ ९९ ॥ 
भिक्षा मागोनि घरासी । आणोनि द्यावी प्रतिदिवसीं । 
मागुती जावें गुरांपाशीं । घेऊनि यावें निशिकाळीं ॥ १०० ॥ 
गुरुनिरोपें येरे दिवशी । गुरे नेऊनि रानासी । 
मागे भिक्षा नित्य जैसी । नेऊनि दिधली घरांत ॥ १०१ ॥ 
घरीं त्यासी भोजन । कधी नव्हे परिपूर्ण । 
पुनरपि जाई तया स्थाना । भिक्षा करुनि जेवीतसे ॥ १०२ ॥ 
नित्य भिक्षा वेळां दोनी । पहिली भिक्षा देवोनि सदनीं । 
दुसरी आपण भक्षूनि । काळ ऐसा कंठीतसे ॥ १०३ ॥ 
येणेपरी किंचित्काळ । वर्ततां जाहला महास्थूळ । 
एके दिवशी गुरु कृपाळ । पुसतसे शिष्यातें ॥ १०४ ॥ 
शिष्य सांगे वृत्तांत । जेणें आपुली क्षुधा शमत । 
नित्य भिक्षा मागत । वेळ दोनी म्हणतसे ॥ १०५ ॥ 
एक वेळ घरासी । आणोनि देतों प्रतिदिवसीं । 
भिक्षा दुसरे खेपेसी । करितों भोजन आपण ॥ १०६ ॥ 
ऐसें म्हणतां धौम्यमुनि । तया शिष्यावरी कोपोनि । 
म्हणे भिक्षा वेळ दोनी । आणूनि घरीं देईं पां ॥ १०७ ॥ 
गुरुनिरोपे जेणेपरी । दोनी भिक्षा आणूनि घरी । 
देता जाहला प्रीतिकरीं । मनीं क्लेश न करीच ॥ १०८ ॥ 
गुरेंसहित रानांत । असे शिष्य क्षुधाक्रांत । 
गोवत्स होतें स्तन पीत । देखता जाहला तयासी ॥ १०९ ॥ 
स्तन पीतां वांसुरासी । उच्छिष्ट गळे संधीसी । 
वायां जातें भूमीसी । म्हणोनि आपण जवळी गेला ॥ ११० ॥ 
आपण असे क्षुधाक्रांत । म्हणोनि गेला धांवत ॥ १११ ॥ 
ऐसें क्षीरपान करीं । घेऊनि आपुलें उदर भरी । 
दोनी वेळ भिक्षा घरीं । देतसे भावभक्तीनें ॥ ११२ ॥ 
अधिक पुष्ट जाहला त्याणें । म्हणे गुरु अवलोकून । 
पहा हो याचें शरीरलक्षण । कैसा स्थूळ होतसे ॥ ११३ ॥ 
मागुती पुसे तयासी । कवणेपरी पुष्ट होसी । 
सांगे आपुलेवृत्तांतासी । उच्छिष्ट क्षिर पान करितो ॥ ११४ ॥ 
ऐकोनि म्हणे शिष्यासी । मतिहीन होय उच्छिष्टेसी ।
दोष असे बहुवसी । भक्षूं नको आजिचेनि ॥ ११५ ॥ 
भक्षूं नको म्हणे गुरु । नित्य नाही तया आहारु । 
दुसरे दिवशीं म्हणे येरु । काय करुं म्हणतसे ॥ ११६ ॥ 
येणेपरी गुरेंसहित । जात होता रानांत । 
गळत होतें क्षीर बहुत । एका रुईचे झाडासी ॥ ११७ ॥ 
म्हणे बरवें असे क्षीर । उच्छिष्ट नव्हे निर्धार । 
पान करुं धणीवर । तंव भरिलें अक्षियांते ॥ ११८ ॥ 
पानें तोडूनि कुसरी । तयामध्यें क्षीर भरी । 
 घेत होता धणीवरी । तंव भरिलें अक्षियांते ॥ ११९ ॥ 
तेणें गेले नेत्र दोनी । हिंडतसे रानोवनीं । 
गुरे न दिसती नयनीं । म्हणोनि चिंता करीतसे ॥ १२० ॥ 
काष्ट नाही अक्षिहीन । करीतसे चिंता गोधना । 
गुरें पाहों जातां राना । पडिला एका आडांत ॥ १२१ ॥ 
पडोनियां आडांत । चिंता करी तो अत्यंत । 
आतां गुरें गेलीं सत्य । बोल गुरुचा आला मज ॥ १२२ ॥ 
पडिला शिष्य तया स्थानीं । दिवस गेला अस्तमानीं । 
चिंता करी धौम्यमुनि । अजून शिष्य न येचि कां ॥ १२३ ॥ 
म्हणोनि गेला रानासी । देखे तेथें गोधनासी । 
शिष्य नाहीं म्हणोनि क्लेशी । दीर्घस्वरे पाचारी ॥ १२४ ॥ 
पाचारितां धौम्यमुनि । ध्वनि पडला शिष्यकानीं । 
प्रत्योत्तर देतांक्षणी । जवळी गेला कृपाळू ॥ १२५ ॥ 
ऐकोनियां वृतांत । उपजे कृपा अत्यंत । 
अश्विनी देवा स्तवीं म्हणत । निरोप दिधला तये वेळी ॥ १२६ ॥ 
निरोप देतां तये क्षणी । अश्विनी देवता ध्याय मनीं । 
दृष्टि आली दोनी नयनी । आला श्रीगुरुसन्मुखेसीं ॥ १२७ ॥ 
येवोनि श्रीगुरुसी । नमन केलें भक्तीसीं । 
स्तुति केली बहुवसी । शिष्योत्तमे तये वेळीं ॥ १२८ ॥ 
संतोषोनि धौम्यमुनि । तया शिष्या आलिंगोनि । 
म्हणे शिष्या शिरोमणी । तुष्टलो तुझ्या भक्तीसी ॥ १२९ ॥ 
प्रसन्न होऊनि शिष्यासी । हस्त स्पर्शीं मस्तकेसी । 
वेदशास्रदि त्तक्षणेसी । आली तया शिष्यातें ॥ १३० ॥ 
गुरु म्हणे शिष्यासी । जावें आपुले घरासी । 
विवाहादि करुनि सुखेसी । नांदत ऐस म्हणतसे ॥ १३१ ॥ 
होईल तुझी बहु कीर्ति । शिष्य होतील तुज अत्यंती । 
' उत्तंक ' नाम विख्याति । शिष्य तुझा परियेसीं ॥ १३२ ॥ 
तोचि तुझ्या दक्षिणेसी । आणील कुंडलें परियेसी । 
जिंकोनियां शेषासी । किर्तिवंत होईल ॥ १३३ ॥ 
जन्मेजय रायासी । तोच करील उपदेशी । 
मारवील समस्त सर्पांसी । याग करुनि परियेसा ॥ १३४ ॥ 
तोचि उत्तंक जाऊन । पुढें केला सर्पयज्ञ । 
जन्मेजयातें प्रेरुन । समस्त सर्प मारविले ॥ १३५ ॥ 
ख्याति जाहली त्रिभुवनांत । तक्षक आणिला इंद्रासहित । 
गुरुकृपेचे सामर्थ्य । ऐसे असे परियेसा ॥ १३६ ॥ 
जो नर असेल गुरुदूषक । त्यासी कैंचा परलोक । 
अंतीं होय कुंभीपाक । गुरुद्रोह-पातक्यासी ॥ १३७ ॥ 
संतुष्ट करितां गुरुसी । काय न साधे तयासी । 
वेदशास्र तयासी । लाधे क्षण न लागतां ॥ १३८ ॥ 
ऐसें तूं जाणोनि मानसी । वृथा हिंडसी अविद्येसीं । 
जावें आपुले गुरुपाशीं । तोचि तुज तारील सत्य ॥ १३९ ॥ 
त्याचें मन संतुष्टवितां । तुज मंत्र साध्य तत्त्वता । 
मन करुनि सुनिश्र्चिता । त्वरित जाईं म्हणितलें ॥ १४० ॥ 
ऐसा श्रीगुरु निरोप देतां । विप्र जाहला अतिज्ञाता । 
चरणांवरी ठेवूनि माथा । विनवीतसे तया वेळी ॥ १४१ ॥ 
जय जया गुरुमूर्ति । तूंचि साधन परमार्थी । 
मातें निरोपिलें प्रीतीं । तत्तवबोध कृपेनें ॥ १४२ ॥ 
गुरुद्रोही आपण सत्य । अपराध घडले मज बहुत । 
गुरुचें दुखविलें चित्त । आतां केवीं संतुष्टवावें ॥ १४३ ॥ 
सुवर्णादि लोह सकळ । भिन्न होतां सांधवेल । 
भिन्न होतां मुक्ताफळ । केवीं पुन्हा ऐक्य होय ॥ १४४ ॥ 
अंतःकरण भिन्न होतां । प्रयास असे ऐक्य करितां । 
ऐसे माझे मन पतित । काय उपयोग जीवूनि ॥ १४५ ॥ 
ऐसे शरिर माझे द्रोही । काय उपयोग वांचून पाहीं । 
जीवित्वाची वासना नाहीं । प्राण त्यजीन गुरुप्रति ॥ १४६ ॥ 
ऐसेपरि श्रीगुरुसी । विनवितो ब्राह्मण हर्षी । 
नमूनि निघे वैराग्येसीं । निश्र्चय केला प्राण त्यजूं ॥ १४७ ॥ 
अनुतप्त जाहला तो ब्राह्मण । निर्मळ जाहलें अंतःकरण । 
अग्नि लागतां जैसे तृण । भस्म होय तत्क्षणीं ॥ १४८ ॥ 
जैसा कापूरराशीस । वन्ही लागतां परियेसीं । 
जळोनि जाय त्वरितेसी । तैसे तयासी जहालें ॥ १४९ ॥ 
याकारणें पापासी । अनुतप्त होतां मानसीं । 
क्षालण होय त्वरितेसी । शतजन्मींचे पाप जाय ॥ १५० ॥ 
निर्वाणरुपें द्विजवर । निघाला त्यजूं कलेवर । 
ओळखोनियां जगद्गुरु । पाचारिती तयावेळी ॥ १५१ ॥ 
बोलावोनि ब्राह्मणासी । निरोप देती कृपेसीं । 
 न करी चिंता तूं मानसी । गेले तुझे दुरितदोष ॥ १५२ ॥ 
वैराग्य उपजले तुझ्या मनीं । दुष्कृतें गेली जळोनि । 
एकचित्त करुनि मनी । स्मरें आपुले गुरुचरण ॥ १५३ ॥ 
तये वेळी श्रीगुरुसी । नमन केले चरणासी । 
जगद्गुरु तूंचि होसी । त्रिमूर्तीचा अवतार ॥ १५४ ॥ 
तुझी कृपा होय जरी । पापें कैची या शरीरीं । 
उदय होतां भास्करीं । अंधकार राहे केवी ॥ १५५ ॥ 
ऐसेपरि श्रीगुरुसी । स्तुति करी तो भक्तीसी । 
रोमांचळ उठती हर्षी । सद्गदित कंठ जाहला ॥ १५६ ॥ 
निर्मळ मानसी तयावेळी । माथा ठेवी चरणकमळी । 
विनवीतसे करुणाबहाळी । म्हणे तारीं तारीं श्रीगुरुमूर्ति ॥ १५७ ॥ 
निर्वाण देखोनि अंतःकरण । प्रसन्न जाहला श्रीगुरु आपण । 
मस्तकीं ठेविती कर दक्षिण । तया ब्राह्मणासी परियेसा ॥ १५८ ॥ 
परीस लागतां लोहासी । सुवर्ण होय बावनकसी । 
तैसे तया द्विजवरासी । ज्ञान जाहलें परियेसा ॥ १५९ ॥ 
वेदशास्रादि तात्काळी । मंत्रशास्रे आलीं सकळीं । 
प्रसन्न जहाला चंद्रमौळी । काय सांगूं दैव त्या द्विजाचें ॥ १६० ॥ 
आनंद जाहला ब्राह्मणासी । श्रीगुरु निरोपिती तयासी । 
आमुचें वाक्य तूं परियेसीं । जाय त्वरित आपुले गुरुपाशी ॥ १६१ ॥ 
जावोनियां गुरुपाशी । नमन करी भावेसीं । 
संतोषी होईल भरंवसीं । तोचि आपण सत्य मानीं ॥ १६२ ॥ 
ऐसेपरि श्रीगुरुमूर्ति । तया बाह्मणा संभाषिती । 
निरोप घेऊनियां त्वरिती । गेला आपल्या गुरुपाशीं ॥ १६३ ॥ 
निरोप देऊनि ब्राह्मणासी । श्रीगुरु निघाले परियेसीं । 
' भिल्लवडी ' ग्रामासी । आले भुवनेश्र्वरी-संनिध ॥ १६४ ॥ 
कृष्णापश्र्चिमतटाकेसी । औदुंबर वृक्ष परियेसीं । 
श्रीगुरु राहिले गुप्तेसी । एकचित्तें परियेसा ॥ १६५ ॥ 
सिद्ध म्हणे नामधारकासी । राहिले श्रीगुरु भिल्लवडीसी । 
महिमा जाहली बहुवसी । प्रख्यात तुज सांगेन ॥ १६६ ॥ 
म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । 
ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्टें साधती ॥ १६७ ॥ 
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने 
सिद्ध-नामधारकसंवादे गुरुशुश्रुषणमाहात्म्यवर्णनं 
नाम षोडशोऽध्यायः ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 
Gurucharitra Adhyay 16 
 गुरुचरित्र अध्याय १६


Custom Search

No comments: