Tuesday, October 15, 2013

Gurucharitra Adhyay 19 गुरुचरित्र अध्याय १९


Gurucharitra Adhyay 19 
Gurucharitra Adhyay 19 is in Marathi. It is a story of Oudumbar tree while Guru was resting under Oudumbar. It was a holy tree like Aswatha tree. Guru liked that tree very much hence he was rested under Oudumbar tree. Fruits of Oudumbar are very powerful in eliminating the poison. After killing demon Hiranykashypoo God Narsinha’s nails were paining because of the poison. Then Goddess Laxmi brought fruits of Oudumbar which cool the burn/pains in the nails of God Narsinha. Hence God and Goddess blessed the tree that it will have fruits in all seasons and it will be called as Kalpavruksha. Kalpavruksha tree means a holy tree which will fulfill any wish of the devotee immediately. Further in the story while Guru was resting there, sixty four Yoginis’ use to come there to worship Guru every day. Then they will take Guru to their Nagar (city) which was under Ganga River. The river makes a way for Guru to go to the nagar. It was seen by Ganganuj a Brahmin. Hence he came to know that Guru is a godlike person. He bowed to Guru and asked for blessings. Guru blessed him and decided to go away from the place as there would be chances of other people may come there for asking his blessings. Yoginis’ requested him not to go. However Guru told them that Oudumbar will became very famous as kalpvruksha is there and he will ask Anapurna Mata to rest there only. Then he told them the importance of Oudumbar.
गुरुचरित्र अध्याय १९ 
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्योनमः ॥ 
नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणां । 
करसंपुट जोडून । विनवीतसे तये वेळीं ॥ १ ॥ 
जय जया सिद्ध योगीश्र्वरा । तूंचि ज्योति अंधकारा । 
भक्तजनांच्या मनोहरा । भवसागरतारका ॥ २ ॥ 
अज्ञानतिमिररजनींत । निजलों होतों मदोन्मत्त । 
गुरुचरित्र मज अमृत । प्राशन करविलें दातारा ॥ ३ ॥ 
त्याणें झाले मज चेत । ज्ञानसूर्यप्रकाश होत । 
तुझे कृपेने जागृत । जाहलो स्वामी सिद्धमुनि ॥ ४ ॥ 
पुढील कथाविस्तारा । निरोपावा योगीश्र्वरा । 
कृपा करी गा दातारा । म्हणोनि लागला चरणांसी ॥ ५ ॥ 
ऐकोनि शिष्याचे वचन । संतोषला सिद्ध आपण । 
सांगतसे विस्तारुन । श्रीगुरुमहिमा अनुपम्य ॥ ६ ॥ 
शिष्योत्तमा नामांकिता । सांगेन ऐके गुरुची कथा । 
औदुंबरतळी अतिप्रीता । होते श्रीगुरु परियेसा ॥ ७ ॥ 
ऐकोनि सिद्धाचे वचन । नामधारक करी प्रश्र्न । 
अनेक पुण्यवृक्ष त्यजून । काय प्रीति औदुंबरीं ॥ ८ ॥ 
अश्र्वत्थवृक्ष असे थोर । म्हणोनि सांगती वेद शास्त्र । 
श्रीगुरुप्रीति औदुंबर । कवण कारण निरोपावें ॥ ९ ॥ 
सिद्ध म्हणे नामांकिता । सांगेन याचिया वृतांता । 
जघीं नरसिंह अवतार होता । हिरण्यकश्यपु विदारिला ॥ १० ॥ 
नखेंकरुनि दैत्यासी । विदारिलें कोपेसीं । 
आंतडीं काधूनियां हर्षी । घातली माळ गळां नरहरीनें ॥ ११ ॥ 
त्या दैत्याचे पोटी । विष होते काळकूटी । 
जैसी वडवाग्नि मोठी । तैसे विष परियेसा ॥ १२ ॥ 
विदारण करितां दैत्यासी । वेधले विष त्या नखांसी । 
तापलीं नखें बहुवसी । ऐक शिष्या एकचित्ते ॥ १३ ॥ 
तये समयी महालक्ष्मी । घेऊनि आली अतिप्रेमीं । 
औदुंबरफळ नामी । शांतीकारणे नखांसी ॥ १४ ॥ 
तये वेळी शीतलार्थ । नखें रोविलीं औदुंबरांत । 
विषाग्नि झाला शांत । उग्र नरसिंह शांत झाला ॥ १५ ॥ 
शांत झाला नृसिंहदेव । देता झाला लक्ष्मीसि खेव । 
संतोषोनि उभय देव । वर देती तये वेळी ॥ १६ ॥ 
तया समयीं औदुंबरासी । देती वर हृषीकेशी । 
सदा फळित तूं होसी । ' कल्पवृक्ष ' तुझे नाम ॥ १७ ॥ 
जे जन भजती भकतीसीं । काम्य होय त्वरितेसी । 
तुज देखतांचि परियेसी । उग्र विष शांत होय ॥ १८ ॥ 
जे सेवितील मनुष्यलोक । अखिल काम्य पावोनि ऐक । 
फळ प्राप्त होय निकें । पापावेगळा होय नर ॥ १९ ॥ 
वांझ नारी सेवा करितां । पुत्र होतील तिसी त्वरिता । 
जे नर असतील दैन्यपीडिता । सेवितां होतील श्रियायुक्त ॥ २० ॥ 
तुझे छायीं बैसोन । जे जन करित जपानुष्ठान । 
अनंतफळ होय ज्ञान । कल्पिलें फळ होय त्यांसी ॥ २१ ॥ 
तुझे छायीं जळांत । स्नान करितां पुण्य बहुत । 
भागीरथीस्नान करीत । तितुकें पुण्य परियेसा ॥ २२ ॥ 
तुज सेविती त्या नरासी । व्याधि नव्हती कवणे दिवशीं । 
ब्रह्महत्यादि महादोषी । परिहार होती परियेसा ॥ २३ ॥ 
जें जें कल्पूनि मानसीं । तुज सेविती भावेसीं । 
कल्पना पुरती भरंवसीं । कलियुगीं कल्पवृक्ष तूंचि ॥ २४ ॥ 
सदा वसों तुजपाशी । लक्ष्मीसहित शांतीसी । 
म्हणोनि वर देती हर्षी । नरसिंहमूर्ति तये वेळीं ॥ २५ ॥ 
ऐसा वृक्ष औदुंबरु । कलियुगीं तोचि कल्पतरु । 
नरसिंहमूर्ति होतां उग्रु । शांत झाली तयापाशी ॥ २६ ॥ 
याकारणें श्रीगुरुमूर्ति । नृसिंहमंत्र उपासना करिती । 
उग्रत्वाची करावया शांति । औदुंबरीं वास असे ॥ २७ ॥ 
अवतार आपण तयाचे । स्थान आपुले असे साचे । 
शांतवन करावया उग्रत्वाचे । म्हणोनि वास औदुंबरीं ॥ २८ ॥ 
सहज वृक्ष तो औदुंबर । कल्पवृक्षसमान तरु । 
विशेषें वास केला श्रीगुरु । कल्पिलीं फळें तेथे होती ॥ २९ ॥ 
तया कल्पद्रुमातळीं । होते श्रीगुरु स्तोममौळी । 
ब्रह्मा-विष्णु-नेत्रभाळी । देह मानुषी धरोनियां ॥ ३० ॥ 
भक्तजनां तारणार्थ । पावन करिती समस्त तीर्थ । 
अवतार त्रयमूर्ति गुरुनाथ । भूमीवरी वर्तत असे ॥ ३१ ॥ 
वृक्षातळी अहर्निशी । श्रीगुरु असती गौप्येसी । 
माध्यानकाळसमयासी । समारंभ होय तेथे ॥ ३२ ॥ 
अमरेश्र्वरसंनिधानीं । वसती चौसष्ट योगिनी । 
पूजा करावया माध्यान्ही । श्रीगुरुजवळी येती नित्य ॥ ३३ ॥ 
नमन करुनि श्रीगुरुसी । नेती आपुले मंदिरासी । 
पूजा करिती विधीसी । गंधपरिमळकुसुमें ॥ ३४ ॥ 
आरोगोनि तयां घरीं । पुनरपि येती औदुंबरी । 
एके समयीं द्विजवरी । विस्मय करिती देखोनियां ॥ ३५ ॥ 
म्हणती अभिनव यति कैसा । न करी भिक्षा ग्रामांत ऐसा । 
असतो सदा अरण्यावासा । कवणेपरि काळ कंठी ॥ ३६ ॥ 
पाहूं याचें वर्तमान । कैसा क्रमितो दिनमान । 
एखादा नर ठेवून । पाहों अंत यतीश्र्वराचा ॥ ३७ ॥ 
ऐसें विचारुनि मानसीं । गेले संगमस्थानासी । 
माध्यान्हसमयीं तयांसी । भय उपजले अंतःकरणीं ॥ ३८ ॥ 
पाहूं म्हणती श्रीगुरुचा अंत । तेचि जाती यमपंथ । 
ऐसे विप्र मदोन्मत्त । अधोगतीचे तेचि इष्ट ॥ ३९ ॥ 
उपजतां भय ब्राह्मणांसी । गेले आपुले स्थानासी । 
गंगानुज थडियेसी । होता वृत्ति राखीत ॥ ४० ॥ 
त्याणें देखिले श्रीगुरुसी । आल्या योगिनी पूजेसी । 
गंगेमध्ये नेता कैसी । मार्ग जाहला जळांत ॥ ४१ ॥ 
विस्मय करी तो नरु । म्हणे कैसा यतीश्र्वरु । 
द्विभाग झाला गंगापूरु । केवीं गेलें गंगेंत ॥ ४२ ॥ 
श्रीगुरुते नेऊनि । पूजा केली त्या योगिनीं । 
भिक्षा तेथे करुनि । आले मागुती बाहेर ॥ ४३ ॥ 
पहात होता गंगानुज । म्हणे कैसे जाहले चोज । 
अवतार होईल ईश्र्वरकाज । म्हणोनि पूजिती देवकन्या ॥ ४४ ॥ 
येरे दिवसीं मागुती । हाती घेऊनि आरति । 
देवकन्या ओवाळिती । श्रीगुरुतें नमूनिया ॥ ४५ ॥ 
पुन्हा गंगाप्रवाहांत । श्रीगुरु निघाले योगिनींसहित । 
जो का नर होता पहात । तोहि गेला सवेंचि ॥ ४६ ॥ 
नदीतीरीं जातां श्रीगुरु । द्विभाग जाहलें गंगेंत द्वारु । 
भीतरी दिसे अनुपम्य पुरु । रत्नखचित गोपुरेंसी ॥ ४७ ॥ 
अमरावतीसमान नगर । जैसा तेजें दिनकर । 
श्रीगुरु जातांचि समस्त पुर । घेऊनि आलें आरति ॥ ४८ ॥ 
ओंवाळून आरति । नेलें आपुले मंदिराप्रति । 
सिंहासन रत्नखचितीं । बैसो घालिती तया समयी ॥ ४९ ॥ 
पूजा करिती विधीसी । जे कां उपचार षोडशी । 
अनेकापरी षड्रसेंसीं । आरोगिलें तये वेळी ॥ ५० ॥ 
श्रीगुरु दिसती तया स्थानीं । त्रैमूर्ति जैसा शूलपाणि । 
पूजा घेऊनि त्तक्षणीं । मग परतले तये वेळी ॥ ५१ ॥ 
देखोनियां तया नरासी । म्हणती तूं कां आलासी । 
विनवी तो नर स्वामियासी । सहज आलो दर्शनाते ॥ ५२ ॥ 
 म्हणोनि लागला गुरुचरणीं । तल्लीन होवोनि अंतःकरणीं । 
म्हणे स्वामी गिरिजारमणा । होसी त्रयमूर्ति तूंचि एक ॥ ५३ ॥ 
न कळें तुझें स्वरुपज्ञान । संसारमाया वेष्टून । 
तूं तारक या भवार्णी । उद्धरावें स्वामिया ॥ ५४ ॥ 
तूं तारक विश्र्वासी । म्हणोनि भूमीं अवतरलासी । 
अज्ञान म्हणिजे रजनीसी । ज्योतिःस्वरुप तूंचि एक ॥ ५५ ॥ 
तुझें दर्शन होय ज्यासी । सर्वाभीष्ट फळ होय त्यासी । 
इहपर अप्रयासीं । जोडे नरा न लागतां क्षण ॥ ५६ ॥ 
ऐशापरी तो देखा । स्तुति करितो नर ऐका । 
संतोषूनि गुरुनायकें । आश्र्वासिले तया वेळीं ॥ ५७ ॥ 
श्रीगुरु म्हणती तयासी । तुझें दैन्य गेलें परियेसीं । 
जें जें तूं इच्छिसी मानसीं । सकळाभीष्ट पावशील ॥ ५८ ॥ 
येथील वर्तमान ऐसी । न सांगावें कवणासी । 
जया दिवशीं प्रगट करिसी । तूंतें हानी होईल जाण ॥ ५९ ॥ 
येणेंपरी तयासी । श्रीगुरु सांगती परियेसीं । 
आले औदुंबरापाशीं । गंगानुज समागमें ॥ ६० ॥ 
श्रीगुरुचा निरोप घेऊनि । गेला गंगानुज आपण । 
वृत्तिस्थानीं जातांचि क्षण । निधान त्यासी लाधलें ॥ ६१ ॥ 
ज्ञानवंत झाला नरु । नित्य सेवा करी तो गुरु । 
पुत्रपौत्र श्रियाकरु । महानंदे वर्ततसे ॥ ६२ ॥ 
भक्तिभावें श्रीगुरुसी । नमन करी प्रतिदिवसीं । 
सेवा करी कलत्रेसी । एकोभावेंकरुनियां ॥ ६३ ॥ 
वर्ततां ऐसे एके दिवसीं । आली पौर्णिमा माघमासीं । 
नमन करुनि श्रीगुरुसी । विनवीतसे तो भक्त ॥ ६४ ॥ 
म्हणे स्वामी जगद्गुरु । माघस्नानी प्रयाग थोरु । 
म्हणोनि सांगती द्विजवरु । काशीपुर महाक्षेत्र ॥ ६५ ॥ 
कैसे प्रयाग गयास्थान । कैसे वाराणसी भुवन । 
नेणों आपण यातिहीन । कृपा करणें स्वामिया ॥ ६६ ॥ 
श्रीगुरु म्हणती तयासी । पंचगंगासंगमेसी । 
' प्रयाग ' जाणावें भरंवसीं । ' काशीपुर ' तें जुगुळ ॥ ६७ ॥ 
दक्षिण ' गया ' कोल्हापुर । त्रिस्थळ ऐसे मनोहर । 
जरी पहासी प्रत्यक्षाकार । दावीन तुज चाल आतां ॥ ६८ ॥ 
बैसले होते व्याघ्राजिनीं । धरीं गा मागें दृढ करुनि । 
मनोवेगें तत्क्षणीं । गेले प्रयागा प्रातःकाळीं ॥ ६९ ॥ 
तेथे स्नान करुनि । गेले काशीस माध्याह्नी । 
विश्र्वनाथा दाखवूनि । सवेंचि गेले गयेसी ॥ ७० ॥ 
ऐसी त्रिस्थळी आचरोनि । आले परतोनि अस्तमानीं । 
येणेंपरी तयास्थानीं । देखता झाला तो नर ॥ ७१ ॥ 
विश्र्वनाटक श्रीगुरुमूर्ति । प्रगट झाली ऐसी कीर्ति । 
श्रीगुरु मनीं विचारिती । आतां येथें गौप्य व्हावें ॥ ७२ ॥ 
ऐसेपरी तयास्थानीं । प्रकट झाले श्रीगुरुमुनि । 
अमरेश्र्वराते पुसोनि । निघते झाले तये वेळीं ॥ ७३ ॥ 
श्रीगुरु निघतां तेथोनि । आल्या चौसष्ट योगिनी । 
विनविताति करुणावचनीं । आम्हां सोडूनि केवीं जातां ॥ ७४ ॥ 
नित्य तुमचे दर्शनेसीं । तापत्रय हरती दोषी । 
अन्नपूर्णा तुम्हांपाशीं । केवीं राहूं स्वामिया ॥ ७५ ॥ 
येणेपरी श्रीगुरुसी । योगिनी विनवीती भक्तीसी । 
भक्तवत्सलें संतोषी । दिधला वर तया वेळीं ॥ ७६ ॥ 
श्रीगुरु म्हणती तयांसी । सदा असो औदुंबरेसी । 
प्रकटार्थ जाणे पूर्वेसी । स्थान आमुचे येथेचि असे ॥ ७७ ॥ 
तुम्ही रहावे येथे औदुंबरी । कल्पवृक्ष मनोहरी । 
अन्नपूर्णा प्रीतिकरीं । औदुंबरी ठेवितों ॥ ७८ ॥ 
कल्पवृक्ष औदुंबर । येथे असा तुम्ही स्थिर । 
अमरापुर पश्र्चिम तीर । आम्हा स्थान हेचि जाणा ॥ ७९ ॥ 
प्रख्यात होईल स्थान बहुत । समस्त नर पूजा करीत । 
मनकामना होय त्वरित । तुम्ही त्यांसी साह्य व्हावें ॥ ८० ॥ 
तुम्हांसहित औदुंबरी । आमुच्या पादुका मनोहरी । 
पूजा करिती जे तत्परी । मनकामना पुरती जाणा ॥ ८१ ॥ 
येथे असे अन्नपूर्णा । नित्य करिती आराधना । 
तेणें होय कामना । चतुर्विध पुरुषार्थ ॥ ८२ ॥ 
पापविनाशी काम्यतीर्थ । सिद्धतीर्थी स्नान करीत । 
सात वेळ स्नपन करीत । तुम्हांसहित औदुंबरी ॥ ८३ ॥ 
साठी वर्षे वांझेसी । पुत्र होती शतायुषी । 
ब्रह्महत्या पाप नाशी । स्नानमात्रे त्या तीर्थी ॥ ८४ ॥ 
सोमसूर्यग्रहणेसी । अथवा माघ संक्रांतीसी । 
स्नान करिती भक्तीसी । अनंत पुण्य अश्र्वमेध ॥ ८५ ॥ 
सोमवारी अमावास्येसी । व्यतीपातादि पर्वणीसी । 
स्नान करितां फळे कैसी । ऐका श्रोते एकचित्ते ॥ ८६ ॥ 
श्रृंग-खूर-सुवर्णेसीं । अलंकृत धेनूसी । 
सहस्र कपिला ब्राह्मणांसी । सुरनदीतीरी दिल्हे फळ ॥ ८७ ॥ 
भक्तिभावेंकरुनि देखा । अन्न घालितां ब्राह्मणा एका । 
कोटि ब्राह्मणासी ऐका । भोजन दिल्हें फळ असे ॥ ८८ ॥ 
औदुंबरवृक्षातळी । जप करिती जे मननिर्मळी । 
कोटिगुणे होती फळें । होम केलिया तैसेचि ॥ ८९ ॥ 
रुद्र जपोनि एकादशी । पूजा करिती मनोमानसीं । 
अतिरुद्र केले फळसदृशी । एकचित्ते परियेसा ॥ ९० ॥ 
मंदगति प्रदक्षिणा । करितां होय अनंत पुण्य । 
पदोपदीं वाजपेययज्ञ । फळ तेथे परियेसा ॥ ९१ ॥ 
नमन करितां येणेपरी । पुण्य असे अपरांपरीं । 
प्रदक्षिणा दोन चारी । करुनि करणें नमस्कार ॥ ९२ ॥ 
कुष्ठ असेल अंगहीन । त्याणें करणें प्रदक्षिणा । 
लक्ष वेळ करितां जाणा । देवासमान देह होय ॥ ९३ ॥ 
ऐसें स्थान मनोहरु । सहज असे कल्पतरु । 
म्हणोनि सांगताति गुरु । चौसष्ट योगिनींसी ॥ ९४ ॥ 
ऐसा निरोप देऊन । श्रीगुरु निघाले तेथून । 
जेथे होते गाणगाभुवन । भीमातीरी अनुपम्य ॥ ९५ ॥ 
विश्र्वरुप जगन्नाथ । अखिल ठायीं असे वसत । 
औदुंबरी प्रीति बहुत । नित्य तेथे वसतसे ॥ ९६ ॥ 
गौप्य राहोनि औदुंबरी । प्रकटरुपे गाणगापुरीं । 
राहिले गुरु प्रीतिकरीं । प्रख्यात झाले परियेसा ॥ ९७ ॥ 
सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा आहे ऐसी । 
प्रकट झाले बहुवसी । गाणगापुरीं परियेसा ॥ ९८ ॥ 
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । 
भक्तिपूर्वक ऐकती नर । लाभे चतुर्विध पुरुषार्थ ॥ ९९ ॥ 
गुरुचरित्र कामधेनु । जे ऐकती भक्तजनु । 
त्यांचे घरीं निधानु । सकळाभीष्टें पावती ॥ १०० ॥ 
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने 
सिद्ध-नामधारकसंवादे औदुंबरवृक्षमहिमानं-योगिनीप्रतिदिनदर्शनं 
तथा वरप्रदानं नाम एकोनविंशोध्यायः ॥ 
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
Gurucharitra Adhyay 19 
गुरुचरित्र अध्याय १९


Custom Search

No comments: