Friday, October 25, 2013

Gurucharitra Adhyay 23 गुरुाचरित्र अध्याय २३


Gurucharitra Adhyay 23 
Gurucharitra Adhyay 23 is in Marathi. This is story when Shri Guru was at Gangapur. It was a story of a king who very strongly urged Guru to bless him and his family and the people in his kingdom. King told Guru that he would construct a math for Guru and his disciples. While going to the palace Guru saw an old house wherein a BrahmaRaksha was leaving. He was very cruel and use to eat people also. So people were very afraid of him. However when Guru and king with other people were passing by that demons house, the demon appeared in front of Guru and requested him to bless him. That BrhmaRakshas was tired of his dirty life and he was very honestly requesting Guru. Hence Guru blessed him and asked him to take a bath in Sangam (River) so that he would become free and have a mukti. Thus that Demon was blessed by Guru and became from free from bondage of life. People were also become happy as now there was no fear of demon. 
गुरुाचरित्र अध्याय २३ 
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥ 
विनवी शिष्य नामांकित । सिद्धासी असे विनवीत । 
पुढील कथाविस्तारत । निरोपावें दातारा ॥ १ ॥ 
सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरुची अखिल लीळा । 
तोचि विप्र प्रकट करिता झाला । वांझ महिषी वर्ते ज्याचे गृहीं ॥ २ ॥। 
तया गांवी येरे दिवसीं । क्षारमृतिका वहावयासी । 
मागों आले महिषीसी । द्रव्य देऊं म्हणती दाम ॥ ३ ॥ 
विप्र म्हणे तयांसी । नेदी आपुली दुभती महिषी । 
दावितसे सकळिकांसी । क्षीरभरणें दोनी केळी ॥ ४ ॥ 
करिती विस्मय सकळ जन । म्हणती वांझ दंतहीन । 
काल होती नाकीं खूण । वेसणरज्जू अभिनव ॥ ५ ॥ 
नव्हती गर्भ, वांझ महिषी । कास नव्हती; दुभे कैसी । 
वार्ता फांकली विस्तारेसीं । तया ग्रामाधिपतीप्रति ॥ ६ ॥ 
पाहे पां वांझ महिषीसी । क्षीर कैसें उत्पन्नेसी । 
श्रीगुरुमहिमा असे ऐशी । आले सकळ देखावया ॥ ७ ॥ 
विस्मय करुनि तये वेळी । अधिपती आला तयाजवळी । 
नमन करुनि चरणकमळीं । पुसतसे वृत्तांत ॥ ८ ॥ 
विप्र म्हणे तयासी । असे संगमी संन्यासी । 
त्याची महिमा आहे ऐसी । होईल त्रिमूर्तीचा अवतार ॥ ९ ॥ 
नित्य आमुच्या मंदिरासी । येती श्रीगुरु भिक्षेसी । 
वरो नव्हती कालचे दिवशी । क्षीर आपण मागितले ॥ १० ॥ 
वांझ म्हणतां रागेजोनि । म्हणे क्षीर दोहा जाऊनि । 
वाक्य त्याचें निघतां मुखानीं । कामधेनूपरी जाहली ॥ ११ ॥ 
विप्रवचन परिसोनि । गेला तो राजा धांवोनि । 
सर्व दळ श्रृंगारोनि । आपुले पुत्रकलत्रसहित ॥ १२ ॥ 
लोटांगणी श्रीगुरुसी । जाऊनि राजा भक्तीसी । 
नमन केलें साष्टांगेसीं । एकोभावेंकरोनियां ॥ १३ ॥ 
जय जया जगद्गुरु । त्रयमूर्तीचा अवतारु । 
तुझी महिमा अपरांपरु । अशक्य आम्हां वर्णितां ॥ १४ ॥ 
नेणों आम्ही मंदमति । मायामोह-अंधकारवृत्ति । 
तूं तारक जगज्ज्योति । उद्धारावें आपणयातें ॥ १५ ॥ 
अविद्या मायासागरीं । बुडालों असो घोरांघारी । 
विश्र्वकर्ता तारी तारी । म्हणोनि चरणीं लागला ॥ १६ ॥ 
विश्र्वकर्मा तूंचि होसी । हेळामात्रें सृष्टि रचिसी । 
आम्हां तुंवा दिसतोसि । मनुष्यरुप धरुनि ॥ १७ ॥ 
वर्णावया तुझी महिमा । स्तोत्र करितां अशक्य आम्हां । 
तूंचि रक्षिता केशव्योमा । चिन्मयात्मा जगद्गुरु ॥ १८ ॥ 
येणेंपरी श्रीगुरुसी । स्तोत्र करी तो बहुवसी । 
श्रीगुरुमूर्ति संतोषीं । आश्र्वासिती तये वेळीं ॥ १९ ॥ 
संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । तया रायातें पुसती । 
आम्ही तापसी असों यति । अरण्यवास करीतसों ॥ २० ॥ 
काय कारण आम्हांपाशीं । येणें तुम्ही संभ्रमेसीं । 
कलत्रपुत्रसहितेसीं । कवण कारण सांग मज ॥ २१ ॥ 
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । राजा विनवी कर जोडून । 
तूं तारक भक्तजना । अरण्यवास काय असे ॥ २२ ॥ 
उद्धरावया भक्तजनां । कीजे अवतार नारायणा । 
वसें जैसे भक्तमना । संतुष्टावें तेणेपरी ॥ २३ ॥ 
ऐशी तुझी ब्रीदख्याति । वेदपुराणें वाखाणिती । 
भक्तवत्सल तूंचि मूर्ति । विनंति माझी अवधारीं ॥ २४ ॥ 
गाणगापुर महास्थान । स्वामी करावें पावन । 
नित्य येथें अनुष्ठान । वास करणें ग्रामांत ॥ २५ ॥ 
मठ करुनि तये स्थानी । असावे आम्हां उद्धारोनि । 
म्हणोनि लागे श्रीगुरुचरणी । भक्तिपूर्वक नरेश्र्वर ॥ २६ ॥ 
श्रीगुरु मनी विचारिती । प्रकट होणें आली गति । 
क्वचित काळ येणे रीतीं । वसणे घडे इये स्थानीं ॥ २७ ॥। 
भक्तजनतारणार्थ । पुढें असे कारणार्थ । 
राजयाचे मनोरथ । पुरवूं म्हणती तये वेळी ॥ २८ ॥ 
ऐसे विचारोनि मानसीं । निरोप देती नगराधिपासी । 
जैसी तुझ्या मानसीं । भक्ति असे तैसे करी ॥ २९ ॥ 
श्रीगुरुवचन ऐकोनि । संतोष झाला बहु मनी । 
बैसवोनि सुखासनीं । समारंभे निघाला ॥ ३० ॥ 
नानापरींचीं वाजंतरेसीं । गीतवाद्यें मंगळ घोषेसी । 
मृदंग काहाळ निर्भरेसीं । वाजताति मनोहर ॥ ३१ ॥ 
यानें छत्रपताकेंसी । गजतुरंगशृंगारेसीं । 
आपुले पुत्रकलत्रेंसीं । सवें चालती सेवा करीत ॥ ३२ ॥ 
वेदघोष द्विजवरी । करिताति नानापरी । 
वाखाणिती बंदिकारी । ब्रीद तया त्रिमूर्तींचें ॥ ३३ ॥ 
येणेपरी ग्रामाप्रती । श्रीगुरु आले अतिप्रीतीं । 
अनेकपरी आरति । घेऊनि आले नगरलोक ॥ ३४ ॥ 
ऐसा संमारंभ थोर । करिता झाला नगरेश्र्वर । 
संतोषोनि श्रीगुरु । प्रवेशले नगरांत ॥ ३५ ॥ 
तया ग्रामीं पश्र्चिमदिशीं । असे अश्वथ उन्नतेसी । 
तयाजवळी गृह वोसी । असे एक भयानक ॥ ३६ ॥ 
तया वृक्षावरी एक । ब्रह्मराक्षस भयानक । 
वसतसे तेथे ऐक । समस्त प्राणिया भयंकरु ॥ ३७ ॥ 
ब्रह्मराक्षस महाक्रूर । मनुष्यमात्रां करी आहार । 
त्याचे भय असे थोर । म्हणोनि वोस गृह तेथें ॥ ३८ ॥ 
श्रीगुरुमूर्ति तया वेळीं । आले तया वृक्षाजवळी । 
ब्रह्मराक्षस तात्काळी । येऊनि चरणीं लागतसे ॥ ३९ ॥ 
कर जोडूनि श्रीगुरुसी । विनवीतसे भक्तिसी । 
स्वामी माते तारी तारी ऐसी । घोरांघारी बुडालो ॥ ४० ॥ 
तुझे दर्शनमात्रेसी । गेले माझे आर्जव दोषी । 
तूं कृपाळू सर्वभूतांसी । उद्धरावें आपणातें ॥ ४१ ॥ 
कृपाळूमूर्ति श्रीगुरु । त्याचे मस्तकी ठेविती करु । 
मनुष्यरुपें होऊनि येरु । लोळतसे चरणकमळीं ॥ ४२ ॥ 
श्रीगुरु म्हणती तयासी । त्वरित जाईं संगमासी । 
स्नान करितां मुक्त होसी । पुनरावृत्ति नव्हे तुज ॥ ४३ ॥ 
श्रीगुरुवचन ऐकोन । करी राक्षस संगमी स्नान । 
कलेवर सोडून । मुक्त झला तत्क्षणीं ॥ ४४ ॥ 
विस्मय करिती सकळ लोक । म्हणती होईल मूर्ति एक । 
हरि-अज-पिनाक । हाचि सत्य होईल ॥ ४५ ॥ 
राहिले गुरु तया स्थानीं । मठ केला तत्क्षणीं । 
नराधिपशिरोमणि । भक्तिभावे वळगतसे ॥ ४६ ॥ 
भक्ति करी तो नरेश्र्वरु । पूजा नित्य अपरांपरु । 
परोपरी वाजंतरु । गीतवाद्ये पूजीतसे ॥ ४७ ॥ 
श्रीगुरु नित्य संगमासी । जाती अनुष्ठानकालासी । 
नराधिप भक्तींसी । सैन्यासहित आपण जाय ॥ ४८ ॥ 
माध्यान्हकाळीं परियेसीं । श्रीगुरु येती मठासी । 
सैन्यासहित आनंदेसी । नमन करी नराधिप ॥ ४९ ॥ 
एखादे समयी श्रीगुरुनाथ । बैसवी आपुलिया आंदोलिकेंत । 
सर्व दळ सैन्यासहित । घेऊनि जाय वनांतरा ॥ ५० ॥ 
भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति । भक्ताधीन आपण असती । 
जैसा संतोष त्याचे चित्तीं । तेणेंपरी रहाटती देखा ॥ ५१ ॥ 
समारंभ होय नित्य । ऐकती लोक सकस्त । 
प्रकाश झाला लौकिकमतें । ग्रामांतरी सकळै जना ॥ ५२ ॥ 
' कुमसी ' म्हणजे ग्रामासी । होता एक तापसी । 
' त्रिविक्रमभारती ' नाम त्यासी । वेद तीन जाणतसे ॥ ५३ ॥ 
मानसपूजा नित्य करी । सदा ध्याय नरहरी । 
त्याणें ऐकिलें गाणगापुरीं । असे नरसिंहसरस्वती ॥ ५४ ॥ 
ऐके त्याची चरित्रलीला । मनीं म्हणे दांभिक माळा । 
हा काय खेळ चातुर्थाश्रमाला । म्हणोनि मनीं निंदा करी ॥ ५५ ॥ 
ज्ञानमूर्ति श्रीगुरुनाथ । सर्वत्रांच्या मनींचे जाणत । 
यतीश्र्वर निंदा करीत । म्हणोनि ओळखे मानसीं ॥ ५६ ॥ 
सिद्ध म्हणे नामांकिता । पुढें अपूर्व जाहली कथा । 
मन करुनि सावधानता । एकचित्तें परिसावें ॥ ५७ ॥ 
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । 
ऐकतां होय मनोहर । सर्वाभीष्टे पाविजे ॥ ५८ ॥ 
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे ब्रह्मराक्षसमुक्तकरणं नाम त्रयोविंशोऽध्यायः ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Gurucharitra Adhyay 23 
गुरुाचरित्र अध्याय २३


Custom Search

No comments: