Tuesday, December 17, 2013

Gurucharitra Adhyay 41 Part 1/4 गुरुचरित्र अध्याय ४१भाग १/४


Gurucharitra Adhyay 41 
Gurucharitra Adhyay 41 is in Marathi. In this Adhyay ShriGuru is telling the way Guru-Bhakti is done by performing Vishveshwar Yatra. It is in detail Yatra of Pious city Kashi. The Yatra is very hard to perform and complete. However Because of his devotion towards his Guru the devotee could complete it. In turn he received the knowledge, Ashta Siddhies, Chaturvidha Purushartha and everthing by the blessings of Guru. Name of this Adhyay is Kashi Yatra-Tvashta-Putra Aakhyan Sayandev-var-Labho.
There are four parts only for Text purpose. However video is for full for Adhyay 41.
गुरुचरित्र अध्याय ४१ भाग १/४
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक शिष्य देखा । उभा राहोन सन्मुखा ।
कर जोडूनि ऐका । नमन करी साष्टांगीं ॥ १ ॥
जय जया सिद्धमुनि । तूं तारक या भवार्णीं ।
नाना धर्म विस्तारोनि । श्रीगुरुचरित्र निरोपिलें ॥ २ ॥
तेणें धन्य जाहलों आपण । प्रकाशविलें महाज्ञान ।
सुधारस गुरुस्मरण । प्राशन करविलें दातारा ॥ ३ ॥
एक असे माझी विनंति । निरोपावें आम्हांप्रति ।
आमुचे पूर्वजें कवणे रीती । सेवा केली श्रीगुरुची ॥ ४ ॥ तुम्ही सिद्ध महाज्ञानी । होतां श्रीगुरुसन्निधानीं ।
शिष्य जाहले कवणे गुणीं । निरोपावें स्वामिया ॥ ५ ॥
ऐकोनि शिष्याचें वचन । सिद्ध सांगे विस्तारुन ।
एकचित्तें करोनि मन । ऐक शिष्या नामधारका ॥ ६ ॥
पूर्वी कथा सांगितलें । जे कां श्रीगुरुसी भेटले ।
वासरग्रामीं होते भले । पूर्वज तुमचे परियेसा ॥ ७ ॥
तयाचें नाम सायंदेव । केली पूजा भक्तिभावें ।
त्यावरी प्रीति अतिस्नेह । आमुचे श्रीगुरुमूर्तीचा ॥ ८ ॥
तेथूनि आले दक्षिणदिशीं । गाणगापुरीं परियेसीं ।
ख्याति जाहली दाही दिशीं । कीर्ति वाढली बहुतेपरी ॥ ९ ॥
ऐकोनि येती सकळ जन । करिती श्रीगुरुचे दर्शन । 
जे जे मनींची वासना । पूर्ण होय परियेसा ॥ १० ॥
येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । होते गाणगापुरीं ख्याति ।
नाम ' नृसिंहसरस्वती ' । भक्तवत्सल अवधारीं ॥ ११ ॥
तुमचा पूर्वज जो कां होता । ' सांयदेव ' नामें ख्यात ।
त्याणें ऐकिला वृत्तांत । महिमा श्रीगुरु यतीचा ॥ १२ ॥
भक्तिपूर्वक वेगेसी । आला गाणगापुरासी ।
आनंद बहु मानसीं । हर्षें निर्भर होऊनियां ॥ १३ ॥
दुरुनि देखतां गाणगाभुवन । आपण घाली लोटांगण ।
करीतसे दंडप्रणाम । येणेंपरी पातला ॥ १४ ॥
दंडप्रणाम करीत । गेला विप्र मठांत । 
देखिलें रुप मूर्तिमंत । परात्पर श्रीगुरुचें ॥ १५ ॥
साष्टांगीं नमस्कारीत । असे चरणीं लोळत ।
केशेंकरुनि पाद झाडित । भक्तिभावें परियेसा ॥ १६ ॥
करसंपुट जोडोनि । स्तुति करी एकोध्यानीं ।
त्रैमूर्ति तूंचि म्हणोनि । म्हणे श्रीगुरुस्वामियां ॥ १७ ॥
धन्य धन्य जन्म आपुलें । कृतार्थ माझे पितृ झाले ।
कोटिजन्म-पाप गेलें । म्हणोनि चरणीं लागला ॥ १८ ॥
जय जया गुरुमूर्ति । परमात्मा परंज्योति ।
त्राहि त्राहि विश्र्वपति । नृसिंहसरस्वती स्वामिया ॥ १९ ॥
तुझे चरण वर्णावयासी । शक्ति कैची आम्हांसी ।
परमात्मा तूंचि होसी । भक्तवत्सला स्वामिया ॥ २० ॥
तुमच्या चरणाची प्रौढी । वसती तेथें तीर्थें क्रोडी ।
वर्णिती श्रुति घडोघडी । ' चरणं पवित्रं विततं पुराणं ॥ २१ ॥
त्रैमूर्तीचा अवतार । मज दिससी साक्षात्कार ।
भासतसे निरंतर । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥ २२ ॥
' ब्रह्मा ' तूंचि केवळ । हातीं दंड कमंडल ।
अमृत भरलें सदा जळ । प्रोक्षितां प्रेतासी जीव येती ॥ २३ ॥
दंड धरिला याकारणें । शरणागतातें रक्षणें । 
दुरितदैन्य निवारणें । भक्तवत्सल तूंचि होसी ॥ २४ ॥
रुद्राक्षमाळा भस्मधारण । व्याघ्रचर्माचें आसन ।
अमृतदृष्टि इंदुनयना । क्रूरदृष्टि अग्नि-सूर्य ॥ २५ ॥
चतुर्विध पुरुषार्थासी । भक्तजना तूंचि देसी ।
तूंचि ' रुद्र ' सत्य होसी । नृसिंह-सरस्वती जगद्गुरु ॥ २६ ॥
' विष्णु ' ऐसे तुझे गुण । पीतांबर पांघरुण ।
तीर्थ समस्त तुझे चरण । कामना पुरती भक्तांच्या ॥ २७ ॥
वांझेसी कन्या-पुत्र देसी । शुष्क काष्ठा वृक्ष करिसी ।
दुभविली वांझ महिषी । अन्नपूर्णा तुम्हां जवळी ॥ २८ ॥
विष्णुमूर्ति तूंचि जाण । साक्षी पावावया कारण ।
त्रिविक्रमभारतीसी खूण । विश्र्वरुप दाविलेंसी ॥ २९ ॥
म्हणविले वेद पतिताकरवीं । अपार महिमा जाहली पूर्वी ।
त्रैमूर्ति अवतारुनि पृथ्वी । आलेति भक्त तारावया ॥ ३० ॥
येणेपरी स्तोत्र करी । पुनः पुनः नमस्कारी । 
सद्गदित कंठ भारी । रोमांचळ उठियेले ॥ ३१ ॥
आनंदजल लोचनीं । निघे संतोषें बहु मनीं ।
नवरस भक्तीकरुनि । स्तुति केली श्रीगुरुची ॥ ३२ ॥
संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा आश्र्वासिती ।
माथां हस्त ठेविती । परम भक्त तूंचि आम्हां ॥ ३३ ॥
तुवां जे कां स्तुति केली । तेणें माझें मन धालें ।
तुज ऐसें वरदान दिधलें । वंशोवंशीं माझे दास ॥ ३४ ॥
ऐसा वर देऊनि । श्रीगुरुमूर्ति संतोषोनि ।
मस्तकीं हस्त न्यासूनि । म्हणती जाईं संगमासी ॥ ३५ ॥
स्नान करुनि संगमासी । पूजा करीं गा अश्र्वत्थासी ।
त्वरित यावें मठासी । भोजन करीं आम्हां-पंक्ती ॥ ३६ ॥
येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । तया वि प्रा निरोप देती ।
गुरुनिरोप जेणें रीतीं । आला तो स्नान करुनि ॥ ३७ ॥
षोडशोपचारें श्रीगुरुसी । पूजा करी भक्तीसीं ।
अनेक परीचे पक्वानेंसीं । भिक्षा केली श्रीगुरुतें ॥ ३८ ॥
भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा आपुले पंक्तीं ।
समस्त शिष्यांहूनि प्रीतीं । ठाव देती आपलेजवळी ॥ ३९ ॥
भोजन जाहलें श्रीगुरुसी । शिष्यांसहित विप्रांसी ।
संतोषोनि आनंदेसीं । बैसले होते मठांत ॥ ४० ॥
तया विप्र-सायंदेवासी । श्रीगुरु पुसती प्रियेसी । 
" तुझें स्थान कवण देशीं । कलत्र पुत्र कोठें असती ॥ ४१ ॥
पुसती क्षेमसमाधान । " कैसे तुमचें वर्तमान " ।
कृपा असे परिपूर्ण । म्हणोनि पुसती संतोषें ॥ ४२ ॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सायंदेव सांगे विस्तारुन ।
" कन्या पुत्र बंधुजन । क्षेम असती स्वामिया ॥ ४३ ॥
उत्तरकंची म्हणिजे ग्रामीं । वसोनि असतों आम्ही ।
तुझे कृपेनें समस्त क्षेमी । असों देवा कृपासिंधु ॥ ४४ ॥
पुत्रवर्ग बंधुजन । करिती संसारयातना ।
आपुली मनींची वासना । करीन सेवा श्रीगुरुची ॥ ४५ ॥
सेवा करीत श्रीचरणांपाशीं । असेन स्वामी परियेसीं ।
ऐसा माझे मानसीं । निर्धार असे देवराया ॥ ४६ ॥
ऐकोनि तयाचें वचन । श्रीगुरु म्हणती हांसोन ।
" आमुची सेवा असे कठिण । आम्हां वास बहुतां ठायीं ॥ ४७ ॥
एके समयीं अरण्यांत । अथवा राहूं नगरांत ।
आम्हांसवें कष्ट बहुत । तुम्ही केवी साहूं शका ॥ ४८ ॥
येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा निरोपिती ।
ऐकोनि विनवी मागुती । म्हणे स्वामी अंगीकारु ॥ ४९ ॥
गुरुची सेवा करी जो नर । तोचि उतरे पैलपार ।
त्यासी कैचें दुःख घोर । सदा सुखी तोचि होय ॥ ५० ॥ चतुर्विध पुरुषार्थ । देऊं शके श्रीगुरुनाथ । 
त्यासी नाहीं यमपंथ । गुरुभक्ति करणें मुख्य ॥ ५१ ॥
येणेंपरी श्रीगुरुसी । सायंदेव भक्तीसीं ।
विनवीतसे परियेंसी । संतोषले श्रीगुरुमूर्ति ॥ ५२ ॥
श्रीगुरु तया विप्रा म्हणती । जैसे असेल तुझे चित्तीं ।
दृढ असेल मनीं भक्ती । तरीच करणें अंगीकार ॥ ५३ ॥
स्थिर करोनि अंतःकरण । करिता सेवा श्रीगुरुचरण ।
झाले मास तीन जाण । ऐक शिष्या नामकरणी ॥ ५४ ॥
वर्ततां ऐसें एके दिवशीं । श्रीगुरु गेले संगमासी ।
सवें घेतलें तयासी । समस्तांतें वारोनि ॥ ५५ ॥
भक्ताचे अंतःकरण । पहावया गेले श्रीगुरु आपण ।
पूर्वज तुमचा भोळा जाण । जातसे समागमें ॥ ५६ ॥
भक्तासहित संगमासी । गेले श्रीगुरु निशि-समयासी ।
बैसते जाहले अश्र्वत्थासी । सुखगोष्टी करीत देखा ॥ ५७ ॥
दिवस गेला अस्तमानीं । श्रीगुरु विचार करिती मनीं ।
दृढ याचें अंतःकारण । कैसें असे पाहूं म्हणती ॥ ५८ ॥
उठविती वारा अवचिती । तेणें वृक्ष पडों पाहती ।
पर्जन्य आला महाख्याती । मुसळधारा वर्षती ॥ ५९ ॥
जो कां विप्र होता जवळी । सेवा केली तये वेळीं ।
आश्रय केला वृक्षातळीं । वस्त्रेंकरुनि श्रीगुरुसी ॥ ६० ॥
पर्जन्य वारा समस्त देखा । साहिलें आपण भावें एका ।
उभा राहोनि सन्मुखा । सेवा करी परियेसा ॥ ६१ ॥
येणें याम दोनी । पर्जन्य आला महा क्षोणी ।
आणिक वारा उठोनि । वाजे शीत अत्यंत ॥ ६२ ॥
श्रीगुरु म्हणती विप्रासी । शीत जाहलें बहुवसी ।
तुवां जाऊनि मठासी । अग्नि आणावा शेकावया ॥ ६३ ॥
श्रीगुरुनिरोपें तत्क्षणीं । एकोभाव धरोनि मनीं ।
निघाला विप्र महाज्ञानीं । आणावया वैश्र्वानर ॥ ६४ ॥
निघाला शिष्य देखोनि । श्रीगुरु म्हणती हांसोनि ।
नको पाहूं आपुले नयनीं । उभयपार्श्र्वीं परियेसा ॥ ६५ ॥
श्रीगुरुनिरोप जेणेंपरी । निघता जाहला झडकरी ।
न दिसे वाट अंधकारीं । खुणें खुणें जातसे ॥ ६६ ॥
अंधकार महाघोर । पाऊस पडे धुरंधर ।  
न दिसे वाट-परिकर । जातो भक्त परियेसा ॥ ६७ ॥
मनीं ध्याय श्रीगुरुसी । जातो मार्गे परियेसीं ।
लवतां वीज संधीसी । तेणें तेजेंसीं जातसे ॥ ६८ ॥
येणेंपरी द्विजवर । पावला त्वरित गाणगापुर ।
वेशीपाशी जाऊनि थोर । हांकारिलें द्वारपाळा ॥ ६९ ॥
तयासी सांगतां वृत्तांत । आणूनि दिधला अग्नि त्वरित ।
तों घालूनियां भांडियांत । घेवोनि गेला परियेसा ॥ ७० ॥
न दिसे मार्ग अंधकार । विजेच्या तेजें जातो नर ।
मनीं करीतसे विचार । श्रीगुरुंनीं मातें निरोपिलें ॥ ७१ ॥
' दोन्हीकडे न पाहें ' म्हणती । श्रीगुरु मातें निरोप देती ।
याची कैसी आहे स्थिति । म्हणोनि पाहे तये वेळीं ॥ ७२ ॥
आपुलें दक्षिणदिशेसी । पहातां देखे सर्पासी ।
भिऊनि पळतां उत्तरेसी । अद्भुत दिसे महानाग ॥ ७३ ॥
पांच फडेचे दिसती दोनी । सवेंचि येताती धांवोनि ।
विप्र भ्याला आपुले मनीं । धांवतसे भिऊनियां ॥ ७४ ॥
वाट सोडूनियां जाय रानीं । सवेंचि येती सर्प दोनी ।
तेव्हा विप्र भिवोनि । अतिशीघ्र जातसे ॥ ७५ ॥
स्मरता जाहला श्रीगुरुसी । एकोभावें धैर्येंसी । 
जातो विप्र शीघ्रेसीं । पातला संगमाजवळिके ॥ ७६ ॥   
दुरुनि देखे श्रीगुरुसी । सहस्त्रदीपज्योतींसीं ।
दिसती विप्र बहुवसी । वेदध्वनि ऐकतसे ॥ ७७ ॥
जवळी जातां द्विजवरु । एकले दिसती श्रीगुरु ।
गेला समस्त अंधकारु । दिसे चंद्र पौर्णिमेचा ॥ ७८ ॥
प्रज्वाल्य केलें अग्नीसी । उजेड झाला बहुवसी ।
झाला विप्र सावधेसी । पाहतसे श्रीगुरुतें ॥ ७९ ॥
दोन्ही सर्प येऊनि । श्रीगुरुतें वंदोनि ।
सवेंचि गेले निघोनि । पूर्वीच विप्र भ्याला असे ॥ ८० ॥
श्रीगुरु पुसती विप्रासी । कां गा भयाभीत झालासी ।
आम्हीं तूंते रक्षावयासी । सर्प दोन्ही पाठविले ॥ ८१ ॥ 
न धरी भय आतां कांहीं । आमुची सेवा कठीण पाहीं ।
विचारुनि आपुल्या देहीं । अंगीकरावी गुरुसेवा ॥ ८२ ॥
गुरुभक्ति म्हणजे असे कठीण । दृढभक्तीनें सेवा करणें ।
कळिकाळातें न भेणें । तया शिष्यें परियेसा ॥ ८३ ॥
सायंदेव तयावेळी । लागतसे श्रीगुरुचरणकमळीं ।
विनवीतसे करुणाबहाळीं । कृपा करी म्हणोनियां ॥ ८४ ॥
गुरुभक्तीचा प्रकारु । निरोपावा मातें श्रीगुरु ।
जेणें माझें मन स्थिरु । होऊनि राहे तुम्हांजवळी ॥ ८५ ॥
श्रीगुरु म्हणती विप्रासी । सांगेन कथा असे सुरसी ।
न गमे वेळ रात्रीसी । ब्राह्ममुहूर्त होय तव ॥ ८६ ॥
पूर्वी कैलासशिखरेसी । बैसला होता व्योमकेशी ।
अर्धांगी पार्वती सरसी । एकांती होती ते जाणा ॥ ८७ ॥
गिरिजा पुसे ईश्र्वरासी । ' गुरुभक्ति ' म्हणजे आहे कैशी ।
विस्तारुनि आम्हांसी । सांगा म्हणे तये वेळीं ॥ ८८ ॥
शंभु सांगे गिरीजेसी । सर्व साध्य गुरुभक्तीसी ।
करावी एकोभावेसी । जोचि शिव तोचि गुरु ॥ ८९ ॥
तयाचें एक आख्यान । सांगेन तुज विस्तारुन ।
एकचित्त करोनि मन । ऐक गिरिजे म्हणतसे ॥ ९० ॥
गुरुभक्तीचें सुलभपण । तात्काळ साध्य होय जाण ।
अनेक तप अनुष्ठान । करितां विलंब परियेसा ॥ ९१ ॥
नानातप अनुष्ठान । करिती यज्ञ महादान ।
त्यातें होय महाविघ्न । साध्य होतां दुर्लभ ॥ ९२ ॥
जो गुरुभक्ति करील । साध्य होय तात्काळ ।
यज्ञ-दान-तपफळ । सर्व सिद्धि त्यासी होय ॥ ९३ ॥
सुलभ असे अप्रयास । जे जाणती गुरुचा वास ।
एकोभावें धरोनि कास । आराधावा श्रीगुरु ॥ ९४ ॥
याचा एक दृष्टांत । सांगेन एक असे विचित्र ।
ब्रह्मयाचा अवतार व्यक्त । ' त्वष्टा ' ब्रह्मा परियेसा ॥ ९५ ॥
त्यासी जाहला एक पुत्र । अतिलावण्य सुंदर ।
सकल कर्मकुशल धीर । योग्य झाला उपनयना ॥ ९६ ॥
त्वष्टाब्रह्मा पुत्रासी । व्रतबंध करी परियेसीं ।
करावया विद्याभ्यासी । गुरुचे घरीं निरविला ॥ ९७ ॥
गुरुची सेवा नानापरी । करीतसे ब्रह्मचारी ।
वर्ततां ऐसें येणेंपरी । अपूर्व एक वर्तलें ॥ ९८ ॥
वर्ततां ऐसें एके दिवशीं । आला पर्जन्य बहुवसी ।
पर्णशाळा परियेसीं । गळत होती गुरुची ॥ ९९ ॥
तया वेळीं शिष्यासी । निरोप दिधला गुरु कैसी ।
त्वरित करावें आम्हांसी । गृह एक दृढ ऐसें ॥ १०० ॥
पर्णशाळा प्रतिवर्षी । जीर्ण होत परियेसीं ।
गृह करावें दृढेसीं । कधीं जीर्ण नव्हे ऐसें ॥ १०१ ॥
न तुटे कधीं, राहे स्थिर । दिसावे रम्य मनोहर ।
असावें सर्व परिकर । शीघ्र करीं गा ऐसें गृह ॥ १०२ ॥
ऐसा गुरु निरोप देती । तेचि समयीं गुरुची सती ।
सांगतसे अतिप्रीतीं । मातें कंचुकी आणावी ॥ १०३ ॥   नसेल विणली अथवा शिवली । विचित्रें रंगी पाहिजे केली ।
माझे अंगाप्रमाणें वहिली । त्वरित आणीं म्हणतसे ॥ १०४ ॥  
गुरुपुत्र म्हणे त्यासी । मागेन ऐक तुम्हांसी ।
पादुका आणाव्या मज ऐसी । चाले जैसी उदकावरी ॥ १०५ ॥
अथवा चिखल न लागे तयांसी । न व्हावी अधिक पायांसी ।
जेथें चिंतूं मानसी । तेथें घेऊनि जाय ऐसी ॥ १०६ ॥
इतुकिया अवसरीं । गुरुकन्या काय करी ।
जातां त्याचा पालव धरी । आपणासी कांहीं आणावें ॥ १०७ ॥
तानवडें दोनी आपणासी । घेऊनि यावें परियेंसीं ।
आणिक आपणा खेळावयासी । घरकूल एक आणावें ॥ १०८ ॥
कुंजराचे दंतें बरवें । घरकूल तुवां करावें ।
एकस्तंभी असावें । कधीं न तुटे नोहे जीर्ण ॥ १०९ ॥
जेथें ठेवीं मी तेथें यावें । सोपस्कारासहित आणावें ।
पाट ठाणवीं असावें । तया घराभीतरीं ॥ ११० ॥
Gurucharitra Adhyay 41 
गुरुचरित्र अध्याय ४१


Custom Search

No comments: