Friday, November 6, 2015

Shri Navanath Bhaktisar Adhyay 6 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सहावा ( ६ ) भाग २/२


Shree Navanath Bhaktisar adhyay 6 
Shree Navanath Bhaktisar adhyay 6 Machchindra visited Baramalhar temple then Kumar Daivat in Konkan. Then he came to Kudal tahasil in the village Aadul. In the outskirt of the village on the hill there is a temple of Kalika devi or Bhadrakali devi. Devi was a God Shiva's weapon helped God in many wars against Demons. As such being restless requested to allow to be on the earth And have a peace. God Shiva agreed and thus that temple was of Kalika devi. Machchhindra came in the temple and requested devi to be helpful in his endeavour of Kavitva. Devi was very angry and told him that she came here for rest hence not to disturb her. Again Machchhindra requested her. So she was very angry and a war started in between them. In the war Machchindra defeated devi who called God Shiva. God Shiva appeared there immediately. He stopped their war and asked Devi to be helpful in Machchhindra's Kavitva which is for the betterment of the people. Thus there is a very long description of the war in between Machchhindra and Kalika devi in this Adhyay 6. In the Next Adhyay DhudiSut Malu from Narhari Vansha will be telling us about Machchhindra and Virbhadra and what happened in between them.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सहावा ( ६ ) भाग २/२
मग तो एकचि दणदणाट । झाला सबळ ब्रह्मांडस्फोट ।
विमानीं पळविती देवता वाट । चुकारपणीं मिरवतसे ॥ ८१ ॥
दोन्ही अस्त्रें बळवंत । एकमेकांतें प्रहार करीत ।
जेणें प्रहारें भयाभीत । दाही दिशा तैं होती ॥ ८२ ॥
परी ती काळी अस्त्रदैवत । तिणे ग्रासिलें वासवशक्तीतें ।
मग अति क्रूर होऊनि उन्मत्त । मच्छिंद्रावरी चालिली ॥ ८३ ॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ । करीं कवळी भस्म चिमुटींत । 
मग एकादश शस्त्रातें । रुद्रमंत्र प्रयोगीं स्मरतसे ॥ ८४ ॥
जेणेंकरुनि एकादश रुद्र । प्रगट झाले महाभद्र ।
तेजःपुंज नक्षत्रचंद्र । काळिकास्त्र मिरवले ॥ ८५ ॥
तें महाप्रळयाकार । भयंकररुपी अनिवार ।
तें पाहताचि काळिकास्त्र । सूक्तीलागी प्रवर्तली ॥ ८६ ॥
सकळां करुनि नमनानमन । स्तुतीस वाडोनि खणूनि रत्न ।
परम भक्ती सूक्तीचें कारण । श्रृंगारिलें रुद्रातें ॥ ८७ ॥
तें नवरत्नांचा सुगम श्रृंगार । भूषणीं मिरवितां एकादश रुद्र ।
शांत होऊनि महाभद्र । ऐलरुपी पावले ॥ ८८ ॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ । वज्रास्त्र त्वरें प्रेरित ।
तया साह्य धूमास्त्र । महान्त तेवी मिरवतसे ॥ ८९ ॥
तेणें करुनि धुमधुमाकार । मावळला मित्र तारा चंद्र ।
तया संधींत वज्रास्त्र । निजमस्तकीं भेदीतसे ॥ ९० ॥
परी ती चपळ काळिका देवी । वज्रास्त्र धरिलें तिनें पायीं ।
आपटिती झाली शैलाद्रिमहीं । उत्तरदिशे कारणें ॥ ९१ ॥
तेणें धायें शैलाद्रि पर्वत । निमा चूर झाला नेमस्त ।
ती साक्ष अद्यापि हिंदुस्थानांत । सह्याद्रि पर्वत नसेचि ॥ ९२ ॥
रामेश्र्वरापासूनि नेमस्त । आणि गुर्जरदेशपर्यंत ।
महाद्री आहे नांदत । पैल नसे महाराजा ॥ ९३ ॥
असो ऐसें वज्रास्त्र सरलें । आणि धूम्रास्त्र तें गिळिलें ।
तें पाहूनि मच्छिंद्र वहिलें । वाताकर्षण जपतसे ॥ ९४ ॥
तें सबळ वाताकर्षण । लाभलें होतें मच्छिंद्राकारणें ।
जे शुक्रमंत्रप्रदान । संजीवनी लाधली ॥ ९५ ॥
कीं वसिष्ठा धेनु झाला लाभ । कीं तें विष्णूचें सुदर्शन । 
मिळालें स्वयंभ । तेवीं देत सूक्तिकागर्भ सूक्तास्त्र मिळालें ॥ ९६ ॥
कीं यमालागीं यमन साधलें । कीं दमालागीं दमन लाधलें ।
तेवीं युक्ती मच्छिंद्र शोभले । देत सूक्तिकारत्न मिरवलें ॥ ९७ ॥
कीं वज्रास्त्रें शक्र विराजमान । कीं देवता लाधलें अमृतपान ।
तेवीं दत्तानें सूक्तिकारत्न । मच्छिंद्रातें मिरविलें ॥ ९८ ॥
रत्नांत मंत्रावळी । देत कृपेची वरदावाळी । 
भस्मचिमुटी योजूनि ते काळीं । प्रोक्षिता झाला मच्छिंद्र ॥ ९९ ॥
तंव तें मंत्रास्त्र गुप्त । काळिका देवीवर वाहात ।
प्रवेश होताचि वात कुंठित । सकळ देहाचा पै झाला ॥ १०० ॥
तेणें देवी विकळ झाली । गगनाहूनि आदळली ।
तेणें घायें अति व्यापिली । केवील दिसे मूर्छेनें ॥ १०१ ॥
परी महीं पडतां ऐसें वाटलें । कीं मेरुमांदार कोसळले ।
तेणें प्रहारें पर्वत भंगले । तरु झाले रांगोळी ॥ १०२ ॥
कित्येक सावजें झालीं पूर्ण । कांहीं पळतां रानोरान ।
दचका पावती समुच्चयें जन । देव दानव विस्मित ॥ १०३ ॥
असो ती आवरण अवस्था । महीं निचेष्टित झाली माता ।
श्वेत नयनीं विकळ देहस्था । अवस्थेंत मिरवली ॥ १०४ ॥
प्राणरहित होऊं पाहे । मग वेगी स्मरला उमाराय ।
ते वाग्भाट धावोनी तरुणोपाय । जाऊनि पोंचले कैलासा ॥ १०५ ॥
जातांचि श्रवणद्वारीं बोभाट । सावध होय कैलासनाथ ।
कीं शिवकरींचें काळिकास्त्र अचाट । संकटांत पडियेलें ॥ १०६ ॥
तो हृदयीं पाहे विचारुन । मच्छिंद्रनाथाचे झाले आगमन ।
मग नंदिकेश्र्वरीं सिद्ध होऊन । तया ठायीं पातला ॥ १०७ ॥
येताचि देखे मच्छिंद्रनाथ । धावूनि लगबगीं अति त्वरित ।
चरणकमळीं कामनातीत । मूर्धकमळ अर्पीतसे ॥ १०८ ॥
शिव उतरुनि नंदिकेश्र्वरीं । भाउकें कवळिला दशमकरी ।
भेटूनि हृदय प्रेमलहरी । आवळूनि धरितसे ॥ १०९ ॥
म्हणे तान्हुल्या अति थोर । करुनि दाविला चमत्कार ।
मजकरींचे काळिकास्त्र । आजि जिंकिले पराक्रमें ॥ ११० ॥
नाथ म्हणे आदिनाथा । हीत्वत्कृपेची बोधसरिता ।
बद्रिकाश्रमीं राहूनि दत्ता । श्रुत केलें तुम्ही माते ॥ १११ ॥
षण्मास महाराजा रक्षूनि मातें । प्रसन्न रवि केला तुम्हीं दत्त ।
त्या प्रसन्न कुळाचें उदित । मातें ओपिलें कृपेनें ॥ ११२ ॥
शिव म्हणे बा अस्तु आतां । सावध करीं काळिकादैवता ।
नाथ म्हणे वरदहस्ता । मम मौळी स्पर्शावा ॥ ११३ ॥
माझें मागणें आहे किंचित । देऊनि स्वामीनीं करावें श्रुत ।
जैसा संजीवनीचे अर्थ । शुक्र कचा फळला असे ॥ ११४ ॥
मग सिद्ध सर्वेश वरदमौळी । म्हणे कोण कामना उचित झाली ।
तदनुअर्थ ये काळीं । लाधसी तूं वद वत्सा ॥ ११५ ॥
नाथ म्हणे पंचवक्त्रा । कवित्व करविलें साबरी पवित्रा ।
त्यातें वर देऊनि वरदपात्रा । काळिकास्त्र मिरवावें ॥ ११६ ॥
जैसे तव करी बहुदिवस । बसूनि अमित केलें कार्यास ।
तेवीं माझे वक्त्रास । काळिकेनें बसावें ॥ ११७ ॥
जें जें कार्य लागे मातें । तदनुकार्य वाहावें सरतें ।
आणि पुढेही मंत्रकार्यातें । उपयोग व्हावें जयासी ॥ ११८ ॥
ऐसें ये रीतीं वरदान । द्याल जरी प्रसन्न होऊन ।
तरी कामनासमाधान । निजदेही नांदेल ॥ ११९ ॥
अवश्य म्हणूनि उमारमण । काळिका त्वत्करीं ओपिन ।
परी या समयीं जीवित्वदान । कालिकेतें स्वीकारीं ॥ १२० ॥
यापरी मीही उमानाथ । त्वत्कार्यासी आहे उदित ।
ऐसें म्हणोनि करतळीं त्वरित । भाष घेतली मच्छिंद्रे ॥ १२१ ॥
मग चरणीं माथा ठेवूनी । भस्मचिमुटी घेऊनि ।
वातास्त्रमंत्रआकर्षण जपोनी । बोलतसे वैखरी ॥ १२२ ॥
पूर्णपाठ वैखरीसी होता । भस्मचिमुटी फेंकी तत्त्वतां ।
तेणें हृदगत होऊनि सर्वथा । काळिकादेवी उठली ॥ १२३ ॥
उठूनि बैसली सावध होऊनी । दाही दिशा पाहे न्याहाळूनी ।
तों अकस्मात शूळपाणी । आपुले दृष्टीं देखिला ॥ १२४ ॥
मग लगबगें येऊनि त्वरित । शिवपदी मौळी सज्ज करीत । म्हणे महाराजा आदिनाथ । आजि जीवित्व त्वां दिधलें ॥ १२५ ॥
जैसे होय सर्पसत्रास । तोही मिरविला आस्तिक त्यास ।
तेवी आज मम प्राणांस । रक्षिता झालासी आदिनाथा ॥ १२६ ॥
कीं भस्मासुराच्या पवनवातीं । आपण पडिलां होतां व्यावृत्ती । 
तेथे रक्षणें विष्णुमूर्ती । कृपापात्रीं मिरविली ॥ १२७ ॥
कीं शक्तिघातें सुमित्रासुत । पुढे होतां रघुनाथ ।
विकट होता हनुमंत । प्रसन्न त्यातें झालासे ॥ १२८ ॥
कीं प्रल्हादाच्या कैवारासी । नरहरी धावलां अति उद्देशीं ।
तन्न्यायें आज तूं मजपाशीं । मिरवलासी कीं कृपेनें ॥ १२९ ॥
ऐसें म्हणोनि काळिकादेवी । वारंवार लागे पायीं । 
याउपरी म्हणे दक्षजांवई । मम मागणें आहे एक ॥ १३० ॥
देशील जरी कृपा करुन । तरी तुज देईन नागरत्न । 
देवी म्हणे उमारमण । अर्थ कोणता बोलवा ॥ १३१ ॥
शिव म्हणे बहु दिवस । मम करीं विराजलीस ।
आतां येऊनि मच्छिंद्रदास । जगउपकारीं बसावें ॥ १३२ ॥
हेंचि मागणें माझें आहे । तुवां कृपा करुनि मज द्यावें ।
हें वचन ऐकूनि महामाय । गदगदां हांसिन्नली ॥ १३३ ॥
म्हणे महाराजा पायांपाशीं । मी म्हणवितें तुमची दासी ।
इतुकें गुह्य धरोनि मानसीं । दान मागतां हें काय ॥ १३४ ॥
जिकडे धाडाल तिकडे जाईन । तुमची आज्ञा मज प्रमाण ।
इतुकें गुह्य धरोन । दान म्हणणें अनुचित हें ॥ १३५ ॥
जैसा वाचस्पती ज्ञानचाड । अजारक्षका पुसे कोड ।
तन्न्याये माझिया पाड । जल्पसी कीं महाराजा ॥ १३६ ॥
कीं उड्डाण करावया अर्थी । गोलांगुळा स्तवी मारुती ।
तन्न्यायें मम प्रयुक्तीं । जल्पतां कीं महाराजा ॥ १३७ ॥
कीं पीयुष मृत्यु निवारणास । स्तविता झाला बळीरस । 
कीं टक्याकरितां महापरिस । विनवीतसे धनाढ्याला ॥ १३८ ॥
तन्न्याय अपर्णापती । गौप्य धरुनि करितां विनंती ।
परी हें श्र्लाघ्य सेवकाप्रती । कदाकाळीं साजेना ॥ १३९ ॥
तरी आतां असो ऐसें । मान्य करीन स्वामिशब्दांस ।
मग मच्छिंद्रास । जननी हृदयीं कवळिला ॥ १४० ॥
म्हणे बा रे ऐक वचन । साबरीविद्या कविरत्न । 
जेथे येईल माझें नाम । तेथें साह्य मी असे ॥ १४१ ॥
कवण अर्थी असो कैसें । मी प्रवर्तवूनि  उच्चारास ।
ऐसे करतल देऊनि भाष्य । समाधानीं मिरवले ॥ १४२ ॥
मच्छिंद्र आणि उमानाथ । देवीनें ठेवूनि तीन रात्र । 
मग स्नेहसंपन्न बोल बोलत । मच्छिंद्रनाथा ओडविलें ॥ १४३ ॥
याउपरी शिवें देवीचा पाणी । मच्छिंद्रनाथाच्या कृपें ओपूनी ।
अति गौरवें शूलपाणी । स्वस्थानासी जातसे ॥ १४४ ॥
मग मच्छिंद्र आणि उमानाथ । देवी बोळवूनि स्वस्थाना येत ।
शिव पावले कैलासांत । मच्छिंद्रनाथा भेटूनी ॥ १४५ ॥
यापरी तेथूनि मच्छिंद्रनाथ । उत्तरपंथें गमन करीत ।
तो समुद्रतीरीं हरेश्र्वर दैवत । गदातीर्थी पातला ॥ १४६ ॥
गदातीर्थी करुनि स्नान । येत हरेश्र्वरा दर्शनकारणें ।
ते कथा वर्तेल रसाळ पूर्ण । पुढिले अध्यायीं वदूं आतां ॥ १४७ ॥
शिवसुत वीरभद्र । महाजेठी प्रतापरुद्र । 
तयातें भेटता नाथ मच्छिंद्र । समरंगणीं मिरवती ॥ १४८ ॥
असो येऊनि त्या प्रसंगीं आतां । भावें पूजिली काळिका देवता ।
तरी पठणीं प्रसंग उपयोग बहुतां । मुष्टिनिवा रणी पडेल ॥ १४९ ॥श 
पुढें मंत्रपुष्टी दृष्टी । बाधा न करी तीर्थाचिया पाठीं ।
कुडेचेडेजारणा लोटीं । मरणभीती बाधेना ॥ १५० ॥
हा अध्याय नित्य पठण करील । तो इतुक्या भयापासूनि सुटेल ।
आणि हा अध्याय गृहीं पाळील । कधींही पीडा त्यासी न होय ॥ १५१ ॥
आणि कोणासही जगा आंतौता । काळीमुष्टीची बाधा होतां ।
त्यांतें प्रसंग श्रवणी पडतां । शम होईल ती मुष्टी ॥ १५२ ॥   
ऐसे गोरक्षाचें कथन । वदला आहे किमयागिरी ग्रंथाकारण ।
तरी जन हो विश्र्वास धरुन । ग्रंथ संग्रही पाळावा ॥ १५३ ॥
हा ग्रंथ म्हणाल उगलीच वाणी । तरी नोहे आहें अमृतसंजीवनी ।
पहा सिद्धाची वाग्वाणी । श्रीगोरक्षें कथियेली ॥ १५४ ॥
तरी विश्र्वास धरुनि चित्ता । प्रचीत घ्यावी पठण करितां । 
नाहींतरी ग्रंथ उगाचि निंदितां । दोषामाजी पडाल कीं ॥ १५५ ॥
याउपरी अर्थाअर्थी । उगेचि निंदाल ग्रंथाप्रती ।
तयाचा निर्वंश पावूनि क्षितीं । यमपुरीं वसे तो ॥ १५६ ॥
तरी  भाविक जन । तुम्हां सांगतों एकचि वचन ।
भावविश्र्वासा करा रोहण । सकळ स्वार्थ पुरेल कीं ॥ १५७ ॥
जे विश्र्वासवर स्वार झाले । ते सर्वस्वीं तरुनि गेले ।
सत्यवचनीं जगीं मिरवले । संतवदनीं विश्र्वासुक ॥ १५८ ॥
तरी जगामाजी धुंडीसुत । मालू नरहरीच्या वंशांत । 
विश्र्वासें झाला ब्रह्मीं व्यक्त । संतपदीं भावार्थ ॥ १५९ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । षष्ठाध्याय गोड हा ॥ १६० ॥
शुभं भवतु श्रीक्रुष्णार्पणमस्तु ॥ श्रीनवनाथभक्तिसार षष्ठाध्याय संपूर्ण ॥
Shri Navanath Bhaktisar Adhyay 6
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सहावा ( ६ )



Custom Search

1 comment:

Unknown said...

I see some doubtful at the end of shlok149. There is one marathi character तरी पठणीं प्रसंग उपयोग बहुतां । मुष्टिनिवा रणी पडेल॥१४९ ॥श.
Is this extra character right or some mistake ? Pl Negelct my comment, if it is right. Thanks for providing this utility. Jay Navnath !