Monday, February 8, 2016

Shree NavanathBhaktiSar Adhyay 16 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सोळावा ( १६ ) भाग २/२


NavanathBhaktiSar Adhyay 16 
Kanifa was in a female kingdom for about 1 month with his host Machchhindra. Then he proceeded for his tirthyatra. He came near to Helapattanam in Goud-Bangal. He met with Goraksha. Then they know from each other about their gurus. Kanifa knew that his guru Jalindar was buried by King Gopichand. Goraksha knew that his guru Machchhindra was in female kingdom. Kanifa was very angry and decided that he would punish king Gopichand. However Mainavati met Kanifa and told him that she was a disciple of Jalindar and was unaware of what happened to Guru Jalindar. She requested Kanifa not to punish Gopichand. What happened next would be told to us by DhundiSut Mau from Narahari family in the next Adhyay 17.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सोळावा ( १६ ) भाग२/२
मग पुन्हां करोनि नमनानमन । प्रांजळ वर्णित वर्तमान ।
एकमेकांतें विचारुन । आदेश म्हणवूनि जाताती ॥ १०१ ॥
गोरक्ष चालिला स्त्रीदेशांत । कानिफा गौडबंगाली जात ।
हेळापट्टण लक्षूनियां पंथ । कूच मुक्काम साधीतसे ॥ १०२ ॥
परी तीव्र होऊनि अति चित्तीं । म्हणे जातांचि भस्म करीन नृपती ।
अहा जालिंदर गुरुमूर्ती । दुखविली नष्टानें ॥ १०३ ॥
ऐसें म्हणोनि वारंवार । परम क्रोधाचा वैश्र्वानर ।
शिखा डुलवी स्वअंगावर । अहाळूनि पाडावया ॥ १०४ ॥
तन्न्यायें तीव्रमती । चित्तकुंडी पावकस्थिती ।
प्रदीप करोनि नृपआहुती । इच्छूनियां जातसे ॥ १०५ ॥
तच्छिष्यकटकथाटी । गमन करितां वाटोवाटीं ।
तंव हेळापट्टण काननपुटीं । जाऊनियां पोहोंचला ॥ १०६ ॥
तो वृत्तांत रायासी कळला । कानिफा आले गांवाला ।
मग परिवारासहित गोपीचंद वहिला । सवें सामोरा जातसे ॥ १०७ ॥
चित्तीं म्हणे मम वैभवा । योग्य दिसे महानुभावा ।
तरी गुरु हाचि करावा । कायावाचाभावानें ॥ १०८ ॥
सातशें शिष्यकटक भारी । पूर्णयोगी ब्रह्मचारी ।
गज वाजी स्यंदनी स्वारी । जगामाजी मिरवतसे ॥ १०९ ॥
सिद्ध करुनि चमूभार । शिबिकासनें तुरंग अपार ।
अन्य मंडळी वीर झुंजार । रायासवें मिरविले ॥ ११० ॥
रायमस्तकीं एकशत । चंद्राकृती देदीप्यवंत । 
ऐसीं छत्रें वर्णिता बहुत । वाढेल ग्रंथ आगळा ॥ १११ ॥
एक सहस्त्र सातशें मिती । बरोबरीचे सरदार असती । 
तयांचीं छत्रें पंच असती । चंद्रार्की मिरवत ॥ ११२ ॥
हेमतगटी झालरा शिल्पयुक्तीं । छत्रकळसाची अपार दीप्ती ।
रत्नखचित अर्का म्हणती । तेज सांडी तूं आपुले ॥ ११३ ॥
ऐशा संपत्तिसंभारेसी । ठेंगणें भाविती अमरपदासी ।
मार्गी चालतां मांत्रिकासी । पाचारी तो नृपनाथ ॥ ११४ ॥
म्हणती प्रारब्धयोगेंकरुन । येथें पातलें सिद्धरत्न ।
तरी याचा अनुग्रह घेऊन । ईश्र्वरभक्तीं परिधानूं ॥ ११५ ॥
हा श्रीगुरु आहें योग्य मातें । माझी संपत्ती भूषणभरतें ।
जगामाजी दिसे सरितें । योगायोग्य उभयतीं ॥ ११६ ॥
नातरी गुरु मम मातेनें । योजिला होता कंगालहीन । 
रत्नपति काच आणून । भूषणांते मिरवीतसे ॥ ११७ ॥
कीं कल्पतरुच्या बागायतीं । कंटक तरु बाभूळवस्ती । 
कीं अर्कचंद्राचे मध्यपंक्ती । काजव्यानें मिरवावें ॥ ११८ ॥
मी भूप माझे पंक्ती । भूपती असावा सर्वज्ञमूर्ती ।
घृतशर्करा दुग्धसरितीं । लवण कैसें वाढावें ॥ ११९ ॥
अमंगळ गल्ली कुश्र्चल स्थान । बहुत ज्ञानी पिशाचसमान ।
तो गुरु मातें मम मातेनें । जालिंदर योजिला ॥ १२० ॥
अहो ती योग्य नसे संगत । काय केलें स्त्रीजातींत ।
परी आतां उदेले उचिताउचित । गुरु कानिफा आम्हांसी ॥ १२१ ॥
ऐसें वदूनि मंत्रिकासी । राव जातसे कटकप्रदेशी ।
घेऊनि सवें संभारासी । षोडशोपचार आदरें ॥ १२२ ॥
ऐसेपरी कटकथाटीं । राव जाय सुगम वाटीं ।
त्या मार्गी योगींद्र जेठी । जाऊनियां मिळाला ॥ १२३ ॥ 
परी येता देखतांचि गोपीचंद । हृदयीं धडाडला अपार क्रोध ।
परी विवेक अर्गळा अपार । तेणें अक्रोध मनामाजी संचरला ॥ १२४ ॥ 
आतांचि शापुनि करिन भस्म । परी कार्य तैसेंचि राहील सुगम ।
कोठें श्रीगुरु योगद्रुम । मिरवला तो कळेना ॥ १२५ ॥
परी याचे हातीं कार्य सुगम । उरकोनि घ्यावा मनोधर्म ।
आधीं पाहूनि गुरुचरंपद्म । शासनातें मग ओपूं ॥ १२६ ॥
ऐसा विचार करुनि चित्तीं । स्तब्ध राहिला योगींद्र जती ।
क्रोधानळा समूळ शांती । बोधलक्ष्मी स्थापीतसे ॥ १२७ ॥
जैसे शस्त्रास्त्री निपुण । जेवीं रक्षिती प्रतापवान ।
परी कार्यसंबंधीं देदीप्यमान । दर्शविती लोकांतें ॥ १२८ ॥
तरी प्रथम श्रीगुरुमूर्ती । प्रत्यक्ष करावी याचे हातीं ।
मग क्रोधानळासी दुस्तर आहुती । गोपीचंद योजावा ॥ १२९ ॥
ऐसिये विचारीं शब्दबोधें । कानिफा राहिला स्तब्ध ।
येरीकडे गोपीचंद । चरणावरी लोटला ॥ १३० ॥
उभा राहिला समोर दृष्टीं । नम्रोत्तर बोले होटीं ।
जोडोनियां करसंपुटीं । विनवणी विनवीतसे ॥ १३१ ॥
हे महाराजा दैवयोगा । मज आळशावरी गंगा ।
वोळलासी कृपाओघा । अनाथा सनाथ करावया ॥ १३२ ॥
तुम्ही कृपाळू संतसज्जन । दयाभांडार शांतिरत्न ।
ज्ञानविज्ञान आस्तिककर्म । गृहस्थांसीं कल्पावें ॥ १३३ ॥
ब्रह्मी पावला तत्त्वतां । षड्गुणासी विषयां दभितां ।
सकळ भोगूनि अकर्ता । मिरवतसां जगामाजी ॥ १३४ ॥
आणि जगाच्या विषयतिमिरीं । ज्ञानदिवटी तेजारी । 
मिरवूनि सुख सनाथपरी । दाविते झाला महाराजा ॥ १३५ ॥
ऐसे साधक याचकमणी । तुम्ही कल्पतरु कल्पनापूर्णी ।
ऐसिये स्थिति जान्हवी जीवनी । बोळविलीत मजवरुती ॥ १३६ ॥
परी श्रीरायाचें वागुत्तर । ऐकूनि कानिफा मनोहर ।
तेणें चित्तशक्तितरुवर । आनंदशांती मिरवली ॥ १३७ ॥
देहीं क्रोधाचा वैश्र्वानर । पेटवा घेत होता अपार ।
तरी रावउत्तराचें सिंचननीर । होतांचि शांति वरियेली ॥ १३८ ॥
मग रायासी धरुनि करी । बैसविला स्वशेजारी ।
मग बोलत वागुत्तरीं । कुशळ असा कीं महाराजा ॥ १३९ ॥
म्हणे राया अनुचित केलें । परी तव भाग्य सबळ पाहिले ।
तेणेंकरुनि शांतीतें वरिलें । मम मानसें महाराजा ॥ १४० ॥
नातरी अनर्थासी गांठी । पडत होती प्राणासी मिठी ।
परी तव भाग्यउत्तराचे देठीं । शांतिफळें मिरवलीं ॥ १४१ ॥    
तरी आतां असो कैसें । वेगीं चाल पट्टणास ।
तेथें सकळ इतिहास । निवेदीन तुज राया ॥ १४२ ॥ 
मग बैसूनि शिबिकासनीं । काटकासह ग्रामासी येवोनि ।
राये राजसदना आणोनी । कनकासनीं वाहिला ॥ १४३ ॥
वाहिला तरी प्रीतीकरुनी । षोडशोपचारें पूजिला मुनी ।
हेमरत्नीं आणि वस्त्रभूषणीं । नम्रवाणी बोलतसे ॥ १४४ ॥
हे महाराजा योगसंपत्ती । कामना वेधली माझे चित्तीं ।
अनुग्रहीं चोज घेऊनि निगुतीं । सनाथपणी मिरवावें ॥ १४५ ॥
ऐसी वेधककामना चित्तीं । प्रथम भागीं निरवत होती ।
त्यांत उदेली कोपयुक्ती । वैश्र्वानरशिखा ते ॥ १४६ ॥
तेणें आनंदोनि उदयाचा तरु । वोळलासे योगधीरु ।
मग पुढें वासनाफळकारु । प्रेरावयातें पावला ॥ १४७ ॥
नृप म्हणे अर्थ उघडून । चित्तीं मिरवा समाधान ।
नातरी भययुक्त भिरड ( कीड ) पूर्ण । चित्ततरुतें स्पर्शीतसे ॥ १४८ ॥
तरी प्रांजळ करुनि मातें । कृपें ओपूनि अनुग्रहातें ।
आपुला साह्य म्हणोनि सरतें । तिन्हीं लोकीं मिरवावे ॥ १४९ ॥
कानिफा म्हणे नृपा ऐक । मम अनुग्रहाचें उत्तम दोंदिक ( थोरपण ) ।
घेऊं पाहसी भावपूर्वक । परी तुवा भाव नासिला ॥ १५० ॥
जैसें दुग्ध पवित्र गोड । परी लवण स्पर्शितां परम द्वाड ।
तेवीं तूतें घडूनि बिघड । आलें आहे महाराजा ॥ १५१ ॥
अरे माझा अनुग्रह घ्यावया पाहसी । परी ज्याचा अनुग्रह मजसी ।
तो तूं स्वामी महागर्तेसी ( खोल खड्यांत ) । अश्र्वविष्ठेंत स्थापिला ॥ १५२ ॥
परी तुझें आयुष्य लाग । पूर्वपुण्याचा होता योग ।
म्हणोनि क्रोधानळ मग । शांतिदरीं दडाला हो ॥ १५३ ॥
नातरी महाराज जालिंदर । प्रळयकाळीचा वैश्र्वानर ।
तुझें वैभवाचें अपार नीर । भस्म करिता क्षणार्धें ॥ १५४ ॥
जयाच्या प्रतापाची सरी । कोण करी बोल वागुत्तरीं ।
जेणे स्वर्गदेवतांची थोरी । झाडोझाडीं लाविली ॥ १५५ ॥
मग साद्यंत वराची कथा । तया नृपातें सांगतां ।
तेणेही सकळ ऐकूनि वार्ता । भय उदेलें चित्तांत ॥ १५६ ॥
अंगीं रोमांच आले दाटून । शरीरी कापरें दाटलें पूर्ण ।
मग धरोनि त्याचे चरण । नम्रपणें विनवीतसे ॥ १५७ ॥
म्हणे महाराजा योगवित्त । घडूनि आलें ते अनिचित ।
तरी आतां क्षमा उचित । प्रसाद करा दासावरी ॥ १५८ ॥  
या ब्रह्मांडमंडपांत । मजएवढा कोणी नाही पतित ।
अहा ही करणी अघटित । घडूनि आली मजलागीं ॥ १५९ ॥
परी सदैव मायेवरी । शांती धरावी हृदयांतरीं ।
बहु अन्याय होतां किशोरी । अहितातें टेकेना ॥ १६० ॥
तुम्ही संत दयावंत । घेतां जगाचे बहु आघात ।
अमृतापम मानूनि चित्त । कृपा उचित दर्शवितां ॥ १६१ ॥
जैसा झाडा घातला घाव । एकीं लावणी केली अपूर्व ।
परि उभयतां एकचि छाव । मिरवूं शके जैशी कां ॥ १६२ ॥
कीं सरितापात्रीं नीरओघीं । धुती पूजिती मळसंगी ।
परी एकचि तों उभयप्रसंगीं । मिरवली कीं सरिता ते ॥ १६३ ॥
कीं तस्करा होतां घरांत रिघावा । त्यासही प्रकाश देई जैसा दिवा ।
तन्न्याय संतभावा । मिरवूं जात महाराजा ॥ १६४ ॥
तरी आतां असो कैसें । क्षमावोढण करीं आम्हांस ।
दुष्कृतसरिता प्रवाहीं विशेष । ओढूनि काढीं महाराजा ॥ १६५ ॥   
ऐसें ऐकूनि तयाचें वचन । ना भी म्हणे गजकर्णनंदन ।
मग रायालागीं सवें घेऊन । स्वशिबिरातें पातला ॥ १६६ ॥
परी हा वृत्तांत ऐकूनि । परिचारिका धांवल्या तेथूनी ।
त्यांनीं जाऊनि सकळ युवतीलागोनी । मैनावतीतें सांगितलें ॥ १६७ ॥
हे माय वो भक्तिसंपादनी । जालिंदरगुरु तुम्हांलागुनी । 
परी तयाची रायें विपत्ती करुनी । महीगर्तेत मिरविला ॥ १६८ ॥
तेंही अश्र्वविष्ठेत । टाकिला आहे दशवरुषांत ।
ही राजदरबारा ऐकूनि मात । तुम्हां आम्हीं निवेदिलें ॥ १६९ ॥
म्हणाल कैसी कळली मात । तरी जालिंदराचा आला सुत ।
अपार वैभव कानिफनाथ । विद्यार्णव दुसरा ॥ १७० ॥
तरी तयाचें वैभव पाहून । शेवटी नटला आपुला नंदन ।
परी जालिंदराचें वर्तमान । श्रुत केलें तेणेंचि ॥ १७१ ॥
आता राव तयाचे शिबिरीं । गेला आहे सहपरिवारीं ।
तेथे घडेल जैसेपरी । तैसे वृत्त सांगूं पुढें ॥ १७२ ॥
ऐसें सांगता युवती । हृदयीं क्षोभली मैनावती ।
परी पुत्रमोहाची संपत्ती । चित्तझुलारी (चित्तरुपी पाळणा ) हेलावे ॥ १७३ ॥
येरीकडे नृपनाथ । मुनिशिबिरा जाऊनि त्वरित । 
उत्तम अगारीं ( तूप इत्यादि ) अनन्य पदार्थ । इच्छेसमान भरियेले ॥ १७४ ॥
सदा सन्मुख कर जोडून । अंगे धांवे कार्यासमान ।
जेथील तेथें अर्थ पुरवून । संगोपन करीतसे ॥ १७५ ॥
जैसे दुर्वासा अतिथी सकळ । सेवे आराधी कौरवपाळ ।
तन्न्याय हा भूपाळ । नाथालागीं संबोखी ॥ १७६ ॥
असो ऐसे सेवेप्रकरणीं । अस्तास गेला वासरमणी ।
मग रायातें आज्ञा देऊनी । बोळविला सदनातें ॥ १७७ ॥
राव पातला सदनाप्रती । परी येतांचि वंदिली मैनावती ।
मग झाला वृत्तांत तियेप्रती । निवेदिला रायानें ॥ १७८ ॥
वृत्तांत निवेदूनि तिजसी । तुवां जाऊनि शिबिरासी ।
युक्तिप्रयुक्तीं बोधूनि त्यासी । महाविघ्ना निवटावें ॥ १७९ ॥
मग अवश्य बोलूनि मैनावती । शिबिरा आसनीं जाऊं पाहती । 
शीघ्र येऊनि शिबिराप्रती । कानिफानाथ मिरवला ॥ १८० ॥
वंदूनि निकट बैसली तेथ । म्हणे महाराजा गुरुनाथ ।
कोण तुम्हीं वरिला अर्थ । नाथपंथी मिरवावया ॥ १८१ ॥
तरी या नाथपंथिका । मीही मिरवतें महीलोका ।
तरी मम मौळीं वरदपादुका । श्रीजालिंदराची मिरविते ॥ १८२ ॥
ऐसी ऐकोनि तियेची वाणी । बोलता झाला कानिफा मुनी ।
ऐसी असूनि बरवी करणी । जालिंदरातें मिरविली ॥ १८३ ॥
तूं अनुग्रही असतां निश्र्चित । गुरु ठेवावा अश्र्वविष्ठेंत ।
मैनावती म्हणे श्रुत । आजि झालें महाराजा ॥ १८४ ॥
मग आपुली कथा मुळापासुनी । तया नाथासी निवेदूनी ।
हें स्वसुताहातीं झाली करणी । मज न कळतां महाराजा ॥ १८५ ॥
तरी आतां झाले कर्म । सज्ञाना सांवरीं दुर्गम ।
परी रायाचें दुष्टकर्म । टाळूनि सुपंथ मिरवीं कां ॥ १८६ ॥
ऐसें सांगूनि तयाप्रती । मोहों उपजला अति चित्तीं ।
मग म्हणे श्रीगुरुमूर्ती । दृश्य करा लोकांत ॥ १८७ ॥
म्हणशील सुताचे हातेंकरुन । कां न करिसी दृश्यमान ।
परी नेणों जालिंदराचा कोपाग्न । धांव घेईल पुढारां ॥ १८८ ॥
तरी बोधावा युक्तिप्रयुक्तीं । रक्षूनियां आपुल्या भाच्याप्रती ।
दृश्य करुनि गुरुमूर्ती । सत्कीर्ती भाच्या वरीं कां ॥ १८९ ॥
मग या ब्रह्मांडमंडपांत । कीर्तिध्वज अति लखलखीत ।
हेळाऊनि परम लोकांत । कीर्तिध्वज फडकेल ॥ १९० ॥
ऐसें बोलूनियां तयाप्रती । मग उठती झाली मैनावती ।
त्यानेंही नमूनि परमप्रीतीं । बोळविलें भगिनीतें ॥ १९१ ॥
पूर्ण आश्र्वासन देऊन । म्हणे रायाचें कल्याण इच्छी पूर्ण ।
श्रीगुरुचरण पाहूनि जाण । सकळ संशय सोडीं कां ॥ १९२ ॥
ऐशी आश्र्वासूनि माता । श्रीनाथ झाला बोळविता ।
असो मैनावती तत्त्वतां । नमूनि आली सदनासी ॥ १९३ ॥
स्वसुतातें पाचारुन । सकळ सांगितलें वर्तमान ।
मग सकळ भयाचें दृढासन । भंगित झाले तत्क्षणीं ॥ १९४ ॥
जालिंदराचे अनुग्रहासहित । आश्र्वासीत कानिफानाथ ।
ऐसा सकळ सांगूनि वृत्तांत । भयमुक्त तो केला ॥ १९५ ॥
असो आतां येथून । पुढिले अध्यायीं धुंडिनंदन । 
नरहरिवरदें श्रोत्यांकारण । मालू निवेदिल गुरुकृपें ॥ १९६ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । षोडशाध्याय गोड हा ॥ १९७ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ श्रीनवनाथभक्तिसार षोडशाध्याय संपूर्ण ॥

Shree NavanathBhaktiSar Adhyay 16 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सोळावा ( १६ )


Custom Search

No comments: