Tuesday, February 23, 2016

Shri Navanath Bhaktisar Adhyay 21 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकविसावा (२१) भाग १/२


Shri Navanath Bhaktisar Adhyay 21 
Kilotala tried everything so that Goraksha could not leave Female kingdom. However Goraksha had already decided to leave female kingdom alogwith Machchhindra. He started for Tirthyatra taking with him Machchhindra and Meennath. Kilotala also went to swarga with Uparcharvasu father of Machchhindra. What happened next will be told to us by Dhandusut Malu from Narahari family in the next 22nd Adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकविसावा (२१) भाग १/२
श्रीगणेशाय  नमः ॥
जयजयाजी जगन्नायका । जगज्जनका जगत्पालका ।
विश्र्वव्यापूनि अवशेषका । विश्र्वंभर म्हणविसी ॥ १ ॥
जरी सकळ विद्यांचें भरणें । करिसी कायावाचामनें ।
तरी मीच काय विश्र्वार्तीनें । उरलों असें महाराजा ॥ २ ॥
जरी मी असें विश्र्वांत । तरी पाळण होईल सहजस्थितींत ।
ऐसें असोनि संकट तुम्हांतें । कवण्या अर्थीं घालावें ॥ ३ ॥ 
परी मम वासनेची मळी । रसनांतरीं हेलावती ।
तयाचीं सुकृतफळें जीं आलीं । ती तुज पक्व ओपीत महाराजा ॥ ४ ॥
तरी तेंही तुज योग्य भूषणस्थित । मज न वाटे पंढरीनाथ ।
परी सूक्ष्म शिकवीत भक्तां मात । मोक्षगांवांत प्रणविसी ॥ ५ ॥
तरी आतां असो कैसें । स्वीकारिलें बोबड्या बोलास ।
मागिले अध्यायीं सुधारस । गोरक्ष मच्छिंद्र भेटले ॥ ६ ॥
भेतले परी एकविचारीं । गुरुशिष्य असती त्या धवळावरीं ।
नानाविलास भोगउपचारीं । भोगताती सुखसोहळे ॥ ७ ॥
शैल्यराजनितंबिनी । मुख्य नायिका कीलोतळा स्वामिनी ।
मोह दर्शवी गोरक्षालागुनी । स्वसुताहूनि आगळा ॥ ८ ॥
आसन वसन भूषणांसहित । स्वइच्छें तया उपचारीत ।
पैल करुनि मीननाथ । संगोपीत गोरक्षबाळा ॥ ९ ॥
जैसा चातकालागीं धन । स्वलीलें करी उदकपान ।
कीं तान्हयाला कांसे लावून । पय पाजीत गौतमी ॥ १० ॥
पाजी परी कैशा स्थितीं । उभवोनि महामोहपर्वतीं ।
वत्सासी लावोनि कांससंपत्ती । शरीर चाटी तयाचें ॥ ११ ॥
त्याचि नीतीं कीलोतळा । संगोपीत गोरक्षबाळा । 
भोजन घालीत अपार लळा । तान्हयातें पाजीतसे ॥ १२ ॥
भलतैसें ललितपणें । श्रीगोरक्षा घाली भोजन ।
निकट मक्षिका उडवोन । निजकरें जेववीतसे ॥ १३ ॥
नाना दावोनि चवणे । अधिकाधिक करवी भोजन ।
ऐसिये परी माउलपण । नित्य नित्य वाढवी ॥ १४ ॥
ऐसा असोनि उपचार । बरें न मानी गोरक्ष अंतरें । 
चित्तीं म्हणे पडतो विसर । योगधर्मविचाराचा ॥ १५ ॥
ऐसें चिंतीत मनें । मग भोग तो रोगचि जाणे । 
जेवीं षड्रस रोगियाकारणें । विषापरी वाटती ॥ १६ ॥
मग नित्य बैठकीं बैसून । एकांतस्थितीं समाधान ।
धृति वृत्ति ऐसी वाहून । करी भाषण मच्छिंद्रा ॥ १७ ॥
हे महाराजा योगपती । आपण वसतां देशाप्रती ।
परी हें अश्र्लाघ्य नाथपंथीं । मातें योग्य दिसेना ॥ १८ ॥
कीं पितळधातूचे तगटीं हिरा । कदा शोभेना वैरागरा ।
कीं राव घेऊनि नरोटीपात्रा । भोजन करी श्र्लाघ्यत्वें ॥ १९ ॥
श्रीमूर्ति चांगुलपणें । महास्मशानीं करी स्थापन । 
तैसा येथें तुमचा वास जाण । दिसत आहे महाराजा ॥ २० ॥
पहा जी योगधर्मी । तुम्ही बैसला निःस्पृह होवोनी ।
तेणेंकरुनि ब्रह्मांडधामीं । कीर्तिध्वज उभारिला ॥ २१ ॥
मृत्यु पाताळ एकवीस स्वर्ग । व्यापिलें आहे जितुकें जग ।
तितुकें वांछी आपुला योग । चरणरज सेवावया ॥ २२ ॥
ऐसी प्रज्ञा प्रौढपणीं । असोनि पडावें गर्ते अवनीं ।
चिंताहारक चिंतामणी । अजाग्रीवीं शोभेना ॥ २३ ॥
तरी पाहें कृपाळू महाराजा । उभारिला जो कीर्तिध्वज ।
जो ध्रुव मिरवेल तेजःपुंज । ऐसें करी महाराजा ॥ २४ ॥
ऐसें झालिया आणिक कारण । तुम्ही पूर्वींचे आहां कोण ।
आलां कवण कार्याकारण । कार्याकार्य विचारा ॥ २५ ॥
कीं पूर्वी पहा ब्रह्मस्थिती । श्रीकविनारायणाची होती ।
लोकोपकारा अवतार क्षिती । जगामाजी मिरवला ॥ २६ ॥
आपण आचरला तपाचरण । शुभमार्गा लावावे जन ।
धर्मपंथिकां प्रज्ञावान । जगामाजी मिरवावया ॥ २७ ॥
ऐसें असतां प्रौढपण । ते न आचरावे धर्म ।
मग जगासी बोल काय म्हणवोन । अर्थाअर्थी ठेवावे ॥ २८ ॥
जात्या वरमाय आळशीण । मग काय पहावी वर्‍हाडीण ।
राव तस्कर मग प्रजाजन । कोणे घरीं रिघावें ॥ २९ ॥
कीं अर्कचि ग्रासिला महातिमिरीं । मग रश्मी वांचती कोणेपरी ।
उडुगणपती (चंद्र) तेजविकारी । जात्या होती तेवीं तारांगणें ॥ ३० ॥
तेवीं तुम्ही दुष्कृत आचरतां । लोकही आचरती तुम्हां देखतां ।
अवतारदीक्षेलागीं माथां । दोष होईल जाणिजे ॥ ३१ ॥
तरी आधींच असावें सावधान । अर्थाअर्थीं संग वर्जून ।
अंग लिप्त मलाकारणें । तिळतुल्यही नसावें ॥ ३२ ॥
नसतां ओशाळ कोणापाठीं । कळिकाळातें मारुं काठी ।
निर्भयपणें महीपाठीं । सर्वा वंद्य होऊं की ॥ ३३ ॥
तरी महाराजा ऐकें वचन । सकळ वैभव त्यजून ।
निःसंग व्हावें संगेंकरुन । दुःखसरिता तरावी ॥ ३४ ॥
प्रथमचि दुःखकारण । विषयहस्तें बीज रजोगुण ।
रजा अंकुर येत तरतरोन । क्रोधपात्रीं हेलावे ॥ ३५ ॥
मग क्रोधयंत्री तृतीयसंधी । मदकुसुमें क्रियानिधी ।
मदकुसुमांचे संधी । मत्सरगंध हेलावे ॥ ३६ ॥
गंधकुसुमें ऐक्यता । होतांचि दैवें विषयसफळता ।
मग विषयफळीं अपार महिमता । मोहर शोभे वेष्टीतसे ॥ ३७ ॥
मग वेष्टिलिया मोहर अंतीं । दैवें फळें पक्वपणा येती । 
मग तीं भक्षितां दुःखव्यावृत्ती । यमपुरी भोगावी ॥ ३८ ॥
मग तें शिवहळाहळाहूनि अधिक । कीं महा उरगामुखीं विख ।
मग प्राणहारक नव्हे सुख । दुःखाचे परी सोशीतसे ॥ ३९ ॥
मग दुःखाचिये उपाधी । शोधित फिराव्या ज्ञानऔषधी ।
तरी प्रथम पाऊल कृपानिधी । भिवोनियां ठेवावें ॥ ४० ॥
तरी आतां योगद्रुमा । चित्तीं निवटोनि विषयश्रमा ।
सावधपणें योगक्षेमा । चिंता मनीं विसरावी ॥ ४१ ॥
ऐसें विज्ञापना युक्तिप्रयुक्तीं । करुनि तोषविला मच्छिंद्रयती ।
तंव निवटूनि विषयभ्रांती । विरक्तता उदेली ॥ ४२ ॥
मग म्हणे वो गोरक्षनाथा । तूं जें बोललासी तें यथार्था ।
निकें न पाहती ऐसा वृत्ता । भ्रष्टदैवा दिसेना ॥ ४३ ॥
तरी आतां असो कैसें । जाऊं पाहूं आपुला देश ।
ऐसें म्हणोनि करतळभाष । गोरक्षकाते दीधली ॥ ४४ ॥
कीं गंगाजळनिर्मळपण । परी महीचे व्यक्त करोन । 
गढूळपणें पात्र भरुन । समुद्रातें हेलावे ॥ ४५ ॥
भाक देऊन समाधान । चित्तीं मिरवी गोरक्षनंदन ।
मग गुरुशिष्य तेथूनि उठोन । पाकशाळे पातले ॥ ४६ ॥
पाकशाळे करुनि भोजन । करिते झाले उभयतां शयन ।
कीलोतळामेळें मच्छिंद्रनंदन । शयनीं सुगम पैं झाला ॥ ४७ ॥
झाला परी मच्छिंद्रनाथ । कीलोतळेतें सांगे वृत्तांत । 
म्हणे मातें गोरक्षनाथ । घेऊनि जातो शुभाननें ॥ ४८ ॥
जातो परी तव मोहिनी । घोंटाळीत माझे प्राणांलागुनीं ।
त्यातें उपाय न दिसे कामिनी । काय आतां करावें ॥ ४९ ॥
येरी म्हणे तुम्ही न जातां । कैसा नेईल कवणे अर्था ।
मच्छिंद्र म्हणे मज सर्वथा । वचनामाजी गोंविलें ॥ ५० ॥
विरक्तपणाच्या सांगोनि गोष्टी । वैराग्य उपजविलें माझे पोटीं ।
तया भाषे संतुष्टदृष्टी । वचनामाजी गुंतलों ॥ ५१ ॥
तरी आतां काय उपाय । सरला सर्वस्वीं करुं काय ।
तुझा देखोनि विनय । जीव होय कासावीस ॥ ५२ ॥
तरी आतां ऐक वचनीं । उपाय आहे नितंबिनी ।
तुवांचि त्यातें घ्यावें मोहोनी । बहुधा अर्थीकरोनियां ॥ ५३ ॥
येरी म्हणे जी प्राणनाथ । म्यां उभविला उपायपर्वत । 
परी तो न रोधी वज्रवंत । विरक्तीतें मिरवी तो ॥ ५४ ॥
ऐसें असतां त्या प्रवाहीं । उपाय मोहाचा चालत नाहीं ।
मच्छिंद्र म्हणे करुनि पाहीं । यत्न आणिक पुढारां ॥ ५५ ॥
ऐसें भाषण करितां उभयतां । निशा लोटली सर्वही असतां ।
उपाय मोहाचा चिंतन करितां । गोरक्ष येऊनि बोलतसे ॥ ५६ ॥
म्हणे माय वो ऐकें वचन । मज करुं वाटतें तीर्थाटन ।
तरी मच्छिंद्रानाथा सवें घेऊन । तीर्था आम्ही जातसों ॥ ५७ ॥
येरी म्हणे वत्सा ऐक । तूं ज्येष्ठ सुत माझा एक ।
तूं वरिष्ठ अलोलिक । मम मनीं ठसलासी ॥ ५८ ॥
कीं स्त्रिया राज्यसंपत्ती । त्यांत तूं शोभसी नृपती । 
आणि धाकटा बंधु धरुनि हातीं । शत्रु जिंकशील वाटतसे ॥ ५९ ॥
तरी तूं सकळ राज्याचा घीर । आम्ही उगलेंचि सुख घेणार ।
अन्नवस्त्राचा अंगीकार । करुनी असों तव सदनीं ॥ ६० ॥
बा रे नाथाचा वृद्धापकाळ । दिवसेंदिवस वाढतसे सकळ ।
तैसें माझे शरीर विकळ । दिवसेंदिवस होईल कीं ॥ ६१ ॥
मग आम्हां वृद्धांचें दीनपण । हरील बा कोण तुझ्याविण ।
आणि धाकट्या बंधूचें संगोपन । कोण करील तुजवांचुनी ॥ ६२ ॥
बाळा तुजवांचूनि मनाचें कोड । कोण पुरवील तूं गेल्यापुढें ।
मायेवाचूनि न ये रडें । संगोपितां तूं अससी ॥ ६३ ॥
बा देवा रे आमुचा सकळ तिलक । तूं अससी राजनायक ।
तूं गेलिया आम्ही भीक । घरोघरीं मागावी ॥ ६४ ॥
तरी ऐसें विपत्तिकोडें । मज न दाखवीं दृष्टीपुढें ।
तरी मज योजूनि विहीरआडें । लोटूनि मग जाई पां ॥ ६५ ॥
बोलतां रसाळ युक्ती । परी न मोहे गोरक्ष चित्तीं । 
जैसें मेघसिंचन झालिया पर्वतीं । अचळ भंगावीण तो ॥ ६६ ॥
ऐसें कीलोतळेचें ऐकूनि वचन । म्हणे माय तूं करिसी सत्य भाषण ।
परी काय गे तूतें बोलून । वैभव माझें दाखवावें ॥ ६७ ॥
तिहीं लोकीं गे चार खुंट । आमुचें असे राज्यपट ।
तूतें बोलाया अधिक वरिष्ठ । काय स्त्रियांचे राज्य हें ॥ ६८ ॥ 
तरी माय वो आतां कैसें । आम्ही जातों तीर्थावळीस ।
तुम्ही स्वस्थ असूनि ग्रामास । संपत्ति भोगा आपुली ॥ ६९ ॥
आम्हांसी काय संपत्ति कारण । आमुची संपत्ति योगधारण ।
सुकृतक्रियाआचरण । सुखसंपन्न भोगावें ॥ ७० ॥
ऐसें निकट बोलूनि तीतें । म्हणे आज्ञा द्यावी जी आमुतें ।
येरी म्हणे जी ऐक मातें । मम हेतू जाऊं नये ॥ ७१ ॥
चित्तीं विचारी कीलोतळा । परम दक्षतेनें या बाळा ।
उपरी दाराविषय घालोनि गळां यत्नेंकरुनि अडकावूं ॥ ७२ ॥
हें योजूनि म्हणे जाणें तीर्थासी । तरी एक बा अटक घालूं तुजसी ।
इतुका संवत्सर मजपासीं । वस्ती करुनि असावें ॥ ७३ ॥    
येरी म्हणे ऐक माते । षण्मास लोटले मज येथें ।
तां न राहें मातें कल्पांतें । तीर्थावळी जाणें कीं ॥ ७४ ॥          
याउपरी बोले कीलोतळा । षण्मास तरी संगती द्यावी मला ।
थोडकियासाठीं उतावळा । होऊं नको मम वत्सा ॥ ७५ ॥
मग मी समाधानेंकरुन । श्रीनाथ तुजसवें देऊन ।
तीर्थावळीतें बोळवीन । समारंभे पाडसा ॥ ७६ ॥
ऐसे बोलतां बोल रसाळ । विवेकी ज्ञानतपोबाळ ।
चित्तीं म्हणे षण्मास काळ । आतां जाईल निघूनी ॥ ७७ ॥
मग अवश्य म्हणे तपोकीर्णी । षण्मास वस्ती करुं सदनीं ।
परी अमुक दिन निश्र्चय करोनी । ठेवीं आम्हां जावया ॥ ७८ ॥
तो दिवस आलियापाठीं । आम्ही न वसूं महीतळवटीं । 
मग यत्न केलिया तुम्ही कोटी । फोल माते होतील ॥ ७९ ॥
तरी आतां कोणता दिन । दावीं मातें निश्र्चयेंकरुन ।
येरी म्हणे प्रतिपदेकारण । बोळवीन तुम्हांसी ॥ ८० ॥
मुहूर्त संवत्सरप्रतिपदेस । मग न पुसतां कोणास । 
तया दिनीं गमन तुम्हांस । भोजन झालिया करवीन ॥ ८१ ॥
ऐसा निश्र्चय मैनाकिनी । बोलूनि स्थिर केला भुवनीं ।
पुढें कांहींएक दिवसांलागूनी । गोरक्षातें पाचारी ॥ ८२ ॥
निकट बैसवूनि आपुलेजवळी । अति स्नेहानें मुख कुरवाळी ।
म्हणे बा रे कामना मम हृदयकमळीं । वेधली असे एकचि ॥ ८३ ॥
कामना म्हणशील तरी कोण । स्नुषा असावी मजकारण ।
तरी उत्तम दारा तुज निपुण । करुं ऐसें वाटतें ॥ ८४ ॥
मग मी बाळा स्नुषेसहित । काळ क्रमीत बैसेन येथ ।
तों तुम्हीं करुनि यावें तीर्थ । आपुलें राज्य सेवाया ॥ ८५ ॥
षण्मास बाळा येथें अससी । अंगींकारीं मुख्य संबंधासी ।
अंगीकारीलिया तव मानसीं । मोह माझा उपजेल ॥ ८६ ॥
म्हणशील तरी विधिपूर्वक । लग्न तुझें करीन निके ।
परी मम चित्ताचें काम दोंदिक (मोठे) । फेडशी इतुकें पाडसा ॥ ८७ ॥
गोरक्ष ऐसे बोल ऐकुनी । म्हणतसे ऐका मम जननी । 
म्यां कांता दोन गुरुकृपेनी । वरिल्या आहेत जननीये ॥ ८८ ॥
वरिल्या आहेत तरी चांग । नित्य भोगितो करुनि योग ।
म्हनशील कवण नामीं सांग । तरी कर्णमुद्रिका म्हणती त्यां ॥ ८९ ॥
तयां कांतांलागीं सोडून । अन्य कांता न वरीं व्यभिचारीण ।
हें योग्य नव्हे मजकारण । गुरुभक्ती जननीये ॥ ९० ॥
ऐसें बोलतां गोरक्षनाथ । कीलोतळा बैसली स्वस्थचित्त ।
म्हणे नाथ हा विरक्त । कदा नातळे विषयांतें ॥ ९१ ॥
यावरी लोटलिया त्या दिवशीं । आणिका एकें दिनी परदेशीं ।
एक शैली उत्तमराशी । सेवेलागीं पाठविली ॥ ९२ ॥
भोजन झालिया रात्रीं निर्भर । शैली संचरली तें मंदिर ।
अत्युत्तम सारीपाट करें । कवळोनियां पातली ॥ ९३ ॥
सदनीं संचरतां बोले वचन । म्हणे हे गोरक्षनंदन ।
मीं सारीपाट करीं कवळून । खेळावया आणिला कीं ॥ ९४ ॥
तरी खेळ खेळूं एकटभावें । ऐसें उदेलें माझिया जीवें ।
येरी म्हणे अवश्य यावें । पूर्णकामना करावया ॥ ९५ ॥
ऐसें म्हणतां नितंबिनी । सारीपाट पसरुनि निकट येऊनी ।
परी द्यूत खेळतां शुभाननी । नेत्रबाण खोंचीतसे ॥ ९६ ॥
खोंचीत परी विषयवर । बोल बोलत अनिवार ।
बोल नव्हे ते महावज्र । तपपर्वत भंगीतसे ॥ ९७ ॥
ऐसें बोलत आणिक कर्णीं । दाखवीतसे नितंबिनी ।
मौळीचा चीरपदर काढुनी । भूमीवरी सोडीतसे ॥ ९८ ॥
श्रृंगारव्यक्त नेत्रकटाक्ष । तुकवोनि खेळ खेळे गोरक्ष ।
खेळ खेळतां मग प्रत्यक्ष । जाणूनि चीर सरसावी ॥ ९९ ॥
उघडी एकचि जानू करुन । दावी आपुलें नग्नपण । 
परी तो विरक्त गौरनंदन । विषयातें आतळेना ॥ १०० ॥

Shri Navanath Bhaktisar Adhyay 21  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकविसावा (२१) 


Custom Search

No comments: