Saturday, February 27, 2016

Shri Navanath BhaktiSar Adhyay 23 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेवीसावा (२३) भाग १/२


Shri Navanath BhaktiSar Adhyay 23 
Machchhindra wanted to test his disciple Goraksha. Machchhindra had brought a gold brick from female kingdom with him. He while passing through a dense forest made a drama that he was very frighten that thieves may trouble them. He handed over his zoli to Goraksha. Goraksha found a gold brick in it and knew the reason why Machchhindra was talking about thieves. He took out the gold brick and threw into the deep dense grass. He asked Machchhindra why he was carrying a gold brick. Machchhindra told him that he was planning a bhandara that is offering food to Rushies, Munies and others. Goraksha with his Mantra vidya turned the mountain into gold. He fulfilled the wish of his guru of offering food to Rushies, Munies, Gods and many others. Thus he proved that he had neither feeling of selfishness nor any attachment towards worldly objects. In the next Adhyay 24 Dhundusut Malu will tell us a new story.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेवीसावा (२३) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी कमळानना । दुष्टदानवअसुरमर्दना ।
भक्तकामचकोरचंद्रानना । यादवेंद्रा आदिपुरुषा ॥ १ ॥
हे पयाब्धिवासा यदुकुळटिळका । पुढें बोलवी कथानका । 
जेणें श्रोतियां चित्तदोंदिका । आनंदाब्धि उचंबळे ॥ २ ॥
मागिले अध्यायीं सौराष्ट्रग्रामीं । गोरक्षानें मीननाथ मारुनी ।
पुन्हां उठविलें परीक्षा देऊनी । श्रीगुरुच्या भावने ॥ ३ ॥
मच्छिंद्रें धरुनि अज्ञानपण । मीननाथासवें केले रुदन ।
परी गोरक्षाचें जाणीवपण । परीक्षेतें आणिले ॥ ४ ॥
असो यापरी तेथूनि निघून । मार्गीं करीत चालिलें गमन ।
तों तैलगंदेशी गोदासंगमन । समुद्रतीरा पातले ॥ ५ ॥
गोदासंगमीं करुनि स्नान । आत्मलिंग शिवातें भावे पुजून ।
तेथूनि गोदेचें तट धरुन । पश्र्चिमदिशे गमताती ॥ ६ ॥
तों बारा लिंगांतील लिंग समर्थ । आवंढ्या आणि परळी वैजनाथ ।
तैं करुनियां सव्य गोदातीर्थ । घेऊनियां चालिले ते ॥ ७ ॥
ते मार्गीं चालतां गोदा सव्य । तों वाल्मीकस्थान विपिनमय ।
गर्भगिरी पर्वतप्राय । येऊनियां तेथें पोंचले ॥ ८ ॥
तें रान कर्कश अचाट । गगनचुंबित तरु अफाट ।
तयांमाजी तृण अफाट । न मिळे वाट चालावया ॥ ९ ॥
व्याघ्र जंबूक शार्दूल हरी । वराह रीस काननांतरी । 
हिंडती ते उन्मत्तापरी । उग्र वेष दावूनियां ॥ १० ॥
जाळिया वेली कर्दळी सघन । कीं जेथें रश्मीचें न पावे दर्शन ।
कीं अर्कोदया लपे गगन । ऐसा भास वाटतसे ॥ ११ ॥
बोरी बाभळ पळस शमी । रातांजन कंदर्प अनेकनामी ।
खैर हिंवर कंटकधामी । काननांत तरु मिरवती ॥ १२ ॥
एकतुराट्ट अकीं फुल्लाट । वरकड तीक्ष्ण कंटकनट ।
तेवीं कनकखंडजाळी अचाट । पर्णकुटिका जैशा कीं ॥ १३ ॥
तयांमाजी तृण उचित । स्थावर तरु जाहले व्यक्त ।
तेणें धरादेवीचें सहसा नितांत झांकिन्नलें ॥ १४ ॥
अहा तें कानन सुरस । वसन नेसविलें भूदेवीस ।
हरितवर्णी कुसुमपदास । बुटलिंग (कशिद्याचें कामाप्रमाणें) मिरवली ॥ १५ ॥
म्हणाल कासया नेसली वसन । तों परपुरुष दिनकर गगनीं ।
म्हणूनि कुळवंत दारा लज्जेनें । स्वशरीरा लपवी ती ॥ १६ ॥
म्हणूनि मित्रकांता जागा । सांडूनि बैसल्या अंबुजभागा ।
धरादेवीच्या लज्जत मार्गा । लक्षूनियां रक्षिलें ॥ १७ ॥
ऐसियापरी कानन अचाट । दर्शन नोहे महीपाठ ।
तेथें पाहूनि मच्छिंद्र सुभट । मनामाजी दचकला ॥ १८ ॥
दचकला परी कवण अर्थ । कनकवीट जे होती भस्मझोळींत ।
तस्कर कोणी हरतील तीतें । म्हणूनि चित्तीं विस्मित ॥ १९ ॥
तैसा नव्हे आणिक अर्थ । गोरक्षाचा लोभी स्वार्थ ।
पहावया परीक्षेंत । मच्छिंद्रनाथ उदेला ॥ २० ॥
आपण घेऊनि अज्ञान । पाहे गोरक्षाचें लक्षण ।
नातरी प्रतापवान । तस्करभय त्यां नाहीं ॥ २१ ॥
कीं ये तमाचा प्रतापजेठी । अर्का संचरे भय पोटीं ।
कीं उदधीची वळी चंचुपुटीं । लागतां कोप काय थरथराटे ॥ २२ ॥
कीं मशकाचे उड्डाणें । मंदराजळ व्यापेल कीं भयानें ।
कीं सर्पकृत किंवा वृचिकदंशानें । खगेंद्रा काय भय त्याचें ॥ २३ ॥
तन्न्यायें मच्छिंद्रनाथ । पाळूं न शके तस्करभयातें ।
परी गोरक्षाचें चित्त । परीक्षेसी उदेलें ॥ २४ ॥
कल्पूनि चित्तीं ऐसियापरी । मग गोरक्षकातें जती वागुत्तरीं ।
बोलता जाहला काननांतरीं । पाचारुनि निकटत्वें ॥ २५ ॥
म्हणे वत्सा ऐक बा कैसें । उद्भट दिसे विपिन कर्कश ।
तरी कांहीं भय अरण्यास । नांदतें कीं तस्करीं ॥ २६ ॥
परम पूर्ण व्यक्त तरुदाटी । जेथे अर्क न पडे दृष्टीं । 
ऐसिये काननीं कर्कश पोटीं । मज भय आजि संचरलें ॥ २७ ॥
तरी बाळा प्राज्ञवंता । आहे कीं नाहीं भय सांग आतां ।
तस्करभयाची समूळ वार्ता । काननांत न येवो या ॥ २८ ॥
ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ । गोरक्ष विचार करी मनांत ।
म्हणे तस्करभय गुरुतें । काय म्हणूनि उदेलें ॥ २९ ॥
तया शब्दोदयाचा अर्थ । श्रीगुरुजवळीं असेल वित्त ।
म्हणूनि हा शब्द उदयवंत । झाला असेल निश्र्चयें ॥ ३० ॥
तरी तो म्हणे ताता कैसें समजावें । फुलवरुनि रुखा (झाडाला) द्यावीं नांवें ।
ऐसें शब्दावरुनि मान समजावें । ओळखावें सुज्ञांनीं ॥ ३१ ॥
तस्मात् गुरुपाशीं वित्त । आहे काय ऐसें विचारीत ।
तरी या शब्दाची असे भ्रांत । निरसूनि दूर करावी ॥ ३२ ॥
ऐसें योजूनि गोरक्षनाथ । मौन धरोनि मार्गीं चालत ।
परी काननीं अधिकोत्तरांत । भयानक दिसे पदोपदीं ॥ ३३ ॥
जंव जंव कानन भयानक दिसे । तंव तंव गोरक्षा मच्छिंद्र पुसे ।   
म्हणे बा रे अरण्य बहु कर्कश । पदोपदीं दिसतसे ॥ ३४ ॥
तरी तस्करभय येथें । आहे कीं नाहीं सांग मातें ।
परी गोरक्ष उत्तरातें । कांहींच तयातें न देई ॥ ३५ ॥
जैसा विश्र्वामित्र समर्थ । मखरक्षणा (यज्ञाचे रक्षण करण्यास) त्या श्रीरामार्थ ।
स्तवितां तेणें दशरथातें । परी उत्तर न देई कांहींच ॥ ३६ ॥
त्याचि न्यायें गोरक्ष मौन धरोनी । गमतसेच सुपंथ अवनीं ।
तो पुढें चालतां देखिलें पाणी । संचळपणीं स्थिरावलें ॥ ३७ ॥
उदक पाहतां संचळवंत । गोरक्षा वदे मच्छिंद्रनाथ ।
म्हणे बा गोरक्षा संचरत येथ । उदक आहे नेटकें  ॥ ३८ ॥
तरी माझी झोळी कक्षेंत घालून । पुढें कांहींसें करी गमन ।
तों मीही येतो लगबगेकरुन । दिशा फिरुन पाडसा ॥ ३९ ॥
ऐसें म्हणतां मच्छिंद्रनाथ । अवश्य गोरक्ष म्हणे त्यास ।
मग स्कंधीं वाहूनि मीननाथास । कक्षीं झोळी घातली ॥ ४० ॥
परी घालितां कक्षे झोळी । वजनवस्त लागे हस्तकमळीं ।
मग मनांत म्हणे प्रतापबळी । भय यांतचि नांदतसे ॥ ४१ ॥
ऐसें म्हणोनि स्वचित्तांत । स्कधीं वाहूनि मीननाथ ।
मच्छिंद्र सोडूनि थिल्लरांत । पुढें जात सच्छिष्य ॥ ४२ ॥
पुढें जातां शतपावलीं । कक्षेंतूनि भिक्षाझोळी काढिली ।
त्यांत पाहतां देखिली । वीट उत्तम हाटकाची ॥ ४३ ॥
पाहतांची दृष्टीं कनकवीट (सोन्याची वीट) । म्हणे कीं फुका भ्याला मच्चिंद्रनाथ सुभट ।
मग दाट लक्षूनि तृण अफाट । झुगारिली वीट त्यामाजी ॥ ४४ ॥
त्या कनकविटेसमाकृती । पाषाण पाहूनि गोरक्षजती ।
झोळींत घालूनि कक्षेप्रती । पुन्हां नेसवी झोळींतें ॥ ४५ ॥
कक्षे झोळी घालून । स्कंधीं पुन्हां मीननाथ घेऊनि ।
लगबगोनी मार्गगमन । करीत असे नाथ तो ॥ ४६ ॥
सुपंथ लक्षितां तांतडीनें । एक कोस गेला त्वरेंकरुन ।
तो मच्छिंद्रनाथ दिशा फिरुन । जात मागुता तांतडी ॥ ४७ ॥
पुढें जातसे गोरक्षनाथ । मागूनि मच्छिंद्र लगबगा येत ।
परी तो नाटोपे गोरक्षनाथ । मार्ग क्रमितां मच्छिंद्रा ॥ ४८ ॥
परी इतुक्या नेटें भावें । मार्ग मिळतां नाटोपावें ।
तरी लघुशंकेलागीं धांवे । संगतसंगमीं मिळाल्या ॥ ४९ ॥
यापरी शौचा सर्वांशीं जावें । लागत आहे सर्वांनुभवें ।
संगतसंगमीं होऊनियां ठावे । विसांवयासी महाराजा ॥ ५० ॥
ऐसियापरी आहे गमन । तेवीं मच्छिंद्रा आले घडून ।
परम तांतडीं करितां गमन । परी तो न मिळे गोरक्ष ॥ ५१ ॥
ऐसेपरी गोरक्षनंदन । पुढें चालतां सुपंथपथानें ।
मार्ग काढिला दीड योजन । जाणूनि खूण अंतरींची ॥ ५२ ॥
तो अवचट देखिला तरु । गोरक्ष पाहे दृष्टीपरु ।
मनांत म्हणे व्हावें स्थिरु । येऊं द्यावें नाथासी ॥ ५३ ॥
ऐसें योजूनि स्वचित्तांत । पाहतां झाला उंबरतरुतें ।
तों त्या ठायीं पोखरणी अद्भुत । वामतीर्थ देखिले ॥ ५४ ॥
मग झोळीं काढिली कक्षेंतून । स्कंधींचा उतरिला नाथ मीन ।
मग अंबुपात्र करीं कवळून । पोखरणींत उतरला ॥ ५५ ॥
सारुनि आपुलें स्नान । अंगीं भस्म केलें लेपन ।
उपरी आपुले नेम सारुन । घातलें स्नान मीननाथा ॥ ५६ ॥
तों मार्गांहूनि मच्छिंद्रनाथ । अति तांतडीनें आले तेथ ।
स्नान करुनि यथास्थित । नित्यकर्म सारिलें ॥ ५७ ॥
सकळ सारिलें नित्यनेमा । बैसले मार्गीं विश्रामा ।
बैसल्या उपशब्दउगमा । पुन्हां दावी मच्छिंद्र ॥ ५८ ॥
म्हणे बा रे गोरक्षनाथ । कर्कश अरण्य येथपर्यंत ।
आपणा लागलें भयानकवत । पुढेंही लागेल ऐसेंचि ॥ ५९ ॥
येरु म्हणे जी गुरुराय । याहूनि पुढें अधिक काय ।
मच्छिंद्र म्हणे कांहीं भय । काननीं या आहे कीं ॥ ६० ॥
गोरक्ष म्हणे वागुत्तर । कीं महाराजा असतां जड पर डर ।
होता जो तो डर थोर । मागेंचि राहिला आहे जी ॥ ६१ ॥
आतां नाहीं डर कैंचा । स्वस्थ असावें कायावाचा ।
मागें राहिला भाव साचा । जड डराचा महाराजा ॥ ६२ ॥
तरी आतां कृपादेही । आपणांपाशीं डर नाहीं ।
मग भय कैंचे काननप्रवाहीं । जड असल्या अचाट ॥ ६३ ॥
यावरी बोले मच्छिंद्रनाथ । आपणांजवळी जड आहे बहुत ।
हाटकवीट भस्मझोळींत । स्त्रीराज्यांतूनि आणिली ॥ ६४ ॥
म्हणूनि तूतें भय स्थित । विचरतां काननांत ।
येरु म्हणे अशाश्वत । जडही असे डर गेला ॥ ६५ ॥
ऐसें म्हणतां गोरक्षनाथ । मच्छिंद्राचे काय चित्तांत ।
चित्तीं म्हणे हाटकविटेतें । सांडिली कीं कळेना ॥ ६६ ॥
ऐसें जाणूनि स्वचित्तांत । मच्छिंद्र तळमळी पहावयातें ।
परी गोरक्ष मच्छिंद्राचा धरुनि हात । पर्वतावरी नेतसे ॥ ६७ ॥
तो महापर्वत गर्भगिरी । उभे चढतांचि लघुशंका करी ।
पर्वतमाथां गोरक्ष मौन वरी । वृत्त समजेल म्हणूनी ॥ ६८ ॥
मग दोन घटिका स्वस्तिक्षेम । सेविती ते विश्राम उपरी ।
अवयव परिधानून । मार्ग क्रमूं म्हणताती ॥ ६९ ॥
ज्याचें त्यानें वस्त्रभूषण । अंगीं केलें परिधान ।
आपुल्या झोळ्या घेवोन । कक्षे अडकवून बांधिती ॥ ७० ॥
तों मच्छिंद्र आपुली घेऊनि झोळी । विकासूनि पाहे नेत्रकमळीं ।
तों कनक नसे पाषाणवळी । झोळीमाजी नांदतसे ॥ ७१ ॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ । धरणीवरी अंग टाकीत ।
अहा अहा म्हणूनि आरंबळत । कनकवीट गेली म्हणोनी ॥ ७२ ॥
मच्छिंद्र बोले क्रोधेंकरोन । तुवां टाकिलें रे माझे धन ।
तूतें ओझें काय दारुण । झालें होतें तयाचें ॥ ७३ ॥
अहा आतां काय करुं । कोठे पाहू हा भांगारु (सोनें) ।
परम यत्नें वेचूनि शरीरु । हाटक (सोनें ) आणीलें होतें म्यां ॥ ७४ ॥
तरी हा थोर मध्यें अनर्थ । कैसा योजिला श्रीभगवंते ।
हातींचें सांडूनि गेलें वित्त । तरी देवक्षोभ जाणावा ॥ ७५ ॥
ऐसें म्हणोनि दडदडा धांवत । पुन्हां परतोनि मागें पहाता ।
ठाईं ठाईं चांचपीत । उकरीत महीसी ॥ ७६ ॥
ऐसी करोनि अपार चेष्टा । अंग टाकी महीं प्रतिष्ठा ।
गडबडां लोळोनि स्फुंदे स्पष्टा । करकमळें पिटीतसे ॥ ७७ ॥
पुनः पुनः मही उकरीत । इकडे तिकडें पाषाण करीत ।
भाळावरती ठेवूनि हस्त । कर्म बुडालें म्हणतसे ॥ ७८ ॥
ऐसें म्हणोनि आक्रोश करीत । दीर्घस्वरें हंबरडा फोडीत ।
जीवास सोडूं म्हणत । कैसें केलें देवानें ॥ ७९ ॥
पिशाचासम भ्रमण करीत । म्हणे माझें येथें आहे वित्त ।
धांवोनि उकरा महीतें । कोणीतरी येऊनियां ॥ ८० ॥
गोरक्षापाशीं शीघ्र येऊन । म्हणे तूं माझें न देशी धन ।
तूं कोण कोणाचा येऊन । पाळतीनें मिरविसी ॥ ८१ ॥
ऐसें अनओळखीनें बोलत । तेणें हृदयीं दचकला गोरक्षनाथ ।
मग मच्छिंद्राचा धरोनि हात । पर्वतावरी नेतसे ॥ ८२ ॥
तो महानग पर्वत गर्भगिरी । उभे चढले तयावरी ।
चढतां लघुशंका करी । पर्वतमाथां गोरक्ष ॥ ८३ ॥
सिद्धियोग मंत्र जपूनी । मंत्रधार कनकवर्णी ।
सकळ पर्वत दैदीप्यमानी । शुद्ध हाटकीं मिरवला ॥ ८४ ॥
मग श्रीगुरुसी नमन करुन । म्हणे लागेल तितुकें घेईजे सोनें ।
तें मच्छिंद्र पाहूनियां जाण । म्हणे धन्य धन्य गोरक्ष ॥ ८५ ॥
गोरक्ष म्हणे गुरुनाथा । लागेल तितुकें घ्यावें कनका ।
येरु म्हणे तूं परीस निका । लाभलासी पाडसा ॥ ८६ ॥
मग हृदयीं धरुनि गोरक्षनाथ । म्हणे बा धन्य आहेस सुत । 
सकळ सिद्धींचें माहेर युक्त । होऊनि जगीं मिरविसी ॥ ८७ ॥
मग मी ऐसा परीस टाकोन । काय करुं फार सुवर्ण ।
उत्तम निधानालागीं सांडून । वल्लीरसा कां पहावें ॥ ८८ ॥
हातींचा टाकूनि राजहंस । व्यर्थ कवळूं फोल वायस ।
कीं कामधेनू असतां गृहास । तक्र मागे घरोघरी ॥ ८९ ॥   
दैवें निधी लाभल्या हातीं । किमर्थ शोधाव्या किमयायुक्ती ।
चिंतामणीची असतां वस्ती । चिंता करावी खासयातें ॥ ९० ॥
तें बाळका कैसें कळे पूर्ण । अर्थ लाधला तुजयोगानें ।
आतां कासया व्हावें सुवर्ण । सकळनिधी अससी तूं ॥ ९१ ॥
ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ । उपरी गोरक्ष विचार करीत । 
म्हणे महाराजा आजिपर्यंत । कनक झोळीं वागविलें ॥ ९३ ॥
येरु म्हणे वत्सा ऐक । मम हृदयींची होती भूक । 
कीं आपुले देशीं मोडूनि हाटक । बहु साधूतें पूजावें ॥ ९४ ॥
तया हाटकाचें करुनि अन्न । मेळवावे अपार संतजन ।
भंडारा करावा ऐसें मन । मनकामनेतें वेधलें ॥ ९५ ॥
इतुकाचि अर्थ होता चित्तीं । म्हणोनि वागविलें हाटकाप्रती ।
यावरी बोले गोरक्षजती । तरी ही कामना फेडीन मी ॥ ९६ ॥
मग पर्वतीं बैसवोनि मच्छिंद्रनाथा । आपण पुन्हां उतरला खालता ।
उचलोनि नेलें मीननाथा । पर्वतमाथीं गोरक्षकें ॥ ९७ ॥
मग गंधर्वास्त्र जपोनि होटीं । स्वर्गा प्रेरिली भस्मचिमुटी ।
तेणेंकरुनि महीतळवटीं । चित्रसेन उतरला ॥ ९८ ॥
श्रीनाथासी करुनि नमन । उभा राहिला कर जोडून ।
म्हणे महाराजा आज्ञा कोण । काय कार्य करावें मीं ॥ ९९ ॥
येरु म्हणे गंधर्वनाथा । आणिक पाचारीं गंधर्व येथें ।

त्यांसी पाठवूनि महीवरतें । मेळा करा सर्वांहीं ॥ १०० ॥

Shri Navanath BhaktiSar Adhyay 23 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेवीसावा (२३)


Custom Search

No comments: