Wednesday, February 17, 2016

Shri NavanathBhaktiSar Adhyay 19 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकोणीसावा (१९) भाग १/२


ShriNavanath BhaktiSar Adhyay 19 
kanifa told Goraksha that his guru Machchhindra was in Female kingdom. Goraksha started towards it for bringing Machchhindra from there. He met Kalinga who was a dancer and going to Female kingdom. Goraksha proved his mastery on playing different musical instruments. Then he entered female kingdom alongw with Kalinga who was very much impressed by Goraksha's mastery over different musical instruments. Goraksha used Vajrastra, Sparashastra, Mohanastra and Nagastra so that Maruti would not trouble him. Maruti came at night and because of these Astras became helpless and about to die. He they prayed God ShriRam who came at his rescue and made him free. Then both went to Goraksha for telling him not to take Machchhindra out of female kingdom with him. Goraksha told them that he is there to take Machchhindra with him any how and any cost. Anything other than that they can ask him to do, he would do it. In the Next 20 th Adhyay Dhundisut Malu from Narahari family will tell us what happen next.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकोणीसावा (१९) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी सद्गुरुराजा । सर्वज्ञ विजय भोजा ।
भवाब्धी भवसरिते काजा । साधक नौका अससी तूं ॥ १ ॥
हे पूर्णब्रह्मानंद कंदा । पुढें बोलवीं भक्ती अतिमोदा ।
तुझी लीला अगाधा । भक्तिसारग्रंथातें ॥ २ ॥
मागिले अध्यायी वदविले गहन । श्रीगोपीचंदाचें उदार कथन ।
बद्रिकाश्रमीं तप करुन । तीर्थाटणीं निघाला ॥ ३ ॥
याउपरी ऐकिजे श्रोतीं । सिंहावलोकनीं विश्रांती ।
गोरक्ष कानिफाचे युक्ती । स्त्रीराज्यांत जातसे ॥ ४ ॥
मार्गी चालतां मुक्कामोमुक्काम । सदा श्रीगुरुचें आठवी नाम ।
ग्रामांत करुनि भिक्षाटण । पुढें मार्ग क्रमीतसे ॥ ५ ॥
ऐसिया स्थितीं गौडबंगाल । सांडूनि सांडिला बंगालकौल ।
पुढें जात स्त्रीराज्यांत वहिला । सीमेपर्यंत पातला ॥ ६ ॥
परी विचारी स्वमनांत । श्रीगुरुराज आहेत तेथ ।
राजवैभव बहु सामर्थ्य । संपत्तीचें मिरवतसे ॥ ७ ॥
ऐसे वैभवमानी सुखप्रकरणीं । मातें ओळखील कैसा कोणी ।
श्रीमंतापुढें हीन दीन । मान्यत्वानें मिरवेना ॥ ८ ॥
जेवी अर्कापुढें खद्योत (काजवा) । हीन दीन अति दिसत ।
तेवीं मज कंगालवंतातें । कोण तेथें ओळखील ॥ ९ ॥ 
मेरुपुढें मशक स्थिती । कोण वर्णावी कवण अर्थीं ।
कीं पुढें बैसल्या वाचस्पती । मैंद वल्गना मिरवीना ॥ १० ॥
कीं हिरातेज पडिपाडा (बरोबरीला) । गार ठेऊनि पुढां ।
परीस पालटा देतां दगडा । योग्यायोग्य साजेना ॥ ११ ॥
सुवर्ण मिरवे राशी सोळा । तेथें दगडाचा पाड केतुला ।
तेवीं मातें संपत्ती मिरवला । ओळखील कैसा तो ॥ १२ ॥
असो याउपरी दुसरे अर्थी । मम नाम कळतां मच्छिंद्राप्रती ।
परम द्वाड लागेल चित्तीं । सुखसंपत्ती भोगितां ॥ १३ ॥
जैसें जेवितां षड्रस अन्न । तैं कडुवट सेवी कोण ।
तेवीं मच्छिंद्र संपत्तीतें टाकून । जाईल कैसा बैरागी ॥ १४ ॥
यापरी आणि तिसरे अर्था । मम नाम श्रीगुरुलागीं कळतां ।
नेणों कल्पना वरुनि चित्ता । वर्तेल घाता माझिया ॥ १५ ॥
मग तयाच्या सवें विद्यारळी । करावी आपण बांधूनि कळीं ।
हे तों कोड येणें काळीं । मजप्रती योग्य भासेना ॥ १६ ॥
ज्या स्वामींचें वंदितों चरण । तयासीं विद्येची रळी खेळेन ।
हें योग्य मातें नव्हे जाण । अपकीर्ति ब्रह्मांड भरी ॥ १७ ॥
ऐसें तर्किवितर्क करितां । श्रीगोरक्ष मार्गीं रमतां ।
तों वेश्याकटक देखिलें तत्त्वतां । स्त्रीराज्यांत जाती त्या ॥ १८ ॥
तों सकळ वेश्यांची मुख्य कामिनी । गुणभरिता ।
तिचें स्वरुप वर्णितां वाणी । रतिपति (मदन) आतळेना ॥ १९ ॥
जिचे पाहतां मुखकमळा । शशितेजाहूनि अति निर्मळ ।
परम लज्जित चपळा केवळ । होऊनि ढगीं रिघताती ॥ २० ॥
जिचा नेत्रकटाक्षबाण । तपस्व्यांचें वेधीत मन ।
मग विषयें लंपट अपार जाण । कवण अर्थीं वर्णावे ॥ २१ ॥
ऐसियेपरी सुलक्षण दारा । चातुर्यकलिका गुणगंभीरा ।
जिचे नाम साजोतरा । कीं हिरागारा मिरवती ॥ २२ ॥
जिचें सुस्वर विपुल गायन । ऐकतां गंधर्व करिती खालती मान ।
अप्सरा परम लज्जित होऊन । सेवा इच्छिती जियेची ॥ २३ ॥
ऐशापरी ती कलिंगदारा । जात स्त्रीदेशांत अवसरा ।
तैं अवचित तीतें गोरक्ष उदारा । देखता झाला निजदृष्टीं ॥ २४ ॥
मग तो जवळी योगद्रुम । जाऊनि पुसे तियेचें नाम ।
येरी म्हणे कलिंगा उत्तम । नाम असे या देहा ॥ २५ ॥
येरु म्हणे कवणार्थी । जातां कोणत्या ग्रामाप्रति ।
कलिंगा म्हणे स्त्रीदेशाप्रती । जाणें आहे आमुतें ॥ २६ ॥
राव मैनाकिनी पद्मिनी । सकळ स्त्रियां देशस्वामिनी ।
तियेतें नृत्यकळा दावूनी । वश्य करणें आहे जी ॥ २७ ॥
ती राजपद्मिनी वश्य होतां । अपार देईल आमुतें वित्ता । 
यापरी कामना योजूनि चित्ता । गमन करितों आम्ही कीं ॥ २८ ॥
ऐसा वृत्तांत ऐकूनि युक्तीं । हृदयीं विचारी योगपती ।
कीं इचीच शुद्ध धरुनि संगती । प्रविष्ट व्हावें त्या स्थानीं ॥ २९ ॥
मग सहजस्थितीनें गमना । आव्हानूनि दृष्टीं राजसदना ।
गुप्तवेषें श्रीगुरुकामना । अवगमूनि घ्यावी तों ॥ ३० ॥
ऐसा विचार करुनि चित्तीं । बोलता झाला तिये युवती ।
म्हणे मी येतों तुमच्या संगतीं । न्याल तरी कीं कृपेनें ॥ ३१   

येरी म्हणे नरेंद्रोत्तमा । येऊं पाहसी संगती आम्हां ।
तरी कुशळपणी काय तुम्हां । भोंवरिली विद्या जे ॥ ३२ ॥
येरु म्हणे करुनि गायन । तुम्हांसवें चातुर्य मानून ।
आणि मृदंगवाद्य वाजवीन । कुशळपणें नेटका ॥ ३३ ॥
येरी म्हणे गाणें वाजविणें । येतसे चातुर्यवाणें ।
तरी प्रथमारंभीं आम्हां दाविणें । कैसे रीतीं कुशलत्व ॥ ३४ ॥
येरु म्हणे जी काय उशीर । आतांचि पहावा चमत्कार ।
हातकंकणा आदर्शव्यवहार । कासया पाहिजे दृष्टीतें ॥ ३५ ॥
कीं स्पर्शतां शुद्ध अमरपण । होय न होय केलिया पान ।
कीं स्पर्शिल्या परिसोन । न होय भ्रांती मिरवेल काय ॥ ३६ ॥
तरी आतां या ठायीं । मम विद्येची परीक्षा घ्यावी ।
ऐसें ऐकतांचि कलिंगा महीं । सदनाहूनि उतरली ॥ ३७ ॥
महीतळीं घालूनि आसन । सारंगी देत आणून ।
म्हणे नवरसें कुशलत्वपण । कळा दावीं कोणती ॥ ३८ ॥
ऐसी ऐकूनि तियेची गोष्टी । करीं कवळूनि भस्मचिमुटी ।
गंधर्वप्रयोग होटीं । जल्पूनि भाळीं चर्चीतसे ॥ ३९ ॥
चर्चूनि दाही दिशा प्रेरीतसे । आणि चतुर्थवाद्यातें स्पर्शीतसे ।
ऐसें झालिया हुंकार देतसे । गावें वाजवावें म्हणूनिया ॥ ४० ॥
तरी काननीं तरु पाषाण । जल्पती गंधर्वासारखें गायन ।
तंतवितंत सुस्वरी गायन । वाजवी वाद्य चातुर्य हो ॥ ४१ ॥
आपुलें आपण वाद्य वाजविती । पाषाण तरु गायन करिती ।
हें पाहूनि कलिंगा युवती । आश्र्चर्य करी मानसीं ॥ ४२ ॥
स्वमुखीं ओपूनि मध्यमांगुळी ती । विस्मय करी आपुल्या पोटीं ॥
चित्ती म्हणे हा नरधूर्जटी । ईश्र्वरतुल्य भासतसे ॥ ४३ ॥
जो पाषाणतरुहातीं गायन । करवीत गंधर्वा सरी आपण ।
तयालागीं स्वतां गायन । अशक्य काय करावया ॥ ४४ ॥
जो पाषाणी पिंवळेपण । करुं जाणे लोहाचें सुवर्ण । 
तयालागीं परिसमणी । करावया अशक्य म्हणावें कीं ॥ ४५ ॥
जेणें बुरंट (कमी दूध देणारी) गौतमीकांसेखालीं । सर्व पदार्थ मही उद्धरिली ।
त्यातें कामधेनु निर्माया भली । परम अशक्यता न बोलावी ॥ ४६ ॥
कीं कोणत्याही वृक्षाखालीं । कामना पुरवी सकळी ।
ते कल्पतरुमेळीं । अनायासें शोभतसे ॥ ४७ ॥
तन्न्यायें वृक्षपाषाणी । आणिली ज्यानें गंधर्वमांडणी ।
तो स्वतः सिद्ध कुशलपणीं । गाणार नाहीं कां बोलावें ॥ ४८ ॥
तरी आतां असो कैसें । आपणचि रहावें याचे संगतीस ।
ऐसा विचार करुनि स्वचित्तास । बोलती झाली विव्हळा ॥ ४९ ॥
म्हणे महाराजा सद्गुणसरिता । मी दिन किंकर अनाथा ।
ऐसा काम उदेला चित्ता । तरी सिद्धार्थ आव्हानीं ॥ ५० ॥
अगाध वर्णनाची सविताराशी । दैवें उदेली मम तमगुणासी ।
तरी संज्ञा जे बोलिलासी । तेंचि सिद्ध आव्हानीं ॥ ५१ ॥
तरी महाराजा विद्यार्णवा । जगीं मिरविसी कोणत्या भावा ।
ऐसें पुसतां गोरक्ष जीवा । परम कल्पना योजीतसे ॥ ५२ ॥
चित्तीं म्हणे नामाभिधान । प्रविष्ट न करावें इजकारण ।
गुप्त ठेविल्यासी कार्यसाधन । घडून येईल पुढारां ॥ ५३ ॥
ऐसा विचार करुनी । म्हणे ऐकें शुभाननी ।
पूर्वडा नाम देहालागुनी । जगामाजी मिरवतसे ॥ ५४ ॥
येरी म्हणे पूर्वडराया । अर्थकाम कोण हृदया ।
असेल तैसी वदूनियां । सुखालागीं हेलावें ॥ ५५ ॥
येरु म्हणे वो शुभाननी । विषयधनाची बोलसी कडसणी ।
परी कांहीं कामना नसे मनीं । अज्ञान असे या अर्थीं ॥ ५६ ॥
एक वेळ उदरापुरती । समया देईं कां आहुती ।
याविरहित अर्थ चित्तीं । इच्छा नसे कांहींच ॥ ५७ ॥
येरी ऐकूनि ऐसें वचन । अवश्य करी प्रेमें भाषण ।
म्हणे महाराजा नरेंद्रा पूर्ण । अर्थ पुरेल हा तुमचा ॥ ५८ ॥
परी एक आहे मम बोलणें । स्त्रीराज्यांत आपण जाणें । 
तेथें पुरुषाचें आगमन । नाहींच त्या देशांत ॥ ५९ ॥
येरु म्हणे कवण अर्थीं । आगमन नसे तया देशाप्रती ।
येरी म्हणे मारुतसुती । भुभुःकारें स्त्रिया होती ॥ ६० ॥
ऊर्ध्वरेता वायुनंदन । रेत पडे भुभुःकारवचनें ।
गरोदर होती तेणेंकरुन । सकळ स्त्रिया त्या देशीं ॥ ६१ ॥
त्याचि भुभुःकारेंकरुन । पुरुषगर्भांत होय पतन ।
तेणेंकरुन तयांसी मरण । होतसे जाण महाराजा ॥ ६२ ॥
तरी तुझें जाणें उदेलें चित्तीं । परी तूंतें होईल कैसी गती ।
या संशयाची भ्रांती । मनीं घोटाळे माझिया ॥ ६३ ॥
येरु म्हणे ऐक युवती । काय करील आम्हा मारुती ।
प्रळयकाळींची मूर्ध्नी हरती । लोळवीन महीतें ॥ ६४ ॥
असे तीव्रपणाचा तपोजेठी । जेणें सविता गिळोनि ठेविला पोटीं ।
तेथें दीपाची हळहळ मोठी । मानील काय तो पुरुष ॥ ६५ ॥
सकळ मही जो माथां वाहे । त्यातें पर्वताचें भय काये ।
अंब्धी गिळितां शरण रिघावें । काय वेगें थिल्लर ॥ ६६ ॥
तरी आता शुभाननी । हा संशय तूं न आणीं मनीं ।
ऐसें गोरक्ष तीतें बोलोनी । ते स्थानाहूनि उठिला ॥ ६७ ॥
मग ती कलिंगा बैसवूनि रथीं । आपण झाला पुढें सारथी ।
दोन्ही वाग्दोरे धरुनि हातीं । धुरा वेष्टुनिया बैसलासे ॥ ६८ ॥
परी प्रथमारंभी तो धूर्जटी । करीं कवळूनि भस्मचिमुटी ।
वज्रास्त्र मंत्रहोटीं । अपारशक्ती जल्पला ॥ ६९ ॥
तयामागें स्पर्शमंत्रा । जल्पोनियां निजवक्रा ।
तेंहीं मिरवे सबळ अस्त्रा । महीलागीं महाराजा ॥ ७० ॥
यावरी तिसरें मोहनास्त्र । विराजले अति पवित्र ।
उपरी चवथें नागास्त्र । सीमेवरी तें प्रेरिलें ॥ ७१ ॥
ऐसें चतुर्थास्त्र प्रेरुन । चालता झाला गोरक्ष त्वरेनें ।
सीमा उल्लंघूनि एक योजन । स्त्रीदेशांत मिसळला ॥ ७२ ॥
चिनापट्टण उत्तम ग्राम । तेथें झालासे मुक्काम ।
तंव लोटूनि गेला अवघा दिन । महीं निशा दाटली ॥ ७३ ॥
परी दिनासमान रात्री । चंद्रतेजें मिरवली होती ।
सकळीं भोजनें सारुनि निगुतीं । पहुडलीं शयनीं आपुलाल्या ॥ ७४ ॥ 
निशा लोटली एक प्रहर । तों रात्री निवळली महीवर ।
सकळ लोपूनि अंधकार । दिशा उजेडें उजळली ॥ ७५ ॥
ते दिनींची म्हणूं नये रात्री । की उदया आली माया भगवती ।
चंद्रपोत घेऊनि हातीं । सहजमतीं क्रीडतसे ॥ ७६ ॥
कीं ते रात्र नव्हे जडितपदक । हेमतगटी अवनी देख ।
त्यावरी नक्षत्रें अन्य माणिक । मध्यें हिराबिंदुशोभे जैसा ॥ ७७ ॥ 
 कीं ते रात्र नव्हे भद्रकाळी । श्रृंगारनक्षत्रें मुक्तमाळी ।
चंद्रबिजवरा लेवूनि भाळीं । महीलागीं क्रीडतसे ॥ ७८ ॥ 
ऐसियेपरी सुलक्षण राती । उजेड दावी महीवरती ।
तों येरीकडे गमन मारुती । सेतुहूनि करीतसे ॥ ७९ ॥
मार्गीं जातां सहजस्थितीं । येवोनि पोंचला सीमेवरती ।
तों वज्रास्त्र हृदयाप्रती । येवोनियां आदळलें ॥ ८० ॥
वज्रशरीरी मारुती । परी वज्रप्रहारें पडला क्षितीं ।
मूर्च्छा दाटोनि हृदयाप्रती । विगतगति पडलासे ॥ ८१ ॥
यावरी स्पर्श करी झगटीं । लिप्त केला महीपाठीं ।
त्यावरी मोहनास्त्र हृदयपुटीं । जाऊनियां संचरलें ॥ ८२ ॥
त्यावरी नागास्त्र नागपती । सहस्त्रफणी प्रत्यक्षमूर्ती ।
उदय पावतां पदहस्ती गुंडाळूनियां बैसला ॥ ८३ ॥
चतुर्थास्त्रांचे पडता वेष्टन । मग कासावीस होतसे वायुनंदन ।
अति तळमळे उडयाकारण । परी स्पर्शास्त्र उठों नेदी ॥ ८४ ॥
घडोघडी मूर्च्छा येतां । नेत्र भोवंडी वांती देतां ।
त्यावरी विखार वेष्टितां । तेणें होत कासाविसी ॥ ८५ ॥
मोहनास्त्राचा अति प्रसर । मोहूनि घेतलें सकळ शरीर ।
मी कोण कोणत्या कार्यांवर । आलों हेंही कळेना ॥ ८६ ॥
ऐसा निचेष्टित महीवरती । पडला असे मारुती । 
एक प्रहर लोटल्यावरती । प्राण निघूं पाहातसे ॥ ८७ ॥
नेत्र झाले श्र्वेतवर्णी । मुखीं लोटलें आरक्त पाणी ।
तें लोटलें सकळ अवनीं । भिजूनि लोट लोटतसे ॥ ८८ ॥
ऐसा समय तया होतां । मग विचार करी आपुल्या चित्ता ।
ऐसिया संकटी प्राण आतां । वांचत नाहीं सहसाही ॥ ८९ ॥
तरी माझा काळ आला । आतां स्मरावें श्रीरामाला ।
ऐसा विचार करुनि स्वचित्ताला । आठविलें श्रीरामातें ॥ ९० ॥
हे दयार्णवा कुळभूषणा । सीतापते रघुनंदना ।
दशग्रीवांतका भक्तदुःखमोचना । धांव पाव वेगेंसीं ॥ ९१ ॥
हे करुणानिधे ताटिकांतका । मुनिमनोरंजना रघुकुळटिळका ।
अयोध्याधीशा प्रतापार्का । धांव पाव वेगेंसीं ॥ ९२ ॥  
हे शिवमानसरंजना । चापधारका तापहरणा ।
शरयूतीर विहारा आनंदसदना । धांव पाव वेगेंसीं ॥ ९३ ॥  
हे श्रीरामा श्यामतनुधारका । एकवचनी व्रतदायका । 
एकपत्नीबाणनायका । धांव पाव वेगेंसीं ॥ ९४ ॥
हे पंकजनेत्रा कोमलगात्रा । बिभीषणप्रिया कोमलपात्रा ।
परमप्रिय कपिकुळगोत्रा । धांव पाव वेगेंसीं ॥ ९५ ॥
हे किष्किंधाधिपवालिनिर्दलना । भक्तप्रियकरा भयमोचना ।
विदेहजामाता जगपाळणा । धांव पाव वेगेंसीं ॥ ९६ ॥
हे विश्र्वामित्रमखसिद्धिकारका । खरदुषेणादिदैत्यांतका ।
जलधिजलपाषाणतारका । धांव पाव वेगेंसीं ॥ ९७ ॥ 
हे अहिमहिदानवहरिता । शतमुखखंड वैदेहीरता ।
मंगळधारणा कुशळवंता । धांव पाव वेगेंसीं ॥ ९८ ॥
हे अर्णवविहारी मारीचदमना । जटायूप्रिया मोक्षगहना ।
शिवचापभंगा मंगळधामा । धांव पाव वेगेंसीं ॥ ९९ ॥
हे दयार्णव राम करुणाकरु । मित्रकुळध्वज कीर्तिधारु ।

ऐसें असूनि संकटपारु । सुखशयनीं निजला अससी ॥ १०० ॥

Shri NavanathBhaktiSar Adhyay 19 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकोणीसावा (१९)


Custom Search

No comments: