Saturday, February 13, 2016

ShriNavanath Bhaktisar Adhyay 18 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अठरावा ( १८ ) भाग २/२


ShriNavanath Bhaktisar Adhyay 18 
Gopichand started to go to Badrikedar for his 12 years tapas over there. He was passing through Poulpattanam where Tilkchand was a king and his daughter in law Champavati was Gopichand's sister. Tilakchand did not believe in Nathpanth and so he was unhappy with Gopichand as he had taken Diksha of Nathpanth. He told his family to serve food to Gopichand outside the house. Champavati became very sad for the worst treatment to his brother. She finished her life with a knife. Gopichand came to know about it. He became sad knowing that Champavati had to finish her life because of him. He told Tilkachand that his guru Jalindar would bring back Champavati alive again. However nobody believed him. Tilakchand proceeded with the further required rights. however he handed over one hand of Champavati to Gopichand. Jalindar came with Gopichand and he used Sanjivani Mantra to bring back Champavati alieve again. Tilakchand came to know the strength of Nathpanth. In the next 19 th Adhyay DhundiSut Malu from Narahai family will tell us about Goraksha who went to female kingdom to bring his Guru Machchhindra.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अठरावा ( १८ ) भाग २/२
कोणी हंबरडा हाणिती बळें । कोणी पिटिती वक्षःस्थळें ।
कोणी महीं आपटिती भाळें । मूर्च्छागत पडताती ॥ १०१ ॥
कोणी गुण आठवूनि रडती  । कोणी रडताती चांगुलपण ।
कोणी म्हणती दैवहीन । भ्रतार असे इयेचा ॥ १०२ ॥
कोणी म्हणती अब्रूवान । चंपावती होती उत्तम ।
निजबंधूचे क्लेश पाहोन । दिधला प्राण लज्जेनें ॥ १०३ ॥
एक म्हणे चंपावती । किती वर्णावी गुणसंपत्ती ।
मृगनयनीं जैसा हस्ती । स्त्रियांमाजी मिरवतसे ॥ १०४ ॥
एक म्हणती सदा आनंदी असून । पहात होतों हास्यवदन ।
सदा हर्षित असे गमन । हस्ती जेवी पृतनेचा ॥ १०५ ॥
एक म्हणे चांगुलपणीं । घरांत मिरवे जेवीं तरणी ।
एक म्हणे वो शुभाननी । किती मृदु कोकिळा ॥ १०६ ॥
एक म्हणती सासुरवास । असतां नाहीं झाली उदास ।
ईश्र्वरतुल्य मानूनि पुरुषास । शुश्रूषा करी वडिलांची ॥ १०७ ॥
ऐसें म्हणोनि आक्रंदती । अवघे एकचि कोल्हाळ करिती ।
तो नाद अश्र्वशाळेप्रती । अकस्मात आदळला ॥ १०८ ॥
अश्र्वशाळे गौडनाथ । अश्र्वरक्षकांलागीं पुसत ।
एवढा कोल्हाळ कां सदनांत । झाला आहे कळेना ॥ १०९ ॥
परी सर्वांठायीं बोभाट । झाला आहे गांवांत प्रविष्ट ।
कीं भावाकरितां अति कष्ट । जीवित्वातें दवडिलें ॥ ११० ॥
तें अश्र्वरक्षकांसी होता श्रवण । पुसता सांगती वर्तमान ।
म्हणती नाथा जीव राणीनें । बंधूकारणें दीधला ॥ १११ ॥
नृप म्हणे कवण रे राणी । कोण बंधु कवणस्थानीं ।
येरु म्हणती ऐकिलें कानीं । चंपावती राणी ती ॥ ११२ ॥
तियेचा बंधु झाला पिसा । सोडूनि गेला राज्यमांदुसा । 
म्हणोनि वरोनि दुःखलेशा । जीवित्व त्यागिलें रांडकीनें ॥ ११३ ॥
येरु म्हणे बंधु कोण । ते म्हणती त्रिलोकचंदनंदन ।  गोपीचंद ऐसें नाम । जगामाजी मिरवतसे ॥ ११४ ॥
ऐसें ऐकोनि नृपनाथ । नयनीं लोटले अश्रुपात ।
चित्तीं म्हणे वो बाई घात । मजसाठीं कां केला ॥ ११५ ॥
मग चंपावतीचे आठवूनि गुण । गोपीचंद मोहें करी रुदन ।
अहा मजसाठीं दिधला प्राण । हें अनुचित झालें हो ॥ ११६ ॥
तरी आता महीवरती । माझी झाली अपकीर्ती ।
आणिक सोयरे दुःख चित्तीं । मानितील बहुवस ॥ ११७ ॥
मी येथें आलों म्हणोन । चंपावतीनें दिधला प्राण ।
हें दुःखा होईल कारण । विसर पडणार नाहीं कीं ॥ ११८ ॥
ऐसा विचार करी चित्तांत । परी नयनीं लोटले अश्रुपात ।
येरीकडे संस्कारासी प्रेत । चितामहीं (स्मशान) चालिलें ॥ ११९ ॥
गोपीचंदही प्रेत पाहून । करीत चालिला सवें रुदन ।
परी चित्त वेधिलें कल्पनेकरुन । अपकीर्ति अवघी जाहली ॥ १२० ॥
तरी आतां असो कैसे । उठावावें स्वभगिनीसी ।
आणि चमत्कार सोयर्‍यांसी । दाखवावा प्रताप ॥ १२१ ॥
आम्हीं जोग घेतला म्हणूनी । तृणासमान मानिलें यांनीं ।
तरी नाथपंथाची प्रतापकरणी । निजदृष्टीं दावावी ॥ १२२ ॥
जैसा पार्वतीचा गोसावी । परी दक्षें हेळितां तो जांवई ।
जीवित्व हरुनि प्रताप महीं । गाजविला तयानें ॥ १२३ ॥
कीं अष्टावक्र अष्टबाळ ब्राह्मण । कुरुप म्हणूनि केलें हेळण ।
परी त्यानें प्रताप दाखवून । विप्र मुक्त केलें पैं ॥ १२४ ॥
कीं वामनरुप असतां साने । बळीनें मानिलें तृणासमान ।
परी आपुला प्रताप दाखवून । पातालभुवनीं मिरवला ॥ १२५ ॥
कीं अगस्तीचा देह लहान । अर्णवें मानिला तृण ।
परी केशव म्हणतां नारायण । आचमनातें उरला नसे ॥ १२६ ॥
कीं उदयतरुपोटीं । लहान एकादशी गोरटी ।
परी मृदुमान्या न सान दृष्टी । पाहतां मृत्य वरियेला ॥ १२७ ॥
(एकादशी ही झाडापासून उत्पन्न झाली व तीनें मृदुमान्य नांवाच्या दैत्याचा वध केला. अशी कथा आहे.) 
तो दशग्रीव राक्षसपाळ । तृण तुल्य मानिला अनिलबाळ ।
परी सकळ लंकेचा झाला काळ । एकदांचि जाळिली ॥ १२८ ॥
तन्न्यायें आम्हां येथ । झालें मानसन्मानरहित ।
आतां यांतें नाथपंथ । निजदृष्टीं दाखवावा ॥ १२९ ॥
मग सहजस्थितीसवें । स्मशानवटीं गेला राय ।
प्रेतानिकट उभा राहे । उभा राहूनि बोलतसे ॥ १३० ॥
म्हणे ऐका माझें वचन । प्रेत करुं नका दहन ।
श्रीगुरु जालिंदर येथ आणून । चंपावती उठवीन कीं ॥ १३१ ॥
अहा मी येथें समयीं असतां । वायां जातसे भगिनी आतां ।
मग व्यर्थ आचरुनि नाथ पंथा । सार्थ नाहीं मिरविलें ॥ १३२ ॥
कीं पहा मातुळकुळ । आस्तिकें रक्षिलें तपोबळें ।
तेंवीं येथें युवती निर्मळ । चंपावती उठविन मी ॥ १३३ ॥     
कीं अहिरणीं गुंततां हिरा । हिरकणी काढी तया सत्वरा ।
तेवीं येथें भगिनी सुंदरा । चंपावती उठविन मी ॥ १३४ ॥  
कीं मोहरासवें सुत सगुण । कदापि नव्हे भस्म ।
तेवीं येथें सुमधुम । चंपावती उठविन मी ॥ १३५ ॥  
ऐसें बोले सकळांकारणें । परी अविश्र्वासी सकळ जन ।
म्हणती मेलिया जीवित्व पूर्ण । कदाकाळीं येईना ॥ १३६ ॥   कीं वाळल्या रुखालागीं पाला । आला ऐसा नाहीं ऐकिला ।
हें तों न घडे कदा बोला । धर्मनिष्ठ हा बोलतसे ॥ १३७ ॥
गोपीचंद म्हणे बोलतां सत्य । परी मम गुरुचें प्रतापकृत्य ।
वर्णन करितां सरस्वतीतें । वाचा अपूर्ण मिरवतसे ॥ १३८ ॥
जेणें कानिफाचे अर्थालागुनी । सकळ देव आणिले अवनीं ।
आणिले परी पूर्णपणीं । वृक्षालागीं गोंविले ॥ १३९ ॥
सध्यां पहा रे मम प्रतापकरणी । एकादश वर्षें गर्तीं अवनीं ।  
अश्र्वविष्ठेंत राहिला मुनी । प्रताप वर्णू केउता ॥ १४० ॥
तरी धैर्य धरुनि चार दिन । करा प्रेताचें संगोपन ।
श्रीजालिंदर येथें आणून । उठवीन भगिनीसी ॥ १४१ ॥
परी न ऐकती अविश्र्वासी । शुभा (गोवर्‍या) रचिल्या स्मशानमहीसी ।
प्रेत ठेवूनि ते चितेसी । अग्नि लावूं म्हणताती ॥ १४२ ॥
तें पाहूनि गोपीचंद । मग आपण चितेंत बैसूनि शुद्ध ।
म्हणे अग्नि लावा प्रसिद्ध । भस्म करा मजलागीं ॥ १४३ ॥
मी भस्म झालिया पोटीं । मग क्रोध न आवरे जालिंदरजेठी ।
नगर पालथें घालूनि शेवटीं । तुम्हां भस्म करील कीं ॥ १४४ ॥
ऐसें बोलता गोपीचंद वचन । क्रोधें दाटला तिलकचंद पूर्ण ।
म्हणे गुरुचा प्रताप वर्णून । फुगीरपणा मिरवीतसे ॥ १४५ ॥
तरी आम्हां सांगतोसी ऐसें । करुनि दावी चमत्कारास ।
येरी म्हणे उत्तरासरसें । बोलेन तैसें घडेल ॥ १४६ ॥
येरी म्हणे वाम कर । काढूनि देतों जाई सत्वर । 
पाहूं दे गुरुचा चमत्कार । प्रेत रक्षूं आम्ही हे ॥ १४७ ॥
येरी म्हणे फार बरवें । चंपावतीचे प्रेत रक्षावें ।
मी हस्त दावूनि गुरुतें । भाव उपजवीन प्रेमाचा ॥ १४८ ॥
तिलकचंद पुत्रा सांगोनी । वाम कर तियेचा दे काढूनी ।
गोपीचंद चितानसींहूनी । उठवूनियां बोळविला ॥ १४९ ॥
नाथ गोपीचंद घेऊनि कर । पुढें चालिला मार्गावर ।
एक कोस येतां नृपवर । काय केलें इकडे ॥ १५० ॥
चितेमाजी घालूनि प्रेत । डावलूनि गेले सकळ आप्त ।
येरीकडे नृपनाथ । हेलापट्टणीं चालिला ॥ १५१ ॥
मार्गी येतां पांच कोस । परीं हें कळलें जालिंदरास । 
मनांत म्हणे नव्हे सुरस । गोपीचंद आल्यानें ॥ १५२ ॥
पिशुन (दुष्ट लोक) करितील विचक्षणा । नानापरींची होईल वल्गना ।
आणि बाळ पावेल शोकस्थाना । आप्तजनांपुढती ॥ १५३ ॥
ऐसा विचार करुनि चित्तीं । आपण चालिला कृपामूर्ती ।
प्रयाणअस्त्र मंत्रविभूती । चर्चूनियां निजभाळीं ॥ १५४ ॥
तरी ते प्रयाण अस्त्रमंत्र । एकचि नैषधराजपुत्र ।
जाणत होता अस्त्र पवित्र । येरां माहीत नव्हतेंचि ॥ १५५ ॥
तें अस्त्र जालिंदरापासीं । होतें अतिउजळपणासीं ।
प्रयाण भस्म लावितां भाळासी । वातगती चालिला ॥ १५६ ॥
मग लोटतां एक निमिष । धांवोनि आला शतकोश ।
अकस्मात गोपीचंदास । निजदृष्टीनें देखिलें ॥ १५७ ॥
म्हणे वत्सा पुन्हां परतोन । किमर्थ केलें आगमन ।
चरणावरी भाळ ठेवोन । वृत्तांत सर्व निवेदिला ॥ १५८ ॥
मग ऐकोनि वृत्तांता । म्हणे तुझा मनोरथ सिद्ध करीन नृपनाथा ।
नको करुं कांहीं चिंता । पुनः फीर मागुता ॥ १५९ ॥
अवश्य म्हणोनि दोघे जण । मार्गें करिते झाले गमन ।
पौलपट्टणामाजी येवोन । राजंगणी संचरले ॥ १६० ॥
तंव ते आप्तांसहित मेळा । घालूनि बैसले होते पाळा ।
विव्हळ चित्तीं नाना बरळा । रुदनशब्दें बोलती ॥ १६१ ॥
तों अकस्मात देखिलें द्वयनाथ । महातपी दर्शनयुक्त ।
देखतांचि तिलकचंद यथार्थ । धांव पुढें घेतसे ॥ १६२ ॥
परम भक्ती करोनियां नमन । त्वरें आणूनि कनकासन ।
त्यावरी बैसोनि अग्निनंदन । पुढें उभा राहिला ॥ १६३ ॥
परी तो नमनादि आदर । जैसा शठाचा श्रृंगार । 
कीं ढिसाळपणीं ओस नगर । तेवीं विनयभाव तो ॥ १६४ ॥
कीं अजाकंठींचे लंबस्तन । कीं गारोडियाचें शूरत्व पूर्ण ।
कीं वेश्येचें मुखमंडन । तेवीं आदर नृपाचा ॥ १६५ ॥
कीं घटामाजी जैसा अर्क । कीं हिंवराची सावली शीतल देख ।
कीं पिशाचबोलणें न सत्यवाक । तेवीं दावी विनयभावातें ॥ १६६ ॥
कीं वृंदावनाचें गोमटें फळ । कीं अर्कवृक्षीं लोंबलें केळ ।
कीं मैंदाचे गळां माळ । तेवीं विनयभावातें ॥ १६७ ॥
कीं बकाचें दिसे शुद्ध ध्यान । परी अंतरी घोकीत वेंचीन मीन ।
कीं तस्कराचें मौनसाधन । तेवीं विनयभावातें ॥ १६८ ॥
कीं अर्थसाधक वक्ता पूर्ण । परी घातें वेगें घेणार प्राण ।
तयाचें रसाळ भाषण । दावी विनयभावातें ॥ १६९ ॥
कीं गोरक्षकाचें ऊर्ध्वगायन । तेंथें कैचे पहावें तानमान ।
तेवीं त्या राजाचा सन्मान । दावी विनयभावातें ॥ १७० ॥  
कीं उदधीचें द्रोणांत जळ । कीं कनकतुल्य पिवळी पितळ ।
कीं विनयाची गोडी बहुरसाळ । तेवीं विनयभावातें ॥ १७१ ॥
कीं घरनिघेचें सवाष्णपण । कीं भोंद्याचें देवतार्चन ।
कीं म्हशाचें गण्या नाम । तेवीं विनयभावातें ॥ १७२ ॥
तन्न्यायें तो नृपती । तिलकचंद उभा भक्तीं ।
परी भावना सकळ नाथाप्रती । कळूनि आली तयाची ॥ १७३ ॥
म्हणे राया चंपावती । ज्ञानकळा सगुण युवती ।
ऐसी जाया गृहाप्रती । साजेल मातें दिसेना ॥ १७४ ॥
जैसी शिवसाळुंका सुरगणीं । परी ती स्थापावी खडकीं नेऊनी ।
तेवीं सत्य या सदनीं । चंपावती साजेना ॥ १७५ ॥
गर्दभा काय चंदनलेप । मर्कटा व्यर्थ गीर्वाण भाष उमोप (भरपूर) ।
वायसा (कावळ्यास) जाण कनकपिंजररुप । कदाकाळीं घडेना ॥ १७६ ॥
तन्न्यायें चंपावती । तुझें गृहीं असे युवती ।
जैसी मैंदेगृहा वसती । मनहीन मिरवतसे ॥ १७७ ॥
परी आतां असो कैसें । काय करावें ब्रह्मतंत्रास ।
मग पाहूनि गोपीचंदवक्रास । हस्त देईं म्हणतसे ॥ १७८ ॥
मग हस्त काढूनि दृष्टी । देता झाला करसंपुटीं ।
शव जाणूनि पोटीं । उच्चार न करी रायातें ॥ १७९ ॥
मग कवळूनि भस्मचिमुटी । मंत्रप्रयोग बोले होटीं ।
सकळ संजीवनीची राहाटी । प्रोक्षीतसे भुजातें ॥ १८० ॥
भस्म भुजेसी होतां सिंचन । हांक मारीत तयेकारण ।
हांकेसरशी त्वरें उठोन । चरणीं माथा ठेवीतसे ॥ १८१ ॥
अहा जाज्ज्वल्य संजीवनी । क्षणांत उठली राजपत्नी ।
जैसा शुक्रें कच मुखांतूनी । दोन वेळा उठविला ॥ १८२ ॥
तोचि न्याय येथें झाला । सकळांलागीं भाव ठसला ।
अहा जालिंदरनाथ भला । पूर्ण ब्रह्म म्हणवूनी ॥ १८३ ॥
मग लागवेगें सकळ उठूनी । श्रीनाथाच्या लोटलें चरणीं ।
म्हणती अपार केली करणी । शुक्र प्रत्यक्ष कलींचा हा ॥ १८४ ॥
मग समस्त म्हणती फार अपूर्व । कौतुक दावी गोपीचंदराव ।
धनसंपत्तीतें काय करावें । टाकूनि जावें सर्वस्वीं ॥ १८५ ॥
मग सर्व जग बोले राया भलें । पश्र्चातापें पूर्ण तापलें ।
परी ते स्मशान वैराग्य ठेलें । पुन्हां जैसें तैसेंचि ॥ १८६ ॥
कीं करी (हत्ती) आव्हानिला अति निर्मळ । परी सवेंचि गंधमोरीं (चिखलामध्ये) लोळे । उकिरड्यांत उतावेळ ॥ १८७ ॥
तन्न्यायें सर्व लोक । बोलती पश्र्चात्तापे दोंदिक । 
परी न सुटे भोगितां नरक । प्रारब्धयोग तयांचा ॥ १८८ ॥
असो ऐसी प्रारब्धकरणी । श्रीजालिंदर जाय उठवूनि ।
मग उठता झाला कनकासनीं । हेलापट्टणीं जावया ॥ १८९ ॥
मग तो तिलकचंद नृपती । अभिमान दवडूनि झाला गलती । 
सलीलपणीं पदावरती । मस्तक ठेवी सप्रेम ॥ १९० ॥
म्हणे महाराजा मी पतित । राजवैभवें झालों उन्मत्त ।
लघु मानिला गोपीचंदनाथ । तरी क्षमेतें वरीं आतां ॥ १९१ ॥
तुम्ही दयाळू कनवाळू संत । मायेहूनि मायावंत ।
तरी बाळाचे अन्याय यथार्थ । उदरामाजी सांठवा ॥ १९२ ॥
ऐसें बोलूनि नम्रोत्तर । चरणीं मौळीं वारंवार ।
ठेवूनि म्हणे आजची रात्र । वस्ती करा या ठायीं ॥ १९३ ॥
ऐसें ऐकूनि तयाचें वचन । बोलता झाला अग्निनंदन ।
चंपावतीचे हस्तेंकरुन । पाकनिष्पत्ती करीं कां ॥ १९४ ॥
अवश्य म्हणूनि तिलकचंद । चंपावतीसी सांगे सद्गद ।
तीतें सांगूनि पाक प्रसिद्ध । करविला नेटका ॥ १९५ ॥
मग चंपावती भ्रतारासहित । बैसविली स्वपंक्तींत ।
आपुला अनुग्रह देऊनि तीतें । नाथपंथीं मिरवली ॥ १९६ ॥
आपुले मुखींचा उच्छिष्ट ग्रास । संजीवनीप्रयोगप्रसादास ।
देऊनि केलें अमरपणास । मैनावतीपरी सिंचिली ॥ १९७ ॥
ऐसे रीतीं सारुनि भोजन । विडे घेतले त्रयोदशगुण ।
राया तिलकचंदा भाषण । करिता झाला मुनिराजा ॥ १९८ ॥
म्हणे ऐक बा सर्वज्ञराशी । गोपीचंद जातो पूर्ण तपासी ।
तरी सांभाळीं याचे राज्यपदासी । बाळ अज्ञान असे याचें ॥ १९९ ॥
तुझा प्रताप महीतें संपूर्ण । शत्रु न येती तेणेंकरुन ।
मीही तेथें षण्मास राहून । सर्व अर्थ पुरवीन कीं ॥ २०० ॥
परी राया षण्मासापाठीं । मीही जाईन तीर्थलोटीं ।
परी मुक्तचंद पडतां संकटी । धांव घाली तूं तेथें ॥ २०१ ॥
ऐसें बोलता अग्निसुत । अवश्य बोले तो नृपनाथ ।
यावरी राहूनि एक रात्र । निघते झाले उभयतां ॥ २०२ ॥
करोनि जालिंदरा नमन । गोपीचंद करिता झाला गमन ।
जालिंदरही मार्ग धरोन । हेलापट्टणीं चालिला ॥ २०३ ॥
तिलकचंद नृपनाथ । बोळवोनी आला स्वगृहांत ।
येरीकडे मैनावतीसुत । मुक्काममुक्काम साधीतसे ॥ २०४ ॥
ऐसिया राहणी मार्ग क्रमोनी । राव गेला बद्रिकाश्रमीं ।
बद्रिकेदार भावें नमोनी । तपालागीं बैसला ॥ २०५ ॥
लोहकंटकी पादांगुष्ट । ठेवोनि तप करी वरिष्ठ ।
येरीकडे जालिंदर वाटे । येवोनियां पोहोंचला ॥ २०६ ॥
तेथें राहून षण्मास प्रीतीं । मुक्तचंद उपदेशोनि अर्थाअर्थी ।
कानिफासह शिष्यकटकाप्रती । घेवोनियां चालिला ॥ २०७ ॥
नाना तीर्थें करी भ्रमण । द्वादश वर्षें गेली लोटोन ।
शेवटीं बद्रिकाश्रम पाहोन । गोपीचंद भेटला ॥ २०८ ॥
मग तैं तपाचा उचित अर्थ । उद्यापना देव समस्त ।
पाचारोनि स्वर्गस्थ । गौरविले आदरानें ॥ २०९ ॥
महाविष्णु महेश सवितां । अश्र्विनी वरुण अमरनाथा ।
भेटवोनि समस्त देवतां । सनाथपणीं मिरवला ॥ २१० ॥
सकळ विद्येचा समारंभभार । अभ्यासविला तो नृपवर 
पुन्हां दैवतां आणोनि सत्वर । वधालागीं ओपिलें ॥ २११ ॥
असो येथोनि गोपीचंदाख्यान । संपलें पुढें करा श्रवण ।
श्रीगोरक्ष स्त्रीराज्याकारणें । जाईल गुरु आणावया ॥ २१२ ॥
तरी आतां अत्यद्भुत । श्रोत्यां सांगेल धुंडीसुत । 
मालु ऐसें नाम ज्यातें । नरहरिवंशीं मिरवलें ॥ २१३ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । समंत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । अष्टादशाध्याय गोड हा ॥ २१४ ॥ 
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ 
॥ श्रीनवनाथभक्तिसार अष्टादशाध्याय संपूर्ण ॥

ShriNavanath Bhaktisar Adhyay 18 
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अठरावा ( १८ ) 

Custom Search

No comments: