Wednesday, March 16, 2016

Shri Navanath Bhaktisar Adhyay 31 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकतिसावा (३१) भाग २/२


Shri Navanath Bhaktisar Adhyay 31 
Bhujavanti had decided to end her life as Krushnagar rejected her demand of having sex. However her servant made a plan to trap Krushnagar into it. As per the plan Bhujavanti told king Shashangar that Krushnagar behave badly with her demanded sex with him. King was very angry and he ordered his solders to cut hands and legs of Krushnagar without any further enquiry in the matter. Goraksha and Machchhindra saw Krushnagar and were very sorry for him. Machchhindra concentrated his mind and knew that Bhujavanti was the culprit. Further he also knew that Krushnagar was an incarnation. Hence they took permission from king to take Krushnagar with them to join him in Nathpanth. They took him to Badrikedar where they asked him to perform 12 years tapas. Now they named Krushnagar as Chourangi. Dhundusut Malu from Narahari family will tell us what happens next in the 32nd Adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकतिसावा (३१) भाग २/२ 
मच्छिंद्र म्हणे कर्मशासन । रावराणींतें दुःख दावून ।
मग न्यावा शिवनंदन । नाथपंथी मिरवावया ॥ १०१ ॥
गोरक्ष म्हणे नोहे ऐसें । नेऊं आधीं चौरगांस । 
पूर्णपणीं नाथपंथास । विद्यार्णव करावा ॥ १०२ ॥
मग तयाचेचि हातीं । रायासी दावावी प्रतापशक्ती ।
आणि त्या रांडे चामुंडेप्रती । ओपणें तें ओपावें ॥ १०३ ॥
तरी आतां सौम्य उपचार । राया करुं वागुत्तर ।
मागूनि घ्या स्नेहपरिवार । चौरंगीतें महाराजा ॥ १०४ ॥
ऐसी गोरक्ष बोलतां वाणी । अवश्य म्हणे मच्छिंद्रमुनी ।
मग उभयतां राजसदनीं । प्रविष्ट जाहले महाराजा ॥ १०५ ॥
पुढें धाडूनि द्वाररक्षक । श्रुत करविलें नांव दोंदिक ।
कीं मच्छिंद्र गोरक्षक तपोनायक । भेटीसी येती महाराजा ॥ १०६ ॥
रायें ऐकोनि ऐसें नाम । मनीं उचंबळे भावार्थ प्रेम ।
मनांत म्हणे योगद्रुम । वंद्य असती हरिहरां ॥ १०७ ॥
परी मम दैवार्णवा सुफळबोध । मच्छिंद्रकृपेचा वोळला मेघ ।
ऐसे म्हणूनि लागवेग । कनकासन सांडिलें ॥ १०८ ॥
सम्यक सामोरा होऊनि नृपती । दृष्टीं देखतां मच्छिंद्रजती ।
भाळ ठेवूनि चरणांवरती । आलिंगीतसे प्रेमानें ॥ १०९ ॥
म्हणे महाराजा अज्ञानभंगा । अज्ञानपतिता बोधिली गंगा ।
वळूनि धीर पावल्या संगा । कुशब्दपाप नाशील ॥ ११० ॥
ऐसें म्हणोनि राव पुढती । नमिता झाला गोरक्षाप्रती ।
भाळ ठेवूनि चरणांवरती । सभेस्थानीं आणिलें ॥ १११ ॥
बैसवूनि कनकासनीं । षोडशोपचारें पूजिले मुनी ।
उपरी उभय जोडूनि पाणी । उभा राहिला सन्मुख ॥ ११२ ॥
म्हणे महाराजा योगद्रुमा । तुमचे चरणीं असे मम प्रेमा ।
दर्शन दिधलें भक्तिउगमा । मम अभक्ताकारणें ॥ ११३ ॥
तरी आतां कमशक्तीं । वेध कोणता सांगा जती ।
जेवीं ऋतुकाल द्रुमाप्रती । फळें येतील तैशींच ॥ ११४ ॥
तरी चिच्छक्तिउल्हासपणें । अर्थ दावा मजकारण ।
ते त्यावरी कामना पावन । तुष्ट होईल महाराजा ॥ ११५ ॥
ऐसें बोलतां नरेंद्रपाळ । मच्छिंद्रचित्तद्रुमाचें फळ ।
शब्दचातुर्यलापिका रसाळ । चौरंगभावीं निघालें ॥ ११६ ॥
म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा । एक काम वेधला आम्हां ।
आजि तुमच्या कौंडण्यग्रामा । शासनीं बाळ विलोकिला ॥ ११७ ॥
राया तिष्ठतां तव कोपाग्न । तयाचे हस्तपाद केले भग्न ।
तो तरी तुमचा अन्यायी उत्तम । आम्हांलागीं ओपावा ॥ ११८ ॥
राव ऐशी ऐकूनि मात । हृदयीं गदगदोनि हांसत ।
म्हणे महाराजा योगी समर्थ । काय त्या कराल नेवोनी ॥ ११९ ॥
म्हणाल करील सेवाभक्ती । तरी भग्न झाला पदहस्तीं ।
तरी त्या पंथ गमाया शक्ती । कांहींएक दिसेना ॥ १२० ॥
तुम्हीच वाहोनियां आपुल्या स्कंधीं । वागवाल कीं कृपानिधी ।
तो स्वामी तुम्ही सेवकबुद्धी । आचराल कीं महाराजा ॥ १२१ ॥
यावरी बोले मच्छिंद्रनाथ । तो सत्यपणें शक्त कीं अशक्त ।
इतुकें वद कीं आमुचें अर्थ । कासया तूं पाहासी ॥ १२२ ॥
ऐसें बोलतां मच्छिंद्रजती । अवश्य म्हणे शशांगर नृपती ।
घेऊनि जावें आवडल्या चित्तीं । सिद्धसंकल्प महाराजा ॥ १२३ ॥
ऐसें बोलतां धरापाळ । उठोनि आले तत्काळ ।
परोपकारी अति कनवाळ । चौरंगापाशीं पातले ॥ १२४ ॥
कनकचौरंगी रुधिरयुक्त । तैसाचि उचलिला महीभुवसुत ।
नेऊनि आपुले शिबिरांत । हस्तपाद तळविलें ॥ १२५ ॥
येथें श्रोते कल्पना घेती । निर्जीवासी सजीव करिती जती ।
तेणें चौरंगीहस्तपादांप्रती । स्नेहकढयीं कां तळविलें ॥ १२६ ॥
निर्जीव पुतळा नृत्य करीत । तेथें मिरवले गहिनीनाथ । 
मग हस्तपादानिमित्त । काय अशक्य झालें तें ॥ १२७ ॥
तरी कवि म्हणे पुढील कारण । होतें म्हणोनि मच्छिंद्रानें ।
लोहकढयीं द्विमूर्धानें । स्नेहीं तळले पदहस्त ॥ १२८ ॥
तूर्त करोनि दुःखाचें शमन । पुढें पहा म्हणती नेमानेम ।
सुधेसमान उत्तमोत्तम । फळा मिरवूं ययासी ॥ १२९ ॥
ऐसा विचार करुनि चित्तीं । तळों लागले पदहस्ती ।
मग तेथें राहोनि एक राती । पुढें गमती महाराजा ॥ १३० ॥
चौरंगी स्कंधीं वाहून । मार्ग क्रमीतसे गौरनंदन । 
मग ग्राम पाहूनि निघून । बद्रिकाश्रमीं पातले ॥ १३१ ॥
शीघ्र जावोनि शिवालयांत । भावें वंदिला उमाकांत ।
उपरी चौरंगी ठेवूनि तेथ । काननांत संचरले ॥ १३२ ॥                
काननीं हिंडतां तेथ पाहीं । तों एक गव्हर (गुहा) देखिलें महीं ।
देखतां विसवती तयाठायीं । गुहागृहामाझारीं ॥ १३३ ॥
तंव तें गव्हर परम गोमट । पाहूं बोलती प्रताप सुभट ।
म्हणती चौरंगीनिश्र्चयतुळवट । येथें कसून पहावा ॥ १३४ ॥
पाहावें तरी कैसे रीती । मग काय करिते झाले जती ।
एक शिळा विस्तीर्ण शक्ती । गोरक्षनाथें आणिली ॥ १३५ ॥
आणिली परी गुहागृहांत । उचलोनि वरल्या जमिनींत । 
शस्त्र अस्त्र जल्पूनि तेथें । अंधारव्यक्त केलेंसे ॥ १३६ ॥
ऐसें कृत्य करुनि तेथें । पुन्हां परतोनि आले नाथ ।
स्कंधीं वाहूनि चौरंगीतें । परतूनि गेले त्या ठायीं ॥ १३७ ॥
तेव्हां गृहद्वारासमीप । तरु एक होता विशाळरुप ।
तयाखालीं प्रतापदीप । सांवलींत बैसले ॥ १३८ ॥
बैसले परी गोरक्षासी । मच्छिंद्र म्हणे भावउद्देशीं ।
त्वां अनुग्रह चौरंगासी । याचि ठायीं ओपावा ॥ १३९ ॥ 
ऐेसें बोलतां मच्छिंद्रनाथ । गोरक्ष वदतसे उत्तरातें ।
मम अनुग्रह तपाश्रिता । लाभ होतसे महाराजा ॥ १४० ॥
तरी चौरंगीचें अनुष्ठान । पूर्णस्वरुपीं मी पाहीन ।
मग प्रसन्न चित्तें देईन । अनुग्रह महाराजा ॥ १४१ ॥     
ऐसें बोलतां वरदउक्ती । मच्छिंद्र म्हणे बरवी नीती । 
तरी याचि ठायीं चौरंगीप्रती । तपालागीं स्थापावें ॥ १४२ ॥
ऐसें म्हणोनि गोरक्षासी । पुसता झाला चौरंगासी ।
हे बाळा तूं पूर्ण तपासी । बैसतोसी कीं या ठाया ॥ १४३ ॥  
यावरी बोले चौरंगनाथ । मी मान्य तुमचें कर्तव्यांत ।
जेथें ठेवाल राहीन तेथ । सांगाल करीन तैसेंचि ॥ १४४ ॥
परी एक मागणें आहे येथें । तुम्हीं जावें कोण्या देशातें ।
परी प्रतिदिनीं माझा हेत । कूर्मदृष्टीं रक्षावा ॥ १४५ ॥
इतुकें मातें दिधल्या दान । सकळांत माझें कल्याण ।
दिवसानुदिवस माझें स्मरण । तव धवळारीं पाळावें ॥ १४६ ॥
तुम्हांसी होतां माझें स्मरण । त्या कृपें होईल माझें पोषण ।
जैसें कूर्म दृष्टीकरुन । बाळालागीं पोषीतसे ॥ १४७ ॥
ऐसें बोलतां चौरंगनाथ । उभय झाले तोषवंत । 
मग उचलोनि गुहागृहांत । चौरंगीतें ठेविलें ॥ १४८ ॥
ठेविलें तरी त्यासी सांगती । बा रे ऊर्ध्व करी कां दृष्टीप्रती ।
शिळा सुटक दिसे क्षितीं । पडेल वरती तुज राया ॥ १४९ ॥
परी आपुले प्रसादेंकरुन । तूतें देतों एक वरदान । 
कीं दृष्टी याजवरुन । काढूं नको कदापि ॥ १५० ॥
जरी दृष्टी किंचित चुकुर । होतां पडेल अंगावर ।
मग प्राण सोडूनि जाईल शरीर । चूर्ण होशील रांगोळी ॥ १५१ ॥     
मग पुढील कार्य साधेपर्यंत । सकळ राहिले नरदेहांत ।
तरी जतन करुनि शरीरांत । हित आपुलें जोडीं कां ॥ १५२ ॥
मग एक मंत्र सांगूनि कानीं । म्हणे करीं याची सदा घोकणी ।
येणेंचि सर्व तपालागुनी । प्राप्त होशील पाडसा ॥ १५३ ॥
मग गोरक्ष जाऊनि उत्तम फळातें । तया सामोरें आणूनि ठेवीत ।
म्हणे हें फल भक्षूनि निश्र्चितें । पूर्ण तपा आचरीं कां ॥ १५४ ॥
परी आणिक राया तूतें । दृष्टी रक्षावी जीवित्वनिमित्तें ।
मंत्र जपावा तपोअर्थें । फळें भक्षावीं क्षुधेसी ॥ १५५ ॥
ऐसी त्रिविधा गोष्टी तूतें । सांगितली परी रक्षीं जीवातें ।
तों आम्ही लवकरी करुनि तीर्थांतें । तुजपासीं येऊं कीं ॥ १५६ ॥    
ऐसें सांगूनि चौरंगासी । बाहेर निघे गोरक्षेंसीं ।
शिळा लावूनि गुहाद्वारासीं । बंधन केलें दृष्टोत्तर ॥ १५७ ॥
याउपरांतीं तपाचार शक्ती । चामुंडा स्मरला आपुले चित्तीं ।
तंव त्या स्मरतां येऊनि क्षितीं । गोरक्षातें भेटल्या ॥ १५८ ॥
म्हणती महाराजा योगोत्तमा । कामना उदेली कोण तुम्हां ।
तैसाचि अर्थ सांगूनि आम्हां । स्वार्थालागीं मिरविजे ॥ १५९ ॥
येरी म्हणे वो शुभाननी । मम प्राण आहे या स्थानीं ।
तरी तयाच्या क्षुधेलागुनी  । नित्य फळें ओपावीं ॥ १६० ॥
आणावीं परी गुप्तार्थ । फळे ठेवावीं त्या नकळत ।
शिळे उचलूनि जावें त्वरित । नित्य फळें ओपावीं ॥ १६१ ॥
ऐसें सांगूनि चामुंडेसी । चालते झाले तीर्थवासीं ।
सहज चालीं चालतां महीसी । गिरनारपर्वतीं पोचले ॥ १६२ ॥
येरीकडे चामुंडा सकळ । उत्तम आणूनि देती फळें । 
शिळा उचलूनि उतावेळ । काननांत सांडिती ॥ १६३ ॥
सांडिती परी कैसे रीतीं । गुप्त सेवा करुनि जाती ।
परी चौरंगी महाजती । शिळाभयें दाटला ॥ १६४ ॥
मनांत म्हणे गुरुवचन । कीं शिळा घेईल तुझा प्राण ।
म्हणोनि दृष्टीं याकारण । अखंडित रक्षावें ॥ १६५ ॥
ऐसी भावना आणूनि चित्तीं । दृष्टी ठेवी शिळेप्रती । 
मुखीं नाम मंत्रउक्ती । आराधीत सर्वदा ॥ १६६ ॥
परी त्या शिळेच्या भयेंकरुन । खाऊं विसरला फळाकारण ।
चिंचित वायूचें होतां गमन । तोचि आहार करीतसे ॥ १६७ ॥
शिळेवरती सदा दृष्टी । परी उर्ध्वभागीं ओपिला दृष्टी ।
अंग हालवेना महीपाठीं । अर्थ कांहीं चालेना ॥ १६८ ॥
जरी करावें चलनवलन । नेणों दृष्टीसी चुकुरपण ।
आलिया शिळा घेईल प्राण । म्हणोनि न हाले ठायातें ॥ १६९ ॥
फळ जरी चांचपूनि घ्यावें हातीं । नेणों तिकडे जाय अवचितीं ।
चित्त गेलिया इंद्रियें समस्तीं । तयामागें धांवती ॥ १७० ॥
मग चित्त बुद्धि अंतःकरण । हीं तों ऐक्य असती तिघें जण ।
फळ स्पर्शितां भावनेकरुन । भ्रष्ट होतील सर्वस्वें ॥ १७१ ॥
मग मंत्ररुपें स्मरणशक्ती । आबुद्ध वरील माझी मती ।
म्हणोनि सांडिले फळप्राप्ती । योगाहूनि लक्षीतसे ॥ १७२ ॥
ऐसी उभयतां कांचणी करुन । आटत चालिले रुधिरप्राण ।
परी तें रुधिर मांस भक्षून । आटत आहे तंव सत्य ॥ १७३ ॥
रुधिर मांसालागूनि भक्षीत । भक्षूनि उदकमय करीत ।
शेवटीं चित्तासी हरीत । भक्षण करीतसे नित्यशः ॥ १७४ ॥
चित्ता आटिलें सकळ रुधिर । पैं शरीर उरलें अस्थिपंजर ।
वरी उगवली त्वचात्यावर । गवसणीपरी विराजे ॥ १७५ ॥
जोंवरी शरीरीं असे प्राण । तोंवरी अस्थि त्वचा घ्राण ।
प्राण भंगल्या भंग जाण । सर्वत्रांसी माहिती ॥ १७६ ॥
नाडी त्वचा अस्थि । चौरंगी उरल्या देहाप्रती ।
सूक्ष्म शरीरीं आपण भूतीं । त्रासूनियां पळाले ॥ १७७ ॥
मग तो देह काष्ठासमान । बोलारहित चलनवलनहीन ।
ऐसें पाहूनि बाळ तान्हें । वारुळ वरी रचियेलें ॥ १७८ ॥
मग तितुक्या दृष्टी हरल्याप्रती । मुखीं ध्वनि मंत्रशक्ती ।
तितुकें उरे मग निश्र्चितीं । जिकडे तिकडे झालीसे ॥ १७९ ॥
ऐसेपरी चौरंगीतें । झालें आहे निजदेहातें ।
यावरी पुढील स्वार्थें । पुढिले अध्यायीं ऐका ते ॥ १८० ॥
तरि हा ग्रंथ नवरत्नहार । आणि वैडूर्य स्वतेजापर ।
तुम्हां श्रोतिया श्रृगांर । धुंडीसुत अर्पीतसे ॥ १८१ ॥
नरहरिवंश मालूतें । मालू नरहरीचा शरणागत ।
तो हा भक्तिपूर्वक ग्रंथ । श्रोतियांतें संकल्पिला ॥ १८२ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत श्रोते चतुर । एकत्रिंधत्तमाध्याय गोड हा ॥ १८३ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ श्रीनवनाथभक्तिसार एकत्रिंधत्तमाध्याय संपूर्ण ॥
Shri Navanath Bhaktisar Adhyay 31   श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकतिसावा (३१) 


Custom Search

No comments: