Sunday, April 3, 2016

Shree Navnath Bhaktisar Adhyay 39 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकोणचाळिसावा (३९) भाग २/२


Shree Navnath Bhaktisar Adhyay 39 
CharpatiNath completed TirthYatra of all pious tirthas on the earth. Now he started for the Swarga where he wanted to bath in the pious Mankarnika River and then proceed to Patala. He reached Swarga and met Brahma who was his father. Narad told the story of Charpati to Brahma from his birth to diksha by Dattaguru to Charpati. Brahma asked Charpati to wait for some period in Swarga and he told him that on a pious day they will have a bath in Mankarnika. Charpati and Narad use to go to a beautiful garden at Amarpur where God Indra lives. The garden was somehow spoiled by both of them while eating fruits and picking up flowers. Hence guards after keeping a watch caught hold of Charpati and beat him. Charpati very angry and by using his Vatakarshanastra Mantra made the guards to lose their lives. Then there was a war between him and God Indra, God Shiva and God Vishnu. Charpati defeated all of them. Then he took out crown, Koustubha Mani and Gandiva from God Vishnu and went to his father God Brahma. God Brahma convinced him and told him that he should immediately make God Shiva, God Vishnu and all others free from his Vatakarshanastra Mantra. Charpati used his Vatakarshanastra Mantra and made them live again. He used Sanjivani Mantra for those who were dead, too alive them again. Then God Brahma introduced Charpati to God Vishnu and God Shiva. Charpati bowed both of them and received their blessings. On a pious day he had a bath in the pious Mankarnika River with God Brahma. Then Charpati went in Patala where he met God Vaman bowed him. King Bali bowed to Charpati and welcomed him in Patala. In the next 40th and the last Adhyay Dhundisut Malu from Nrahari family is going to tell us what happens next.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकोणचाळिसावा (३९) भाग २/२
चरणावरी थेवूनि माथा । म्हणे महाराजा आदिनाथा ।
तुम्हीं अमरपुरीं मज पतिता । अमर करोनि बैसविलें ॥ १०१ ॥
बैसल्यावरी दानवें थोर । गांजिल्यावरी वारंवार । 
संकट निरसूनि सत्वर पदस्थापना मज केली ॥ १०२ ॥
परी आतां निर्वाण आलें । देव सकळ प्राणा मुकले ।
सांगावया तुम्हांसी वहिलें । उरलों आहे इतुका मी ॥ १०३ ॥
शिव म्हणे ऐसा कोण । आला आहे स्वर्ग चढून । 
शक्र म्हणे स्वदृष्टीनें । पाहिला नाहीं महाराजा ॥ १०४ ॥
कुसुमलतिकेचा केला नाश । म्हणूनि पाठविलें सर्व देवांस ।
त्यांचा समूळ होतां प्राणनाश । पळूनि आलों येथें मी ॥ १०५ ॥
ऐसें ऐकतां शिवशंकर । गणांसी आज्ञा देत सत्वर ।
सिद्ध होऊनि चला समग्र । समागमें माझिया ॥ १०६ ॥
आणि विष्णूतें करा श्रुत । तों होवो अनायासें सहित ।
ऐसें ऐकतां दूत । विष्णूसमीप धांवती ॥ १०७ ॥
मग गणांसहित अष्ट भैरव । अष्ट पुत्र घेऊनि शिव । 
शतकोटिसमुदाव । अमरपुरीं पातला ॥ १०८ ॥   
चढाओढी रणांत । देव मिळाले समस्त । 
चरपटीनें दृष्टीं देखत । भस्मचिमुटी कचळिली ॥ १०९ ॥
चित्तीं म्हणे कासया उशीर । उगाचि शीण करावा थोर ।
निवृत्ति करुनि थोर व्यवहार । बोळवावें सर्वांसी ॥ ११० ॥
ऐसें सिद्ध करुनि वचन । प्रयोगीं अस्त्र वाताकर्षण ।
अस्त्रदेवता सिद्ध करुन । श्र्वास बंद शिवासहित ॥ १११ ॥
श्र्वास झाले कुंठित । शिवासहित देव झाले विगलित ।
मूर्च्छना येऊनि भूमीवरी पडत । प्राण सर्वांचे निघूं पाहती ॥ ११२ ॥
असो शतकोटी गण । शिवासह पाकशासन ।
एकदांचि महीकारण । ढांसळून पाडिले ॥ ११३ ॥
जैं तरु पल्लवशाखीं । मूळ खंडतां पडती शेखीं । 
तेवीं अवस्था झाली निकी (बरोबर) । महीवरी पडताती ॥ ११४ ॥
त्यापरी शिवादि शतकोटी गण । मुख आच्छादी पाकशासन ।
पुष्पवाटिके विकल प्राण । मूर्च्छागत झाले ते ॥ ११५ ॥
अवघे पडिले निचेष्टित । परी नारद दुरोनि विलोकीत ।
हस्तपाद खुडितां हंसत । अमरनाथा पाहुनी ॥ ११६ ॥      
मनीं म्हणे बरें झालें । अहंकारीं सर्व गळाले ।
देवांमाजी कित्येक मेले । शवें झालीं शरीरांची ॥ ११७ ॥ 
कुसुमलतापाळक बनकर । तैं सकळीं सांडिलें देहवसर ।
प्रेत होऊनि महीवर । भयेंकरुनि पडियेले ॥ ११८ ॥
कोणा रुधिराचा भडभडाट । मुखीं अपार पूर लोटत ।
श्र्वेतवर्ण चक्षुपाट । वटारुनि दाविती ॥ ११९ ॥
येरीकडे शिवदूत ॥ गेले होते वैकुंठांत । 
विष्णु लक्षूनि महाअद्भुत । वृत्तान्त सर्व सांगती ॥ १२० ॥
म्हणती महाराजा कमलाक्षा । महीदक्षा सर्वसाक्षा । 
राक्षसारीं मोक्षमोक्षा । निजदासां कैवारी ॥ १२१ ॥
नेणों अमरवनीं कोण । आला आहे बलिष्ठ जाण ।
तेणें सकळ देव केले तृण । गतप्राण झाले ते ॥ १२२ ॥
एकटा उरला अमरनाथ । तोही शिघ्र येऊनि कैलासास ।
स्तवूनियां उमानाथास । युद्धालागीं गेलासे ॥ १२४ ॥
भव जातां अमरपुरीसी । आम्हां पाठविलें तुम्हांपासीं ।
आपण चलावें त्या कटकासी । म्हणोनि आम्ही धांवलों ॥ १२५ ॥  
ऐसें ऐकतां मधुसूदन । विचार न पाहतां विष्णुगण । 
छपन्न कोटी मेळवून । गरुडारुढ झालासे ॥ १२६ ॥
टाळ ढोल दुंदुभिनाद । समारंभें श्रीगोविंद । 
अमरपुरींत झाला नाद । ऐसे येऊनि पातले ॥ १२७ ॥
समस्त बैसले घालूनि पाळा । आर्‍हाटिती विष्णुमंडळा ।
धरा मारा शब्दकोल्हाळा । एकदांचि करिताती ॥ १२८ ॥
शिवगण जे शिवासहित । देवांसह अमरनाथ ।
परम पाहूनि अवस्थित । विष्णु मनीं क्षोभला ॥ १२९ ॥
सकळ दूतां आज्ञापीत । म्हणे तुमचा होय तात ।
धरा मारा आलंबित । शस्त्रेंअस्त्रेंकरुनियां ॥ १३० ॥
आपण घेऊनि सुदर्शन । गांडीव सजविलें लावोन ।
इतुकें चरपटनाथें लक्षून । भस्मचिमुटी कवळीतसे ॥ १३१ ॥
मनांत म्हणे विधिकुमार । सुदर्शन हे आहे अनिवार ।
तरी आपण आधींचि वारासार । करुनियां बैसावें ॥ १३२ ॥
मग मोहनास्त्र जल्पूनि होटीं । सुदर्शननामीं फेकिली भस्मचिमुटी ।
तें मोहनास्त्र सुदर्शनपोटीं । जाऊनियां संचरलें ॥ १३३ ॥
तेणेंकरुनि सुदर्शन । अचळ जड झालें मोहून ।
तैसेचि गांडीव आणि सकळ गण । उठावले नेटकीं ॥ १३४ ॥
ते पाहूनि चरणस्थित । काय करितां झाला नाथ ।
विष्णुगण करुनि समस्त । वाताकर्षण योजिलें ॥ १३५ ॥
वाताकर्षण प्रयोग नेटीं । गणीं फेंकितां भस्मचिमुटी । 
तेणें विष्णुकटक सुभट । श्र्वासोच्छ्वासें दाटलें ॥ १३६ ॥
कोंडतांचि श्र्वासोच्छ्वास । धैर्य न उरे मग समस्तांत ।
मग देह सांडूनि सकळ धरणीस । धुळीमाजी लोळती ॥ १३७ ॥
खरसायकें मोकळे हस्त । शस्त्रविकार झाला बहुत ।
मुखीं रुधिर विचकूनि दांत । नेत्र श्र्वेम त करिताती ॥ १३८ ॥
सकळ सांडूं पाहती प्राण । हस्तपाद आपटिती दुःखी होऊन ।
तें पाहूनि मधुसूदन । सुदर्शन प्रेरीतसे ॥ १३९ ॥
सुदर्शनातें वैडूर्यखाणीं । कीं येऊन राहिले सहस्त्र तरणी ।
ऐसें अति चंचळाहूनी । चपळ महाअस्त्र तें ॥ १४० ॥
जैसा अश्र्वांत श्यामकर्ण । कीं धेनूमणीं सुरभिरत्न ।
तेवीं अस्त्र सुदर्शन । जाज्वल्यपणीं मिरवे तें ॥ १४१ ॥
तें सुदर्शन कोपेंकरुन । प्रेरिता झाला रमारमण ।
परी तें नाथापाशीं येऊन । मोहेंकरुन वेष्टलें ॥ १४२ ॥
चित्तीं म्हणे पिप्पलायन । हा प्रत्यक्ष विष्णुनारायण ।
स्वामी आपुला वांचवा प्राण । घोट घेतला दिसेना ॥ १४३ ॥
तरी हें युद्ध पूर्ण नाहीं । माझी परीक्षा पाही । 
निमित्तें सहज करुनियां कांहीं । खेळ मज दावीतसे ॥ १४४ ॥
ऐसा विचार धरुनि चित्तीं । नमन केले नाथाप्रती । 
नमूनियां दक्षिण हस्ती । जाऊनियां विराजलें ॥ १४५ ॥
चरपटाहातीं सुदर्शन । कुस्ती करितां मनोधर्म ।
मग तो चरपट चांगुलपणें । प्रत्यक्ष विष्णु भासतसे ॥ १४६ ॥
येरीकडे वैकुंठनाथ । आश्र्चर्य धरी स्वचित्तांत । 
म्हणे मोहूनि सुदर्शनातें । घेतले कैसें अरिष्टानें ॥ १४७ ॥
मग हातीं गदा परताळून । येता झाला रमारमण ।
तैं चरपट तेथें दृष्टीं पाहून । भस्मचिमुटी कवळीतसे ॥ १४८ ॥
वाताकर्षणप्रयोग मंत्र । सिद्ध करोनि तपपात्र । 
समोर लक्षोनि कजगात्र । प्रेरी अस्त्र दुर्घट तें ॥ १४९ ॥ 
मग तें अस्त्र पवनगतीं । संचरतें झालें हृदयाप्रती ।
तेणें झालें अरिष्ट अती । धडाडूनि पडियेलें ॥ १५० ॥
हस्तविभक्त होऊनि गदा । पडती झाली क्षितीं आल्हादा । 
पांचजन्य प्रियपद गोविंदा । सोडूनियां मिरवत ॥ १५१ ॥
ऐसा होतां अव्यवस्थित । तें पाहूनियां चरपटनाथ ।
मग विष्णूजवळी येऊनि त्वरित । निजदृष्टीं विलोकीं ॥ १५२ ॥
विलोकितां विष्णूलागुनी । तों दृष्टीं पडला कौस्तुभमणी । 
मनांत म्हणे आपणालागुनी । भूषणातें घ्यावा हा ॥ १५३ ॥
ऐसें म्हणूनि स्वचित्तांत । वैजयंतीसी काढूनि घेत ।                    
गळां ओपूनि मौळीं ठेवीत । रत्नमुकुट विष्णूचा  ॥ १५४ ॥
शंख चक्र आदिकरुन । हातीं घेतसे ब्रह्मनंदन । 
गदा कक्षेमाजी घालून । शिवापाशीं पातला ॥ १५५ ॥
शिव पाहुनि निजदृष्टीं । तों कपालपात्र आणिलें पोटीं ।
तें घेऊनि झोळीं त्रिपुटी । सोडूनियां चालिला ॥ १५६ ॥
चित्तीं गमनागमनध्यान । त्वरें पातला सत्यग्राम । 
पितयापुढें शीघ्र येऊन । उभा राहिला चरपट तो ॥ १५७ ॥
पांचजन्य सुदर्शन । सव्य अपसव्य कराकारण ।
कक्षे गदा हृदयस्थान । कौस्तुभ गळां शोभवी ॥ १५८ ॥
तें पाहुनि नाभिसुत । विष्णुचिन्हें भूषणस्थित ।
मौळी मुकुट विराजित । अर्कतेजीं चमकूनियां ॥ १५९ ॥    
ऐसे चिन्हीं पाहतां विधी । मनीं दचकला विशाळबुद्धी ।
म्हणे मुला काय त्रिशुद्धी । केलें आहेसीं कळेना ॥ १६० ॥
मग चरपटाचा धरुनि हात । आपुल्या अंकांवरी घेत । 
गोंजारुनि विधी पुसत । चिन्हें कोठूनि आणिलीं हीं ॥ १६१ ॥
येरी म्हणे ऐका तात । सहज शक्राच्या कुसुमलतांत । 
खेळत होतों पहात अर्थ । मातें बनकरें ताडिलें ॥ १६२ ॥
मग म्यां कोपें बनकर । मारुनि टाकिले महीवर ।
तया कैवारें हरिहर । झुंझावया पातले ॥ १६३ ॥
मग मी चित्तीं शांत होऊन । विकळ केले भव विभुप्राण ।
तयां अंगींचीं भूषणें घेऊन । आलो आहे महाराजा ॥ १६४ ॥
ऐसी ऐकतां चरपटगोष्टी । परम दचकला परमेष्ठी ।
मग हृदयीं धरुनि नाथ चरपटी । गौरवीत बाळातें ॥ १६५ ॥
म्हणे वत्सा माझा तात । आजा तुझा विष्णु निश्र्चित । 
महादेव तो आराध्यदैवत । मजसह जगाचा ॥ १६६ ॥
जरी ते होतील गतप्राण । मग मही त्यांवांचून । 
आश्रयरहित होऊन । जीवित्व आपुलें न चाले ॥ १६७ ॥
तरी बाळा ऊठ वेगीं । क्लेश हरोनि करीं निरोगीं ।
नातरी मज जीवित्वभागीं । अंत्येष्टी करुनि जाई कां ॥ १६८ ॥
ऐसें बोलतां चतुरानन । चित्तीं वेष्टला कृपेंकरुन । 
म्हणे ताता उठवीन । सकळिकां चाल कीं ॥१६९ ॥    
मग विधि आणि चरपटनाथ । त्वरें पातले अमरपुरींत ।
तों हरिहर अव्यवस्थित । चतुराननें देखिले ॥ १७० ॥
मग प्रेमाश्रु आणूनि डोळां । म्हणे वेगीं उठवी बाळा ।
वाताकर्षण चरपटें कळा । काढूनियां घेतलें ॥ १७१ ॥
वातप्रेरकमंत्र जपून । सावध केले सकळ देवजन । 
उपरी जे कां गतप्राण । संजीवनीनें उठविले ॥ १७२ ॥
सकळ सावध झाल्यापाठीं । ब्रह्मा करीं धरुनि चरपटी ।
विष्णु-भवांच्या पदपुटीं । निजहस्तें लोटिला ॥ १७३ ॥
परी विष्णुचिन्ह भूषणस्थित । पाहूनियां रमानाथ ।
कोण हा विधीतें पुसत । तोही प्रांजळ सांगतसे ॥ १७४ ॥
मग जन्मापासूनि अवतारलक्षण । विधि सांगे देवाकारण ।
विष्णु सकळ वृत्तान्त ऐकून । ग्रीवेलागीं तुकवी ॥ १७५ ॥
मग म्हणे मम भूषणें । वर्तलें नाहीं विभक्तपण ।
माझाचि अवतार जाण । चरपटनाथ आहे हा ॥ १७६ ॥
मग परमेष्ठी हस्तेंकरुन । चरपटआंगींचें काढूनि भूषण ।
विष्णुलागीं देऊन । चरणीं माथा ठेवीतसे ॥ १७७ ॥
असो सकळांचे समाधान । पावूनि पावले स्वस्थान । 
चरपटअवतार पिप्पलायन । सर्व देवांलागीं समजला ॥ १७८ ॥
कपालपात्र शिवें घेऊन । गणांसह पावला स्वस्थान । 
अमरपुरीं सहस्त्रनयन । देवांसहित गेला असे ॥ १७९ ॥
मग विधीनें चरपट करीं वाहून । पाहता झाला ब्रह्मस्थान ।
येरीकडे नारद गायन । करीत आला शक्रापाशीं  ॥ १८० ॥
इंद्रालागीं नमस्कारुन । म्हणे तुम्हां झाले थोर विघ्न ।
येथें कोणता नारद येऊन । कळी करुन गेला असे ॥ १८१ ॥
आम्ही तुमच्या दर्शना येतां । कळीचे नारद आम्हां म्हणतां । 
तरी आजचि कैसी बळव्यथा । कोणें दाखविली तुम्हांसी ॥ १८२ ॥     
ऐसें नारद बोलतां वचन । मनीं खोंचला सहस्त्रनयन । 
चित्तीं म्हणे हेंचि कारण । नारद आम्हां भवलासे ॥ १८३ ॥
ऐसें समजूनि स्वचित्तांत । कळीचे नारद कदा न म्हणत ।
अल्प पूजनें गौरवीत । मग बोळविलें तयासी ॥ १८४ ॥
येरीकडे चतुरानन । गेला स्वस्थाना चरपटीसी घेऊन ।
तयामागें नारद येऊन । सत्यलोकीं देखिला ॥ १८५ ॥
यावरी पुढें खेळींमेळीं । पर्वणी उत्तम पावली बळी । 
मणिकर्णिकेसी सर्व मंडळी । स्नानालागीं जातसे ॥ १८६ ॥
एकवीस स्वर्गींचे लोक समस्त । मणिकर्णिकेसी आले बहुत ।
तयांमाजी चरपटीनाथ । विधी घेऊनि आलासे ॥ १८७ ॥
मग तात पुत्र करुनि स्नाना । परतोनि आले स्वस्थाना ।
याउपरी सहजस्थित होऊन । संवत्सर भरला असें ॥ १८८ ॥
नारदविद्या पूर्ण गमन । मनीं चिंतितां पावे स्थान ।
तया मागें गौरवून । भोगावतीसी पातला ॥ १८९ ॥
विधिसुत चरपटनाथ । गमन करीत महीं येत ।
तेथेंही करुनि अन्य तीर्थें । भोगावतीसी जातसे ॥ १९० ॥
करुनि भोगावतीचें स्नान । सप्त पाताळ दृष्टीं पाहून । 
बळिरायाच्या गृहीं जाऊन । वामनातें वंदिले ॥ १९१ ॥
बळीनें करुनि परम आतिथ्य । बोळविला चरपटीनाथ । 
यापरी इच्छापूर्ण नाथ । भ्रमण करी महीसी ॥ १९२ ॥
ऐसी कथा ही सुरस । कुसुममाळा ओपी त्यास । 
कवि मालू श्रोतियांस । भावेकरुनि अर्पीतसे ॥ १९३ ॥
नरहरिवंशीं धुंडीसुत । अनन्यभावें संतां शरणागत । 
मालू ऐसे नाम देहाप्रत । ज्ञानकृपें मिरवीतसे ॥ १९४ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । एकोनचत्वारिंशतितमाध्याय गोड हा ॥ १९५ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ 
॥ श्रीनवनाथभक्तिसार एकोनचत्वारिंशतितमाध्याय संपूर्ण ॥
Shree Navnath Bhaktisar Adhyay 39  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकोणचाळिसावा (३९) 


Custom Search

No comments: