Thursday, January 5, 2017

Samas Aathava Sadvidya Nirupan समास आठवा सद्विद्या निरुपण


Dashak Dusara Samas Aathava Sadvidya Nirupan
Samas Aathava Sadvidya Nirupan is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Sadvidya. He is describing the person who is having Sadvidya. The qualities of Sadvidya are very good and pure. If we just go on thinking deeply about these qualities then Sadvidya qualities becomes part of our nature. Everybody should have these qualities however the person who wants progress in spirituality then he must have Sadvidya qualities in his nature. The person, who is having Sadvidya qualities, is Satvaguni. He is very kind hearted, knowledgeable but calm and quiet. There are many described.
समास आठवा सद्विद्या निरुपण
श्रीराम ॥
ऐका सद्विद्येचीं लक्षणें । परम शुद्ध सुलक्षणें ।
विचार घेतां बळेंचि बाणे । सद्विद्या आंगी ॥ १ ॥
१) आता सद्विद्येची लक्षणें ऐका. ती अतिशय शुद्ध असून त्यांचा ठाम विचार केला की, सद्विद्या आपल्या अंगी बाणते. 
सद्विद्येचा जो पुरुष । तो उत्तम लक्षणी विशेष ।
त्याचे गुण ऐकतां संतोष । परम वाटे ॥ २ ॥  
२) सद्विद्या अंगी असलेला पुरुष अति उत्तम गुणांनी युक्त असतो. त्याचे गुण ऐकल्यावर मनाला परम संतोष वाटतो.
भाविक सात्विक प्रेमळ । शांति क्ष्मा दयासीळ ।
लीन तत्पर केवळ । अमृतवचनी ॥ ३ ॥ 
३) असा तो भाविक असतो, प्रेमळ व सात्विक असतो. जणु दया, क्षमा व शांती यांचा पुतळाच असतो. कितीही ज्ञानसंपन्न, थोर, उच्चपदस्थ असला तरी नम्र असतो व कोठच्याही चांगल्या कामास सदैव तयार असतो. त्याचे बोलणे आर्जवी, मधुर असते.  
परम सुंदर आणी चतुर । परम सबळ आणी धीर ।
परम संपन्न आणी उदार । आतिशयेंसीं ॥ ४ ॥ 
४) तो अति सुंदर व चतुर असतो. तो बलवान, धैर्यवान असतो. तो संपत्ती, ज्ञान ह्यांनी श्रीमंत असतो व धन अणि ज्ञान दात्यास देण्यासाठी उदार असतो. 
परम ज्ञाता आणी भक्त । माहा पंडित आणी उदार । 
माहा तपस्वी आणी शांत । आतिशयेंसीं ॥ ५ ॥ 
५) तो ज्ञानवान आणि देवाचा भक्त असतो. अंगी मोठे पांडित्य असून उदार असतो.  महा तपस्वी व शांत असतो. 
वक्ता आणी नैराशता । सर्वज्ञ आणी सादरता ।
श्रेष्ठ आणी नम्रता । सर्वत्रांसीं ॥ ६ ॥
६) तो मोठा वक्ता असून त्याला लोभ नसतो. सर्वज्ञ असुन दुसर्‍यांशी आदराने वागतो. श्रेष्ठ असुनही नम्र असतो. 
राजा आणी धार्मिक । शूर आणी विवेक । 
तारुण्य आणी नेमक । आतिशयेंसीं ॥ ७ ॥  
७) तो राजा असुन धार्मिक; शूर असून विवेकी; तरुण असुन नियमाने वागतो.
वृधाचारी कुळाचारी । युक्ताहारी निर्विकारी ।
धन्वंतरी परोपकारी । पद्महस्ती ॥ ८ ॥ 
८) वाडवडिलांच्या मार्गावरुन चालतो, कुळाचार पाळतो, परोपकारी व धन्वतरी, हातावर यश देणारे चिन्ह असते.  
कार्यकर्ता निराभिमानी । गायक आणी वैष्णव जनी ।
वैभव आणी भगवद्भजनी । अत्तादरें ॥ ९ ॥
९) चांगले काम करण्यास तयार, अभिमान नसतो, गायक असतो, भगवंताची भजने म्हणुन भक्ति करणारा, वैभवी असला तरी देवाची भक्ती आादराने करतो. 
तत्वज्ञ आणी उदासीन । बहुश्रुत आणी सज्जन ।
मंत्री आणी सगुण । नीतिवंत ॥ १० ॥
१०) तत्वज्ञानी असुन आसक्ति विरहीतअसतो, मोठा पंडित असुन सज्जन असतो, राज्यकारभारांत सल्ला मसलती करणारा, सद्गुणी व नीतिने आचरण करणारा असतो. 
साधु पवित्र पुण्यसीळ । अंतरशुद्ध धर्मात्मा कृपाळ ।
कर्मनिष्ठ स्वधर्में निर्मळ । निर्लोप अनुतापी ॥ ११ ॥
११) साधु वृत्तीचा, पवित्र, पुण्यवंत, अंतःकरणाने शुद्ध, निर्मळ मनाचा, मोठा कर्मनिष्ठ, स्वधर्मी, निर्लोभी व स्वतःच्या चुकीचा खेद करणारा असतो.
गोडी आवडी परमार्थप्रीती । सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती ।
श्रुति स्मृती लीळा युक्ति । स्तुती मती परीक्षा ॥ १२ ॥
१२) परमार्थाची आवड, प्रेम व गोडी असते. सन्मार्गाने चालणारा, चांगल्या कर्मांचे आचरण करतो,  भगवंताचे कायम अनिसंधान ठेवतो, मन स्थिर ठेवतो, श्रुति,स्मृतिचे ज्ञान असते, खेळ म्हणून युक्तीने कार्य करतो, देवाची स्तुति करण्याची कला त्याला येते, निरनिराळ्या गोष्टींची माहिती किंवा ज्ञान त्याला असते.  दक्ष धूर्त योग्य तार्किक । सत्य साहित्य नेमक भेदक ।
कुशळ चपळ चमत्कारिक । नाना प्रकारें ॥ १३ ॥
१३) नेहमी सावध असतो, लबाडीने वागणार्‍याची लबाडी हुशारीने ओळखणारा असतो, योग्य प्रकारे विचार व तर्क करणारा असतो, सत्याच्या मार्गाने चालतो, साहित्याचे ज्ञान असते, नियमाने व नेमाने वागणारा, प्रत्येक गोष्टीचे अगर प्रसंगाचे मूळापर्यंत जाऊन ज्ञान करुन घेण्याची हातोटी त्याच्याजवळ असते, कुशलतेने काम करणारा, चपळाईने काम उरकणारा, असे निरनिराळे प्रसंगी चमत्कारिक वाटणारे गुण त्याच्याजवळ असतात.    
आदर सन्मान तार्तम्य जाणे । प्रयोग समयो प्रसंग जाणे ।
कार्याकारण चिन्हें जाणे । विचक्षण बोलिका ॥ १४ ॥
१४) लोकांचा आदर व सन्मान करतांना तो किती व कसा हे तो बरोबर जाणतो, कोणत्यावेळी कसे वागावे हे त्याला बरोबर माहित असते. कामे करतांना ती कां कराची ह्याचे ज्ञान त्याला असते. हुषारीने बोलणारा असतो.  
सावध साक्षेपी साधक । आगमनिगमशोधक ।
ज्ञानविज्ञानबोधक । निश्र्चयात्मक ॥ १५ ॥
१५) सावधगीरीने वागतो, नेहमी कार्यरत असतो, वेद व शास्त्रे यांचा अभ्यास करणारा, ज्ञान व विज्ञान यांची योग्य सांगड घालून पक्का बोध करुन घेणारा व देणारा असतो.
पुरश्र्चरणी तीर्थवासी । दृढव्रती कायाक्लेसी ।
उपासक निग्रहासी । करुं जाणे ॥ १६ ॥
१६) पुरश्र्चरणे करणारा, तीर्यात्रा करणारा, कठिण व्रते करतो, त्यासाठी देह कष्टवितो, निग्रहाने-निश्र्चयाने भगवंताची उपासना करतो. 
सत्यवचनी शुभवचनी । कोमळवचनी येकवचनी व सुखकार। 
निश्र्चयवचनी सौख्यवचनी । सर्वकाळ ॥ १७ ॥
१७) नेहमी खरे बोलणारा, शुभ बोलणारा, मृदु बोलणारा, एकवचनी, निश्र्चयात्मक बोलणारा व सुखकारक बोलणारा असतो. 
वासनातृप्त सखोल योगी । भव्य सुप्रसन्न वीतरागी ।
सौम्य सात्विक शुद्धमार्गी । निःकपट निर्वेसनी ॥ १८ ॥
१८) त्याच्या सर्व वासना तृप्त असतात, मूलापर्यंत जाऊन अभ्यास करणारा योगी असतो, भव्य व सुप्रसन्न व्यक्तिमत्वाचा, विरक्त असुन सौम्य व सात्विक वर्तुणुकीचा शुद्ध मार्गीअसतो, त्याच्याजवळ कपट नसते. तो व्यसनी नसतो. 
सुगड संगीत गुणग्राही । अनापेक्षी लोकसंग्रही ।
आर्जव सख्य सर्वहि । प्राणीमात्रासी ॥ १९ ॥
१९) कोणतेही काम उत्तम करतो, संगीतज्ञ असतो, दुसर्‍याच्या गुणांची प्रशंसा करतो, अपेक्षा न ठेवता अनेक लोकांशी मैत्री करतो, सर्व प्राण्यांशी आर्जवाने, सख्याने, गोडीने वागतो.
द्रव्यसुची दारासुची । न्यायसुची अंतरसुची ।
प्रवृत्तिसुची निवृत्तिसुची । सर्वसुची निःसंगपणें ॥ २० ॥
२०) धन व स्त्रिया यांच्या बाबतींत शीलवंत, वागणुक न्यायाला, नीतिमर्यादा धरुन व सांभाळुन असते. शुद्ध अंतःकरणी, संसारांत व परमार्थांतही वागणे चोख, पवित्र असते, सर्व जीवन पवित्र व निर्मळ असते.  
मित्रपणें परहितकारी । वाग्माधुर्य परशोकहारी ।
सामर्थ्यपणें वेत्रधारी । पुरुषार्थें जगमित्र ॥ २१ ॥
२१) दुसर्‍यांशी मित्रत्वाने वागणे, दुसर्‍यांचे हित करणे, भले चिंतणे, मधुर वाणीचा व इतरांचा शोक, दुःख कमी करणाराअसतो. आपल्या अधिकारांत गरिबांचे, अनाथांचे व सज्जनांचे भले करतो. आपल्या चांगल्या वागण्याने सर्वांचा मित्र बनतो.
संशयछेदक विशाळ वक्ता । सकळ क्लृप्त असोनि श्रोता ।
कथानिरुपणीं शब्दार्था । जाऊंच नेदी ॥ २२ ॥
२२) उत्कृष्ट ज्ञानी वक्ता असल्याने लोकांचे संशय निरसन करतो. सर्वज्ञान असले तरी उत्तम श्रोता होऊन दुसर्‍यांचे बोलणे व्यवस्थित ऐकून घेणारा असतो. कथा, प्रवचन यांचे निरुपण मनापासून ऐकतो व भावार्थाकडेही लक्ष देतो.
वेवादरहित संवादी । संगरहित निरोपाधी ।
दुराशारहित अक्रोधी । निर्दोष निर्मत्सरी ॥ २३ ॥
२३) वादविवादाशिवाय उत्तम संवाद साधतो, कोणतीही उपाधी लावून न घेता अलिप्त राहतो. अयोग्य आशा, अपेक्षा बाळगत नाही. क्रोध करत नाही. कोठचेही दोष त्याच्याजवळ नसतात, कोणाचाही मत्सर करत नाही.
विमळज्ञानी निश्र्चयात्मक। समाधानी आणी भजक ।
सिद्ध असोनी साधक । साधन रक्षी ॥ २४ ॥
२४) शुद्ध ज्ञानी असल्याने निश्र्चयी असतो, समाधानी व भगवंतास भजणारा असतो. सिद्धि प्राप्त झाल्या तरी साधकाच्याच वृत्तींत असतो. साधनाचे रक्षण करणारा असतो.
सुखरुप संतोषरुप । आनंदरुप हास्यरुप । 
ऐक्यरुप आत्मरुप । सर्वत्रांसी ॥ २५ ॥
२५) सद्विद्येनेयुक्त पुरुष सुखी, संतोषी, आनंदी, हसरा, आत्मरुपी होऊन सर्वांशी एकरुप झालेला असतो.  
भाग्यवंत जयवंत । रुपवंत गुणवंत ।
आचारवंत क्रियावंत । विचारवंत स्थिती ॥ २६ ॥
२६) तो भग्यवंत, जयवंत, रुपवंत, गुणवंत, आचारधर्म पाळणारा आचारवंत, क्रियावंत, उत्तम विचारी विचारवंत असतो.   
येशवंत कीर्तिवंत । शक्तिवंत सामर्थ्यवंत ।
वीर्यवंत वरदवंत । सत्यवंत सुकृती ॥ २७ ॥
२७) तो यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, त्याचा आशिर्वाद शुभफलदायी असतो, सत्यवंत व चांगली कामे, कृती करणारा असतो.  
विद्यावंत कळावंत । लक्ष्मीवंत लक्ष्णवंत ।
कुळवंत सुचिष्मंत । बळवंत दयाळु ॥ २८ ॥
२८) हे विद्याविभूषित, कलावंत, लक्ष्मीवंत, उत्तम लक्षणांनी युक्त असतो,  कुलीन, पवित्र, बळवंत व दयाळु असतो. 
युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ । बुद्धिवंत बहुधारिष्ट । 
दीक्षावंत सदा संतुष्ट । निस्पृह वीतरागी ॥ २९ ॥ 
२९) तो युक्तिने कार्य करणारा, गुणी, श्रेष्ठ, बुद्धिमान, धैर्यवान, परमार्थ दीक्षा संपन्न, संतुष्ट, इच्छा विरहीत म्हणजे कसलीही इच्छा न करणारा असतो, वैराग्यशील असतो.
असो ऐसे उत्तम गुण । हें सद्विद्येचें लक्षण ।
अभ्यासाया निरुपण । अल्पमात्र बोलिलें ॥ ३० ॥
३०) असो आतापर्यंत हे सद्विद्येचे गुण, त्यांचा अभ्यास करुन अंगांत बाणवावे म्हणुन थोडेसे सांगितले. 
रुप लावण्य अभ्यासितां नये । सहज गुणास न चले उपाये । 
कांहीं तरी धरावी सोये । अगांतुक गुणाची ॥ ३१ ॥
३१) रुप व लावण्य हे गुण उपजत असतात मात्र इतर उत्तम गुण अभ्यास करुन, प्रयत्नाने अंगी बाणवता येतात.
ऐसी हे सद्विद्या बरवी । सर्वत्रांपासी असावी ।
परी विरक्त पुरुषें अभ्यासावी । अगत्यरुप ॥ ३२ ॥ 
३२) अशी सद्विद्या सर्वांजवळ असावी. विरक्त पुरुषाने मात्र ती आपल्या अंगी प्रयत्नपूर्वक वाढवावी. 

॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सद्विद्यानिरुपणनाम समास आठवा ॥
Samas Aathava Sadvidya Nirupan
समास आठवा सद्विद्या निरुपण


Custom Search
Post a Comment