Friday, April 7, 2017

Samas Tisara Swaguna Pariksha B समास तिसरा स्वगुणपरीक्षा (ब)


Dashak Tisara Samas Tisara Swaguna Pariksha B 
Samas Tisara Swaguna Pariksha B is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about the pains suffered after taking birth on this earth and how a common man behaves after he is young. Qualities he is having in his nature that obstructs his spiritual progress.
समास तिसरा स्वगुणपरीक्षा (ब) 
समास तिसरा स्वगुणपरीक्षा (ब) 
श्रीराम ॥
द्वितीय संमंध जाला । दुःख मागील विसरला ।
सुख मानून राहिला । संसाराचें ॥ १ ॥
अर्थ
दुसरा लग्नसंबंध झाला. पण हा अत्यंत कंजूषपणे वागु लागतो. मग त्याचे वागणे कसे होते त्याचे वर्णन.
१) दुसरे लग्न झाले. मग मागचे दुःख विसरतो. परत संसारांत सुख आहे असे मानु लागतो. 
जाला अत्यंत कृपण । पोटें न खाय अन्न ।
रुक्याकारणें सांडी प्राण । येकसरा ॥ २ ॥
२) तो आता फार कंजूष होतो. पोटभर खातपीसुद्धा नाही. पैसा पैसा जमविण्यासाठी सारखा मरमर राबतो.
कदा कल्पांती न वेची । सांचिलेंचि पुन्हा सांची ।
अंतरी असेल कैंची । सद्वासना ॥ ३ ॥
३) जग बुडण्याची वेळ आली तरी पैसा खर्च करीत नाही. जमविलेले्या पैशांत अधिकाधिक भर घालू लागल्यावर चांगली वासना कशी येणार?
स्वयें धर्म न करी । धर्मकर्त्यासहि वारी । 
सर्वकाळ निंदा करी । साधुजनाची ॥ ४ ॥
४) स्वतः काही धर्मकृत्य करीत नाही व करणारासही करु नको असे सांगु लागे. नेहमी साधु संतांची निंदा करु लागला. 
नेणे तीर्थ नेणे व्रत । नेणे अतित अभ्यागत ।
मुंगीमुखींचें जें सीत । तेंहि वेंचून सांची ॥ ५ ॥
५) तीर्थ, व्रत, अतिथी अभ्यागत कोणालाच ओळखी नाहीसा झाला. मुंगीच्या तोंडांतील धान्याचा कणसुद्धा वेचावयास कमी करीना. 
स्वयें पुण्य करवेना । केलें तरी देखवेना ।
उपहास्य करी मना । नये म्हणौनि ॥ ६ ॥
६) स्वतः काही पुण्यकर्म करावयाचे नाही व दुसर्‍याकोणी केलेले पुण्यकर्म बघवत नाही. व तसे करणार्‍याचा दुःस्वास द्वेष करीन करु नको म्हणुन सांगू लागला. 
देवां भक्तांस उछेदी । आंगबळें सकळांस खेदी ।
निष्ठुर शब्दें अंतर भेदी । प्राणीमात्रांचें ॥ ७ ॥
७) तो भक्तांना व देवाला खोटे मानून स्व शक्तीने त्यांना त्रास देऊ लागला. कठोर शब्दाने त्यांना दुखवू लागला.
नीति सांडून मागें । अनीतीनें वर्तो लागे ।
गर्व धरुन फुगे । सर्वकाळ ॥ ८ ॥   
८) नीतीचा मार्ग सोडून अनीतीने वागु लागला. आणि सदा त्या अभिमानाने वागु लागला.
पूर्वजांस सिंतरिलें । पक्षश्राद्धहि नाहीं केलें ।
कुळदैवत ठकिले । कोणेपरी ॥ ९ ॥
९) पूर्वजांना विसरला. श्राद्ध-पक्ष करीनासा झाला. काहींतरी कारण काढून कुळ-दैवत कुळचार काही पाळीनासा झाला.
आक्षत भरिली भाणा । दुजा ब्राह्मण मेहुणा ।
आला होता पाहुणा । स्त्रियेस मूळ ॥ १० ॥
१०) एखादे कर्म केलेच तर खर्च वाचविण्यासाठी माहेरी आलेल्या बहिणीला अक्षता देऊन सुवासिण म्हणून व मेहुण्याला  जो त्याच्या बहिणीला माहेरी नेणयास आलेला असतो त्याला ब्राह्मण म्हणून आमंत्रण देऊन खर्च वाचवू लागला.
कदा नावडे हरिकथा । देव नलगे सर्वथा । 
स्नानसंध्या म्हणे वृथा । कासया करावी ॥ ११ ॥
११) हरिकथेचे वावडे व नावद, देवधर्म नकोसा तर स्नान-संध्येची काय जरुरी असे म्हणु लागला. 
अभिळाषें सांची वित्त । स्वयें करी विश्र्वासघात ।
मदें मातला उन्मत्त । तारुण्यपणें ॥ १२ ॥
१२) तरुण वय व जमा केलेला पैसा यामुळे विश्र्वासघातकी बनून उनमत्तपणाने वागु लागला.  
तारुण्य आंगी भरलें । धारिष्ट नवचे धरिलें ।
करुं नये तेंचि केलें । माहा पाप ॥ १३ ॥
१३) तारुण्याच्या भरांत मनावर ताबा  न ठेवता करु नये असे महापाप त्याने केले. 
स्त्री केली परी धाकुटी । धीर न धरवेचि पोटीं ।
विषयलोभें सेवटीं । वोळखी सांडिली ॥ १४ ॥
१४) स्त्री वयांत न आलेली केलेली कामवासनेचा जोर स्वस्थ बसू देईना स्त्री सुख मिळविण्यासाठी कोणाला ओळखिनासा झाला.
माये बहिण न विचारी । जाला पापी परद्वारी । 
दंड पावला राजद्वारीं । तर्‍हीं पालटेना ॥ १५ ॥
१५) आई-बहिण कोणाला ऐकीना शेवटी व्यभिचारी झाला. सरकार दरबारी शिक्षा झाली तरी वृत्ती बदलेना.
परस्त्री देखोन दृष्टीं । अभिळाष उठे पोटीं ।
अकर्तव्यें हिंपुटी । पुन्हां होये ॥ १६ ॥
१६) परस्त्रीला बघुन वाईट वासनेने तीची इच्छा करी. पण ती मिळण्याची आशा नसल्याने हिरमुसला होऊन दुःखी होई.
ऐसें पाप उदंड केलें । शुभाशुभ नाहीं उरलें ।
तेणें दोषें दुःख भरलें । अकस्मात आंगी ॥ १७ ॥
१७) असे त्याने फार पाप केले. शुभ अशुभ कसलाच विचार केला नाही. त्यामुळे दुःख व त्याचे योगे व्यसने वगैरे दोषाने त्याला धरले.  
व्याधी भरली सर्वांगीं । प्राणी जाला क्षयरोगी ।
केले दोष आपुले भोगी । सीघ्र काळें ॥ १८ ॥
१८) सर्वांग रोगांनी भरले. क्षयरोगी झाला. आपल्याच पापाचे भोग लवकरच भोगण्याची वेळ आली. 
दुःखें सर्वांग फुटलें । नासिक अवघेंचि बैसलें ।
लक्षण जाऊन जालें । कुलक्षण ॥ १९ ॥
१९) रोगाने सर्व शरीर फुटले, सर्वांगावर फोड उठले. नाक झडले. चांगले स्वरुप जाऊन कुलक्षणी बेढब दिसू लागला.  
देहास क्षीणता आली । नाना वेथा उद्भवली ।
तारुण्यशक्ती राहिली । खंगला प्राणी ॥ २० ॥
२०) देह अशक्त झाला. निरनिराळ्या व्यथांनी तारुण्याचा जोर ओसरल व त्याचा देह खंगु लागल.
सर्वांगी लागल्या कळा । देहास आली अवकळा ।
प्राणी कांपे चळचळां । शक्ति नाहीं ॥ २१ ॥
२१) त्याच्या सर्वांगाला कळा लागल्या. देह कळाहीन झाला. शक्तीहीन झाल्याने देहाला कंप भरला.   
हस्तपादादिक झडले । सर्वांगी किडे पडिले ।
देखोन थुंको लागले । लाहानथोर ॥ २२ ॥
२२) हातपाय झडले. सर्वांगी किडे पडले. लहानमोठे त्याला बघुन थुंकु लागले.
जाली विष्टेची सारणी । भोवती उठली वर्ढाणी ।
अत्यंत खंगला प्राणी । जीव न वचे ॥ २३ ॥
२३) त्याला जुलाबाने हैराण केले. त्यामुळे सभोवती घाण पसरली. अति खंगला पण प्रााण जाईना.
आतां मरण दे गा देवा । बहुत कष्ट जाले जीवा ।
जाला नाहीं नेणों ठेवा । पातकाचा ॥ २४ ॥
२४) त्याला आता देव आठवला. म्हणु लागला की, देवा आता मला मरण दे! अजुन माझ्या पापाचा घडा भरला नाही कां? 
दुःखे घळघळां रडे । जों जों पाहे आंगाकडे ।
तों तों दैन्यवाणें बापुडें । तळमळीं जीवीं ॥ २५ ॥
२५) आपल्या अंगाकडे बघुन व त्याची दशा बघुन घळघळा रडु लागला. जीवाची तळमळ होऊ लागली.  ऐसे कष्ट जाले बहुत । सकळ जालें वाताहात ।
दरवडा घालून वित्त । चोरटीं नेलें ॥ २६ ॥
२६) असे फार कष्ट झाले. सगळ्याची वाताहात झाली. जमविलेले सर्व धन चोरट्यानी चोरुन नेले.
जालें आरत्र ना परत्र । प्रारब्ध ठाकलें विचित्र । 
आपला आपण मळमूत्र । सेविला दुःखें ॥ २७ ॥
२७) धड इहलोक ना परलोक अशी अवस्था झाली. प्रारब्धाचा असा विचित्र भोग भोगणे प्राप्त झाले. आपलेच मळमूत्र प्राशन करणे आले.
पापसामग्री सरली । दिवसेंदिवस वेथा हरली ।
वैद्यें औषधें दिधली । उपचार जाला ॥ २८ ॥ 
२८) असे करताकरता पापाचा डोंगर संपला. वैद्यांचे औषध कामी येऊन व्याधी कमी होऊ लगल्या.  
मरत मरत वांचला । यास पुन्हां जन्म जाला ।
लोक म्हणती पडिला । माणसांमधें ॥ २९ ॥
२९) मरता मरता वाचला.  त्याचा पुनर्जन्म झाला. लोक म्हणु लागले हा परत माणसामध्ये आला.  
येरें स्त्री आणिली । बरवी घरवात मांडिली ।
अति स्वार्थबुद्धी धरिली । पुन्हा मागुती ॥ ३० ॥
३०) बायकोला घरी आणुन परत संसार करु लागला. पण स्वार्थी वागणे सोडले नाही.
कांहीं वैभव मेळविलें । पुन्हा सर्वहि संचिले ।
परंतु गृह बुडालें । संतान नाही ॥ ३१ ॥
३१) परत काही पैसा अडका मिळविला. परंतु घराला घरपण नाही कारण कुलबाळ नाही. म्हणुन परत दुःखी झाले.
पुत्रसंतान नस्तां दुःखी । वांज नांव पडिले लोकिकीं ।
तें न फिटे म्हणोनि लेंकी । तरी हो आतां ॥ ३२ ॥
३२) मुलबाळ नसल्याचे दुःख त्यांत परत लोकांत वांझ हे नांव पडले. ते जावे म्हणुन निदान मुलगी तरी व्हावी असे वाटु लागले.
म्हणोन नाना सायास । बहुत देवांस केले नवस ।
तीर्थें व्रतें उपवास । धरणें पारणें मांडिलें ॥ ३३ ॥
३३) त्यासाठी नाना प्रकारे प्रयत्न कष्ट केले. पुष्कळ देवांना नवस केले. तीर्थ, व्रत, उपवास, धरणे-पारणे करणे यांचा सपाटा लावला. 
विषयसुख तें राहिलें । वांजपणें दुःखी केलें ।
तव तें कुळदैवत पावलें । जाली वृद्धी ॥ ३४ ॥
३४) विषयसुख राहीलेच त्यांत वांझपणाचे दुःख आले. अकस्मात कुळदैवत पावले व मुल झाले.
त्या लेंकुरावरी अति प्रीती । दोघेहि क्षण येक न विशंभती ।
कांहीं जाल्यां आक्रदंती । दीर्घ स्वरें ॥ ३५ ॥
३५) त्या मुलावर दोघांचे फार प्रेम. एकक क्षणभरही त्याला दूर करत ना. त्याला काही झाले तर दोघे रडत.  ऐसी ते दुःखिस्ते । पूजीत होती नाना दैवतें ।
तव तेंहि मेलें अवचितें । पू्वपापेंकरुनी ॥ ३६ ॥
३६) अशी ती दोघे दुःखाने निरनिराळी दैवते पूजीत होती. पण अचानक पूर्वींच्या पापाने ते मूल मरुन गेले. 
तेणें बहुत दुःख जालें । घरीं आरंधें पडिलें ।
म्हणती आम्हांस कां ठेविलें । देवें वांज करुनी ॥ ३७ ॥
३७) त्यामुळे फार दुःखी झाले. घरांत जणू अंधारले म्हणु लागले की, दैवाने आम्हाला वांझ करुन मागे का ठेवले?     
आम्हांस द्रव्य काये करावें । तें जावें परी अपत्य व्हावें ।
अपत्यालागी त्यजावें । लागेल सर्व ॥ ३८ ॥
३८) आम्हाला पैशाचे काय तो नसाला तरी मुलबाळ हवे त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागला तरी चालेल.
वांजपण संदिसे गेलें । तों मरतवांज नांव पडिले ।
तें न फिटे कांहीं केलें । तेणें दुःखें आक्रंदती ॥ ३९ ॥
३९) वांझपणा ऐवजी आता मरणवांझ म्हणजे ज्यांची पोरे वाचत नाहीत असे नांव पडले. ते फार दुःखदायक झाले.
आमुची वेली कां खुंटिली । हा हा देवा वृत्ती बुडाली ।
कुळस्वामीण कां क्षोभली । विझाला कुळदीप ॥ ४० ॥  
४०) आमचा वंशवेल कां खुंटला. देवा आमचा म्हातारपणीचा आधर तुटला. हे कुलस्वामिनी तूं आमच्यावर कां रागावलीस. आमचा कुळदिपक विझला. 
आतां लेंकुराचें मुख देखेन । तरी आनंदे राडी चालेन ।
आणी गळहि टोचीन । कुळस्वामिणीपासीं ॥ ४१ ॥
४१) आम्हाला जर मुलाचे तोंड परत पहावयास मिळाले म्हणजेच परत मुल झाले तर मोठ्या आनंदाने निखर्‍यावरुन चालेन. आणि कुलस्वामिनीसमोर गळा टोचून घेईन.    
आई भुता करीन तुझा । नाव ठेवीन केरपुंजा ।
वेसणी घालीन माझा । मनोरथ पुरवी ॥ ४२ ॥ 
४२) आई त्या मुलाला मी तुला वाहीन. तुझा भुत्या करीन. त्याचे नांव केरपुंजा ठेवीन. त्याच्या नाकांत वेसण घालीन पण मुलगा व्हावा ही माझी इच्छा तूं पू्र्ण कर. 
बहुत देवांस नवस केले । बहुत गोसावी धुंडिले ।
गटगटां गिळिले । सगळे विंचू ॥ ४३ ॥
४३) पुष्कळ देवांना नवस केले. पुष्कळ गोसावी, बैरागी यांचे शोध केले. पुष्कळ विंचू गटगटा गिळले. 
केले समंधाचे साायास । राहाणें घातलें बहुवस । 
केळें नारिकेळें ब्राह्मणास । अंब्रदानें दिधलीं ॥ ४४ ॥
४४) समंधाला प्रसन्न करुन घेण्यासाठी प्रयत्न केले. अंगांत दैवतांचा संचार करुन घेतला. ब्राह्मणांना केळी, नारळ, आंबे यांची दाने दिली.  
केलीं नाना कवटालें । पुत्रलोभें केलीं ढालें ।
तरी अदृष्ट फिरलें । पुत्र नाहीं ॥ ४५ ॥
४५) अनेक प्रकारचे चेटुकआदी वाईट प्रयोग केले. पुत्र लोभाने हीन कर्मे केली. पण दैव फिरले नाही. मुल नाहीच झाले.
वृक्षाखालें जाऊन नाहाती । फळतीं झाडें करपती ।
ऐसे नाना दोष करिती । पुत्रलोभाकारणें ॥ ४६ ॥
४६) मुलगा व्हावा म्हणुन झाडाखाली अस्पर्श असतांना जाऊन न्हाहाली. फळे येणारी झाडे जाळली. अशी पापकर्मे मुलाच्या इच्छेने केली. 
सोडून सकळ वैभव । त्यांचा वारयावेधला जीव ।
तव तो पावला खंडेराव । आणी कुळस्वामिणी ॥ ४७ ॥
४७) दोघांनी आपले वैभव सोडले व  भ्रमिष्टपणे वागु लागली. अकस्मात खंडेराय व कुळस्वामिनी  प्रसन्न झाली.
आतां मनोरथ पुरती । स्त्रीपुरुषें आनंदती ।
सावध होऊन श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ४८ ॥ 
४८) मनांतील इच्छा पूर्ण झाली. नवराबायको आनंदली.
आता श्रोत्यांनी पुढीले समासी लक्ष द्यावे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्वगुणपरीक्षानाम समास तिसरा ॥
Samas Tisara Swaguna Pariksha B 
समास तिसरा स्वगुणपरीक्षा (ब) 


Custom Search

No comments: