Wednesday, May 3, 2017

Samas Aathava Aadhidaivik Tap समास आठवा आधिदैविक ताप


Dashak Tisara Samas Aathava Aadhidaivik Tap 
Samas Aathava Aadhidaivik Tap is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about the pains suffered after our death. Those people who don’t follow Niti and behave as they wish to have the happiness even by troubling others, have to suffer the pains called as Yam Yatana after death. Nobody can avoid these Yama yatana. So follow the path of Niti. These pains are called as Adhidaivik Tap.
समास आठवा आधिदैविक ताप 
श्रीराम ॥
मागां बोलिला आध्यात्मिक । त्या उपरी आदिभूतिक ।
आतां बोलिजेल आदिदैविक । तो सावध ऐका ॥ १ ॥
मागील दोन समासांत आध्यात्मिक व आदिभौतिक ताप सांगितला. आता आदिदैविक ताप सांगतो. तो नीट सावधपणे ऐका.
श्र्लोकः 
शुभाशुभेन कर्मेन देहांते यमयातना । 
स्वर्गनरकादि  भोक्तव्यमिदं चैवाधिदैविकं ॥ १ ॥
१) आपल्या शुभ व अशुभ कर्मांमुळे स्वर्ग व नरकयातना भोगाव्या लागतात. त्यांना आदिदैविक ताप असे म्हणतात.  
शुभाशुभ कर्मानें जना । देहांतीं येमयातना ।
स्वर्ग नर्क भोग नाना । या नाव आदिदैविक ॥ २ ॥
२) माणसांना त्यांच्या चांगल्यावाईट कर्मांनी मरणानंतर यमयातना व स्वर्ग असे अनेक भोग भोगावे लागतात. त्यांना आदिदैविकताप म्हणतात.
नाना दोष नाना पातकें । मदांधपणें अविवेकें ।
केलीं परी तें दुखदायकें । येमयातना भोगविती ॥ ३ ॥   
३) माणूस मदांध होऊन अविनाशी बनतो व अविचारानें तो अनेक दोष व पातकें करतो. तीं पातकें अंती दुःखदायक होऊन त्यास यमयातना भोगावयास लावतात.  
आंगबळें द्रव्यबळें । मनुष्यबळें राजबळें ।
नाना सामर्थ्याचेनि बळें । अकृत्य करिती ॥ ४ ॥
४) माणुस अंगबळाने, पैशाच्या बळाने, मनुष्यबळाने अगर राजबळाने अशा वेगवेगळ्या शक्तींच्या बळावर वाईट कर्मे करतो. 
नीती सांडूनियां तत्वता । करुं नये तेंचि करितां ।
येमयातना भोगितां । जीव जाये ॥ ५ ॥
५) नीतिला सोडून करु नये ते माणसे करितात. त्यामुळेमृत्युनंतर मग यमयातना भोगाव्या लागतात. 
डोळे झांकून स्वार्थबुद्धी । नाना अभिळाश कुबुद्धी ।
वृत्ति भूमिसिमा सांधी । द्रव्य दारा पदार्थ ॥ ६ ॥
६) अति स्वार्थबुद्धीने माणसे अति लोभाने अंध बनून जमीनीची हद्द वाढविणे, दुसर्‍याचे द्रव्य, बायको,वस्तु पळविणे,  
मातलेपणें उन्मत्त । जीवघात कुटुंबघात ।
अप्रमाण क्रिया करीत । म्हणौन येमयातना ॥ ७ ॥
७) नेहमी मस्तवालपणे उन्मत्तासारखे वागणे, जीवाचा नाश करणे, कुटुंबाचा नाश करणे, समाजविध्वंसक कर्मे करणे, असे करणरांना यमयातना भोगाव्या लागतात.
मर्यादा सांडूनि चालती । ग्रामा दंडी ग्रामाधिपती ।
देशा दंडी देशाधिपती  । नीति न्याय सांडितां ॥ ८ ॥
८) नीतिन्यायास सोडून वागल्यास तर गावाचा अधिपती गावाला दंड करतो. देशाचा राजा देशाला दंड करतो. 
देशाधिपतीस दंडिता रावो । रायास दंडिता देवो ।
राजा न करितां नीतिन्यावो । म्हणौन येमयातना ॥ ९ ॥
९) देशाच्या स्वामीला राजा शासन करतो. राजा नीतिन्यायाने वागत नसेल तर राजाला देव शासन करतो. 
अनीतीनें स्वार्थ पाहे । राजा पापी होऊन राहे ।
राज्या अंती नर्क आहे । म्हणौनिां ॥ १० ॥  
१०) जो राजा अनीतिने स्वार्थ साधतो, तो पापी बनतो. त्याचे पाप वाढत जाऊन तो मेला की त्याला नरकवास भोगावा लागतो.   
राजा सांडिती राजनीति । तयास येम गांजिती ।
येम नीति सांडितां धावती । देवगण ॥ ११ ॥
११) राजाने नीति सोडली तर त्यास यम शासन करतो. पण यमाने नीतिचे पालन केले नाही तर देवगण यमास शासन करतात. 
ऐसी मर्यादा लाविली देवें । म्हणौन नीतीनें वर्तावें ।
नीती न्याय सांडितां भोगावें । येमयातनेसी ॥ १२ ॥
१२) देवाने अशी ही मर्यादा घालून दिली आहे. म्हणून सर्वांनी नीतिने वागावे. नीतिन्यायाने न वागल्यास यमयातना भोगाव्या लागतात. 
देवें प्रेरिले येम । म्हणौन आदिदैविक नाम ।
तृतीय ताप दुर्गम । येमयातनेचा ॥ १३ ॥
१३) देव यमाला प्रेरित करुन त्याच्याद्वारे जीवाला हे भोग भोगावयास लावतो. म्हणून यास आदिदैविक ताप असे नाव आहे.  ह्या यमयातना अति दुःसह व दुखद आहेत.
येमदंड येमयातना । शास्त्रीं बोलिले प्रकार नाना ।
तो भोग कदापि चुकेना । या नाव आदिदैविक ॥ १४ ॥
१४) शास्त्रामध्ये यमदंड व यमयातना यांचे अनंत प्रकार सांगितले आहेत. हे यमयातनेचे भोग कधिच चुकविता येत नाहीत. म्हणून यास आदिदैविक असे नाव आहे.  
येमयातनेचे खेद । शास्त्रीं बोलिले विशद । 
शेरीरीं घालून अप्रमाद । नाना प्रकारें ॥ १५ ॥
१५) माणूस जी नाना प्रकारची दुष्कृत्ये करतो त्यांचे सगळे दोष त्याच्या सूक्ष्म शरीरांत साठवले जातात. त्या दोषामप्रमाणे त्याला यमयातना भोगाव्या लागतात. शास्त्रामध्ये सर्व वर्णन केले आहे. 
पापपुण्याचीं शरीरें । स्वर्गीं असती कळीवरें ।
त्यांत घालून नाना प्रकारें । पापपुण्य भोगविती ॥ १६ ॥
१६) मरणोत्तर लोकांत पापपुण्याची शरीरे असतात. मनुष्य मेल्यानंतर त्याचा सूक्ष्म देह त्याच्या पापपुण्यानुसार त्याच्या शरीरांत घालून मग त्याला पापाची व पुण्याची फळे भोगावी लागतात.  
नाना पुण्यें नाना विळास । नाना दोषें यातना कर्कश ।
शास्त्रीं बोलिले अविश्र्वास ।  मानूंच नये ॥ १७ ॥
१७) ज्याच्या पदरी पुष्कळ पुण्य त्याला ते संपेपर्यंत स्वर्गसुख व ज्याच्या पदरी पाप पुष्कळ त्याला पुष्कळ नरकयातनांचे दुःख व यातना भोगाव्या लागतात. असे शास्त्रांत सांगितले आहे. ते खोटे मानू नये.  
वेदाज्ञेनें न चालती । हरिभक्ती न करिती ।
त्यास येमयातना करिती । या नाव आदिदैविक ॥ १८ ॥   
१८) जे वेदाज्ञेनुसा वागत नाहीत, जे हरिभक्ती करत नाहीत त्यांना यमयातना भोगाव्या लागतात. यास आदिदैविक ताप म्हणतात.
अक्षोभ नर्कीं उदंड जीव । जुनाट किडे करिती रवरव ।
बांधोन टाकिती हातपाय । या नाव आदिदैविक ॥ १९ ॥
१९) अक्षोभ नावाच्या नरकांत अनेक जुने किडे वळवळ करीत असतात. पापी मनुष्याला यम त्यामध्ये हातपाय बांधुन टाकतो. यास आदिदैविक ताप म्हणतात. 
उदंड पैस लाहान मुख । कुंभाकार कुंड येक ।
दुर्गंधी उकाडा कुंभपाक । या नाव आदिदैविक ॥ २० ॥
२०) कांही पापी जीवांना कुंभपाक नावाच्या नरकांत टाकतात. कुंभपाक म्हणजे लहान तोंडाचे पण आत मोठी जागा असलेले मडक्यासारखे कुंड. ह्या कुंडांत फार उकाडा व दुर्गधी असते. याला आदिदैविक ताप म्हणतात.
तप्त भूमिका ताविती । जळत स्वंभ पोटाळविती । 
नाना सांडस लाविती । या नाव आदिदैविक ॥ २१ ॥
२१) जीवाला तापलेल्या जमिनीवर भाजतात. जळत असलेला लाकडी खांब पोटावर फिरवतात. अनेक चाप लावतात. यास आदिदैविक ताप म्हणतात.  
येमदंडाचे उदंड मार । यातनेची सामग्री अपार  ।
भोग भोगिती पापी । या नाव आदिदैविक ॥ २२ ॥
२२) यमाच्या शिक्षेमध्ये मार देण्याचे पुष्कळ प्रकार आहेत. यातना देण्याची साधने पुष्कळ आहेत. पापी मनुष्यांना त्यांच्या पापाच्या यातना भोगाव्या लागतात. 
पृथ्वीमध्यें मार नाना । त्याहून कठीण येमयातना ।
मारितां उसंतचि असेना । या नाव आदिदैविक ॥ २३ ॥ 
२३) या जगांत मार देण्याचे पुष्कळ प्रकार आहेत परंतु यमयातना सोसण्यास त्याहीपेक्षा कठिण आहेत. तेथिल मार संपतच नाही. याला आदिदैविक ताप म्हणतात. 
चौघे चौंकडे वोढिती । येक ते झोंकून पाडिती ।
ताणिती मारिती वोढून नेती । या नाव आदिदैविक ॥ २४ ॥ 
२४) चारजण चार बाजूंनी खेंचतात. कोणी झोके देऊन पाडतात, ताडतात, मारतात. किंवा फरफटत ओढून नेताता. 
उठवेना बैसवेना । रडवेना पडवेना ।
यातनेवरी यातना । या नाव आदिदैविक ॥ २५ ॥
२५) तेथे उठवत नाही, बसवत नाही, रडवत नाही की पडवत नाही. यातना यातना कांही संपत नाहीत. 
आक्रंदे रडे आणी फुंजे । धकाधकीनें निर्बुजे ।
झुर्झुरों पंजर होऊन झिजे । या नाव आदिदैविक ॥ २६ ॥
२६) जीव तेथे रडतो, मोठ्याने गळा काढतो, गहिंवरतो, फुसफुसतो, तेथील धक्काबुक्कीने घाबरतो, सारखी झुरणी लागल्याने हाडांचा सापळा उरतो तरी झीज चालूच राहाते.
कर्कश वचनें कर्कश मार । यातनेचे नाना प्रकार ।
त्रास पावती दोषी नर । या नाव आदिदैविक ॥ २७ ॥
२७) कठोर बोलून कठोर मार देतात. यमयातनेचे असे नेक प्रकार आहेत. पापी माणसांना तो त्रास भोगावा लागतो. याचे नाव आदोदैविक ताप आहे. 
मागां बोलिला राजदंड । त्याहून येमदंड उदंड ।
तेथील यातना प्रचंड । भीमरुप दारुण ॥ २८ ॥
२८) मागील समसांत राजा ज्या शिक्षा करतो त्या सांगितल्या आहेत. पण यमाच्या शिक्षा त्यांहून पुष्कळ आहेत. यमयातना प्रचंड आहेत, भयंकर आहेत, फार अक्राळ-विक्राळ आहेत. 
आध्यात्मिक आदिभूतिक । त्याहूनि विशेष आदिदैविक ।
अल्प संकेते कांहीयेक । कळावया बोलिलें ॥ २९ ॥
२९) आध्यात्मिक, आधिभौतिक आणि त्याहून विशेष आदिदैविक ताप हे तीन ताप थोड्या लक्षणांसहित समजण्यासाठी म्हणून सांगितले. 
॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आदिदैविकतापनाम समास आठवा ॥  
Samas Aathava Aadhidaivik Tap 
समास आठवा आधिदैविक ताप 


Custom Search

No comments: