Monday, July 10, 2017

Samas Tisara ShishyaLakshan समास तिसरा शिष्यलक्षण


Dashak Pachava Samas Tisara ShishyaLakshan
Samas Tisara ShishyaLakshan. It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about SatShishya. Every SadGuru requires a Shishya. but he must be a SatShishya. SadGuru teaches him about spirituality. He makes him understand the true knowledge. He can take him to path of Moksha. Swami Samarth is telling us about SatShishya in this Samas. What qualities SatShishya must have and how he can attain Moksha. By knowing these qualities of SatShishya is very important as we can know what qualities are to be developed and what bad qualities we have to avoid to be on the path of Mukti or Moksha.
समास तिसरा शिष्यलक्षण
श्रीराम ॥ 
मागां सद्गुरुचें लक्षण । विशद केलें निरुपण ।
आतां सच्छिष्याची वोळखण । सावध ऐका ॥ १ ॥
१) मागील समासांत सद्गुरुचे लक्षण सांगितले. आतां सत्शिष्याची ओळख सांगतो. 
सद्गुरुविण सच्छिष्य । तो वायां जाय निशेष ।
कां सच्छिष्येंविण विशेष । सद्गुरु सिणे ॥ २ ॥
२) सद्गुरु जर मिळाला नाही तर सत्शिष्य वाया जातो. सत्शिष्य मिळाला नाही तर सद्गुरुला शिष्याला सत्शिष्य बनविण्यास बरेच श्रम घ्यावे लागतात.
उत्तम भूमि शोधिली शुद्ध । तेथें बीज पेरिलें किडखाद ।
कां ते उत्तम बीज परी समंध । खडकेंसी पडिला ॥ ३ ॥  
३) समजा, उत्तम जमीन आहे. तिच्यांतील खडे गोटे तण काढून ती चांगली साफ केली. पण तिच्यांत किडके बीज पेरले. किंवा उत्तम बीज खडकाळ जमीनींत पेरले. 
तैसा सच्छिष्य तें सत्पात्र । परंतु गुरु सांगे मंत्र तंत्र ।
तेथें अरत्र ना परत्र । कांहींच नाहीं ॥ ४ ॥
४) या दोन्ही ठिकाणी चांगले पीक येत नाही. तसेच सत्शिष्य आहे पण त्याला मंत्र-तंत्र सांगणारा गुरु भेटला तर ना प्रपंच ना परमार्थ अशी अवस्था होऊन हाती कांहींच लागत नाही. 
अथवा गुरु पूर्ण कृपा करी । परी शिष्य अनाधिकारी ।
भाग्यपुरुषाचा भिकारी । पुत्र जैसा ॥ ५ ॥
५) किंवा सद्गुरु ब्रह्मज्ञानी, पूर्ण कृपा करणारा व कृपाळू असला परंतु त्याचा शिष्य जर अनधिकारी, अपात्र, परमार्थाला अयोग्य भेटला तर एखाद्या भाग्यवान बापाचा मुलगा दरिद्री निघावा अशी अवस्था होते.    
तैसें येकाविण येक । होत असे निरार्थक । 
परलोकींचे सार्थक । तें दुर्‍हावे ॥ ६ ॥
६) या कारणाने सद्गुरु आणि सत्शिष्य यापैकी एक असून दुसरा नसेल तर सगळे फुकट जाते. परमार्थ साधल्याने होणारे सामर्थ्य दूरच राहते. 
म्हणौनि सद्गुरु आणी सच्छिष्य । तेथें न लगती सायास ।
त्यां उभयतांचा हव्यास । पुरे येकसरा ॥ ७ ॥
७)  म्हणून सद्गुरु व सत्शिष्य अशी जोडी जेथे असते तेथे सद्गुरुला कष्ट न होता सत्शिष्य तयार होतो. दोघांची हौस एकदम पुरविली जाते. आपलें ज्ञान दान योग्य ठिकाणी होते म्हणून सद्गुरु समाधानी तर आपल्याला उत्तम ज्ञानी सद्गुरु भेटला म्हणून सत्शिष्य पण समाधानी होतो.
सुभूमि आणी उत्तम कण । उगवेना प्रजन्येंविण ।
तैसें अध्यात्मनिरुपण  । नस्तां होये ॥ ८ ॥
८) जमीन उत्तम आहे. उत्तम बीज पेरले आहे पण पाऊस नसेल तर पीक येणार नाही. तसेंच सद्गुरु आहे त्याला सत्शिष्य भेटला आहे. पण दोघांमध्ये आत्मज्ञानाबद्दल सुसंवाद नसेल तर शिष्याला स्वानुभव येणार नाही.
सेत पेरिलें आणी उगवलें । परंतु निगेविण गेलें ।
साधनेंविण तैसे जालें । साधकांसी ॥ ९ ॥
९) शेतांत उत्तम बी पेरले आणी ते उगवले परंतु त्याची निगा न राखल्याने ते वाया गेले. तसेच सद्गुरुने आत्मज्ञान दिले परंतु सत्शिष्याने साधना केली नाही तर सर्व फुकटच जाते.
जंवरी पीक आपणास भोगे । तंवरी अवघेंचि करणें लागे ।
पीक आलियां हि उगें । राहोंचि नये ॥ १० ॥
१०) जोपर्यंत शेतांतील पीक घरी येऊन पडत नाही, तोपर्यंत सर्व गोष्टी करुन निगा राखावी लागते. पीक घरी आल्यावरही त्याची काळजी घ्यावी. थंडपणे बसून राहू नये. 
तैसें आत्मज्ञान जालें । परी साधन पाहिजे केलें ।
येक वेळ उदंड जेविलें । तर्‍हीं सामग्री पाहिजे ॥ ११ ॥
११) आत्मज्ञान झाल्यानंतरसुद्धासाधकाने सद्गुरुने सांगितलेले साधन चालू ठेवले पाहीजे. अविद्येच्या अमंमलाने ते ज्ञान मंद होता कामा नये. जसे एकदा पोटभर जेवले तरी परत जेवण बनविण्यासाठी  सामुग्रीजवळ ठेवावीच लागते. 
म्हणौन साधन अभ्यास आणी सद्गुरु । सच्छिष्य आणी सच्छास्त्रविचारु ।
सत्कर्म सद्वासना पारु । पाववी भवाचा ॥ १२ ॥
१२) म्हणून साधना, अभ्यास, सद्गुरु, सत्शिष्य, सत्शास्त्र विचार, सत्कर्माचार, सद्वासना 
सदुपासना सत्कर्म । सत्क्रिया आणी स्वधर्म । 
सत्संग आणी नित्य नेम । निरंतर ॥ १३ ॥
१३) सद्उपासना, सत्क्रिया,  स्वधर्माचरण, सत्संग आणि नित्य नेम 
ऐसें हें अवघें चि मिळे । तरी च विमळ ज्ञान निवळे ।
नाहीं तरी पाषांड संचरें बळें ।  समुदांई ॥ १४ ॥
१४) या सगळ्या गोष्टी सातत्याने एकत्र राहील्या तरच निर्मळ आत्मज्ञान उदय पावते. आणि सत्शिष्य संसारांतून पार पडतो. नाहींतर लोकंमधे पाखंडाचा प्रचार होतो. 
येथें शब्द नाहीं शिष्यासी । हें अवघे सद्गुरुपासीं ।
सद्गुरु पालटी अवगुणासी । नाना येत्नेंकरुनी ॥ १५ ॥
१५) या बाबतींत शिष्याला दोष देता येत नाही. कारण सत्शिष्याचे अवगुण निरनिराळ्या प्रयत्नांनी घालविणे ही सद्गुरुची जबाबदारी असते. 
सद्गुरुचेनि असच्छिष्य पालटे । परंतु सच्छिष्यें असद्गुरु न पालटे ।
कां जें थोरपण तुटे । म्हणौनिया ॥ १६ ॥
१६) एखादा शिष्य चांगला नसेल तर सद्गुरु त्याचे अवगुण घालवून सत्शिष्यांत रुपांतर करु शकतो. परंतु सत्शिष्य वाईट गुरुस बदलू शकत नाही. कारण गुरुला मोठेपणाचा वृथा अभिमान असतो.
याकारणे सद्गुरु पाहिजे । तरीच सन्मार्ग लाहिजे ।
नाहीं तरी होईजे । पापांडा वरपडे ॥ १७ ॥
१७) यासाठी सद्गुरु असला पाहिजे तरच शिष्याला उत्तम मार्गदर्शन मिळते. सद्गुरु नसेल तर शिष्य पाखंड मताचा होतो.  
येथें सद्गुरुचि कारण । येर सर्व निःकारण ।
तथापि सांगो वोळखण । सच्छिष्याची ॥ १८ ॥
१८) येथें गुरुशिष्यसंबंधामध्ये सद्गुरुच मुख्य कारण आहे. तोच शिष्याला परमार्थांत पुढे नेतो किंवा मागे खेचतो. बाकीचे महत्वाचे नाही. तरीही सत्शिष्याची लक्षणें सांगतो. 
मुख्य सच्छिष्याचें लक्षण । सद्गुरुवचनीं विश्र्वास पूर्ण ।
अनन्यभावें शरण । त्या नांव सच्छिष्य ॥ १९ ॥
१९) सत्शिष्याचे मुख्य लक्षण म्हणजे सद्गुरुच्या वचनावर उपदेशावर त्याचा पूर्ण विश्र्वास हवा. सद्गुरुला तो अनन्यभावाने शरण असला पाहीजे. तोच खरा उत्तम शिष्य होय.
शिष्य पाहिजे निर्मळ । शिष्य पाहिजे आचारसीळ ।
शिष्य पाहिजे केवळ । विरक्त अनुतापी ॥ २० ॥
२० ) शिष्य निर्मळ, आचारशीळ, अगदी विरक्त व चुकीबद्दल वाईट वाटणारा असावा.
शिष्य पाहिजे निष्ठावंत । शिष्य पाहिजे सुचिष्मंत ।
शिष्य पाहिजे नेमस्त । सर्वप्रकारीं ॥ २१ ॥
२१) शिष्य निष्ठावंत, शुचिमंत आणि सर्व बाबतींत नियमाने वागणारा असावा.  
शिष्य पाहिजे साक्षपी विशेष । शिष्य पाहिजे परम दक्ष ।
शिष्य पाहिजे अलक्ष । लक्षी ऐसा ॥ २२ ॥
२२) शिष्य मोठा उद्योगी तत्पर व अतींद्रिय लक्ष्यावर लक्ष केंद्रित करणारा असाना. अशा सामर्थ्यानेच आत्म्याचे अनुसंधान साधते.  
शिष्य पाहिजे अति धीर । शिष्य पाहिजे अतिउदार ।
शिष्य पाहिजे अति तत्पर । परमार्थविषईं ॥ २३ ॥
२३) शिष्य मोठा धीराचा व उदार व परमार्थाविषयीं अति तत्पर असावा. 
शिष्य पाहिजे परोपकारी । शिष्य पाहिजे निर्मत्सरी ।
शिष्य पाहिजे अर्थांतरीं । प्रवेशकर्ता ॥ २४ ॥
२४) शिष्य परोपकारी असावा. तो निर्मत्सरी हवा. ग्रंथाचा अभ्यास करताना शब्दार्थाच्या अंतरगांत शिरणारा असावा. ग्रंथकर्त्याचा आशय आकलन होणारा असावा.
शिष्य पाहिजे परम शुद्ध । शिष्य पाहिजे परम सावध ।
शिष्य पाहिजे अगाध । उत्तम गुणाचा ॥ २५ ॥
२५) शिष्य अति शुद्ध, अति सावध आणि उत्तम गुणांचा असावा.
शिष्य पाहिजे प्रज्ञावंत । शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त ।
शिष्य पाहिजे नीतिवंत । मर्यादेचा ॥ २६ ॥
२६) शिष्य स्वतंत्र विचारशक्ति असलेला, तो प्रमेळ भक्त असावा. तो नीतीवंत व नीति मर्यादा सांभळणारा असावा.
शिष्य पाहिजे युक्तिवंत । शिष्य पाहिजे बुद्धिवंत ।
शिष्य पाहिजे संतासंत । विचारघेता ॥ २७ ॥
२७) शिष्य मोठ्या युक्तीचा असावा. शिष्य मोठा बुद्धिवंत हवा. चांगल्या वाईटाचा विचार करणारा असावा. 
शिष्य पाहिजे धारिष्टाचा । शिष्य पाहिजे दृढ व्रताचा ।
शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा । पुण्यसीळ ॥ २८ ॥
२८) शिष्य धाडसी, निश्र्चयानें व्रत सांभाळणारा असावाा. तो उत्तम कुळांतील व पुण्यशील असावा. 
शिष्य असावा सात्विक । शिष्य असावा भजक ।
शिष्य असावा साधक । साधनकर्ता ॥ २९ ॥
२९) शिष्य सात्विक, भगवंताला भजणारा आणि मनापासून साधन करणारा साधक असावा.
शिष्य असावा विश्र्वासी । शिष्य असावा कायाक्लेशी ।
शिष्य असावा परमार्थासी । वाढऊं जाणे ॥ ३० ॥
३०) शिष्य विश्र्वास ठेवणारा असावा. शरीराचे कष्ट सोसणारा असावा. परमार्थ कसा वाढेल याचे ज्ञान असणारा असावा. 
शिष्य असावा स्वतंत्र । शिष्य असावा जगमित्र ।
शिष्य असावा सत्पात्र । सर्व गुणें ॥ ३१ ॥
३१) शिष्य स्वतंत्र, जगाचा मित्र असावा. तो सर्व गुणांनी संपन्न असलेला सत्पात्र असावा.
शिष्य असावा सद्विद्येचा । शिष्य असावा सद्भावाचा ।
शिष्य असावा अंतरींचा । परम शुद्ध ॥ ३२ ॥
३२) शिष्य ब्रह्मविद्येचा अभ्यास करणारा असावा. भगवंतावर खरा भाव असलेला असावा. तो शुद्ध अंतःकरणाचा असावा.
शिष्य नसावा अविवेकी । शिष्य नसावा गर्भसुखी ।
शिष्य असावा संसारदुःखी । संतप्त देही ॥ ३३ ॥
३३) शिष्य अविवेकी नसावा. तो गर्भश्रीमंत नसावा. तो संसारांतील दुःखाने दुःखी झालेला, पोळलेला असावा. 
जो संसारदुःखें दुःखवला । जो त्रिविधतापें पोळला ।
तोचि अधिकारी जाला । परमार्थविषीं ॥ ३४ ॥
३४) संसारांतील दुःखाने जो पोळलेला आहे, जो शारिरीक व मानसिक आधिव्याधींनी पोळलेला आहे, तोच परमार्थ साधण्याच्या दृष्टीने योग्य ठरतो. 
बहु दुःख भोगिलें जेणें । तयासीच परमार्थ बाणे ।
संसारदुःखाचेनि गुणें । वैराग्य उपजे ॥ ३५ ॥
३५) ज्यानें संसारांत पुष्कळ दुःख भोगलेले असते, त्याच्या अंगी परमार्थ बाणतो. अति दुःख भोगल्याने त्याच्या मनांत वैराग्य येते. 
जया संसाराचा त्रास । तयासीच उपजे विस्वास ।
विस्वासबळें दृढ कास । धरिली सद्गुरुची ॥ ३६ ॥
३६) ज्याला संसाराचा त्रास वाटूं लागतो, त्याच्या अंतरी परमार्थाबद्दल विश्र्वास निर्माण होतो. तो सद्गुरुची कास घट्ट धरतो.
अविस्वासें कास सोडिली । ऐसीं बहुतेक भवीं बुडालीं ।
नाना जळचरीं तोडिलीं । मध्येंचि सुखदुःखें ॥ ३७ ॥
३७) कांहीं कारणाने विश्र्वास उडून मधेंच सद्गुरुची साथ सोडणारे लोक, परत संसारांत बुडतात. संसारांतील सुखदुःखानी ते तसेच मरुन जातात.
या कारणें दृढ विस्वास । तोचि जाणावा सच्छिष्य ।
मोक्षाधिकारी विशेष । आग्रगण्यु ॥ ३८ ॥
३८) म्हणून दृढ विश्र्वास ज्याला परमार्थ व सद्गुरुविषयीं तोच सच्छिष्य जाणावा. 
जो सद्गुरुवचनें निवाला । तो सायोज्यतेचा आंखिला ।
संसारपांगें पांगिला । न वचे कदा ॥ ३९ ॥
३९) अशा दृढ श्रद्धेच्या सत्शिष्याचे मन सद्गुरुच्या बोधाने शांत होते. तो सायुज्यमुक्तिला पात्र होतो. मग संसाराच्या आसक्तीने तो कधी चळत नाही.
सद्गुरुहून देव मोठा । जयास वाटे तो करंटा ।
सुटला वैभवाचा फांटा । सामर्थ्यपिसें ॥ ४० ॥
४०) सद्गुरुहून देव मोठा आहे असे ज्याला वाटते. तो करंटा असतो. हा समज एक भ्रमच आहे. वैभवाच्या अभिमानांतून बाहेर पदणारा तो एक विकल्प असतो. 
सद्गुरुस्वरुप ते संत । आणी देवांस मांडेल कल्पांत ।   
तेथें कैंचे उरेल सामर्थ्य । हरिहरांचें ॥ ४१ ॥
४१) सद्गुरुंचे खरे स्वरुप कायम टिकणारे, अविनाशी आहे. देवांचे स्वरुप अशाश्वत आहे व कल्पांताच्यावेळी देव नाश पावतात. त्यांचे सामर्थ्यही उरत नाही. 
म्हणोन सद्गुरुसामर्थ्य आधीक । जेथें आटती ब्रह्मादिक ।
अल्पबुद्धी मानवी रंक । तयांसी हें कळेना ॥ ४२ ॥
४२) म्हणुन सद्गुरंचे सामर्थ्य देवांपेक्षा जास्त आहे. अल्पबुद्धि मानवाला मात्र हे कळत नाही. 
गुरुदेवास बराबरी । करी तो शिष्य दुराचारी ।
भ्रांति बैसली अभ्यांतरीं । सिद्धांत नेणवे ॥ ४३ ॥
४३) सद्गुरु व देव यांची जो बरोबरी करतो, तो शिष्य दुराचारी समजावा. त्याच्या  मनांत भ्रामक खोट्या कल्पना बसलेल्या असतात त्यामुळे खरे तत्व काय आहे ते त्याला कळत नाही.
देव मनुषीं  भाविला । मंत्रीं देवपणासी आला ।
सद्गुरु न वचे कल्पिला । ईश्र्वराचेनी ॥ ४४ ॥
४४) देवाला माणुसच निर्माण करतो. मंत्रांनी त्याला प्रतिष्ठानेने देवपण देतो. पण ईश्र्वरालासुद्धा सद्गुरुची कल्पना करता येत नाही.
म्हणौनि सद्गुरु पूर्णपणें । देवाहून आधीक कोटिगुणें ।
जयासी वर्णिता भांडणें । वेदशास्त्रीं लागलीं ॥ ४५ ॥
४५) म्हणुन सद्गुरु देवापेक्षा कोटीगुणे श्रेष्ठ आहे. सद्गुरुचे स्वरुप कल्पनातीत असल्यानेत्याचे त्याचे वर्णन करण्यामधें वेदशात्रांतही भांडणे, मतभिन्नता आहे.
असो सद्गुरुपदापुढें । दुजें कांहींच न चढे । 
देवसामर्थ्य तें केवढें । मायाजनित ॥ ४६ ॥
४६) सद्गुरुचे स्थान परमश्रेष्ठ असल्याने त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे नाही. सर्व देव मायेंतून निर्माण होतात म्हणून त्यांचे सामर्थ्य सद्गुरुपेक्षा कमीच असते.   
अहो सद्गुरुकृपा जयासी । सामर्थ्य न चले तयापासीं ।
ज्ञानबळें वैभवासी । तृणतुछ केलें ॥ ४७ ॥
४७) ज्याच्यावर सद्गुरुकृपा असते त्याच्यावर इतर कोणाचीही सत्ता चालत नाही. आपल्या ब्रह्मज्ञानाच्या सामर्थ्यानें तो सार्‍या वैभवाला तुच्छ मानतो.
सद्गुरुकृपेचेनि बळें । अपरोक्षज्ञानाचेनि उसाळें ।
मायेसहित ब्रह्मांड सगळें । दृष्टीस न ये ॥ ४८ ॥
४८) सद्गुरुच्या कृपेने व सामर्थ्याने सत्शिष्याला आत्मसाक्षात्कार होतो. त्यामुळे मायेसह सारें विश्र्व त्याला दिसत नाही. खोट्या दृश्याचा आत्मज्ञानामुळे लोप होतो.
ऐसें सच्छिष्याचें वैभव । सद्गुरुवचनीं दृढ भाव ।
तेणें गुणें देवराव । स्वयेंचि होती ॥ ४९ ॥
४९) उत्तम शिष्याचे वैभव व ज्ञान अशा प्रकारचे असते. सद्गुरुच्या वचनावर त्याचा दृढ विश्र्वास असतो. त्यामुळें तो सत्शिष्य ईश्र्वरस्वरुप बनुन जातो. 
अंतरीं अनुतापें तापले । तेणें अंतर शुद्ध जालें ।
पुढें सद्गुरुवचनें निवाले । सच्छिष्य ऐसे ॥ ५० ॥
५०) सत्शिष्याचे अंतःकरण पश्र्चातापाच्या आगीने पोळतें ते निर्मळ व शुद्ध होते. ते पोळलेले अंतःकरण सद्गुरुच्या बोधाने शांत होते. सत्शिष्य हा असा असतो.  
लागतां सद्गुरुवचनपंथें । जालें ब्रह्मांड पालथें ।    
तरी जयाच्या शुद्ध भावार्थें । पालट न धरिजे ॥ ५१ ॥
५१) सद्गुरुनें सांगितलेल्या मार्गाने साधना करीत असतां सारें ब्रह्मांड पालथे झाले तरी सद्गुरुच्या वचनावर असलेला सत्शिष्याचा अढळ व शुद्ध विश्र्वास कमी होत नाही.  
शरण सद्गुरुस गेले । सच्छिष्य ऐसे निवडले ।
क्रियापालटें जाले । पावन ईश्र्वरीं ॥ ५२ ॥
५२) अशा रीतीनें जे खरे सद्गुरुला शरण जातात तेंच सत्शिष्य म्हणुन निवडले जातात. त्याच्यांत अंतरबाह्य बदल होऊन ते ईश्र्वर स्वरुप बनतात.
ऐसा सद्भाव अंतरीं । तेचि मुक्तीचे वाटेकरी ।
येर माईक वेषधारी । असच्छिष्य ॥ ५३ ॥
५३) सत्शिष्याच्या चित्तामधे सद्गुरुबद्दल अशी अढळ श्रद्धा असते. तोच मोक्षाचा अधिकारी होतो. बाकीचे शिष्य नुसते पोशाखीच असतात.
वाटे विषयांचे सुख । परमार्थ संपादणें लौकिक ।
देखोवेखीं पढत मूर्ख । शरण गेले ॥ ५४ ॥
५४) जे पढतमूर्ख असतात त्यांना मनांतून इंद्रियभोगामध्यें सुख वाटत असते. केवळ लौकिकासाठी ते परमार्थ करतात. आपणही परमार्थी आहोत असे प्रदर्शन करन्यासाठी ते सद्गुरुला शरण जातात. 
जाली विषईं वृत्ति अनावर । दृढ धरिला संसार ।
परमार्थचर्चेचा विचार । मळिण जाला ॥ ५५ ॥
५५) वासना तृप्तीतच ते रममाण होतात. त्यामुळे परमार्थांतील सूक्ष्म विचारांचे त्यांना आकलन होत नाही. 
मोड घेतला परमार्थाचा । हव्यास धरिला प्रपंचाचा ।
भार वाहिला कुटुंबाचा । काबाडी जाला ॥ ५६ ॥
५६) पधतमूर्ख परमार्थाकडे वळतो पण त्याचे मन प्रपंचात गुंतलेले असते. त्यामुळे कुटुंबाची ओझी हमालासारखा बनुन वाहू लागतो. 
मानिला प्रपंची आनंद । केला परमार्थी विनोद ।
भ्रांत मूढ मतिमंद । लोधला कामीं ॥ ५७ ॥
५७) प्रपंचातच त्याचे खरे सुख असते. केवळ कमणुकीसाठी तो परमार्थाकडे वळलेला असतो. भ्रमांत राहून तो मंदबुद्धि, मूर्ख माणुस वासनेमधेच अदकलेला असतो.
सूकर पूजिलें विलेपनें । म्हैसा मर्दिला चंदनें ।
तैसा विषई ब्रह्मज्ञानें । विवेके बोधिला ॥ ५८ ॥  
५८) एखाद्या डुकराला सुगंधी लेप लावाला किंवा एखाद्या रेड्याला चंदनाचा लेप लावला तरी त्यांना त्याची किंमत नसते. तसेच वासनेंत अडकलेल्या ब्रह्मज्ञानाच्या, आत्मोपदेश केला तरी त्याची त्याला किंमत नसते.  
रासभ उकरडां लोळे । तयासि परिमळसोहळे ।
उलूक अंधारीं पळे । तया केवी हंसपंगती ॥ ५९ ॥
५९) उकिरड्यामधे लोणणार्‍या गाढवाला सुगंधाचा आनंद कळत नाही. किंवा अंधारांत उडणार्‍या घुबडाला सूर्यप्रकाशांत विहार करणार्‍या हंसाच्या मुक्त जीवनाची कल्पना येऊ शकत नाही.
तैसा विषयदारींचा बराडी । घाली अधःपतनीं उडी ।
तयास भगवंत आवडी । सत्संग कैंचा ॥ ६० ॥
६०) त्याचप्रमाणे इंद्रिय वासनेच्या दाराशी बसलेल्या भिकार्‍यास भगवंताची आवड असत नाही. तो इंद्रिय भोगाच्या लालसेने घाणींत उडी घेतो आणि अधोगतीस जातो.
वर्ती करुन दांताळी । स्वानपुत्र हाडें चगळी ।
तैसा विषई तळमळी । विषयसुखाकारणें ॥ ६१ ॥
६१) तोंड वरती करुन कुत्रे ज्याप्रमाणे हडे चघळते व त्यांतच त्याचा आनंद असतो. तसाच इंद्रियाधीन माणसाला इंद्रियभोगामधेंच आनंद, सुख वाटते.  
तया स्वानमुखीं परमान्न । कीं मर्कटास सिंहासन ।
तैसें विषयशक्तां ज्ञान । जिरेल कैचें ॥ ६२ ॥
६२) त्या कुत्र्याच्या तोंडांत उत्तम अन्न घातलें तरी ते त्याला रुचत नाही. किंवा एखाद्या माकडाला सिंहासनावर बसविले तरी त्याची त्याला काय किंमत ? त्याचप्रमाणे इंद्रियासक्त माणसाला आत्मज्ञान पचत नाही. 
रासभें राखतां जन्म गेला । तो पंडितांमध्यें प्रतिष्ठिला ।
न वचे तैसा आशक्ताला । परमार्थ नाहीं ॥ ६३ ॥
६३) गाढवें राखतां ज्या कुंभाराचा जन्म गेला, त्याला विद्वानांच्या सभेंत बसविला तर ते त्याला मानवत नाही. त्याचप्रमाणे इंद्रियभोगांत गुंतलेल्या माणसाला परमार्थ साधत नाही. 
मिळाला राजहंसाचा मेळा । तेथें आला डोंबकावळा ।
लक्षून विष्ठेचा गोळा । हंस म्हणवी ॥ ६४ ॥
६४) राजहंसांच्या समुहामध्यें डोमकावळा शिरला. त्याचे लक्ष विष्ठेच्या गोळ्यावर आणि तो स्वतःला हंस म्हणू लागला. 
तैसे सज्जनाचे संगती । विषई सज्जन म्हणविती ।
विषय आभेद्य चित्तीं । गोळा लक्षिला ॥ ६५ ॥  
६५) त्याचप्रमाणें संताच्या संगतींत राहून इंद्रियसक्त स्वतःला संत म्हणवुन घेतात. परंतु त्यांचे लक्ष इंद्रियभोगरुपी घाणीकडेच लागलेले असते.     
काखे घेऊनियां दारा । म्हणे मज संन्यासी करा ।
तैसा विषई सैरावैरा । ज्ञान बडबडी ॥ ६६ ॥
६६) बायकोला बगलेंत घेऊन " मला संन्यास द्या " असे कोणी म्हणाला तर ते जसे अर्थहीन असते. तसें इंद्रियासक्त माणूस अवाच्या सव्वा बडबडतो.
असो ऐसे पढतमूर्ख । ते काय जाणती अद्वैतसुख ।
नारकी प्राणी नर्क । भोगिती स्वइछा ॥ ६७ ॥
६७) असो अशा पढतमूर्खांना भगवंताशी एकरुप होण्याचे सुख कळणें शक्य नसते. घाणींतील किड्यांना घाणी मध्येंच आनंद वाटतो ते स्चेच्छेने घाणींत रमतात.  
वैषेची करील सेवा । तो कैसा मंत्री म्हणावा । 
तैसा विषयदास मानावा । भक्तराज केवी ॥ ६८ ॥
६८) वेश्येची सेवा करण्यांत गुंतलेला माणूस राजाचा मंत्री होऊ शकत नाही. तसा विषयासक्त उत्तम भगवंतभक्त कसा होऊ शकेल ?   
तैसें विषई बापुडे । त्यांस ज्ञान कोणीकडे । 
वाचाळ शाब्दिक बडबडे । वरपडे जाले ॥ ६९ ॥
६९) त्याचप्रमाणें जे लोक इंद्रियसुखापुढें लाचार होतात त्यांना आत्मज्ञान होणे शक्य नाही. ते नुसता वाचाळपणा करतात. नुसतें शाब्दिक ज्ञान बडबडून मिरवतात.
ऐसे शिष्य परम नष्ट । कनिष्टांमधें कनिष्ट ।
हीन अविवेकी आणी दृष्ट । खळ खोटे दुर्जन ॥ ७० ॥
७०) असे जे शिष्य असतात वाया गेलेले, हलक्यांतील हलके, हीन, अविवेकी, दुष्ट, दुर्जन खळ आणि खोटे असतात.  
ऐसे जे पापरुप । दीर्घदोषी वज्रलेप ।
तयांस प्राश्र्चीत अनुताप । उद्भवतां आहे ॥ ७१ ॥
७१) असे जे पापाने भरलेले शिष्य असतात, त्यांनी फार काळ दोषरुप जीवन जगल्याने त्यांचे मनांत दोष घट्ट बसलेले असतात. त्यांना पश्र्चाताप झाला तर तेच प्रायश्र्चित्त, अनुतापाच्या आगीने त्यांचे दोष जळून जाऊन ते निर्मळ होतात. 
तेंहिं पुन्हा शरण जावें । सद्गुरुस संतोषवावें ।
कृपादृष्टी जालियां व्हावें । पुन्हा शुद्ध ॥ ७२ ॥
७२) त्यांनी सद्गुरुला पुन्हा शरण जावें, त्यांना प्रसन्न करावे व त्यांची कृपा मिळवून शुद्ध व्हावे. 
स्वामीद्रोह जया घडे । तो यावश्र्चंद्र नरकीं पडे ।
तयास उपावचि न घडे । स्वामी तुष्टल्यावांचुनी ॥ ७३ ॥
७३) ज्यांच्याकडून गुरुद्रोह घडतो तो कायमचा नरकांत पडतो. सद्गुरुनां प्रसन्न करण्याशिवाय नरक टाळण्याचा दुसरा उपाय नाही.
स्मशानवैराग्य आलें । म्हणौन लोटांगण घातलें ।
तेणें गुणें उपतिष्ठलें । नाहीं ज्ञान ॥ ७४ ॥
७४) एखद्या शिष्याला स्मशानवैराग्य येते म्हणुन तो गुरुला शरण येऊन त्याच्यापुढें लोटांगण घालतो. पन ते वैराग्य फार वेळ टिकत नाही. त्यामुळे त्याला आत्मज्ञान होत नाही. 
भाव आणिला जायाचा । मंत्र घेतला गुरुचा ।
शिष्य जाला दो दिसांचा । मंत्राकारणें ॥ ७५ ॥
७५) थोडावेळ टिकेल एवढा भाव आणुन सद्गुरुकडून मंत्र घेतला त्या मंत्रपुरते तात्पुरते शिष्यत्व घेतले.  
ऐसे केले गुरु उदंड । शब्द सिकला पाषांड ।
जाला तोंडाळा तर्मुंड । महापाषांडी ॥ ७६ ॥
७६) अशा पद्धतीने पुष्कळ गुरु केले तरी परमार्थाचे ज्ञान होणार नाही. अशा शिष्याला लोकांत मिरवायला शब्दज्ञान पुष्कळ येते. तो अति बडबड्या, शिरजोर आणि दुष्ट तर्कवादी बनतो. 
घडी येक रडे आणी पडे । घडी येक वैराग्य चढे ।
घडी येक अहंभाव जडे । ज्ञातेपणाचा ॥ ७७ ॥
७७) परमार्थाचे सोंग करु तो घटकेंत रडतो. घटकेंत अंगांत वैराग्य शिरलेले असे दाखवतो. आपण मोठे ज्ञानी आहोत असा अहंकार व्यक्त करतो.
घडी येक विश्र्वास धरी । सवें च घडी येक गुर्गुरी ।
ऐसे नाना छंद करी । पिसाट जैसा ॥ ७८ ॥
७८) घटकेंत अत्यंत श्रद्धावान दिसतो. तर लगेच दुसर्‍या घटकेला अविश्र्वासाने उलटून तंटा करतो. अशी अनेक सोंगें वेड्या माणसासारखी तो करतो. 
काम क्रोध मद मत्सर । लोभ मोह नाना विकार ।
अभिमान कापट्य तिरस्कार । हृदईं नांदती ॥ ७९ ॥
७९) काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह, अभिमान, कपटवृत्ति, तिरस्कार असे अनेक दुष्ट विकार त्याच्या हृदयांत भरलेले असतात. 
अहंकार आणी देहपांग । अनाचार आणी विषयसंग ।
संसार प्रपंच उद्वेग । अंतरीं वसे ॥ ८० ॥
८०) अहंकार, देहसुखाची आवड, अनाचार, इंद्रियभोगांची लालसा, संसाराचे प्रेम व प्रपंचाचा कंटाळा या सर्व गोष्टी त्याच्या अंतरंगांत वास करतात.
दीर्घसूत्री कृतघ्न पापी । कुकर्मी कुतर्की विकल्पी ।
अभक्त अभाव सीघ्रकोपी । निष्ठुर परघातक ॥ ८१ ॥
८१) तो काम करण्यांत दिरंगाई करणारा, कृतघ्न, पापी, कुकर्मी, भलतेच तर्क करणारा, संशयी, भक्तिहीन, भावहीन, शीघ्रकोपी, निष्ठुर, दुसर्‍याचा घातकी असतो.    
हृदयेंसुन्य आणी आळसी । अविवेकी आणि अविस्वासी ।
अधीर अविचार संदेहासी । दृढ धर्ता ॥ ८२ ॥
८२) दुसर्‍याच्या सुखदुःखाची पर्वा न करणारा, आळशी, अविवेकी, अविश्र्वासु, अधीर, अविचारी आणि संशय घट्ट बाळगणारा असतो.
आशा ममता तृष्णा कल्पना । कुबुद्धी दुर्वृत्ति दुर्वासना ।
अल्पबुद्धि विषयकामना । हृदईं वसे ॥ ८३ ॥
८३) आशा, ममता, तृष्णा, कल्पना, वाईट बुद्धि, वाईट वृत्ती, वाईट वासना, हलकी बुद्धि, इंद्रियसुखाची वासना या सर्व परमार्थाला घातक गोष्टी त्याच्या मनांत असतात. 
ईषणा असून तिरस्कारें । निंदेसि प्रवर्ते आदरें ।
देहाभिमानें हुंबरे। जाणपणें ॥ ८४ ॥
८४) त्याला फार हाव असते. तो मत्सरी असतो. तिरस्कारी असल्याने दुसर्‍याची निंदा करतो. ज्ञान व देह यांच्या अभिमानाने तो उर्मटपणें वागतो. 
क्षुधा तृष्णा आवरेना । निद्रा सहसा धरेना ।
कुटुंबचिंता वोसरेना । भ्रांति पडिली ॥ ८५ ॥
८५) ज्याला आपली तहान व भूक आवरत नाही. झोंप आलेली आवरत नाही. मुलाबाळांची व बायकोची चिंता कमी होत नाही. तसाच जो भ्रमाने व्यापलेला आहे अशा माणसाला परमार्थ साधत नाही. 
शाब्दिक बोले उदंड वाचा । लेश नाहीं वैराग्याचा ।
अनुताप धारिष्ट साधनाचा । मार्ग न धरी ॥ ८६ ॥
८६) जो भरमसाट शब्दज्ञान बोलतो, पण अंगी वैराग्य नसते, ज्याच्या अंगी अनुताप व धारिष्ट्य नाही व जो साधनेचा मार्ग धरत नाही, त्याला परमार्थ साधत नाही. 
भक्ति विरक्ति ना शांती । सद्वृत्ति लीनता ना दांती ।
कृपा दया ना तृप्ती । सुबुद्धि असेच ना ॥ ८७ ॥
८७) ज्याच्याजवळ भक्ति, विरक्ति, शांती, चांगली वृत्ति, लिनता, इंद्रियदमन, कृपा, दया, आणि तृप्ति यांपैकी कांहींच नाहीं, त्याला भगवंत भेटणे शक्य नाही.
कायाक्लेसीं शेरीरहीन । धर्मविषंई परम कृपण ।
क्रिया पालटेना कठिण । हृदये जयाचें ॥ ८८ ॥
८८) शरीराचे कष्ट करण्यास ज्याची प्रकृती योग्य नाही. धर्माच्याबाबतींत अति कंजुष , ज्याच्या वर्तनामध्ये सुधारणा होत नाही, आणि ज्याचे अंतःकरण अति कठोर आहे. अशा माणसाला परमार्थ साधत नाही.    
आर्जव नाहीं जनासी । जो अप्रिय सज्जनासी ।
जयाचे जिवीअहिर्णेसीं । परन्यून वसे ॥ ८९ ॥
८९) जो लोकांशी सरळ वागत नाही. जोासज्जनांना आवडत नाही. जो रात्रंदिवस दुसर्‍यांचे उणे काढतो,  
सदा सर्वदा लटिका । बोले माईक लापणिका । 
क्रिया विचार पाहतां येका । वचनीं सत्य नाहीं ॥ ९० ॥
९०) जो सदा सर्वकाळ खोटे बोलतो , बोलणें मायिक असते, आचार व विचार यांचा ज्याच्याजवळ मेळ नसतो. त्याला परमार्थ साधत नाही.
परपीडेविषंई तत्पर । जैसे विंचु आणि विखार ।
तैसा कुशब्दें जिव्हार । भेदी सकळांचें ॥ ९१ ॥
९१) विंचू व इतर विषारी प्राणी कोणालही दंश करण्यासाठी नेहमी तयार असतात. त्याचप्रमाणें वाईट बोलून जो सगळ्यांना दुखावत असतो. 
आपले झाकी अवगुण । पुढिलांस बोले कठिण ।
मिथ्या गुणदोषेंविण । गुणदोष लावी ॥ ९२ ॥
९२) स्वतःचे अवगुण लपवितो, पण दुसर्‍यांना त्याच्या दोषाबद्दल कठिण शब्द बोलतो. त्याच्यां अंगी दोष नसले तरी तो ते लादतो. 
स्वयें परमात्मा अंतरीं । पुढिलांची कणव न करी ।
जैसा हिंसक दुराचारी । परदुःखें शिणेना ॥ ९३ ॥
९३) ज्याप्रमाणें एखदा दुराचारी, क्रूर माणूस दुसर्‍याच्या दुःखानें द्रवत नाही, त्याचप्रमाणे जो स्वतः अंतःकरणांत पापमय असतो, परंतु दुसर्‍याच्या हातून पाप घडले तर तो त्यांची कणव करत नाही. अशा माणसाला भगवंत भेटत नाही. 
दुःख पराव्याचें नेणती । दुर्जन गांजिले चि गांजिती ।
श्रम पावतां आनंदती । आपुले मनीं ॥ ९४ ॥
९४) दुष्ट माणसाला दुसर्‍याचे दुःख कळत नाही. त्या माणसाला तो अधिकच दुःख देतो. उलट त्याचे कष्ट पाहून आपल्या मनांत अजून आनंदी होतो. अशा माणसाला भगवंत भेटत नाही. 
स्वदुःखें झुरे अंतरीं । आणी परदुःखें हास्य करी ।
तयास प्राप्त येमपुरी । राजदूत ताडिती ॥ ९५ ॥
९५) ही दुर्जन माणसे स्वतःच्या दुःखाने झुरत असतात. पण दुसर्‍याचे दुःख बघून ते हसतात. त्याला यमपुरींत जावे लागते. तेथील यमदूत त्याला मार देतात.   
असो ऐसे मदांध बापुडे । तयांसि भगवंत कैंचा जोडे ।
जयांस सुबुद्धि नावडे । पूर्वपातकेंकरुनी ॥ ९६ ॥
९६) असो. असे जे लोक बिचारे मदोन्मत्त असतात त्यांना भगवंताची भेट होत नाही. पूर्वीं केलेल्या पापकर्मांमुळे त्यांची बुद्धि भगवंताकडे वळत नाही.
तयांस देहाचा अंतीं । गात्रें क्षीणता पावती ।
जिवलगें वोसंडिती । जाणवेल तेव्हां ॥ ९७ ॥
९७) देहाचा अंतकाळ आला म्हणजे त्यांची गात्रे क्षीण होतात. अगदी जवळचे नातेवाईक लांब जातात. त्यावेळी त्यांना आपल्या वाईट कर्माची जाणीव होते. 
असो ऐसे गुणावेगळे । ते सच्छिष्य आगळे ।
दृढ भावार्थें सोहळे । भोगिती स्वानंदाचे ॥ ९८ ॥
९८) असो. आधी सांगितल्याप्रमाणे असे अवगुण ज्यांच्यांत नाहीत असे सत्शिष्य वेगळेच असतात. त्यांची श्रद्धा बळकट  असते. भाव शुद्ध असतो. त्यामुळें त्यांना आत्मज्ञान होते व ते आत्मानंदाची मजा चाखतात. 
जये स्थळीं विकल्प जागे । कुळाभिमान पाठीं लागे ।
ते प्राणी प्रपंचसंगें । हिंपुटी होती ॥ ९९ ॥
९९) ज्याच्या मनांत संशय जागाअसतो, कुळाचा अभिमान मागेजडलेला असतो, अशी माणसें प्रपंच्याच्या नादाने दुःखी व निराश होतात.
जेणेंकरितां दुःख जालें । तें चि मनीं दृढ धरिलें ।
तेणें गुणें प्राप्त जालें । पुन्हा दुःख ॥ १०० ॥
१००) ज्या प्रपंचाच्या संगतीने दुःख झालें त्या प्रपंचालाच मनानें पुन्हा घट्ट धरुन ठेवले तर तो परत दुःखच देणार. 
संसारसंगें सुख जालें । ऐसें देखिलें ना ऐकिलें ।
ऐसे जाणोन अनहित केलें । ते दुःखी होती स्वयें ॥ १०१ ॥
१०१) संसारांत गुंतून राहील्याने सुख मिळाले असे कधी पाहिले नाही व ऐकलेही नाही. हे माहीतअसूनही प्रपंचांत गुंततात ते स्वतःचेच नुकसान करुन घेऊन दुःखी होतात.
संसारीं सुख मानिती । ते प्राणी मूढमती ।
जाणोन डोळे झांकिती । पढतमूर्ख ॥ १०२ ॥
१०२) संसारामध्यें सुख मानणारी माणसे मूढ व मंदबुद्धिचे असतात. पढतमूर्ख जाणून बुजुन संसारांतील दुःखांकडे डोळे झाक करतात.
प्रपंच सुखें करावा । परी कांहीं परमार्थ वाढवावा ।
परमार्थ अवघाचि बुडवावा । हें विहित नव्हे ॥ १०३ ॥
१०३) प्रपंच करावा परंतु त्याबरोबर थोडा परमार्थही वाढवावा. परमार्थ बुडवावा हे कांहीं योग्य नव्हे.
मागां जालें निरुपण । गुरुशिष्यांची वोळखण ।
आतां उपदेशाचें लक्षण । सांगिजेल ॥ १०४ ॥
१०४) मागील समासांमधे गुरुशिष्याचे निरुपण झाले आता पुढील समासांत उपदेशाचे लक्षण सांगतो. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे  शिष्यलक्षणनाम समास तिसरा ॥
Samas Tisara ShishyaLakshan
समास तिसरा शिष्यलक्षण


Custom Search

No comments: