Tuesday, August 1, 2017

Samas Choutha Brahma Nirupan समास चवथा ब्रह्मनिरुपण


Dashak Sahava Samas Choutha Brahma Nirupan 
Samas Choutha Brahma Nirupan. It is in Marathi. Samartha Ramdas is telling us about the Brahma that which is invisable but it is permanent. What we see is not real and permanent and that is called as Maya.
समास चवथा ब्रह्मनिरुपण 
श्रीराम ॥
कृतयुग सत्रा लक्ष अठाविस सहस्त्र । त्रेतायुग बारा लक्ष शहाणौ सहस्त्र ।
द्वापार आठ लक्ष चौसष्टी सहस्त्र । आतां कलयुग ऐका ॥ १ ॥
१) कृतयुगाची सत्रा लक्ष अठ्ठावीस हजार वर्षें, त्रेतायुगाची बारा लक्ष शहाण्णव हजार वर्षें, द्वापारयुगाची आठ लक्ष चौसष्ट हजार वर्षें, आतां कलियुगाची ऐका. 
कलयुग च्यारि लक्ष बतीस सहस्त्र । च्यतुर्युगें त्रेताळिस लक्ष वीस सहस्त्र ।
ऐसीं च्यतुर्युगें सहस्त्र । तो ब्रह्मयाचा येक दिवस ॥ २ ॥
२) कलियुगाची चार लक्ष बत्तीस हजार वर्षें, चारी युगांची मिळून एकंदर त्रेचाळीस लक्ष बत्तीस हजार वर्षें होतात. अशी चार युगें म्हणजें ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो.     
ऐसे ब्रह्मे सहस्त्र देखा । तेव्हां विष्णुची येक घटिका ।
विष्णू सहस्त्र होतां ऐका । पळ येक ईश्र्वराचें ॥ ३ ॥
३) ब्रह्मदेवाचे असे हजार दिवस झाले म्हणजे विष्णुची एक घटका होते. विष्णुच्या हजार घटका झाल्या म्हणजे महादेवांचे एक पळ होते. 
ईश्र्वर जाये सहस्त्र वेळ । तें शक्तीचें अर्ध पळ ।
ऐसी संख्या बोलिली सकळ । शास्त्रांतरीं ॥ ४ ॥
४) ईश्र्वराची किंवा शंकराची एक हजार पळें झाली म्हणजे आदिशक्तीचें म्हणजेच मूळ मायेचे एक अर्धपळ होते. निरनिराळ्या शास्त्रांतून अशी कालगणना सांगितली आहे.    
चतुर्युगसहस्त्राणि दिनमेकं पितामहम् ।
पितामहसहस्त्राणि विष्णोर्घटिकमेवच ।
विष्णोरेकसहस्त्राणि पलमेकं महेश्र्वरम् ।
महेश्र्वरसहस्त्राणि शक्तोरर्ध पलं भवेत् ॥ 
ऐशा अनंत शक्ती होती । अनंत रचना होति जाती । 
तरी अखंड खंडेना स्थिती । परब्रह्माची ॥ ५ ॥
५) आदिशक्तीसारख्या अनंत शक्ती आहेत. अंनत ब्रह्मांडाच्या रचना होतात आणि जातात. तरी पण परब्रह्म अगदी जसेंच्या तसेंच राहतें. त्याच्यामध्यें यत्किंचितही स्थित्यंतर घडत नाही.   
परब्रह्मासी कैंची स्थिती । परी हे बोलावयाची रीती ।
वेदश्रुति नेति नेति । परब्रह्मीं ॥ ६ ॥
६) वास्तविक परब्रह्माला स्थिती नाही. परंतु ही एक बोलण्याची पद्धत आहे. वेद आणि श्रुति " नेति नेति " म्हणजे हे असें नाही असें नाही म्हणून परब्रह्माच्या बाबतींत हात टेकताता. 
च्यारि सहस्त्र सातसें साठीं । इतुकी कलयुगाची राहाटी ।
उरल्या कलयुगाची गोष्टी । ऐसी असे ॥ ७ ॥
७) कलियुगाची चार हजार सातशें साठ वर्षें आतांपर्यंत झाली. जी वर्षें शिल्लक आहेत त्यांचा प्रकार ऐका.  
च्यारि लक्ष सत्ताविस सहस्त्र । दोनिसें चाळीस संवछर ।
पुढें अन्योविण्य वर्नसंकर । होणार आहे ॥ ८ ॥
८) कलियुगाचीं चार लक्ष सत्तावीस हजार दोनशें चाळीस वर्षें अजून बाकी आहेत. पुढें येणार्‍या कालामध्यें वर्णांचा एकमेकांत संकर होणार आहे.  
ऐसें रचलें सचराचर । येथें येकाहूनि येक थोर ।
पाहातां येथीचा विचार । अंत न लगे ॥ ९ ॥
९) असें हें चराचर विश्र्व रचलेले आहे. त्यामध्यें एकाहून एक मोठा आहे. या क्रमानें विचार केला तर त्याचा अंत लागत नाहीं.   
येक म्हणती विष्णू थोर । येक म्हणती रुद्र थोर ।
येक म्हणती शक्ति थोर । सकळांमधें ॥ १० ॥
१०) कोणी म्हणतो या विश्र्वामध्यें विष्णु मोठा तर कोणी म्हणतो शंकर मोठा आहे. कोणी म्हणतो या सर्वांहून आदिशक्ति मोठी आहे. 
ऐसें आपुलालेपरी बोलती । परंतु अवघेंचि नासेल कल्पांतीं ।
यदृष्टं तं नष्टं हे श्रुती । बोलतसे ॥ ११ ॥
११) लोक आपापल्या परीनें असे बोलतात. पण कल्पांताची वेळ आली म्हणजे या सर्वांचा नाश होणार आहे. जें दिसतें तें नासतें असे श्रुति सांगते.  
आपुलाली उपासना । अभिमान लागला जना ।
याचा निश्र्चयो निवडेना । साधुविण ॥ १२ ॥
१२) जो जी ज्याची उपासना करतो त्याचा त्याला अभिमान लागतो. परंतु खरा देव कोणता हें फक्त साधुच नक्की सांगतात.     
साधु निश्र्चय करिती येक । आत्मा सर्वत्र व्यापक ।
येर हें अवघेंचि माईक । सचराचर ॥ १३ ॥
१३) साधूचा असा दृढ निश्र्चय असतो, की, एक आत्मा तेवढा सर्वत्र व्यापून आहे. तोच खरा देव आहे. बाकीचे सगळें चराचर विश्र्व हा मायेचा खेळ आहे.  
चित्रीं लिहिली सेना । त्यांत कोण थोर कोण साना ।
हें तुम्ही विचाराना । आपुले ठाईं ॥ १४ ॥
१४) एखाद्या चित्रामध्यें सेना काढली. त्यामध्यें मोठा कोण व लहान कोण म्हणावा याचा विचार तुम्हींच आपल्या मनाशी करावा.
स्वप्नीं उदंड देखिलें । लाहानथोरहि कल्पिलें ।
परंतु जागें जालियां जालें । कैसें पाहा ॥ १५ ॥
१५) एखाद्या स्वप्नांत माणसांना लहान व मोठे ठरविले. पण जागे झाल्यावर पाहूं लागले तर सर्वच नाहींसे झालेले आढळते.  
पाहातां जागृतीचा विचार । कैंचे लाहान कैंचें थोर ।
लाहानथोराचा निर्धार । जाणती ज्ञानी ॥ १६ ॥
१६) जागेपणाचा विचार केला तर कोण मोठा व कोण लहान हा स्वप्नामधला विचार होता. असें ध्यानांत येते. 
अवघाचि माईक विचार । कैंचें लाहान कैंचें थोर ।
लाहानथोराचा निर्धार । जाणती ज्ञानी ॥ १७ ॥
१७) त्याचप्रमाणें या दृश्य जगाचा विचार स्वप्नाप्रमाणें मायिक आहे. येथील लहान व मोठेपण खरें नाही. खरा मोठा कोण व लहान कोण हे ज्ञानी पुरुष बरोबर जाणतात.  
जो जन्मासी येऊन गेला । तो मी थोर म्हणतांच मेला ।
परी याचा विचार पाहिला । पाहिजे श्रेष्ठीं ॥ १८ ॥
१८) जन्मास येऊन मरण पावतो, तो देहबुद्धिमुळें देहाचे मोठेपण तेच स्वतःचे मोठेपण समजतो. जे खरे विचारानें श्रेष्ठ आहेत त्यांनीं याचा विचार केला पाहीजे. 
जयांसि जाले आत्मज्ञान । तेचि थोर माहाजन ।
वेद शास्त्रें पुराण । साधु संत बोलिले ॥ १९ ॥
१९) ज्यांना आत्मज्ञान होतें, तेच खरे थोर पुरुष, महाजन असतात. असा निवाडा वेद, शास्त्रें, साधु, संत, पुराणें यांनी दिलेला आहे. 
एवं सकळांमध्यें थोर । तो येकचि परमेश्र्वर ।
तयामधें हरिहर । होति जाती ॥ २० ॥
२०) याप्रमाणें एक परमेश्र्वर तेवढा सर्वांपेक्षा मोठा आहे. त्यामध्यें विष्णु आणि शंकर येतात व जातात.  
तो निर्गुण निराकार । तेथें नाहीं उत्पत्ती विस्तार ।
स्थानमानाचा विचार । ऐलिकडे ॥ २१ ॥
२१) तो परमेश्र्वर निर्गुण व निराकार आहे. तेथें कांही उत्पन्न होत नाही. तसेच उत्पन्न होऊन वाढतही नाही. स्थळ, काळ व आकार यांचा विचार अलीकडचा आहे.   
नावरुप स्थानमान । हा तों आवघाचि अनुमान ।
तथापी होईल निदान । ब्रह्मप्रळईं ॥ २२ ॥
२२) नाम, रुप, स्थल, काल, आकार वगैरे माणसाच्या बुद्धीच्या कल्पना आहेत. ब्रह्मप्रलयाच्या वेळीं यांचा निकाल लागतो. सर्व गोष्टी नाश पावतात.
ब्रह्म प्रळयावेगळें । ब्रह्म नावरुपनिराळें ।
ब्रह्म कोणी येका काळें । जैसें तैसें ॥ २३ ॥
२३) परब्रह्माला प्रलय स्पर्श करुं शकत नाही. तें नामरुपांच्या पलीकडे आहे. ब्रह्म अगदी जसेंच्या तसें राहाते. 
करिती ब्रह्मनिरुपण । जाणती ब्रह्म संपूर्ण ।
तेचि जाणावे ब्राह्मण । ब्रह्मविद ॥ २४ ॥
२४) जे नेहमी ब्रह्मस्वरुपाबद्दल बोलतात व सांगतात, तें ब्रह्म संपूर्ण जाणतात. ते ब्रह्मज्ञ पुरुष ब्राह्मण समजावेत.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ब्रह्मनिरुपणनाम समास चवथा ॥ 
Samas Choutha Brahma  Nirupan 
समास चवथा ब्रह्मनिरुपण 


Custom Search

No comments: