Sunday, August 13, 2017

Samas Dahava Anurvachya समास दहावा अनुर्वाच्य निरुपण


Dashak Sahava Samas Dahava Anurvachya 
Samas Dahava Anurvachya. It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us that Brahma can’t be dscribed. When we think of “ I “ and start thinking who “ I “ is then slowly the process starts where we come to know that “ I am “ is not the body what we were knowing earlier, but it is something beyond that. But this knowledge we acquire can’t be described in words. This is a self-experience. In this state the sadhak becomes one with Brahma.
समास दहावा अनुर्वाच्य निरुपण
श्रीराम ॥
समाधान पुसतां कांहीं । म्हणती बोलिजे ऐसें नाहीं ।
तरी तें कैसें आहे सर्वहि । निरोपावें ॥ १ ॥
१) समाधान कसें असतें, हें शब्दानें सांगता येण्यासारखें नाही. तरी समाधान आहे तरी कसे तें सगळे मला सांगावें.
मुक्यानें गुळ खादला । गोडी न ये सांगाव्याला ।
याचा अभिप्राव मजला । निरोपण कीजे ॥ २ ॥ 
२) एखाद्या मुक्यानें गुळ खाल्ला तर त्याची गोडी त्याला सांगता येणार नाही. तसेंच समाधानाचें आहे. तर त्या म्हणण्याचा खरा अर्थ मला समजावून सांगा. 
अनुभवहि पुसों जातां । म्हणती न ये किं सांगतां ।
कोणापासीं पुसों आतां । समाधान ॥ ३ ॥ 
३) एखाद्याला तुझा अनुभव काय आहे असे विचारले तर तो सांगतो की, समाधान हें शब्दानें सांगता येण्यासारखें नाही. मग आतां मी समाधान कसें असतें हे कोणाला विचारु?  
जे ते अगम्य सांगती । न ये माझिये प्रचिती  ।
विचार बैसे माझे चित्तीं । ऐसें करावें ॥ ४ ॥
४) जो तो सांगतो की, समाधान जाणण्यास अशक्य आहे. पण मला हे पटत नाही. म्हणून स्वामी, माझ्या मनांत बसेल अशारीतीनें समाधानाचे स्वरुप मला सांगा.
ऐसें श्रोत्याचें उत्तर । याचें कैसें प्रत्योत्तर ।
निरोपिजेल तत्पर । होऊन ऐका ॥ ५ ॥
५) श्रोत्याचा प्रश्र्ण हा असा आहे. त्याचे उत्तर आतां मी सांगतो तें मनापासून ऐका.
जें समाधानाचें स्थळ । किं तो अनुभवचि केवळ ।
तें स्वरुप प्रांजळ । बोलोन दाऊं ॥ ६ ॥
६) केवळ अनुभव शुद्ध जाणीव हीच समाधानाची जागा आहे. त्या शुद्ध अनुभवाचे स्वरुप स्पष्ट करुन सांगतो. 
जें बोलास आकळेना । बोलिल्याविणहि कळेना ।
जयासी कल्पितां कल्पना । हिंपुटी होये ॥ ७ ॥
७) समाधान शब्दाने सांगावें म्हटलें तर शब्दबद्ध करता येत नाही. पण सांगितल्याशिवाय समजतही नाही. त्याची कल्पना करावी असे ठरविलें तरी कल्पनाशक्ती कमी पडते.
तें जाणावें परब्रह्म । जें वेदांचें गुह्य परम ।
धरिता संतसमागम । सर्वहि कळे ॥ ८ ॥
८) तें समाधान परब्रह्मरुप आहे. तें वेदांचे परम रहस्य आहे. संतांच्या संगतींत राहीलें म्हणजे तें सर्व कांही समजते.  
तेंचि आतां सांगिजेल । जें समाधान सखोल ।
ऐक अनुभवाचे बोल । अनुर्वाच्य वस्तु ॥ ९ ॥
९) अत्यंत सूक्ष्म असलेलें असें जे समाधान तेच आतां वर्णन करुन सांगतो. माझ्या अनुभवाचे शब्द तूं ऐक. ऐरव्ही समाधान शब्दांनी सांगण्यासारखीं वस्तु नाही. 
सांगतां न ये तें सांगणें । गोडी कळाया गूळ देणें ।
ऐसें हें सद्गुरुविणें । होणार नाहीं ॥ १० ॥
१०) एखाद्या गोडी कशी असते. हे कळण्यासाठीं गुळ द्यावा. त्याचप्रमाणें  सद्गुरुंनी दिल्यावाचून समाधान काय असतें हे बरोबर कळणार नाही.  
सद्गुरुकृपा कळे त्यासीं । जो शोधील आपणासी ।
पुढें कळे अनुभवासी । आपेंआप वस्तु ॥ ११ ॥
११) जो स्वतःचा शोध घेतो त्या सद्गुरुकृपा समजते. पुढें मग आत्मवस्तु स्वानुभवानें आपोआप कळूं लागते.
दृढ करुनियां बुद्धी । आधी घ्यावी आपशुद्धी ।
तेणें लागे समाधी । अकस्मात ॥ १२ ॥
१२) बुद्धीचा पक्का निश्र्चय करावा. मग प्रथम मी कोण याचा शोध घ्यावा. तो शोध घेता घेता अकस्मात समाधी लागते.  
आपलें मूळ बरें शोधितां । आपली तो माईक वार्ता ।
पुढें वस्तुच तत्वता । समाधान ॥ १३ ॥
१३) आपलें मूळ स्वरुप नीट प्रकारें शोधू लागलें तर देहबुद्धींतील मी मायानिर्मित आहे असे समजते. देहबुद्धीचा अशाश्वत मी बाजूस ठेवला की, शुद्ध आत्मवस्तु शिल्लक राहाते व तेच समाधानाचे ठिकाण होय. 
आत्मा आहे सर्वसाक्षी । हें बोलिजे पूर्वपक्षीं ।
जो कोणी सिद्धांत लक्षी । तोचि सिद्ध ॥ १४ ॥
१४) मी ब्रह्म आहे. मी सर्व साक्षी आत्मा आहे. ही अवस्था अखेरची स्थिती नव्हे. जो कोणी या अवस्थेच्या पलीकडे जातो. तो खरा सिद्ध होय. 
 सिद्धांतवस्तु लक्षूं जातां । सर्वसाक्षी तो अवस्ता ।
आत्मा तीहून पर्ता । अवस्तातीत ॥ १५ ॥
१५) शेवटच्या अनुभवाच्या दृष्टीनें पाहिलें तर " मी सर्व साक्षी आहे " ही अवस्था आहे. या अवस्थेच्या पलीकडे असणारे आत्मस्वरुप सर्वसाक्षीपणाच्या पलीकडे राहाते. 
पदार्थज्ञान जेव्हां सरे । द्रष्टा द्रष्टेपणें नुरे ।
ते समंई उतरे । फुंज मीपणाचा ॥ १६ ॥
१६) ज्ञेयरुप पदार्थाचें ज्ञान जेव्हां निःशेष संपते. द्रष्ट्याचा द्रष्टेपणा संपूर्ण नाहींसा होतो, त्यावेळी मीपणाचा भ्रम संपूर्णपणें विरुन जातो.   
जेथें मुरालें मीपण । तेंचि अनुभवाची खूण ।
अनुर्वाच्य समाधान । या कारणें बोलिजे ॥ १७ ॥ 
१७) मीपणा संपूर्णपणें विरणें हीच परमात्मवस्तुच्या अनुभवाची खूण आहे. म्हणून समाधान शब्दांनी सांगता येण्यासारखें नाही, असे म्हणतात. 
अत्यंत विचाराचे बोल । तरी ते माईक फोल ।
शब्द सबाह्य सखोल । अर्थचि अवघा ॥ १८ ॥
१८)  अतिशय विचारांनी भरलेले शब्द जरी बोलले तरी ते दृश्य विश्र्वांतील मायेच्या क्षेत्रांतील असतात. मात्र त्यांचा जो अर्थ असतो तो सूक्ष्म असतो. त्या शब्दांना आत-बाहेर व्यापून असतो. 
शब्दाकरितां कळे अर्थ । अर्थ पाहातां शब्द वेर्थ ।
शब्द सांगे ते येथार्थ । परी आपण मिथ्या ॥ १९ ॥
१९) शब्दामुळें अर्थ कळतो. अर्थ ध्यानांत आल्यावर शब्दाची गरज संपते. अर्थ सत्य व शाश्वत असतो. पण शब्द मात्र असत्य व अशाश्वत असतो.  
शब्दाकरितां वस्तु भासे । वस्तु पाहातां शब्द नासे ।
शब्द फोल अर्थ असे । घनवटपणें ॥ २० ॥
२०) शब्दामुळें परमात्मवस्तुच्या अस्तित्वाचे ज्ञान होते. परंतु त्या वस्तुचें साक्षात् दर्शन झाल्यावर शब्द नाश पावतो. शब्द असार कवच असून त्याचा अर्थ भरीव सार असतो.
भुंसाकरितां धान्य निपजे । धान्ये घेऊन भूंस टाकिजे ।
तैसें शब्द भूंस जाणिजे । अर्थ धान्य ॥ २१ ॥
२१) भुसामध्येंच धान्य निपजते. आपण धान्य घेऊन भुसा टाकून देतो. तसेच शब्द म्हणजे भुसा व अर्थ म्हणजे धान्य समजावे.  
पोचटामधें घनवट । घनवटीं उडे पोचट । 
तैसा शब्द हा फलगट । परब्रह्मीं ॥ २२ ॥
२२) पोकळ कवचामध्यें भरीव सार सांपडते. सार घेतल्यावर असार कवच उडून जाते. त्याचप्रमाणें परब्रह्मरुपी अर्थ घेतल्यावर फोलपट शब्द गळून पडतात. म्हणून आत्मसाक्षात्कारापाशीं शब्द जाऊं शकत नाहीत. त्याचे वर्णन होऊं शकत नाही. 
शब्द बोलोनि राहे । अर्थ शब्दापूर्वींच आहे ।      
या कारणें न साहे । उपमा तया अर्थासी ॥ २३ ॥
२३) उच्चार करण्याच्या आधीं अर्थ असतो. उच्चार होत असतांनाही अर्थ असतो व उच्चार होऊन शब्द नाहींसा झाला तरीही अर्थ असतो. त्यामुळें खरतर भुसा व धान्याची उपमा अर्थाला लागू पडत नाही.  
भूंस सांडून कण घ्यावा । तैसा वाच्यांश त्यजावा ।
कण लक्ष्यांश लक्षावा । शुद्ध स्वानुभवें ॥ २४ ॥
२४) भूस टाकून त्यांतील धान्याचा कण घेतात तसेच शब्दाचा वाच्यांश टाकावा व त्यांतील अर्थ तेवढा घ्यावा. शुद्ध आत्मसाक्षात्कारानें तो संपूर्णपणें ग्रहण होतो.  
दृश्यावेगळें बोलिजे । त्यासी वाच्यांश म्हणिजे ।
त्याचा अर्थ तो जाणिजे । शुद्ध लक्ष्यांश ॥ २५ ॥
२५) " आत्मवस्तु दृश्याहून वेगळी आहे. " हा वाच्यांश होय. त्या अर्थ जो लक्ष्यांश तो समजून घ्यावा व त्याचे स्वानुभवामध्यें रुपांतर करावे. 
ऐसा जो शुद्ध लक्ष्यांश । तोचि जाणावा पूर्वपक्ष ।
स्वानुभव तो अलक्ष । लक्षिला नवचे ॥ २६ ॥
२६) शब्द ऐकल्यावर अर्थमय शुद्ध बोध किंवा लक्ष्यांश मनांत निर्माण होतो. पण तोही आत्मवस्तुच्या अलीकडेच थांबतो. आपले मन स्वस्वरुपाच्या अनुभवापर्यंत जाऊं शकत नाही. यामुळें सर्व अर्थ घ्यानांत येऊनही आत्मवस्तुचा अनुभव येत नाही.  
जेथें गाळून सांडिलें नभा । जो अनुभवाचा गाभा ।
ऐसा तोहि उभा । कल्पित गेला ॥ २७ ॥
२७) आत्मस्वरुप फार सूक्ष्म आहे. आपल्या अनुभवामध्यें आकाश अति सूक्ष्म आहे. तें गाळून घेतले तर त्याला आत्मस्वरुपाच्या सूक्ष्मपणाची सर येईल. असे तें स्वरुप सर्व अनुभवाचा गाभा आहे. त्याच्या सत्तेनें सर्व अनुभव येतात. पण हें सगळें स्वरुप वर्णन म्हणजे माणसानें आपली कल्पना ताणून उभारलेला डोलाराच आहे.  
मिथ्या कल्पनेपासूनि जाला । खरेंपण कैंचें असेल त्याला ।  
म्हणौनि तेथें अनुभवाला । ठावचि नाहीं ॥ २८ ॥
२८) मुळांत कल्पना खरी नसते. म्हणून कल्पनेमुळें जे तयार होते, तेही खरे नसते. त्यामुळें आत्मस्वरुपाच्या ठिकाणी ज्याला अनुभव म्हणतात त्याला स्थान नाही.  
दुजेविण अनुभव । हें बोलणेंचि तों वाव ।
याकारणें नाहीं ठाव । अनुभवासी ॥ २९ ॥
२९) अनुभव येण्यास अनुभव घेणारा व ज्याचा अनुभव घ्यावयाचा  तें असें दोन घटक आवश्यक असतात. पण आत्मस्वरुपामध्यें अनुभव घेणाराच उरत नाही. तेथें दोन घटकच नसतात. त्यामुळें " मी स्वरुपाचा अनुभव घेतो " या अवस्थेला स्वस्वरुपसाक्षात्कारांत जागाच नाही. 
अनुभवें त्रिपुटी उपजे । अद्वैतीं द्वैतचि लाजे ।
म्हणौनि बोलणें साजे । अनुर्वाच्य ॥ ३० ॥
३०) " मी अनुभव घेतला " असें म्हटलें कीं, अनुभव घेणारा मी; ज्याचा अनुभव घेतला ती वस्तु, आणि या दोहोंचा संबंध आल्यावर आलेला अनुभव अशी तीन अंगें उत्पन्न होतात. त्यांना त्रिपुटी म्हणतात. स्वस्वरुपाच्या ठिकाणीं केवळ अद्वैतच असल्यानें भाषा पोहोचूं शकत नाही. म्हणून स्वस्वरुप अनुर्वाच्य आहे. शब्दानें तें सांगता येत नाही. हे त्याबद्दल योग्य आहे.  
दिवसरजनीचें परमित्य । करावया मूळ आदित्य ।
तो आदित्य गेलियां उर्वरित । त्यासी काये म्हणावें ॥ ३१ ॥
३१) सूर्यामुळें आपण दिवस व रात्र वेगळें समजू शकतो. पण सूर्यच नाहींसा झाला तर दिवस व रात्र हा भेद राहणारच नाही.   
शब्दमौन्याचा विचार । व्हावया मूळ वोंकार ।
तो वोंकार गेलियाउच्चार । कैसा करावा ॥ ३२ ॥
३२) सर्व शब्दांचे मूळ ओंकार आहे. शब्द बोलणें किंवा मौन धरणें म्हणजे शब्द न बोलणें हे ओंकाराच्या अस्तित्वावर आहे. तो ओंकारच नाहींसा झाला तर शब्द बोलणें व शब्द न बोलणें दोन्ही नाहीसे होतात.
अनुभव आणी अनुभविता । सकळ ये मायेचि करितां ।
ते माया मुळीं नस्तां । त्यासी काये म्हणावें ॥ ३३ ॥
३३) अनुभव व अनुभव घेणारा दोन्ही मायेमुळें निर्माण होतात. पण जर मायाच नसेल तर अनुभवाला जागाच नाही राहाणार. 
वस्तु येक आपण येक । ऐसी अस्ती वेगळिक ।
तरि अनुभवाचा विवेक । बोलों येता सुखें ॥ ३४ ॥ 
३४) आत्मवस्तु निराळी व अनुभव घेणारा मी निराळा असें वेगेळेपण असते तर मी आत्मवस्तुचा अनुभव घेतला असे सुखानें बोलता आले असते.     
वेगळेपणाची माता । ते लटिके वंधेची सुता ।
म्हणोनियां अभिन्नता । मुळींच आहे ॥ ३५ ॥
३५) वेगळेपणाची या भावनेची आई माया आहे. मायेमुळे हीचा जन्म झाला. पण वांझ बाईची मुलगी जशी खोटी तशी ही माया खोटी आहे. म्हणून वेगळेपण खोटे आहे. जीव मुलांतच परमात्म्याशी अभिन्न आहे.  
अजन्मा होता निजेला । तेणें स्वप्नीं स्वप्न देखिला ।
सद्गुरुस शरण गेला । संसारदुःखें ॥ ३६ ॥
३६) ज्याला जन्म मरण नाही असा अजन्मा निजलेला होता. त्यानें झोपेंत स्वप्न बघितले. त्यांत तो संसारदुःखाने सद्गुरुस शरण गेला आहे असें बघितलें.  
सद्गुरुकृपेस्तव । जाला संसार वाव ।
ज्ञान जालियां ठाव । पुसे अज्ञानाचा ॥ ३७ ॥
३७) मग सद्गुरुची आपल्यावर कृपा झाली. त्यामुळें संसार खोटा झाला. मग मी आत्माच आहे असें ज्ञान झालें. त्यामुळें मी देह आहे हें अज्ञान नाहींसे झाले. 
आहे तितुकें नाहीं जालें । नाहीं नाहींपणें निमालें ।
आहे नाहीं जाऊन उरलें । नसोन कांहीं ॥ ३८ ॥
३८) जें आहे असें वाटत होते ते नाहींसे झाले. जें नाहीं असें माहीत होते तें कधी नव्हते म्हणून नाहीं असें झाले. अशा रीतीनें आहे व नाहीं हीं दोन्ही नाहींशी झाली.   
सुन्यत्वातीत शुद्धज्ञान । तेणें जालें समाधान ।
ऐक्यरुपें अभिन्न । सहजस्थिती ॥ ३९ ॥
३९) आहे व नाहीं यांत गोवलेले सर्व दृश्य विश्व लय पावलें.  त्या ज्ञानानें समाधान झालें. आपण व आत्मा एकरुप आहोत या अभिन्नपणाच्या ज्ञानानें सहजस्थिती प्राप्त होते. 
अद्वैतनिरुपण होतां । निमाली द्वैताची वार्ता ।
ज्ञानचर्चा बोलो जातां ॥ जागृती आली ॥ ४० ॥
४०) अशा रीतीनें अद्वैताचे विवेचन ऐकले म्हणजे द्वैतानें भरलेले दृश्य खरें नाहीं हे पटते. आत्मज्ञानचे वर्णन ऐकले म्हणजे आपण अज्ञानांत वावरत आहोत ही स्पष्ट जाणीव होते. हीच जागृती होय. 
श्रोता व्हावें सावधान । अर्थीं घालावें मन ।
खुणे पावता समाधान । अंतरीं कळे ॥ ४१ ॥
४१) आतां श्रोत्यांनी सहजस्थितीचे ऐकलेल्या वर्णनाने मन भरुन टाकावे.  असें झालें म्हणजे आत्मज्ञानानें मिळणारें समाधान कसें असतें याची खूण अंतर्यामी बरोबर कळेल.  
तेणें जितुकें ज्ञान कथिलें । तुतिकें स्वप्नावारीं गेलें ।
अनुर्वाच्य सुख उरलें । शब्दातीत ॥ ४२ ॥
४२) अद्वैताच्या विवेचनामध्यें जेवढें ज्ञान सांगितलें तें शब्दरुप असल्यानें मायेच्या क्षेत्रांतील असते. देहबुद्धीला तें खरे वाटलें तरी स्वरुपानुभवाच्या दृष्टीने तें स्वप्नांतील ज्ञानाप्रमाणेंच आहे. आत्मसाक्षात्कार झाला कीं, तें नाहीसें होते. मग शब्दांच्या पलीकडे असणारे अनिर्वाच्य स्वानंदसुख तेवढें उरते.   
तेथें शब्देंविण ऐक्यता । अनुभव ना अनुभविता ।
ऐसा निवांत तो मागुता । जागृती आला ॥ ४३ ॥
४३) आत्मज्ञानामध्यें संपूर्ण एकरुपता  असते. अनुभव व अनुभव घेणारा हेदोन तेथें असत नाहीत. ज्ञानच्या या जागृतीमध्यें साधक अत्यंत शांत व स्तब्ध असतो.  
तेणें स्वप्नीं स्वप्न देखिला । जागा होऊनि जागृती आला ।
तेथें शब्द कुंठित जाला । अंत नलगे ॥ ४४ ॥
४४) जीवानें स्वप्नांत स्वप्न पाहिलें. गुरुच्या उपदेशानें खरें जागेपण आले. आतां शब्दांची शक्ती लटकी पडली. तें अनिर्वाच्य समाधान शब्दांनी सांगणें शक्य नाही. 
या निरुपणाचें मूळ । केलेंचि करुं प्रांजळ ।
तेणें अंतरी निवळ । समाधान कळे ॥ ४५ ॥
४५) आतां जे विवेचन केलें त्यांतील मुख्य मुद्दे पुन्हा सांगतो. त्यामुळें शुद्ध समाधान कसें असतें तें अंतर्यामी कळून येईल.  
तव शिष्यें विनविलें । जी हें आतां निरोपिलें ।
तें पाहिजे बोलिलें । मागुतें स्वामी ॥ ४६ ॥
४६) तेव्हां शिष्यानें विनविलें कीं, स्वामी आतांपर्यंत जें आपण सांगितलें तें मला पुन्हां सांगावें. 
मज कराया कारण ।केलेंचि करावें निरुपण ।
येथील जे कां निजखूण । ते मज अनुभवावी ॥ ४७ ॥
४७) हा विषय मला नीट कळावा म्हणून सांगितलेलें पुनः सांगावें. त्यांतील आत्मज्ञानाचें जें रहस्य आहें तें माझ्या अनुभवास येईल असें सांगावें. 
अजन्मा तो सांग कवण । तेणें देखिला कैसा स्वप्न ।
तेथें कैसें निरुपण । बोलिलें आहे ॥ ४८ ॥  
४८) ज्याला जन्म मरण या कालाधीन घटना नाहीत. तो अजन्मा कोण? त्याला स्वप्न कसें पडलें? याप्रश्र्णांची उत्तरें कोणती? हें विवेचन पुनः करावे. 
जाणोनी शिष्याचा आदर । स्वामी देती प्रत्योत्तर ।
तेंचि आतां अति तत्पर । श्रोतीं येथें परिसावें ॥ ४९ ॥
४९) शिष्याची जिज्ञासा पाहून स्वामींनी परत प्रश्र्णांची उत्तरें दिली. ती श्रोत्यांनी मनःपूर्वक ऐकावीत. 
ऐक शिष्या सावधान । अजन्मा तो तूंच जाण ।
तुवां देखिला स्वप्नीं स्वप्न । तोहि आतां सांगतों ॥ ५० ॥ 
५०) शिष्या, अगदी लक्ष देऊन ऐक. जो अजन्मा म्हणून सांगितला तो खरा तूंच आहेस हें ध्यानांत ठेव. तूं जें स्वप्नांत स्वप्न पाहिलेंस तें देखिल आतां सांगतो.  
स्वप्नीं स्वप्नाचा विचार । तो तूं जाण हा संसार ।
येथें तुवा सारासार । विचार केला ॥ ५१ ॥
५१) स्वप्नामध्यें स्वप्न पाहिलें याचा अर्थ हा संसार होय. " मी आत्मा आहे " हा जागेपणा जाऊन " मी देह आहे " हे स्वप्न होय. माझा संसार आहे हें स्वप्नांतील स्वप्न होय. संसार स्वप्नमय पण त्यांत सार काय असार काय याचा तूं विचार केलास.  
रिघोनि सद्गुरुस शरण । काढून शुद्ध निरुपण ।
याची करिसी ऊणखूण । प्रत्यक्ष आतां ॥ ५२ ॥
५२) नंतर तूं सद्गुरुला शरण गेलास. त्याच्या जवळून शुद्ध आत्मस्वरुपाचे विवेचन ऐकलेस. ही खरी खूण तुला पटली. हा प्रत्यक्ष अनुभव आतां तुला आला. 
याचाचि घेतां अनुभव । बोलणें तितुकें होतें वाव ।
निवांत विश्रांतीचा ठाव । ते तूं जाण जागृती ॥ ५३ ॥
५३) यानंतर आत्मस्वरुपाचा अनुभव घेतलास कीं स्वस्वरुपाबद्दलचे शब्दज्ञान आपोाप नाहींसे होईल. अत्यंत निवांत असें विश्रांतीचे स्थान तुला सापडेल. हेंच खरें जागेपण असें समजावें.
ज्ञानगोष्टीचा गल्बला । सरोन अर्थ प्रगटला ।
याचा विचार घेतां आला । अंतरीं अनुभव ॥ ५४ ॥
५४) प्रथम ज्ञान विवेचनाची गडबड थांबेल. ती थांबल्यावर त्याचा अर्थ प्रगट होईल. त्यावर विचार केला कीं लय लागतो.  व अंतरीं अनुभव येतो. 
तुज वाटे हे जागृती । मज जाली अनुभवप्राप्ती ।
या नांव केवळ भ्रांती । फिटली च नाहीं ॥ ५५ ॥ 
५५) तुला वाटेल कीं, जागृति म्हणतात ती हीच. आपल्याला अनुभव प्राप्ती झाली. पण हा केवळ भ्रम असतो. तो गेलेला नसतो.    
अनुभव अनुभवीं विराला । अनुभवेंविण अनुभव आला ।
हाहि स्वप्नीचा चेईला । नाहींस बापा ॥ ५६ ॥
५६) " मी अनुभव घेतो " ही वृत्ती जाऊन केवळ अनुभवरुपता तेवढी उरली. तरी बाबा, अजून तूं स्वप्नांतून जागा झाला नाहीस. 
जागा जालियां स्वप्नउर्मी । स्वप्नीं म्हणसी अजनमा तो मी ।  
जागेपणें स्वप्नउर्मीं । गेलीच नाहीं ॥ ५७ ॥
५७) तूं जागा झालास तरी अजून तुझें स्वप्न नाहींसे झालेले नाही. मीच तो अजन्मा आहे असें तूं स्वप्नांत म्हणतोस. म्हणजेच जागेपणीं स्वप्नाची वृत्ती शिल्लक आहे. 
स्वप्नीं वाटे जागेपण । तैसी अनुभवाची खूण ।
आली परी तें सत्य स्वप्न । भ्रमरुप ॥ ५८ ॥
५८) स्वप्नांत " मी जागा झालों " असें वाटते, त्याचप्रमाणें " मीच तो अजन्मा आहे " या अनुभवाचें लक्षण आहे. तो अनुभव खरा असतो पण अजून भ्रम शिल्लक असतोच.  
जागृती या पैलिकडे । तें सांगणें केवि घडे ।
जेथे धाणाची मोडे । विवेकाची ॥ ५९ ॥
५९) संपूर्ण जागेपणा या अनुभवाच्या पलीकडे असतो. शब्दांनीं तो सांगता येणें शक्य नाही. ती सहजस्थिती आहे. तेथे विवेकाचा पाया उखडला जातो. 
म्हणोनि तें समाधान । बोलतांचि न ये ऐसें जाण ।
निशब्दाची ऐसी खूण । वोळखावी ॥ ६० ॥ 
६०) म्हणून तें समाधान वर्णन करुन सांगता येत नाहीं असें असतें. अनिर्वाच्य म्हणतात त्याचा हा असा अर्थ आहे.  हें लक्षांत ठेवावे.  
ऐसें आहे समाधान । बोलतांच न ये जाण ।
इतुकेन बाणली खूण । निशब्दाची ॥ ६१ ॥
६१) समाधान हें असें आहे.  सांगून सांगता येण्यासारखें तें नाही. समाधान अनिर्वाच्य आहे याचा अर्थ ध्यानांत येईल.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अनुर्वाच्यनिरुपणनाम समास दहावा ॥
Samas Dahava  Anurvachya
समास दहावा अनुर्वाच्य निरुपण



Custom Search

No comments: