Monday, September 18, 2017

Samas Dahava Dehanta Nirupan समास दहावा देहान्तनिरुपण


Dashak Satava Samas Dahava Dehanta Nirupan 
Samas Dahava Dehanta Nirupan, It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us how we can make use of our body to attain Moksha. Now we know that we are not body. There is something more important in our body when it leaves the body we are called as dead.
समास दहावा देहान्तनिरुपण
श्रीराम ॥
मिथ्या तेंचि जालें सत्य । सत्य तेचि जालें असत्य ।
मायाविभ्रमाचें कृत्य । ऐसें असे पाहातां ॥ १ ॥
१) जें दृश्य खरें नाहीं तें आपल्याला खरें वाटते. जें अदृश्य आत्मरुप खरे आहे तें आपल्याला खोटे वाटते. खरे पाहिलें तर हा सर्व मायेपासून निर्माण झालेला भ्रम आहे. 
सत्य कळाया कारणें । बोलिलीं नाना निरुपणें ।
तरी उठेना धरणें । असत्याचें ॥ २ ॥
२) सत्य काय आहे हें कळण्यासाथीं पुष्कळ निरुपणें, विवेचनें केली तरीपण मनावर असलेली असत्याची पकड कांहीं ढिली होत नाही. 
असत्य अंतरीं बिंबलें । न सांगतां तें दृढ जालें ।
सत्य असोन हारपलें । जेथील तेथें ॥ ३ ॥
३) असत्य सत्यरुपानें मनांत बसलें कीं मग तें कोणीही न सांगतां मनामध्यें दृढ होते. आणि अंतरीं सत्य असूमही तें तेथल्या तेथें नाहींसे होते. 
वेदशास्त्रेंं पुराणें सांगती । सत्याचा निश्र्चय करिती ।
तरी न ये आत्मप्रचिती । सत्यस्वरुप ॥ ४ ॥
४) वेद, शास्त्रें, पुराणें नाना प्रकारें विवेचन करुन सत्याचे स्वरुप निश्र्चितपणें सांगतात. तरी त्या सत्यस्वरुपाची आपल्याला प्रचीति येत नाही. 
सत्य असोन आछ्यादलें । मिथ्या नसोन सत्य जालें ।
ऐसें विपरीत वर्तलें । देखत देखतां ॥ ५ ॥
५) सत्य प्रत्यक्ष असून झाकलें गेलें. आंणि सत्य नाहीं तें मात्र सत्यपणास पावले. अशा प्रकारें हा विपरीत प्रकार पाहतां पाहतां घडून गेला.   
ऐसी मायेची करणी । कळों आली तत्क्षणीं ।   
संतसंगें  निरुपणीं । विचार घेतां ॥ ६ ॥
६) अशी ही मायेची करणी आहे. संतांच्या संगतींत राहून श्रवण केले व मनन केले तर मायेचा परिणाम लगेच लक्षांत येतो.  
मागां जालें निरुपण । देखिलें आपणासि आपण ।
तेणें बाणली खूण । परमार्थाची ॥ ७ ॥
७) आतांपर्यंत या ग्रंथांमध्यें आत्मज्ञानाचें निरुपण केलें. त्यामुळें साधकाला स्वस्वरुपाचे ज्ञान झाले असलेच पाहीजे. त्यामुळें परमार्थाची खूण त्याच्या अंगी बाणणारच. 
तेणें समाधान जालें । चित्त चैतंनीं मिळालें ।
निजस्वरुपें वोळखिलें । निजवस्तुसी ॥ ८ ॥
८) स्वरुपज्ञानानें मनाचें संपूर्ण समाधान होते. चित्त चैतन्याशी समरस होऊन जातें. आणि खरा मी कोण आहे हे कळल्यानें ब्रह्मस्वरुप ओळखता येते. 
प्रारब्धीं टाकिला देहो । बोधें फिटला संदेहो ।
आतांचि पडो अथवा राहो । मिथ्या कळीवर ॥ ९ ॥
९) ज्ञानी पुरुष आपला देह प्रारब्धावर सोडतो. आत्मज्ञानानें त्याचे सर्व संशय नाहींसे होतात. देहाचे खोटेपण समजल्यानें ज्ञानी पुरुष त्याच्याबद्दल अनासक्त असतो. मग देह आज पडला काय किंवा बरेच दिवस टिकला काय या दोन्हीबद्दल त्यास सुखदुःख उरत नाही. 
ज्ञानियांचें जें शेरीर । तें मिथ्यत्वें निर्विकार ।
जेथें पडे तेचि सार । पुण्य भूमी ॥ १० ॥
१०) ज्ञानी पुरुषाला शरीर असत्यपणाने जाणवते. त्यामुळें शरीराचे विकारीदी दोष त्याला बाधत नाहीत. प्रारब्धानें त्याचे शरीर जेथें पडतें तीच मोठी पुण्यभूमी बनून जाते. 
साधुदर्शनें पावन तीर्थ । पुरती त्यांचे मनोरथ ।
साधु न येतां जिणें वेर्थ । तयां पुण्यक्षेत्रांचें ॥ ११ ॥
११) साधुसंत येऊन राहील्यानें तीर्थक्षेत्रांना पवित्रपणा येतो. त्यांचे महत्व वाढते. साधुसंत त्या तीर्थक्षेत्रांत राहीले नाहीत तर त्या पुण्यक्षेत्रांना महत्व राहणार नाही. 
पुण्यनदीचें जें तीर । तेथें पडावें शरीर ।
हा इतर जनाचा विचार । साधु नित्य मुक्त ॥ १२ ॥
१२) एखाद्या पवित्र नदीच्या कांठी मरण यावें म्हणजे आपल्याला मुक्ति मिळेल हा आपण सामान्य लोक विचार करतो. साधु नेहमी मुक्तच असतो. 
उत्तरायेण तें उत्तम । दक्षणायेन तें अधम ।
हा संदेहीं वसे भ्रम । साधु तो निःसंदेह ॥ १३ ॥
१३) देहाला मृत्यु यावा उत्तरायणांत तर तें उत्तम पण दक्षिणायनांतील मृत्यु अधम होय हा देहाचा भ्रम समजावा. अंतर्यामी आत्मबुद्धि स्थिर झाल्यानें साधु निःसंदेहपणें कालसत्तेच्या पलीकडे वावरतो. देहबुद्धी नसल्यानें जिवंतपणींच साधु ब्रह्मरुप झालेला असतो. त्याला अंतःकाळचे भय नसते. त्याला कालाचे बंधन नसते. तो ज्या क्षणीं देह ठेवतो तोच पुण्यकाल होतो.  
शुक्लपक्ष उत्तरायेण । गृहीं दीप दिवा मरण ।
अंतीं राहावें स्मरण । गतीकारणें ॥ १४ ॥
१४) शास्त्राप्रमाणें उत्तरायणांत शुक्लपक्षांत घरामध्यें दिवा जळत असतां दिवसा मरण यावें, त्यांत अंतःकाळीं भगवंताचे स्मरण राहावें म्हणजे जीवाला उत्तम गति मिळते.  
इतुकें नलगे योगियांसी । तो जीव चि मुक्त पुण्यरासी ।
तिळांजुळी पापपुण्यासी । दिधली तेंणें ॥ १५ ॥
१५) परंतु आत्मज्ञानी पुरुषाला यांपैकीं काहीं नसले तरी तो जिवंतपणींच मुक्त असल्यानें पापपुण्याला त्यानें तिळांजली दिलेली असते. 
देहाचा अंत बरा आला । देह सुखरुप गेला ।
त्यासी म्हणती धन्य जाला । अज्ञान जन ॥ १६ ॥
१६) देहाचा शेवट चांगला झाला. सायास, कष्ट न होतां मरण आले तर अज्ञाानी लोक,  मरणारा धन्य झाला असें समजतात.    
जनाचें विपरीत मत । अंतीं भेटतो भगवंत ।
ऐसें कल्पून घात । करिती आपुला स्वयें ॥ १७ ॥
१७) जन्मभर कसेंही वर्तन केलें तरी शेवटी भगवंताचे स्मरण केले म्हणजे भगवंत भेटतो असे अज्ञानी माणसांचे चुकीचे मत आहे. मात्र हें मत खरें मानून ते आपलेच नुकसान करुन घेतात. 
जितां सार्थक नाहीं केलें । वेर्थ आयुष्य निघोन गेलें ।
मुळीं धान्येचि नाहीं पेरिलें । तें उगवेल कैंचें ॥ १८ ॥
१८) जिवंतपणीं कोणतेही परमार्थाचे साधन जर केलेले नसेल तर सबंध आगुष्य कांहीं न साधतां वाया जाते. धान्यच जर पेरले नाहीं तर कांहींही उगवणारच नाहीं. 
जरी केलें ईश्र्वरभजन । तरीच होईजे पावन ।
जैसें वेव्हारितां धन । रासि माथां लाभे ॥ १९ ॥
१९) जिवंत असतांना माणसानें ईश्र्वराची भक्ति केली तर तो पवित्र होऊन जातो. एखाद्या माणसानें जवळील पैशाचा नीट व्यवहार केला तर त्यास खूप पैसा मिळतो, तसेंच हें आहे. 
दिधल्याविण पाविजेना । पेरिल्याविण उगवेना ।
ऐसें हें वाक्य जना । ठाउकेंचि आहे ॥ २० ॥
२०) आपण दिल्याशिवाय आपल्याला मिळत नाही, पेरल्यावाचून उगवत नाहीं ही वाक्यें लोकांना माहित आहेत. 
न करितां सेवेच्या व्यापारा । स्वामीस म्हणे कोठें मुशारा ।
तैसें अंतीं अभक्त नरां । स्वहित न घडे ॥ २१ ॥
२१) जो सेवेचे कष्ट करीत नाही त्याला मालकाजवळ मोबदला मागता येत नाही. तसेच जो जिवंतपणी भगवंताची भक्ति करीत नाही, त्याचें अंतःकाळी कल्याण होत नाही. 
जितां नाहीं भगवद्भक्ती । मेल्यां कैंची होईल मुक्ती ।
असो जे जे जैसें करिती । ते ते पावती तैसें ॥ २२ ॥
२२) जिवंतपणी ज्यानें भगवंताची भक्ति केलेली नसते, तो अंतःकाळीं चांगल्या अवस्थेला पोहोंचत नाहीं. मेल्यावर त्याला मुक्ति मिळत नाही. जो जशी करणी करतो तसेंच बरेवाईट फळ त्याला मिळते.  
एवं न करितां भगवद्भजन । अंती नव्हीजे पावन ।
जरी आलें बरें मरण । तरी भक्तीविण अधोगति ॥ २३ ॥
२३) थोडक्यांत भगवंताची भक्ति केली नाहीं तर अंतकाळी तो पवित्र होत नाही. देहाला कष्ट न होतां त्याला जरी मरण आलें तरी भक्ती न केल्यानें त्याला वाईट गतीच मिळते. 
म्हणौन साधूनें आपलें । जीत अस्तांच सार्थक केलें ।
शरीर कारणीं लागलें । धन्य त्याचें ॥ २४ ॥
२४) साधु म्हणुनच जिवंत असतांना आपल्या देहाचे सार्थक करुन घेतो. आत्मसाक्षात्कार करुन घेतो. त्यामुळें त्याचे शरीर भगवंताचे कारणीं लागते. त्यामुळे तो धन्य होय.  
जें कां जीवन्मुक्त ज्ञानी । त्यांचें शरीर पडो रानीं ।
अथवा पडो स्मशानीं । तरी धन्य जालें ॥ २५ ॥
२५) जे जीवन्मुक्त आत्मज्ञानी असतात त्यांचे शरीर अंतःकाळीं रानांत पडो किंवा स्मशानांत पडो तें धन्यच होतात.  
साधूचा देह खितपला । अथवा श्र्वानादिकीं भक्षिला।
हें प्रशस्त न वटे जनाला । मंदबुद्धीस्तव ॥ २६ ॥
२६) एखाद्या साधुचा देह जर खितपत पडला किंवा कुत्रा आदि श्वापदांनी खाल्ला तर अज्ञानी लोकांना त्याचे वाईट वाटते.  
अंत बरा नव्हेचि म्हणोन । कष्टी होती इतर जन ।
परी बापुडे अज्ञान । नेणती वर्म ॥ २७ ॥ 
२७) त्या साधुचा अंत बरा झाला नाही म्हणून लोक दुःखी होतात. पण ते अज्ञानी असल्यानें साधूच्या अंतरंगांतील अवस्थेंचे वर्म ते जाणू शकत नाहीत.          
जो जन्मलाच नाहीं ठाईचा । त्यास मृत्य येईल कैंचा ।
विवेकबळें जन्ममृत्याचा । घोट भरिला जेणें ॥ २८ ॥
२८) " मी आत्माच आहे " अशी अगदीं दृढ भावना साधुची असते. या दृष्टीनें ज्या आत्म्याला जन्मच नाही त्याला मृत्यु कसा येणार ? आत्मानात्मविवेकाच्या सामर्थ्यानें साधु जन्ममृत्युचा घोट पिऊन बसलेला असतो. म्हणजेच जन्ममृत्युच्या पलीकडे तो गेलेला असतो. 
स्वरुपानुसंधानबळें । सगळी मायाच नाडळे ।
तयाचा पार न कळे । ब्रह्मादिकासी ॥ २९ ॥
२९) आात्मस्वरुपाशी तदाकार झाल्यानें सगळींकडे त्याला परमात्माच भरलेला दिसतो. सगळी माया त्याला आढळतच नाही. ब्रह्मादिकांना त्याच्या स्वरुपाचा अंदाज येत नाही. 
तो जितचि असतां मेला । मरणास मारुन ज्याला ।
जन्ममृत्य न स्मरे त्याला। विवेकबळें ॥ ३० ॥
३०) देहबुद्धिच नसल्यानें तो जिवंत असून मेल्यासारखाच असतो. वासना नसल्यानें मृत्युला मारुन जिवंत राहतो. मी आत्मा आहे या विवेकाच्या बळावर त्याला जन्ममृत्युचे स्मरण उरत नाही.  
तो जनीं दिसतो परी वेगळा । वर्ततां भासे निराळा ।
दृश्य पदार्थ त्या निर्मळा । स्पर्शलाचि नाहीं ॥ ३१ ॥
३१) तो सामान्य माणसांमध्यें राहतो. परंतु त्यांच्याहुन वेगळा असतो. त्याचे एकंदर वागणें बघितलें तर त्याचे वेगळेपण अनुभवास येते. तो शुद्ध, निर्मळ असल्यानें त्याला अशुद्ध, मलिन व दृश्य पदार्थ स्पर्शच करुं शकत नाहीत.
असो ऐसे साधुजन । त्यांचें घडलियां भजन ।
तेणें भजनें पावन । इतर जन होती ॥ ३२ ॥
३२) असो. असे जें साधुसंत असतात त्यांची भक्ति केली तर त्या भक्तीनें इतर सामान्य माणसें पवित्र होतात.
सद्गुरुचा जो अंकित साधक । तेणें केलाचि करावा विवेक ।
विवेक केलियां तर्क । फुटे निरुपणीं ॥ ३३ ॥
३३) जो साधकवृती धरुन सद्गुरुच्या आज्ञेंत राहतो, त्यानें पुन्हा पुन्हा आत्मानात्मविवेक करीत जावा. सातत्यानें विवेक चालू ठेवला म्हणजे विषयविवेचनामध्यें नवीन विचार स्फुरतात. 
हेंचि साधकासी निरवणें । अद्वैत प्रांजळ निरुपणें ।
तुमचेंहि समाधान बाणे । साधूच ऐसें ॥ ३४ ॥
३४) साधजनांस हीच सूचना मी देतों कीं, त्यांनीं शुद्ध अद्वैताचे विवेचन प्रतिपादन करावें. तसें केल्यानें साधूला ज्या समाधानाचा अनुभव येतो त्याचा त्यांना देखील अनुभव येईल.   
जो संतांस शरण गेला । तो संतचि ठेला ।
इतर जनास उपेगा आला । कृपाळूपणें ॥ ३५ ॥
३५) जो साधक संतांना शरण जातो, तो स्वतःच संतपदास पोहोचतो. मग तो दयावंत होऊन इतर लोकांना मार्गदर्शन करतो.  
ऐसें संतांचें महिमान । संतसंगें होतें ज्ञान ।
सत्संगपरतें साधन । आणीक नाहीं ॥ ३६ ॥
३६) संतांचा थोरपणा हा असा आहे. संतांच्या संगतीनें आत्मज्ञान होते. म्हणून जीवाचे कल्याण होण्यास संतसंगतीसारखें दुसरें साधन नाही. 
गुरुभजनाचेनि आधारें । निरुपणाचेनि विचारें ।
क्रियाशुद्ध निर्धारें । पाविजे पद ॥ ३७ ॥
३७) सद्गुरुच्या भक्तीचा आधार घ्यावा. सदैव आत्मानात्म विचार करावा. आणि आचरण शुद्ध ठेवावें. या तीनही गोष्टींनी माणसाला खात्रीनें ब्रह्मपद प्राप्त होते.    
परमार्थाचें जन्मस्थान । तेंचि सद्गुरुचें भजन ।
सद्गुरुभजनें समाधान । अकस्मात बाणे ॥ ३८ ॥
३८) सद्गुरुच्या भक्तीमध्येंच परमार्थ आहे. सद्गुरुच्या भक्तीनें माणसाला समाधानाचा त्वरित लाभ होतो.  
देह मिथ्या जाणोनि जीवें । याचें सार्थकचि करावें ।
भजनभावें तोषवावें । चित्त सद्गुरुचें ॥ ३९ ॥
३९) आपला देह खरा नाहीं हें मनापासून ओळखावें आणि त्याचे सार्थक करुन घ्यावें. अत्यंत मनापासून शुद्ध भावनेनें भक्ति करुन सद्गुरुचें चित्त प्रसन्न करावें. 
शरणांगतांची वाहे चिंता । तो येक सद्गुरु दाता ।
जैसें बाळक वाढवी माता । नाना येत्नें करुनी ॥ ४० ॥  
४०) आपल्याला जो शरण येतो त्याची चिंता, काळजी सद्गुरु घेतो. जशी माता आपल्या मुलाला अनेक प्रकारें सांभाळून लहानाचा मोठा करते. तसाच सद्गुरु आपल्या शिष्याला परमार्थामध्यें लहानाचा मोठा करतो.    
म्हणौन सद्गुरुचें भजन । जयासि घडे तोचि धन्य ।
सद्गुरुविण समाधान । आणीक नाहीं ॥ ४१ ॥
४१) म्हणून सद्गुरुची भक्ति ज्याचेकडून घडते त्याचे जीवन धन्य होते. सद्गुरुवाचून समाधान मिळविण्याचा अन्य मार्ग नाही. 
सरली शब्दाची खटपट । आला ग्रंथाचा सेवट ।
येथें सांगितलें पष्ट । सद्गुरुभजन ॥ ४२ ॥
४२) आता शब्दांची खटपट संपली. या ग्रंथाचा शेवट आला आहे. या ग्रंथामध्यें सद्गुरुची भक्ति करावी असें अगदी स्पष्ट सांगितलें आहे.      
सद्गुरुभजनापरतें कांहीं । मोक्षदायेक दुसरें नाहीं ।
जयास न मने तेंहीं । अवलोकावी गुरुगीता ॥ ४३ ॥
४३) सद्गुरुच्या भक्तीवांचून मोक्ष देणारे असें दुसरें साधन नाही. माझें हें सांगणें ज्याला पटत नाहीं, त्यानें गुरुगीता अभ्यासावी
तेथें निरोपिलें बरवें । पार्वतीप्रति सदाशिवें ।
याकारणें सद्भावें । सद्गुरुचरण सेवावे ॥ ४४ ॥
४४)गुरुगीतेमध्यें श्रीशंकरांनीं पार्वतीला हेंच उत्तम रीतीनें सांगितलें आहे. म्हणून अगदी मनापासून खर्‍या भक्तीनें श्रद्धेनें श्रीसद्गुरुच्या पायांची सेवा करावी.     
जो ये ग्रंथींचा विवेक । विवंचूनि पााहे साधक ।
तयास सांपडे येक । निश्र्चय ज्ञानाचा ॥ ४५ ॥
४५) या ग्रंथामध्यें जे विचार मांडलेले आहेत त्यावर जो साधक विचार करील त्याला आढळेल येथें आत्मज्ञानच निश्र्चितपणें प्रतिपादन केलें आहे. 
जे ग्रंथीं बोलिलें अद्वैत । तो म्हणो नये प्राकृत । 
सत्य जाणावा वेदांत । अर्थविषंई ॥ ४६ ॥
४६) ज्या ग्रंथामध्यें अद्वैत सांगितलेले असते तो मराठींत आहे म्हणून त्यास कमी लेखूं नये. जोपर्यंत ग्रंथाचा अर्थ अद्वैत आहे तोपर्यंत तें तत्वज्ञान अगदी खरें मानावें. 
प्राकृतें वेदांत कळे । सकळ शास्त्रीं पाहातां मिळे ।
आणी समाधान निवळे । अंतर्यामीं ॥ ४७ ॥
४७) मराठीमध्यें असल्यानें वेदान्त समजतो. शिवाय संस्कृत ग्रंथामधें तोच वेदांत प्रतिपादन केला आहे असेआढळेल. आणि मग अंतर्यामी समाधान मिळेल. 
तें प्राकृत म्हणों नये । जेथें ज्ञानाचे उपाये ।
मूर्खासि हें कळे काये । मर्कटा नारिकेळ जैसें ॥ ४८ ॥
४८) ज्या ग्रंथामधें आत्मज्ञानाचा उपाय सांगितला आहे, तो ग्रंथ संस्कृतामधें नसला तरी कमी समजू नये. माकडाला ज्याप्रमाणे नारळाची किंमत कळत नाही. त्याचप्रमाणें मूर्खास हें कळत नाही. 
आतां असो हें बोलणें । अधिकारपरत्वें घेणें ।
शिंपीमधील मुक्त उणें । म्हणों नये ॥ ४९ ॥
४९) आतां हें बोलणें पुरे झाले. प्रत्येकानें आपल्या लायकीप्रमाणें ग्रंथांतूंन जें घ्यावयाचे तें घ्यावें. शिंपल्यामधें मोती तयार होतो म्हणून मोत्याला कोणी उणा समजत नाहीत. 
जेथें नेति नेति श्रुती । तेथें न चले भाषावित्पत्ती ।
परब्रह्म आदिअंतीं । अनुर्वाच्य ॥ ५० ॥
५०) ब्रह्मस्वरुप कळत नाही, असें म्हणून जेथें वेदानें हार खाल्ली तेथें भाषेचें चातुर्य उपयोगी पडत नाही. आरंभापासून शेवटपर्यंत परब्रह्म शब्दाच्या आवाक्याबाहेरचें असतें.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहान्तनिरुपणनाम समास दहावा ॥
Samas Dahava Dehanta Nirupan 
समास दहावा देहान्तनिरुपण


Custom Search

No comments: