Saturday, October 7, 2017

Samas Chautha Sukshma Panchabhute Nirupan समास चवथा सूक्ष्मपंचभूतें निरुपण


Dashak Aathava Samas Chautha Sukshma Panchabhute Nirupan 
Samas Chautha Sukshma Panchabhute Nirupan, It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about MahaBhute. There are five Mahabhute. Samarth is telling us about them. These Mahabhute are Aakasha (Sky), Pruthavi (Earth), Jala (Water), Vayu (Wind) and Teja (Fire).
समास चवथा सूक्ष्मपंचभूतें निरुपण 
श्रीराम ।
मागील आशंकेचें मूळ । आतां होईल प्रांजळ ।
वृत्ति करावी निवळ । निमिष्य येक ॥ १ ॥
१) श्रोत्यांनीं मागें जी शंका काढली होती. तिचें मूळ आतां स्पष्ट होईल. त्यानीं आपली वृत्ती क्षणभर स्वच्छ ठेवावी.   
ब्रह्मीं मूळमाया जाली । तिच्या पोटा माया आली ।
मग ते गुण प्रसवली । म्हणौनि गुणक्षोभिणी ॥ २ ॥
२) परब्रह्मामध्यें मूळमाया झाली. तिच्या पोटीं माया जन्मास आली. मायेनें त्रिगुणांना जन्म दिला म्हणून तिला गुणक्षोभिणी म्हणतात. 
पुढें तिजपासाव कोण । सत्वरजतमोगुण ।
तमोगुणापासून निर्माण । जालीं पंचभूतें ॥ ३ ॥
३) मायेपासून कोण कोण झाले तर सत्व, रज व तम हे गुण झाले. तमोगुणापासून पंचभूतें निर्माण झाली. 
ऐसी भूतें उद्भवलीं । पुढें तत्वें विस्तारलीं ।
एवं तमोगुणापासून जाली । पंचमाहांभूतें ॥ ४ ॥
४) अशा रीतीनें पंचभूतें जन्मास आली नंतर त्यांचा विस्तार झाला. थोडक्यांत तमोगुणापासून पंच महाभूतें निर्माण झाली.  
मूळमाया गुणापरती । तेथें भूतें कैचीं होतीं  ।
ऐसी आशंका हे श्रोती । घेतली मागां ॥ ५ ॥
५) मूळ माया जर त्रिगुणांच्या पलीकडे आहे तर तिच्यापासून पंचभूतें उत्पन्न होणें कसें शक्य आहे ? अशी शंका  पूर्वी श्रोत्यांनी काढली होती.   
आणीक येक येके भूतीं । पंचभूतें असतीं ।
तेहि आतां कैसी स्थिती । प्रांजळ करुं ॥ ६ ॥
६) आणखीं असें की प्रत्येक भूतामध्यें बाकीची भूतें असतात. हें कसें तें आतां स्पष्ट करुन सांगतो. 
सूक्ष्मदृष्टीचें कौतुक । मूळमाया पंचभूतिक । 
श्रोतीं विमळ विवेक । केला पाहिजे ॥ ७ ॥ 
७) अत्यंत सूक्ष्म विचार केला तर मूळमायेमध्यें पंचभूतांचें अगदी बीजरुपानें अस्तित्व असलें पाहिजे. हें समजेल. मात्र श्रोत्यांनी स्वच्छ विवेक केला पाहिजे. 
आधीं भूतें तीं जाणावीं । रुपें कैसीं वोळखावीं ।
मग तें शोधून पाहावीं । सूक्ष्मदृष्टीं ॥ ८ ॥
८) प्रथम पंचमहाभूतें कोणती तें समजून घ्यावें. प्रत्येकाचे रुप कसें तें समजून घ्यावें. मग सूक्ष्म विचार करुन ज्ञानदृष्टीनें ती शोधून काढावी.   
वोळखी नाहीं अंतरीं । ते वोळखावी कोणेपरी ।
म्हणोनि भूतांची वोळखी चतुरीं । नावेक परिसावी ॥ ९ ॥
९) जोपर्यंत भूतांच्या लक्षणांचे ज्ञान आपल्या अंतरंगांत नाही, तोपर्यंत ती ओळखून शोधतां येणार नाहीत. यासाठीं शहाण्या माणसांनी भूतें कशी ओळखावी हा विषय क्षणभर ऐकावा.   
जें जें जड आणी कठिण । तें तें पृथ्वीचें लक्षण ।
मृद आणी वोलेपण । तितुकें आप ॥ १० ॥ 
१०) जें जें जड आणि कठिण आहे ते ते पृथ्वीचे लक्षण तर जें जें मऊ आणि ओलें तें पाण्याचें लक्षण समजावे.   
जें जें उष्ण आणी सतेज । तें तें जाणावें पैं तेज ।
आतां वायोहि सहज । निरोपिजेल ॥ ११ ॥
११) जें जें गरम आणि प्रकाशयुक्त आहे तें तेजाचे लक्षण होय. आतां वायूचें लक्षण सांगतो.
चैतन्य आणी चंचळ । तो हा वायोचि केवळ ।
सुन्य आकाश निश्र्चळ । आकाश जाणावें ॥ १२ ॥
१२) जिवंतपणा आणि हालचाल हें वायूचें लक्षण तर पोकळपणा, अवकाश व स्तब्धपणा हें आकाशाचें लक्षण होय.  
ऐसीं पंचमाहांभूतें । वोळखी धरावी संकेतें ।
आतां येकीं पांच भूतें । सावध ऐका ॥ १३ ॥
१३) पंचभूतांची लक्षणें थोडक्यांत हीं अशी आहेत. त्यांवरुन खुणेनें भूतें ओळखून काढावी. आतां एका भूतांत इतर भूतें कशी असतात तें लक्ष देऊन ऐका.
जें त्रिगुणाहुनि पर । त्याचा सूक्ष्म विचार । 
यालागीं अति तत्पर । होऊन ऐका  ॥ १४ ॥
१४) जें त्रिगुणांच्या पलीकडे आहे त्याचा विचार सूक्ष्मच असणार.म्हणून आतां मी जें सांगणार आहे तें श्रोत्यांनीं अगदी मनःपूर्वक ऐकावें.  
सूक्ष्म आकाशीं कैसी पृथ्वी । तेचि आधीं निरोपावीं ।
येथें धारणा धरावी । श्रोतेजनीं ॥ १५ ॥
१५) आकाश अत्यंत सूक्ष्म व पृथ्वी अत्यंत स्थूल व जड असते. अशा सूक्ष्म आकाशांत जड पृथ्वी कशीं असते तें प्रथम सांगतो. श्रोत्यांनी एकाग्र मनानें ऐकावें. 
आकाश म्हणजे अवकाश सुन्य । सुन्य म्हणिजे तें अज्ञान ।
अज्ञान म्हणिजे जडत्व जाण । तेचि पृथ्वी ॥ १६ ॥
१६)  आकाश म्हणजे नुसता अवकाश किंवा शून्यमय, पोकळ व मोकळी जागा. शून्य म्हनजे अज्ञान होय. अज्ञान म्हणजे जडत्व आणि जडत्व म्हणजेच पृथ्वी समजावी.   
आकाश स्वयें आहे मृद । तेंचि आप स्वतसिद्ध ।
आतां तेज तेंहि विशद । करुन दाऊं ॥ १७ ॥
१७) आकाश स्वतः अगदी मऊ आहे. तो मऊपणा हेंच आकाशांतील पाणी होय. आतां आकाशांत तेज कसें आहे तें स्पष्ट करुन सांगतो. 
अज्ञानें भासला भास । तोचि तेजाचा प्रकाश ।
आतां वायो सावकाश । साकल्य सांगों ॥ १८ ॥  
१८) अज्ञानानें जो भास होतो तोच तेजाचा प्रकाश होय. अज्ञानाचा जो व्यवहार होतो तो सगळा अवकाशांतच होतो. आतां वायूचें रुप सांगतो.    
वायु आकाशा नाहीं भेद । आकाशाइतुका  असे स्तब्ध ।
तथापी आकाशीं जो निरोध । तोचि वायो ॥ १९ ॥ 
१९) वायूंत व आकाशांत भेद नाही. वायूदेखील आकाशाइतका स्तब्द असतो. पण आकाशामध्यें जो प्रतिकार व सूक्ष्म अटकाव अनुभवास येतो तोच वायु होय.   
आकाशीं आकाश मिसळलें । हें तों नलगे किं बोलिलें ।
येणें प्रकारें निरोपिलें । आकाश पंचभूत ॥ २० ॥ 
२०) आकाश आकाशांत हें कांहीं सांगायला नको. अश प्रकारें आकाशामध्यें इतर भूतें कशी असतात याचें विवेचन झालें. 
वायोमध्यें पंचभूतें । तेंहि ऐका येकचित्तें ।
बोलिजेती ते समस्तें । येथान्वयें ॥ २१ ॥
२१) वायूमध्यें इतर भूतें कशी आढळतात तें आतां क्रमवार सांगतो. लक्ष देऊन ऐकावे. 
हळु फुल तरी जड । हळु वारा तरी निबिड ।
वायो लागतां कडाड । मोडती झाडें ॥ २२ ॥ 
२२) फूल हलकें असलें तरी त्यास वजन असते. तसाच वारा जरी हलका असला तरी त्यास घनपणा असतो. कठीणपणा असतो. म्हणून सोसाट्याच्या वार्‍यानें झाडें कडाकडा मोडतात. 
तोलेंविण झाड मोडे । ऐसें हें कहिंच न घडे ।
तोल तोचि तये जडे । पृथ्वीचा अंश ॥ २३ ॥ 
२३) वजनावांचून झाड मोडलें असें कधींच घडत नाही. वजनाला जडपणा असतो. हा वायूंतील पृथ्वीचा अंश होय.   
येथें श्रोते आशंका घेती । तेथें कैंचीं झाडे होतीं ।
झाडे नव्हतीं तरी शक्ती । कठिणरुप आहे ॥ २४ ॥  
२४) येथें श्रोत्यांनी शंका घेतली कीं, सध्या नुसत्या पंचभूतांचे वर्णन चालू आहे. दृश्य पदार्थ अजून निर्माण झालेलाच नाही. अशा निराकार अवस्थेंत झाडें असणें शक्य नाही. तेव्हां श्रीसमर्थ उत्तर देतात कीं, निराकार पंचभूतांमध्यें झाडे नाहीत हें खरे. पण तेथेम शक्ती होतीच. आणि शक्तीमध्यें कठिणपणा असतो. हा पृथ्वीचा गुण होय.  
वन्हीस्फुलिंग लाहान । कांहीं तर्‍ही असे उष्ण ।
तैसें सूक्ष्मीं जडपण । सूक्ष्मरुपें ॥ २५ ॥ 
२५) विस्तवाची लहान ठिणगी आहे. तिच्यामध्यें तिच्या मापाची उष्णता असतेच. त्याचप्रमाणें सूक्ष्म वायूमध्यें सूक्ष्मरुपानें जडपणा असतो.  
मृदपण तेंचि आप । भास तेजाचें स्वरुप ।
वायो तेथें चंचळरुप । सहजचि आहे ॥ २६ ॥
२६) वायूमधिल मऊपणा हा पाण्याचा गुण, वायूमधिल भास हा तेजाचा गुण आणि चमचलपणा हा तर वायूचा स्वतःचा स्वभाव आहे.   
सकळांस मिळोन आकाश । सहजचि आहे अवकाश ।
पंचभूतांचें अंश । वायोमधें निरोपिले ॥ २७ ॥
२७) सर्वांना सामावून घेणें हा आकाशाचा गुण आहे. वायूमध्यें कठिणपणा, मऊपण, भास व चंचळपणा हे गुण सामावलेले आहेत. म्हणून वायूमध्यें आकाश आहे. अशा रीतीनें वायूमध्यें इतर भूतांचे अंश आहेत हें सांगून झाले.   
आतां तेजाचें लक्षण । भासलेंपण तें कठिण ।
तेजीं ऐसी वोळखण । पृथ्वीयेची ॥ २८ ॥
२८) आतां तेजाचें लक्षण सांगतो. तेजानें भास होतो. प्रत्यक्ष कांहींतरी दिसते. इंद्रियांना गोचर होतें. कांहीं तरी कठीणपणा, दाटपणा असल्याखेरीज भास होत नाही. कठिणपणा हा पृथ्वीचा गुण म्हणून तेजानध्यें पृथ्वीचा अंश असतो.  
भासला भास वाटे मृद । तेजीं आप तेचि प्रसिद्ध ।
तेजीं तेज स्वतसिद्ध । सांगणेंचि नलगे ॥ २९ ॥
२९) जो भास अनुभवास येतो तो मऊ असतो. इंद्रियांना सहजपणें प्रत्ययास येतो. हा जो मृदुपणा तो तेजामधील पाण्याचा अंश होय. तेजांमध्यें तेज असते तेम स्वतः सिद्ध असल्यानें त्याबद्दल सांगणें नलगे.  
तेजीं वायो तो चंचळ । तेजीं आकाश निश्र्चळ ।
तेजीं पंचभूतें सकळ । निरोपिलीं ॥ ३० ॥
३०) तेजामध्यें आढळणारी चंचलता हा वायूचा अंश तर त्यामध्यें आढळणारी स्तब्धता हा आकाशाचा अंश होय. अशा प्रकारें तेजामध्यें इतर भूतें कशीं असतात तें सांगितलें. 
आतां आपाचें लक्षण । आप तेंचि जें मृदपण ।
मृदपण तें कठिण । तेचि पृथ्वी ॥ ३१ ॥
३१) आतां पाण्याचे लक्षण मृदुपणा. पाणी मऊ आहे. असें म्हटले तरी त्यामध्यें थोडातरी कठीणपणा असतोच. तोच पृथ्वीचा अंश समजावा.    
आपीं आप सहजची असे । तेज मृदपणें भासे ।
वायो स्तब्धपणेम दिसे । मृदत्वाआंगीं ॥ ३२ ॥
३२) पाण्यांत पाणीपणा असतोच. तेजामुळें पाण्यांतील मऊपणा अनुभवास येतो. मउपणांतील स्तब्धता वायूचा गुण समजावा. 
आकाश नलगे सांगावें । तें व्यापकचि स्वभावें ।
आपीं पंचभूतांचीं नांवें । सूक्ष्म निरोपिलीं ॥ ३३ ॥ 
३३) पाण्यामध्यें आकाश असते हें सांगावयासच नको. सर्वांना व्यापून टाकणें हा आकाशाचा गुण आहे. म्हणून तें पाण्यामध्यें असणाराच. याप्रमाणें पाण्यामध्यें इतर भूतें कशी आहेत हें सांगून झाले. 
आतां पृथ्वीचें लक्षण । कठिण पृथ्वी आपण ।
कठिणत्वीं मृदपण । तेंचि आप ॥ ३४ ॥
३४) आतां पृथ्वीबद्दल सांगतो. कठीनपणा हा तीचा गुण आहे. कठीणपणामध्यें जें मऊपण आढळते तें पृथ्वीमधील पाणी समजावें.  
कठिणत्वाचा जो भास । तोचि तेजाचा प्रकाश ।
कठिणत्वीं निरोधांश । तोचि वायो ॥ ३५ ॥ 
३५) कठीणपणाचा जो प्रत्यय येतो तो तेजाचा अंश होय. कठीणपणामध्यें जो प्रतिकार आढळतो तो वायूचा अंश समजावा.    
आकाश सकळांस व्यापक । हा तो प्रगटचि विवेक ।
आकाशींच कांहीं येक । भास भासे ॥ ३६ ॥
३६) आकाश सर्वांना व्यापून राहतें. हें उघडच आहे. माणसाला दृश्याचा जो प्रत्यय येतो तो आकाशामध्येंच येतो. 
आकाश तोडितां तुटेना । आकाश फोडितां फुटेना ।
आकाश परतें होयेना । तिळमात्र ॥ ३७ ॥
३७) आकाश तोडता येत नाही. फोडता येत नाही. थोडे सरकविताही येत नाही.  
असो आतां पृथ्वीअंत । दाविता भूतांचा संकेत । 
येक भूतीं पंचभूत । तेंहि निरोपिलें ॥ ३८ ॥ 
३८) असो. पृथ्वीमध्यें इतर भूतें कशीं आहेत तें सांगून झाले. प्रत्येक भूतामध्यें इतर भूतें कशी अंशरुपानें आहेत ते सांगून झालें. 
परी हें आहाच पाहातां नातुडे । बळेंचि पोटीं संदेह पडे ।
भ्रांतिरुपें अहंता चढे । अकस्मात ॥ ३९ ॥
३९) परंतु पंचमहाभूतांचा नुसता वर वर जर विचार केला तर तीं एकमेकांत कालवलेली आहेत हे आकलन होत नाही. मन मनांत बळेंच विकल्प वाढतो. त्यामुळें भलतीच कल्पना होऊन एकाकी अहंकार मात्र वाढतो. 
सूक्ष्मदृष्टीनें पाहातां । वायोचि वाटे तत्वता ।
सूक्ष्म वायो शोधूं जातां । पंचभूतें दिसती ॥ ४० ॥
४०) सूक्ष्म विचार केला तर हा सगळा वायूचा म्हणजे शक्तीचा खेळ आहे असें वाटते. त्या सूक्ष्म शक्तीचा शोध घ्यावयास गेलें तर सूक्ष्म पंचमहाभूतें आढळतात.   
एवं पंचभूतिक पवन । तेचि मूळमाया जाण ।
माया आणी सूक्ष्म त्रिगुण । तेहि पंचभूतिक ॥ ४१ ॥
४१) थोडक्यांत सूक्ष्म शक्तीमध्यें पंचमहाभूतें सूक्ष्मपणें राहतात. या शक्तीलाच मूळमाया म्हणतात. तिच्यापासून होणारी माया आणि तिच्यांतून उद्भवणारे त्रिगुण सगळे पंचभूतात्मक असतात.  
भूतें गुण मेळविजे । त्यासी अष्टधा बोलिजे । 
पंचभूतिक जाणिजे । अष्टधा प्रकृति ॥ ४२ ॥
४२) पंचभूतांमधे तीन गुण मिळवले म्हणजे आठ प्रकार होतात. म्हणून अष्टधा प्रकृति पंचभूतात्मक आहे असें समजावें.  
शोधून पाहिल्याविण । संदेह धरणें मूर्खपण ।
याची पाहावी वोळखण । सूक्ष्मदृष्टीं ॥ ४३ ॥
४३) कोणत्याही गोष्टीचा विचारानें शोध घ्यावा. तसें न करतां तिच्यावर संशय धरणें मूर्खपणाचें आहे. अष्टधा प्रकृति पंचभूतात्मक आहे ही गोष्ट सूक्ष्म विचार करुन समजून घ्यावी. 
गुणापासुनीं भूतें । पावलीं पष्ट दशेतें ।
जडत्व येऊन समस्तें । तत्वें जाली ॥ ४४ ॥
४४) मूळमायेंत असणारी अत्यंत सूक्ष्म पंचभूतें त्रिगुणांमुळें स्पष्ट दशेंत येतात. मग त्यांना दृश्य रुप आल्यावर सगळीं तत्वें निर्माण होतात. 
पुढें तत्वांविवंचना । पिंडब्रह्मांड तत्वरचना ।
बोलिली असे ते जना । प्रगटचि आहे ॥ ४५ ॥
४५) त्यानंतरचा जो तत्वांचा विचार आहे, पिंड व ब्रह्मांड या दोन्हीमध्यें जी तत्वरचना आहे तो विषय लोकांना चांगला माहित आहे. 
हा भूतकर्दम बोलिला । सूक्ष्म संकेतें दाविला ।
ब्रह्मगोळ उभारला । तत्पूर्वीं ॥ ४६ ॥   
४६) आतांपर्यंत पंचभूतांच्या मिश्रनाचा विषय सूक्ष्म खुणांनीं सांगितला. पण तो विश्र्वरचना होण्यापूर्वींचा आहे.    
या ब्रह्मांडापैलिकडिल गोष्टी । जैं जाली नव्हती सृष्टी ।
मूळमाया सूक्ष्मदृष्टीं । वोळखावी ॥ ४७ ॥
४७) विश्व उत्पन्न होण्यापूर्वीं विश्वाच्या पलीकडे म्हणजे जेव्हां कोणतेंहीं दृश्य उद्भवलें नव्हते तेव्हां पंचभूतांची अवस्था काय होती ती आतांपर्यंत सांगितली. तेथें फक्त मूळमाया होती. खोल विचार करुन सूक्ष्म बुद्धीनें तिला ओळखावी.  
सप्तकंचुक प्रचंड । जालें नव्हतें ब्रह्मांड ।
मायेअविद्येचें बंड । ऐलिकडे ॥ ४८ ॥
४८) केवळ मूळमाया होती. त्यावेळीं हें सात आवरणें असणारें प्रचंड ब्रह्मांड झालें नव्हतें. माया व अविद्या यांचा धुमाकूळ अलीकडील आहे. पंचमहाभूतें, अहंकार व महत् तत्व मिळून सात आवरणें मानतात.  
ब्रह्मा विष्णु महेश्र्वर । हा ऐलिकडिल विचार ।
पृथ्वी मेरु सप्त सागर । ऐलिकडे ॥ ४९ ॥
४९) ब्रह्मा, विष्णु, महेश हे देवदेखील अलीकडील आहेत. त्याचप्रमाणें पृथ्वी, मेरु पर्वत, सातसमुद्र हे देखील अलीकडील आहेत. मेरु हा पुराणांतील प्रसिद्ध, स्थिर,सर्वोच्य सोन्याचा पर्वत आहे. सर्व ग्रह त्याच्या भोवतीं फिरतात.  
नाना लोक नाना स्थानें । चंद्र सूर्य तारांगणें ।
सप्त द्विपें चौदा भुवनें । ऐलिकडे ॥ ५० ॥
५०) अनेक प्रकारचे लोक, अनेक प्रकारची स्थानें, चंद्र, सूर्य, तारें, सप्त द्विपें, चौदा भुवनें हीं अलीकडची आहेत. 
शेष कूर्म सप्त पाताळ । येकविस स्वर्गें अष्ट दिगपाळ ।
तेतिस कोटी देव सकळ । ऐलिकडे ॥ ५१ ॥
५१) शेष, कूर्म, सात पाताळें, एकवीस स्वर्ग, आठ दिक्पाळ, तेहतीस कोटी देव, हे अलीकडील आहेत.  
बारा अदित्य अकरा रुद्र । नव नाग सप्त ऋषेश्र्वर ।
नाना देवांचे अवतार । ऐलिकडे ॥ ५२ ॥
५२) बाराआदित्य, अकरा रुद्र, नव नाग, सप्तर्षी, निरनिराळे देवांचे अवतार हे सर्व अलीकडील आहेत. 
मेघ मनु चक्रवती । नाना जीवांची उत्पती ।
आतां असो सांगो किती । विस्तार हा ॥ ५३ ॥ 
५३) चक्रवर्ति मनु, मेघ, अनेक प्रकारच्या जीवांची उत्पत्ती, हे सर्व अलीकडील आहेत. हा विस्तार किती सांगायाचा. आतां पुरें झाले.     
सकळ विस्ताराचें मूंळ । ते मूळमायाच केवळ ।
मागां निरोपिली सकळ । पंचभूतिक ॥ ५४ ॥
५४) हा जो विस्तार आतांपर्यंत सांगितला त्या सगळ्याचें मूळ मूळमायाच आहे. मूळमाया पंचभूतात्मक आहे हें मागें सांगितलेलें आहे. 
सूक्ष्मभूतें जें बोलिलीं । तेचि पुढें जडत्वाआलीं ।
ते सकळहि बोलिली । पुढिलें समासीं ॥ ५५ ॥
५५) मागें जीं सूक्ष्म भूतें सांगितली तीच नंतर दृश्यरुप धारण करतात. तें सगलें विवेचन पुढील समासांत केलें आहे.  
पंचभूतें पृथकाकारें । पुढें निरोपिलीं विस्तारें ।
वोळखीकारणें अत्यादरें । श्रोतीं श्रवण करावीं ॥ ५६ ॥
५६) पंचभूतांपैकी प्रत्येक भूताचें स्वरुप वेगवेगळें पुढें सांगितलें आहे. विस्तारानें वर्णन केलें आहे. तें ध्यानांत येण्यासाठीं श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावे.  
पंचभूतिक ब्रह्मगोळ । जेणें कळे हा प्रांजळ ।
दृश्य सांडून केवळ । वस्तुच पाविजे ॥ ५७ ॥
५७) हा ब्रह्मगोळ पंचभूतंचा केलेला आहे असें पुढील विवेचनावरुन कळेल. तें कळलें म्हणजे सर्व दृश्य मागें टाकून परमात्वस्तु प्राप्त करुन घेता येईल. 
माहाद्वार वोलांडावें । मग देवदर्शन घ्यावें । 
तैसें दृश्य हें सांडावें । जाणोनियां ॥ ५८ ॥  
५८) मंदिराचे महाद्वार ओलांडलें म्हणजे देवाचे दर्शन घेता येते.  त्याचप्रमाणें दृश्य हें पंचभौतिक आहे हे ओळखून मागें टाकलें म्हणजे ब्रह्मदर्शन घडते. 
म्हणोनि दृश्याचा पोटीं आहे पंचभूतांची दाटी ।
येकपणें पडिली मिठी । दृश्य पंचभूतां ॥ ५९ ॥  
५९) या दृश्य विश्वाच्या आत बाहेर पंचमहाभूतें भरुन राहीली आहेत. दृश्य व पंचमहाभूतें या दोघांमध्यें ऐक्याची मिठी पडली आहे. 
एवं पंचभूतांचेनि दृश्य । सृष्टी रचली सावकास ।
श्रोतीं करुन अवकाश । श्रवण करावें ॥ ६० ॥
६०) सारांश सगळें दृश्य पंचमहाभूतांचेच बनलेंलें आहे. पंचभूतांपासून क्रमाक्रमानें विश्वाची रचना झाली. श्रोत्यांनी सावकाश तें ऐकावें.  
इति श्रीदासबोधें गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मपंचभूतेंनिरुपणनाम समास चवथा ॥ 
Samas Chautha Sukshma Panchabhute Nirupan
समास चवथा सूक्ष्मपंचभूतें निरुपण 


Custom Search

No comments: