Sunday, January 14, 2018

Samas Dusara ChatvarDev Nirupan समास दुसरा चत्वारदेव निरुपण


Dashak Aakarava Samas Dusara ChatvarDev Nirupan 
Samas Dusara ChatvarDev Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Chala and Achala in this Samas. Chala means Maya, the world which we see. It is not permanent. While Achala means Brahma, which is permanent and we can’t see it.
समास दुसरा चत्वारदेव निरुपण
श्रीराम ॥
येक निश्र्चळ येक चंचळ । चंचळीं गुंतलें सकळ ।
निश्र्चळ तें निश्र्चळ । जैसें तैसें ॥ १ ॥
१) विश्वामध्यें दोन वस्तु आहेत. एक शाश्वत व दुसरी अशाश्वत. सारीं माणसें अशाश्वतांतच गुंतलेली आढळतात. शाश्वत मात्र जसेंच्या तसें शाश्वतच राहते. 
पाहे निश्र्चळाचा विवेक । ऐसा लक्षांमधें येक ।
निश्र्चळाऐसा निश्र्चयात्मक । निश्र्चळचि तो ॥ २ ॥
२) सारासार विवेक करुन शाश्वताचा शोध करणारा असाा लाखांत एखादाच सापडतो. शाश्वतासारखाच तोसुद्धा अत्यंत निश्र्चयी, स्थिर व शांत बनतो.
या निश्र्चलाच्या गोष्टी सांगती । पुन्हा चंचळाकडे धांवती ।
चंचळचक्रीं निघोन जाती । ऐसे थोडे ॥ ३ ॥
३) पुष्कळ लोक शाश्वराच्या गोष्टी करतात. परमतु परत ते अशाश्वताच्याच मागे धावतात. या अशाश्वतांतून बाहेर पडणारे फारच थोडे असतात.
चंचळीं चंचळ जन्मले । चंचळाचि मधें वाढलें ।
अवघें चंचळचि बिंबलें । जन्मवरी ॥ ४ ॥
४) अशाश्वतामध्येंच अशाश्वत जन्म घेते. त्यांतच ते वाढते. यामुळें माणसाच्या मनावर अशाश्वत सारखें परिणाम करीत राहते. 
पृथ्वी अवघी चंचळाकडे । करणें तितुकें चंचळीं घडे ।
चंचळ सांडून निश्र्चळीं पवाडे । ऐसा कैंचा ॥ ५ ॥
५) या पृथ्वीवरील सर्व घटना अशाश्वत आहेत. येथें माणसाचे सर्व व्यवहार अशाश्वतामध्येंच घडतात. त्यामुळें अशाश्वतास दूर करुन शाश्वतामध्यें प्रवेश करणारा माणूस सापडणें फार कठीण आहे. 
चंचळ कांहीं निश्र्चळेना । निश्र्चळ कदापी चळेना ।
नित्यानित्यविवेकें जना । उमजे कांहीं ॥ ६ ॥
६) जे अशाश्वत आहे ते कधी स्थिरपणें टिकत नाही. जें शाश्वत आहे ते कधीच चळत नाही. नित्यानित्य विवेक केला तर माणसाला या गोष्टी थोड्याशा आकलन होतात. 
कांहीं उमजलें तरी नुमजे । कांहीं समजलें तरी न समजे ।
कांहीं बुझे तरी निर्बुजे । किंचित मात्र ॥ ७ ॥
७) माणसानें नित्यानित्य विवेकाने कांहीं समजून घेतले तरी ते अशाश्वताच्या जोराने न समजल्यासारखें होते. तसेंच थोडे समजलें तरी तें न समजल्यासारखें वाया जाते.  
संदेह अनुमान आणी भ्रम । अवघा चंचळामधें श्रम ।
निश्र्चळीं कदा नाहीं वर्म । समजलें पाहिजे ॥ ८ ॥
८) संशय येणें, कल्पना करीत सुटणें, भ्रम होणें या सर्व गोष्टी अशाश्वतामधील कष्ट देणार्‍या घटना आहेत. शाश्वतामध्यें त्यांना स्थान नाही. पण हे माणसाला समजले पाहिजे. 
चंचळाकरी तितुकी माया । माईजे जाये विलया ।
लहान थोर म्हणावया । कार्य नाहीं ॥ ९ ॥
९) जे जे अशाश्वत आहे ते सारे मायानिर्मित आहे. तें तें नाशवंत असते. मायानिर्नित वस्तूंमध्यें लहान-मोठा हा फरक आढळत नाही. 
सगट माया विस्तारली । अष्टधा प्रकृति फांपावली ।
चित्रविचित्र विकारली । नाना रुपें ॥ १० ॥
१०) विश्वामधें जिकडेतिकडे मायेचा विस्तार आहे. पंचभूतें आणि तीन गुण मिळून असणारी अष्टधा प्रकृति सगळीकडे पसरली आहे. नाना प्रकारच्या चित्रविचित्र रुपांनीं ती विस्तारलेली आढळते. 
नाना उत्पत्ती नाना विकार । नाना प्राणी लाहान थोर ।
नाना पदार्थ मकार । नाना रुपें ॥ ११ ॥
११) तिच्या विस्तारामधें अनेक प्रकारच्या निर्मित वस्तु, अनेक प्रकारचे बदल, अनेक प्रकारचे लहान मोठे, नाना प्रकारचे जड द्रव्यमय पदार्थ आणि नाना प्रकारची रुपें आढलतात. 
विकारवंत विकारलें । सूक्ष्म जडत्वास आलें ।
अमर्याद दिसों लागलें । कांहींचाबाहीं ॥ १२ ॥
१२) अष्टधा प्रकृति विकारशील किंवा सतत बदलणारी असल्यानें तिच्या विकारवंत स्वभावांतून हे विश्व निर्माण झालें. अव्यक्त प्रकृति सूक्ष्म असते. ती व्यक्त स्वरुप धारण करतांना स्थूल पदार्थाचें रुप घेते. अशा रीतीनें अमर्यादपणें भरमसाट वाढलेलें हे दृश्य स्थूल विश्व दिसूं लागते.     
मग नाना शरीरें निर्माण जालीं । नाना नामाभिधानें ठेविलीं ।
भाषा परत्वें कळों आलीं । कांहीं कांहीं ॥ १३ ॥
१३) मग नाना प्रकारचे देह धारण केलेले प्राणी निर्माण झाले. त्यांना निरनिराळी नांवें ठेविली. मग त्यांच्यांत माणूस निर्माण झाला. त्याच्या कांहीं भाषा झाल्या मग एकमेकाचे एकमेकाला थोडे कळायला लागले. 
मग नाना रीति नाना दंडक । आचार येकाहून येक ।
वर्तो लागलें सकळ लोक । लोकाचारें ॥ १४ ॥
१४) मग माणसांत कांहीं कांहीं चालीरीती झाल्या. वागण्याचे अनेक प्रकार झाले. निरनिराळे आचार रुढ झाले. त्या लोकाचारांना अनुसरुन लोक वागतात.  
अष्टधा प्रकृतीचीं शरीरें । निर्माण जालीं लाहानथोरें ।
पुढें आपुलाल्या प्रकारें । वर्तो लागती ॥ १५ ॥
१५) थोडक्यांत अष्टधा प्रकृति प्रथम निर्माण झाली. तिच्यापासून अनेक प्रकारची लहान मोठी शरीरें झाली.नंतर आपापल्या स्वभावानुसार त्यांचे वागणें सुरु झाले. 
नाना मतें निर्माण जालीं । नाना पाषांडें वाढलीं ।
नाना प्रकारीचीं उठिलीं । नाना बंडें ॥ १६ ॥
१६) पण मानव समाजांतील जीवन अधिक गुंतागुंतीचें आहे. मानव समाजामध्यें अनेक प्रकारची मतें निर्माण झाली. अनेक प्रकारचे खोटे व भ्रामक विचार वाढीस लागले. आणि नाना प्रकारच्या विलक्षण कल्पनांचा प्रसार झाला. 
जैसा प्रवाह पडिला । तैसाच लोक चालिला ।
कोण वारील कोणाला । येक नाहीं ॥ १७ ॥
१७) समाजामध्यें जो विचार प्रवाह प्रबळ असतो. त्याला अनुसरुन सामान्य लोक वागतात. त्यांनाआवरुन योग्य मार्गाकडे वळवणारा विचारवंत माणूस क्वचितच आढळतो. 
पृथ्वीचा जाला गळांठा । येकाहून येक मोठा ।
कोण खरा कोण खोटा । कोण जाणे ॥ १८ ॥
१८) सध्याच्या काळी मानव समाजामध्यें जर सगळीकडें गोंधळ माजला आहे, प्रत्येकजण स्वतःला इतरांपेक्षा मोठा समजतो, अशा परिस्थितींत खरा कोण व खोटा कोण हे ठरवणे मोठें कठीण पडते.   
आचार बहुकाचेंत पडिला । कित्येक पोटासाठीं बुडाला ।
अवघा वरपंगचि जाला । साभिमानें ॥ १९ ॥
१९)आचार बहुरंगी होऊन गुंतागुंतीचा झाला आहे. कांहीं आचार पोट भरण्याच्या पायीं बुडाला. उरलेला अचार केवळ वरपांगीपणानें पाळला जातो. देहाच्या ाबहिमानानें लोक केवळ देखाव्यासाठीं लोक आचार पाळतात. 
देव जाले उदंड । देवांचें मांडलें भंड । 
भूतादेवतांचें थोतांड । येकचि जालें ॥ २० ॥
२०) समाजामध्यें पुष्कळ देव निर्माण झालें आहेत. त्यांचे निरर्थक महत्व वाढलें आहे. भूतें व देवता यांचें भलतेंच माहात्म्य एकमेकांत मिसळलें गेलें आहे.  
मुख्य देव तो कळेना । काशास कांहींच मिळेना ।
येकास येक वळेना । अनावर ॥ २१ ॥
२१) मुख्य देव तो कोणता हें कळेनासें झालें आहे. कशाचा कशाशी मेळ बसत नाही. स्वैराचारास आवर घालणारा कोणी आढळत नाही.  
ऐसा नायेक सला विचार । कोण पाहातो सारासार ।
कैंचा लहान कैंचा थोर । कळेचिना ॥ २२ ॥
२२) याप्रमाणें सर्व समाज विचारभ्रष्ट झाला आहे. सारासार विवेक करणारा कोणी उरला नाहीं. लहान कोण व मोठा कोण हे ठरवण्यास कांहीं मार्गच उरला नाहीं. 
शास्त्रांचा बाजार भरला । देवांचा गल्बला जाला ।
लोक कामनेच्या व्रताला । झोंबोन पडती ॥ २३ ॥
२३) शास्त्रांचा जणू बाजार भरला आहे. देवांची तर नुसती गर्दी झाली आहे. आणि बहुजन समाज प्रापंचिक वासना पूर्ण करणार्‍या व्रतांच्या नादी वेड्यासारखा लागला आहे.  
ऐसें अवघें नासलें । सत्यासत्य हारपलें ।
अवघें अनायेक जालें । चहूंकडे ॥ २४ ॥
२४) अशारीतीनें लोक समाज सर्व अंगांनी बिघडून गेलेला आहे. सत्यासत्याचा फरक हरवल्यासारखा झाला आहे. चोहीकडे केवळ अराजकच माजलेले आढळते.  
मतामतांचा गल्बला । कोणी पुसेना कोणाला ।
जो जे मतीं सांपडला । तयास तेंचि थोर ॥ २५ ॥
२५) नानात र्‍हेच्या मतमतांतराचा बुजबुजाट झाला आहे. कोणी कोणाला विचारी नासा झाला आहे. ज्याला जें मत आढळते तेच त्याला उत्तम व थोर वाटते.  
असत्याचा अभिमान । तेणें पाविजे पतन ।
ह्मणोनियां ज्ञाते जन । सत्य शोधिती ॥ २६ ॥
२६) जो असत्याचा अभिमान धरतो त्याचे अधःपतन होते. म्हणून ज्ञानी माणसें  सत्याचा शोध करतात.   
लोक वर्तती सकळ । तें ज्ञात्यास करतलमळ ।
आतां ऐका केवळ । विवेकी हो ॥ २७ ॥
२७) सामान्य माणसांची देवाच्या बाबतींत असणारी कल्पना आणि त्यांची देवाशीं वागणूक दोन्ही खर्‍या नसतात. ही गोष्ट जाणत्या पुरुषांना अगदी स्पष्ट दिसते. आतां जाणत्या विवेकी माणसानें खर्‍या देवाविषयीं नीट श्रवण करावें.   
लोक कोण्या पंथें जाती । आणि कोण्या देवास भजती ।
ऐसी हे रोकडी प्रचिती । सावध ऐका ॥ २८ ॥
२८) सामान्य लोक कोणत्या मार्गानें जातात आणि कोणत्या देवाला भजतात, याचे प्रत्यक्ष पाहिलेले वर्णन करतो. श्रोत्यांनी तें लक्ष देऊन ऐकावें. 
मृतिका धातु पाषाणादिक । ऐसिया प्रतिमा अनेक ।
बहुतेक लोकांचा दंडक । प्रतिमादेवीं ॥ २९ ॥
२९) धातु, दगड, माती वगैरेपासून तयार केलेल्या देवाच्या अनेक प्रतिमा असतात. या प्रतिमा म्हणजेच देव होय अशी बहुतेक लोकांची कल्पना असते.   
नाना देवांचे अवतार । चरित्रें ऐकती येक नर ।
जप ध्यान निरंतर । करिती पूजा ॥ ३० ॥
३०) देवाचे अनेक अवतार होऊन गेले. पुष्कळ लोक त्या अवतारांची चरित्रें ऐकतात. त्यांची पूजा करतात. त्यांचा जप करतात. त्यांचे निरंतर ध्यान करतात. 
येक सकळांचा अंतरात्मा । विश्र्वी वर्ते जो विश्र्वात्मा । 
द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा । मानिती येक ॥ ३१ ॥
३१) सर्वांचा जो अंतरात्मा आहे त्याला कांहीं लोक देव मानतात. विश्र्वांत व्यापून असणार्‍या आणि त्यास चालवणार्‍या विश्वात्म्यालाच कांहीं लोक देव मानतात. तर साक्षीपणानें असणारा जो ज्ञानात्मा द्रष्टा त्याला कांहीं लोक देव मानतात.       
येक ते निर्मळ निश्र्चळ । कदापी नव्हेति चंचळ ।
अनन्यभावें केवळ । वस्तुच ते ॥ ३२ ॥
३२) कधीहीं न चळणारी अशी जी निर्मळ व निश्चल शाश्वत सद्वस्तु किंवा ब्रह्मवस्तु तिच्याशी अनन्यपणें तदाकार झालेले, स्वतः ब्रह्मरुप झालेले कांहीं लोक असतात. 
येक नाना प्रतिमा । दुसरा अवतार महिमा ।
तिसरा तो अंतरात्मा । चौथा तो निर्विकारी ॥ ३३ ॥
३३) यावरुन असें दिसतें कीं देव चार प्रकारचे आहेत. १) नाना प्रकारच्या प्रतिमा २) अवतारांचा महिमा ३) सर्वांचा अंतरात्मा आणि ४) निर्विकार परब्रह्म.
ऐसे हे चत्वार देव । सृष्टीमधील स्वभाव ।           
यावेगळा अंतर्भाव । कोठेंचि नाहीं ॥ ३४ ॥
३४) असे हे चार प्रकारचे देव आहेत. मानवाच्या स्वभावाला धरुन हे चार प्रकार आढळतात. या चार प्रकारांच्या व्यतिरिक्त पांचवा प्रकार माणसांच्या अंतर्यामी आढळत नाहीं. 
अवघें येकचि मानिती । ते साक्ष देव जाणती ।
परंतु अष्टधा प्रकृति । वोळखिली पाहिजे ॥ ३५ ॥
३५) देव येथून तेथपर्यंत एकच आहे. तो सर्वांचा साक्षी आहे. तो सर्व जाणतो. असें कांहीं लोक मानतात. पण देवाला जो साक्षीपणा येतो. तो अष्टधा प्रकृतिमुळें येतो. हें बरोबर समजले पाहिजे.  
प्रकृतीमधील देव । तो प्रकृतीचा स्वभाव ।
भावातीत माहानभाव । विवेकें जाणावा ॥ ३६ ॥
३६) प्रकृतीला साक्षीपणें पाहणारा देव हा प्रकृतीच्या स्वभावाचा म्हणजे चंचल किंवा अशाश्वत असणार हें उघड आहे. मूळ देवाला पाहणें ठाऊक नाही. प्रकृति निर्माण झाल्यावर त्याच्यावर साक्षीपणाने पाहण्याचा आरोप आला. प्रकृतीमधून निर्माण झालेला हा साक्षीपणाचा आरोप प्रकृतीप्रमाणेंच अशाश्वत असतो. म्हणून कोणत्याही होण्यापलीकडे किंवा कल्पनेपलिकडे असलेला दिव्य भाव म्हणजेच केवळ अस्तित्व तें विवेकानें जाणावें.   
जो निर्मळास ध्याईल । तो निर्मळचि होईल ।
जो जयास भजेल । तो तद्रूप जाणावा ॥ ३७ ॥
३७) मायामलरहित ब्रह्मवस्तूचें जो सतत चिंतन करतो तो ब्रह्मस्वरुपच बनतो. जो मायामय द्वैतास भजतो, भयानें भरलेल्या प्रकृतीचें जो सतत चिंतन करतो तो भयानें व्यापला जातो. हें समजावें. 
क्षीर नीर निवडिती । ते राजहंस बोलिजेती ।
सारासार जाणती । ते महानभाव ॥ ३८ ॥
३८) दूध व पाणी जे वेगळे करतात त्यांना राजहंस म्हणतात. शाश्वत व अशाश्वत वेगळे करुन जे शाश्वतास जाणतात त्यांना थोर अनुभवी संत म्हणतात.  
अरे जो चंचळास ध्याईल । तो सहजचि चळेल ।
जो निश्र्चळास भजेल । तो निश्र्चळचि ॥ ३९ ॥
३९) अहो काय सांगावें जो अशाश्वताचे सतत चिंतन करतो, तो अस्थिरप्रज्ञच राहतो. जो शाश्वताचे सतत चिंतन करतो तो स्थिरप्रज्ञ बनतो.   
प्रकृतीसारिखें चालावें । परी अंतरीं शाश्र्वत वोळखावें ।
सत्य होऊन वर्तावें । लोकांऐसें ॥ ४० ॥
४०) म्हणून जाणत्या पुरुषानें देहानें अशाश्वत प्रकृतीप्रमाणें वागावें. परंतु अंतर्यामीं शाश्वत ब्रह्म ओळखून असावें. आंतून ब्रह्मस्वरुप असावें व बाहेरुन मात्र चार लोकांसारखें वर्तन ठेवावें.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चत्वारदेवनिरुपणनाम समास दुसरा ॥
Samas Dusara ChatvarDev Nirupan 
समास दुसरा चत्वारदेव निरुपण



Custom Search

No comments: