Thursday, January 11, 2018

Samas Pahila Siddhant Nirupan समास पहिला सिद्धान्तनिरुपण


Dashak Aakarava Samas Pahila Siddhant Nirupan 
Samas Pahila Siddhant Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Chala and Achala in this Samas. Chala means Maya, the world which we see. It is not permanent. While Achala means Brahma, which is permanent and we can’t see it.
समास पहिला सिद्धान्तनिरुपण
श्रीराम ॥
आकाशापासून वायो होतो । हा तो प्रत्यये येतो ।
वायोपासून अग्नी जो तो । सावध ऐका ॥ १ ॥
१) आकाशापासून वायु होतो हे प्रत्यक्ष अनुभवास येते. वायूपासून अग्नि होतो, तो कसा होतो ते लक्ष देऊन ऐका.
वायोची कठिण घिसणी । तेथें निर्माण झाला वन्ही ।
मंद वायो सीतळ पाणी । तेथुनि जालें ॥ २ ॥
२) वायूमध्यें जें कठीण घर्षण होते त्याच्यापासून अग्नि निर्माण होतो. मंद वायूपासून थंड पाणी निर्माण होते.
आपापासून जाली पृथ्वी । ते नाना बीजरुप जाणावी ।
बीजापासून उत्पत्ति व्हावी । हा स्वभावचि आहे ॥ ३ ॥
३) पाण्यापासून पृथ्वी निर्माण होते. पृथ्वीमधें अनेक बीजे आहेत. बीजापासून वनस्पतींची, प्राणीमात्रांची निर्मिती होते हा निसर्गाचा नियमच आहे.
मुळीं सृष्टी कल्पनेची । कल्पना आहे मुळींची ।
जयेपासून देवत्रयाची । काया जाली ॥ ४ ॥
४) हें दृश्य विश्व कल्पनामय आहे. कल्पना मुळ मायेपर्यंत पोहोचते. ब्रह्मा, विष्णु व महेश हे तीन देव मूळमायेंतूनच आले. 
निश्र्चळामधें चंचळ । ते चि कल्पना केवळ ।
अष्टधा प्रकृतीचें मूळ । कल्पनारुप ॥ ५ ॥
५) निश्चल ब्रह्मामधें चंचल दिसणें हें कल्पनेचें अगदी प्रथम स्वरुप होय. म्हणून अष्टधा प्रकृति कल्पनेतून निर्माण झाली.
कल्पना तेचि अष्टधा प्रकृति । अष्टधा तेचि कल्पनामूर्ती ।
मुळापासून उत्पत्ति । अष्टधा जाणावी ॥ ६ ॥
६) कल्पना आकार  घेऊन आली ती अष्टधा प्रकृति होय. म्हणून अष्टधा प्रकृति कल्पनारुप आहे. मुळापासून शेवटपर्यंत सर्व सृष्टि अष्टधा आहे हे जाणावे.  
पांच भूतें तीन गुण । आठ जालीं दोनी मिळोन ।
म्हणौनि अष्टधा प्रकृति जाण । बोलिजेते ॥ ७ ॥
७) पांच भूतें व तीन गुण मिळून आठ तत्वें होतात. यामुळें सृष्टिला अष्टधा असे म्हणतात. 
मुळीं कल्पनारुप जाली । पुढें तेचि फापावली । 
केवळ जडत्वास आली । सृष्टिरुपें ॥ ८ ॥
८) मुळांत सूक्ष्म कल्पना होती. नंतर ती फोफावली व वाढली नंतर विश्र्वाच्या रुपानें तिनें दृश्य आकार धारण केला.
मुळीं जाली ते मूळमाया । त्रिगुण जाले ते गुणमाया ।
जडत्व पावली ते अविद्या माया । सृष्टिरुपें ॥ ९ ॥
९) अगदी मूळ ब्रह्मामध्यें जी कल्पना झाली ती मूलमाया होय. तिच्यांत गुण प्रगटले तेव्हां ती गुणमाया झाली. आणि दृश्य, इंद्रियगोचर विश्वाच्या रुपानें ती जडत्व पावली तेव्हां ती अविद्यामाया बनली.
पुढें च्यारी खाणी जाल्या । च्यारी वाणी विस्तारल्या ।
नाना योनी प्रगटल्या । नाना वेक्ती ॥ १० ॥
१०) त्यानंतर जीवाच्या चार खणी झाल्या. चार वाणींचा विस्तार झाला. शेवटी अनेक प्रकारच्या योनी व त्यांत अनेक जीवप्राणी उत्पन्न झालें.  
ऐसी जाली उभारणी । आतां ऐका संव्हारणी ।
मागील दशकीं विशद करुनि । बोलिलें असे ॥ ११ ॥
११) याप्रमाणें विश्र्वाची उभारणी झाली. आतां विश्र्वाची संहारणी ऐकावी. संव्हारणीचा क्रम मागील दशकांत सविस्तर सांगितला आहे. 
परंतु आतां संकळित । बोलिजेल संव्हारसंकेत ।
श्रोते वक्ते येथें चित्त । देऊन ऐका ॥ १२ ॥
१२) या ठिकाणीं सव्हांर क्रम थोडक्यांत सांगतो. श्रोत्यावक्त्यांनी लक्ष देऊन ऐकावें. 
शत वरुषें अनावृष्टि । तेथें आटेल जीवसृष्टि ।
ऐशा कल्पांताच्या गोष्टी । शास्त्रीं निरोपिल्या ॥ १३ ॥
१३) शंभर वर्षें पाऊस न पडल्यानें पृथ्वीवरील सर्व जीव नाश पावतील. हा कल्पान्त कसा घडून येईल याचे वर्णन शास्त्रां मध्यें आढळते. 
बाराकळीं तपे सूर्य । तेणें पृथ्वीची रक्षा होये ।
मग ते रक्षा विरोन जाये । जळांतरी ॥ १४ ॥
१४) बारा प्रकारच्या किरणांनी सूर्य तापेल. त्यामुळें पृथ्वीची राख होईल. ती राख पाण्यांत विरुन जाईल. 
तें जळ शोषी वैश्र्वानरु । वन्ही झडपी समीरु ।
समीर वितुळे निराकारु । जैसें तैसें ॥ १५ ॥
१५) अग्नि ते पाणी शोषून घेईल. त्या अग्नीला वायु विझवून टाकील. शेवटी वायूही नाहींसा होतो व निराकार ब्रह्म मात्र जसेंच्या तसे शिल्लक राहते.
ऐसी सृष्टिसंहारणी जाली । मागां विस्तारें बोलिली ।
मायानिरासें उरली । स्वरुपस्थिति ॥ १६ ॥
१६) सृष्टिचा संव्हार असा घडतो. मागे तो सविस्तर सांगितला आहे. अशा रीतीनें विश्र्वाचा संव्हार झाल्यावर मायेचा निरास होतो. मायेचा निरास झाल्यावर केवळ निर्विकार स्वरुपस्थिती उरते. 
तेथें जीवशिव पिंडब्रह्मांड । आटोन गेलें थोतांड ।
मायेअविद्येचें बंड । वितळोन गेलें ॥ १७ ॥
१७) तेथें जीव नाही, शिव नाही, पिंड नाही तसेंच ब्रह्मांडही नाही. हें सगळें कल्पनेचे थोतांड नाहीसें होते. माया व अविद्या यांचे बंड मावळून जाते.  
विवेकेंचि बोलिला क्षये । म्हणोनि विवेकप्रळये ।
विवेकी जाणती काये । मूर्खास कळे ॥ १८ ॥
१८) विवेकानें जो दृश्याचा संहार करायचा त्याला विवेकप्रळय म्हणतात. हा प्रलय कसा करावचा ते विवेकी पुरुष जाणतात. मूर्खांना ते कळणार नाही. 
सृष्टि शोधितां सकळ । येक चंचळ येक निश्र्चळ ।
चंचळास कर्ता चंचळ । चंचळरुपी ॥ १९ ॥  
१९) सारें विश्र्व शोधून पाहीलें तर दोन तत्वें आढळतात. एकचंचळ व दुसरें निश्र्चळ. चंचळाचा कर्ता चंचळ असून तो चंचळ स्वरुप असतो.       
जो सकळ शरीरीं वर्ते । सकळ कर्तुत्वास प्रवर्ते ।
करुन अकर्ता हा वर्ते । शब्द जया ॥ २० ॥ 
२०) तो सर्व प्राण्यांच्या शरीरांत राहतो. ती शरीरें चालवतो. शरीराच्या कर्तृत्वास प्रेरणा देतो. तो करुन अकर्ता आहे. अशा शब्दांनी त्याचे वर्णन करतात.   
राव रंक ब्रह्मादिक । सकळांमधें वर्ते येक ।
नाना शरीरें चाळक । इंद्रियेंद्वारें ॥ २१ ॥ 
२१) गरीब, श्रीमंत आणि ब्रह्मांदिक देव या सर्वांच्या अंतर्यामी तोच एक राहून त्यांना चालवतो. इंद्रियांच्या मार्फत अनेक देहांचे व्यवहार तो चालवतो.   
त्यास परमात्मा बोलती । सकळ कर्ता ऐसें जाणती ।
परि तो नासेल प्रचिती । विवेकें पाहावी ॥ २२ ॥
२२) त्याला परमात्मा असे म्हणतात. तो सर्व कर्ता आहे ही गोष्ट सर्व जाणतात. परंतु तो देखील अखेर नाश पावणारा आहे, याचे खरें-खोटेपण विवेकानें शोधून पहावें.      
जो स्वानामधें गुरगुरितो । जो सूकरांमधें कुरुकरितो । 
गाढवीं भरोन भुंकतो । आटाहास्यें ॥ २३ ॥
२३) कुत्र्यामधें तो गुरगुरतो. डुकरामधें तो कुरकुरतो. गाढवाच्या अंतर्यामी भरुन तो अट्टहासानें ओरडतो. 
लोक नाना देह देखती । विवेकी देहांत पाहाती ।
पंडित समदर्शनें घेती । येणें प्रकारें ॥ २४ ॥
२४) सामान्य माणसे प्राण्यांचा वरवरचा तेवढा देह पाहतात. पण विवेकी माणसें त्यांच्या अंतर्यामी राहणार्‍या जाणीवकलेकडे पाहतात. अशा रीतीनें जाणते लोक सर्व प्राण्यांना सारखेपणानें समजतात. व तसें वागवतात. 
श्र्लोक 
विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शनि चैव श्र्वपाके च पंडिताः समदर्शिनः ॥
अर्थ
विद्या आणि विनय यांनी संपन्न असलेल्या ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना विवेकी पुरुष सारखेपणानें पाहून त्यांच्याशी समत्वानें वागतात. 
देह पाहातां वेगळाले । परंतु अंतर येकचि जालें । 
प्राणीमात्र देखिलें । येकांतरें ॥ २५ ॥
२५) प्राण्यांचे देह पाहीले तर ते वेगवेगळे दिसतात. पण सर्वांचे अंतःकरण मात्र एकच असते. त्यामुळे विवेकी माणसे अंतरंगाकडे लक्ष देऊन सर्वांना सारखेपणाने पाहतात. 
अनेक प्राणी निर्माण होती । परी येकचि कळा वर्तती ।
तये नांव जगज्जोती । जाणतीकळा ॥ २६ ॥
२६) अनेक प्रकारचे प्राणी निर्माण होतात हे खरें. परंतु त्या सगळ्याांना वागवणारी व  चालवणारी जीवनकला एकच आहे. तिला जगत्ज्योति किंवा जाणीवकला म्हणतात.   
श्रोत्रीं नाना शब्द जाणे । त्वचेमधें सीतोष्ण जाणे ।
चक्षुमधें पाहों जाणे । नाना पदार्थ ॥ २७ ॥
२७) कानाच्या द्वाराने ती अनेक शब्द जाणते. त्वचेच्या द्वारानें ती थंडगरम जाणते. डोळ्यांच्या द्वारानें ती अनेक पदार्थ पहाणें जाणते.  
रसनेनधें रस जाणे । घ्राणामधें वास तो जाणे ।
कर्मइंद्रियामधें जाणे । नाना विषयस्वाद ॥ २८ ॥
२८) जिभेच्या द्वारे ती रस जाणते. नाकाच्या द्वारे ती वास घेणे जाणते. कर्मेंद्रियांच्या द्वारे ती अनेक प्रकारच्या देहसुखाची गोडी घेण्याचे जाणते.  
सूक्ष्म रुपें स्थूळ रक्षी । नाना सुखदुःखे परीक्षी ।
त्यास म्हणती अंतरसाक्षी । अंतरात्मा ॥ २९ ॥
२९) स्वतः ती सूक्ष्मरुप आहे. पण आपण सूक्ष्म असून ती स्थूल देहाचें रक्षण करते. नाना प्रकारच्या सुखदुःखांची बरोबर परीक्षा करते. अंतर्यामी राहणार्‍या या सूक्ष्म जाणीवकलेला अंतरसाक्षी किंवा अंतरात्मा म्हणतात.   
आत्मा अंतरात्मा विश्र्वात्मा । चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा ।
जीवात्मा शिवात्मा परमात्मा । द्रष्टा साक्षी सत्तारुप ॥ ३० ॥
३०) तिची आणखी नांवे अशी आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य, सर्वात्मा, सूक्ष्मात्मा, जीवात्मा, परमात्मा, शिवात्मा, द्रष्टा, साक्षी व सत्तारुप.
विकारामधील विकारी । अखंड नाना विकार करी ।
तयास वस्तु म्हणती भिकारी । परम हीन ॥ ३१ ॥
३१) जगत् ज्योती विकारामधिल विकार आहे. व ती अखंडपणें नाना विकार निर्माण करते. तरी कांहीं झाले तरी ती निश्र्चळ परब्रह्म वस्तु होऊं शकत नाही. परंतु अनुभवाने व विवेकानें दरिद्री असलेले हीन पातळीवरील लोक त्याजगत ज्योतीलाच ब्रह्मवस्तु म्हणतात.   
सर्व येकचि दिसती । अवघा येकंकार करिती ।
ते अवघी माईक स्थिती । चंचळामधें ॥ ३२ ॥
३२) अशा अध्यात्मदरिद्री लोकांना निश्चळ व चंचळ सगळें एकच दिसते. सगळ्यातत्वानां एकत्र घालून त्यांचा ते सबगोलांकार करतात. असें करणें हेही चंचळामध्यें असणार्‍या मायिक स्थितीचा परिणाम आहे. 
चंचळ माया ते माईक । निश्र्चळ परब्रह्म येक ।
नित्यानित्यविवेक । याकारणे ॥ ३३ ॥
३३) चंचळ किंवा विकारी तेवढें सगळें मूळमायेंतून निर्माण होते. ते खरे नसते. निश्र्चळ परब्रह्म तेवढें एकटेंच खरें असते. या खर्‍याखोट्याचा निश्र्चित अनुभव येण्यासाठीं नित्य किंवा निश्र्चळ काय आणि अनित्य किंवा चंचळ काय याचा विवेक करायचा असतो.    
जातो जीव तो प्राण । नेणे जीव तो अज्ञान ।
जन्मतो जीव तो जाण । वासनात्मक ॥ ३४ ॥
३४) जीव जातो असे आपण म्हणतो तेव्हां माणसाचा प्राण जातो. जीवाला कळत नाहीं असें आपण म्हणतो तेव्हां तें अज्ञान असते. जीव जन्मतो असे आपण म्हणतो तेव्हां वासना साकार होऊन येते.     
ऐक्य जीव तो ब्रह्मांश । जेथें पिंडब्रह्मांडनिरास ।
येथें सांगतले विशेष । चत्वार जीव ॥ ३५ ॥
३५) जीव ब्रह्माशी ऐक्य पावतो असें आपण म्हणतो तेव्हां जीवांतील ब्रह्मांशाला उद्देशून बोलतो. ब्रह्माशी तदाकार स्थितीमध्यें पिंडब्रह्मांडाचा निरास होतो. येथे जीव देखील चार प्रकारचे सांगितले आहेत.  
असो हे अवघें चंचळ । चंचळ जाईल सकळ ।
निश्र्चळ तें निश्र्चळ । आदिअंतीं ॥ ३६ ॥
३६) असो. हे सगळें चंचळ आहे. तें चंचळ आहे म्हणून विनाशी आहे. पण जें निष्चळ आहे ते आरंभापासून अखेरपर्यंत अविनाशी असते. 
आद्य मध्य अवसान । जे वस्तु समसमान ।
निर्विकारी निर्गुण निरंजन । निःसंग निःप्रपंच ॥ ३७ ॥
३७) आरंभ, मध्य व अखेर या तिन्ही अवस्थांमध्यें जी वस्तु विकाररहित राहते , थोडाही बदल न होतां जशीच्या तशी राहते, ती परब्रह्म वस्तु होय. ती निर्विकारी, निर्गुण, निरंजन, निःसंग व निःप्रपंच असते.   
उपाधीनिरासें तत्वता । जीवशिवास ऐक्यता ।
विवंचून पाहों जातां । उपाधि कैंची ॥ ३८ ॥
३८) जीवाला उपाधी असतात. त्यांचा निरास झाला कीं जीव शिवाशी ऐक्य पावतो. उपाधीचा निरास करण्यास विवेक हाच उपाय आहे. विवेक केल्यानें उपाधी उरत नाही.  
असो जाणणें तितुकें ज्ञान । परंतु होतें विज्ञान ।
मनें वोळखावें उन्मन । कोण्या प्रकारें ॥ ३९ ॥
३९) आपण जे जे जाणतो ते ते ज्ञान होतें. परंतु त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला की ज्ञानाचें विज्ञान बनते. विज्ञानाना मध्यें मन उन्मन होते. उन्मन कसें होते हे सध्याच्या मनाला आकलन होत नाही.  
वृत्तीस न कळे निवृत्ति । गुणास कैंची निर्गुणप्राप्ती ।
गुणातीत साधक संतीं । विवेकें केलें ॥ ४० ॥
४०) वृत्तिरुप ज्ञानाला निवृत्ती कशी असते हें कळत नाहीं. गुणांच्या अंमलाखाली राहणार्‍यास त्याच्या पलीकडे असणार्‍या निर्गुणापर्यंत पोचंता येत नाही. जो साधक असतो त्याला संत सद्गुरु विवेकाच्या योगानें गुणातीत करुन सोडतात. 
श्रवणापरीस मनन सार । मननें कळे सारासार ।
निजध्यासें साक्षात्कार । निःसंग वस्तु ॥ ४१ ॥
४१) सद्गुरुकडून श्रवण करणें ही पहिली पायरी आहे. त्या श्रवणाहून मनन श्रेष्ठ आहे. कारण मननाने सारासार समजते. मननाहून निदिध्यास श्रेष्ठ, कारण निदिध्यासानें निःसंग आत्मवस्तूचा साक्षात्कार घडतो. 
निर्गुणीं जे अनन्यता । तेचि मुक्ति सायोज्यता ।
लक्ष्यांश वाच्यांश आतां । पुरे जाला ॥ ४२ ॥
४२) निर्गुण ब्रह्माशी तदाकार होणें यास सायुज्यमुक्ति म्हणतात. येथपर्यंत पोचल्यावर लक्ष्यांश आणि वाच्यांश आपोआप मागे राहतात.
अलक्षीं राहिलें लक्ष । सिद्धांतीं कैंचा पूर्वपक्ष ।
अप्रत्यक्षास कैचें प्रत्यक्ष । असोन नाहीं ॥ ४३ ॥
४३) निर्गुणाशी अनन्य होणें म्हणजे जेथें लक्ष पोचूं शकत नाहीं तेथें लक्ष ठेवणें होय. सिद्धन्त हस्तगत झाल्यावर तेथें पूर्वपक्षाचे काम संपते. ब्रह्मस्वरुप अतिंद्रिय असल्यानें इंद्रियांनी प्रत्यक्षपणें ते पाहता येत नाही. इंद्रियांच्या दृष्टीनें तें स्वरुप असून नसल्यासारखें होते.    
असोन माईक उपाधी । तेचि सहजसमाधी ।
श्रवणें वळावी बुद्धी । निश्र्चयाची ॥ ४४ ॥
४४) मायामय दृश्याची उपाधी भोवंती असून निर्गुणाशी अनन्यता टिकली म्हणजे त्या स्थितीला सहज समाधि म्हणतात. ती साध्य होण्याकरितां प्रथम श्रवणानें बुद्धीमध्यें स्वरुपाबद्दल निश्र्चय निर्माण होणें आवश्यक असते.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सिद्धांतनिरुपणनाम समास पहिला ॥
Samas Pahila Siddhant Nirupan 
समास पहिला सिद्धान्तनिरुपण



Custom Search

No comments: