Sunday, February 18, 2018

Samas Navava Yatna Shikavan समास नववा यत्नशिकवण


Dashak Barava Samas Navava Yatna Shikavan 
Samas Navava Yatna Shikavan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Yatna. Yatna means efforts. The importance of Yatna i.e. taking efforts to do something to achieving it, is nicely told by Samarth Ramdas. It changes our life for betterment.
समास नववा यत्नशिकवण 
श्रीराम ॥
दुर्बल नाचारी वोडगस्त । आळसी खादाड रिणगस्त ।
मूर्खपणें अवघें वेस्त । कांहींच नाहीं ॥ १ ॥
१) कोणाचा आधार नसलेला एक दुर्बळ माणूस होता. त्याची सर्व बाजूंनी ओढाताण होती. तो आळशी, खादाड व कर्जबाजारीही होता. मूर्खपणाच्या वागणूकीनें त्याचे जीवन अस्ताव्यस्त झाले होते. कांहींच व्यवस्थित नव्हते.  
खाया नाहीं जेवाया नाहीं । लेया नाहीं नेसाया नाहीं ।
अंथराया नाहीं पांघराया नाहीं । कोंपट नाहीं अभागी ॥ २ ॥
२) त्या अभागी माणसाला कांहीं खायला नाहीं, जेवायला नाहीं, अंगावर घ्यायला व नेसायला वस्त्र नाहीं. अंथरायला, पांघरायला नाहीं, राहायला झोपडी पण नाहीं अशी त्याची दीनवाणी अवस्था झाली होती. 
सोयेरे नाहीं धायेरे नाहीं । इष्ट नाहीं मित्र नाहीं ।
पाहातां कोठे वोलखी नाहीं । आश्रयेंविण परदेसी ॥ ३ ॥
३) त्याला कोणी सगे सोयरे, मित्र नव्हतें, कोणाचा आश्रय नव्हता त्यामुळें स्वदेशांत असूनही तो परदेशी असल्यासारखा जगत होता. 
तेणें कैसें करावें । काये जीवेंसीं धरावें ।
वाचावें किं मरावें । कोण्या प्रकारें ॥ ४ ॥
४) अशा माणसानें काय करावें? कोणत्या आशेने जगावें? कोणत्या रीतीनें त्यानें जगावें कां मरुन जावें?  
ऐसें कोणीयेकें पुसिलें । कोणीयेके उत्तर दिधलें ।
श्रोतीं सावध ऐकिलें । पाहिजे आतां ॥ ५ ॥
५) असें प्रश्र्ण कोणी एकानें विचारलें. त्यास जी उत्तरें दिली आहेत. ती श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावीत. 
लाहानथोर काम कांहीं । केल्यावेगळें होत नाहीं ।
करंट्या सावध पाहीं । सदैव होसी ॥ ६ ॥
६) मानवी जीवनाचा असा नियम आहे कीं, कोणतेंही काम मग तें लहान असो वा मोठे असो, केल्याशिवाय होत नाहीं. ज्या अभागी माणसाला भाग्यवान व्हायचे असेल त्यानें हें समजून घेतलें पाहिजे.   
अंतरीं नाहीं सावधानता । येत्न ठाकेना पुरता ।
सुखसंतोषाची वार्ता । तेथें कैंची ॥ ७ ॥
७) चांगला प्रयत्न होण्यास मनांत दक्षता पाहिजे. मनुष्याजवळ सावधानता नसेल तर त्याच्या हातून पुरेसे प्रयत्न होत नाहीत. मगत्यांना जीवनांत सुखसंतोषाचा अनुभव येत नाही. 
म्हणोन आळस सोडावा । येत्न साक्षेपें जोडावा ।
दुश्र्चितपणाचा मोडावा । थारा बळें ॥ ८ ॥
८) म्हणून माणसानें आळस झाडून टाकावा. मोठ्या चिवटपणें प्रयत्न करावा. मनांत येणारे संशय वगैरेला थारा देऊं नये. 
प्रातःकाळीं उठत जावें । प्रातःस्मरामि करावें ।
नित्य नेमें स्मरावें । पाठांतर ॥ ९ ॥
९) नेहमी सकाळीं लवकर उठावें. भगवंताचें स्मरण करावें. पूर्वी जो अभ्यास, पाठांतर केले असेल त्याची उजळणी करावी.
मागील उजळणी पुढें पाठ । नेम धरावा निकट ।
बाष्कळपणाची वटवट । करुंच नये ॥ १० ॥
१०) उजळणी व नविन कांहीं पाठ करणें. असा नित्य नेम धरावा. वायफळ बोलणें सोडून द्यावें. 
दिशेकडे दुरी जावें । सुचिस्मंत होऊन यावें ।
येतां कांहीं तरी आणावें । रितें खोटें ॥ ११ ॥
११) मग लांब कोठेतरी शौचास जावें.अणि निर्मळ होऊन यावें. परत येतांना कांहींतरी घेऊन यावे. रिकाम्या हातानें येऊं नये. 
धूतवस्त्रें घालावीं पिळून । करावें चरणक्षाळण । 
देवदर्शन देवार्चन । येथासांग ॥ १२ ॥
१२) पाय धुवावें. आपले धुवून आणलेले कपडे पिळून वाळत घालावेत. नंतर देवपूजा व व्यवस्थित देवदर्शन करावें.  
कांहीं फळाहार घ्यावा । पुढें वेवसाये करावा ।
लोक आपला परावा । म्हणत जावा ॥ १३ ॥
१३) नंतर कांहीं फळाहार घ्यावा. मग आपला व्यवसाय करावा. जनांमध्यें आपला कोण व आपला कोण नाहीं हें ओळखून चालावें.  
सुंदर अक्षर ल्याहावें । पष्ट नेमस्त वाचावें ।
विवरविवरों जाणावें । अर्थांतर ॥ १४ ॥
१४) लिहीणें सुंदर अक्षरांत करावें. वाचतांना स्पष्ट बरोबर वाचावें. पुनः पुनः विचार करुन मनन करुन त्याचा खरा अर्थ समजून घ्यावा. 
नेमस्त नेटकें पुसावें । विशद करुन सांगावें ।
प्रत्ययेंविण बोलावें । तेंचि पाप ॥ १५ ॥
१५) कोणाल कांहीं विचारयाचें तें नेमकें व स्पष्टपणें विचारावें. कोणाला कांहीं सांगावयाचे असल्यास नेमके, नीट उकलून व स्पष्ट करुन सांगावें. स्वतःला अनुभव असल्याशिवाय ज्ञानाच्या गप्पा मारणें म्हणजें पापच होय.  
सावधानता असावी । नीतिमर्यादा राखावी ।
जनास माने ऐसी करावी । क्रियासिद्धि ॥ १६ ॥
१६) नेहमी सावध असावें. नीतीची मर्यादा राखून वागावें. कोणतेंही काम करावयाचे ते लोकांना पसंत पडेल अशारीतीनें करावें. 
आलियाचें समाधान । हरिकथा निरुपण ।
सर्वदा प्रसंग पाहोन । वर्तत जावें ॥ १७ ॥
१७) जो कोणी आपल्याकडे येईल त्याचे समाधान करावें. भगवंताची कथा करतअसावें. अध्यात्माचे निरुपण चालूं ठेवावें. नेहमी प्रसंग पाहून वागावें.  
ताळ धाटी मुद्रा शुद्धा । अर्थ प्रमये अन्वये शुद्ध ।
गद्यपद्यें दृष्टांत शुद्ध । अन्वयाचे ॥ १८ ॥
१८) ताल, धाटी, शुद्ध मुद्रा, अर्थ, प्रमेय, शुद्ध अन्वय, गद्य, पद्य, शुद्ध व उचित दृष्टांत,
गाणें वाजवणें नाचणें । हस्तन्यास दाखवणें ।
सभारंजकें वचनें । आडकथा छंदबंद ॥ १९ ॥
१९) गाणें, बजावणें, नाचणें, हातांचा अभिनय दाखवणें, श्रोत्यांच्या मनाला प्रसन्न करणारी वचनें सांगणें, छंद व बंद या सार्‍या गोष्टी भगवंताची कथा करतांना वापराव्या.   
बहुतांचें समाधान राखावें । बहुतांस मानेल तें बोलावें ।
विलग पडों नेदावें । कथेमधें ॥ २० ॥
२०) पुष्कळांचें समाधान होईल अशी कथा करावीं. पुष्कळांना आवडेल व पसंत पडेल असें बोलावें. आपल्या कथेंत विसंगति येऊं देवू नये. 
लोकांस उदंड वाजी आणूं नये । लोकांचे उकलावें हृदये ।
तरी मग स्वभावें होये । नामघोष ॥ २१ ॥
२१)  श्रोत्यांना फार कंटाळा येईल अशी कथा करुं नये. उलट लोकांचे मनोगत उकलेल असें मार्मिक बोलावे. मग लोक भगवंताचा नामघोष सहजच करतील.
भक्ति ज्ञान वैराग्य योग । नाना साधनाचे प्रयोग ।
जेणें तुटे भवरोग । मननमात्रें ॥ २२ ॥
२२) आपल्या कथेंत, निरुपणांत भक्ति, ज्ञान, वैराग्य, योग आणि अजुनकांहीं गोष्टींचा उपयोग करावा. कीं, ज्यायोगे श्रोत्यांच्या मननाने त्यांचा भवरोग नष्ट होईल. 
जैसें बोलणें बोलावें । तैसेंचि चालणें चालावें ।
मग महंतलीळा स्वभावें । आंगीं बाणे ॥ २३ ॥
२३) आपण जसें बोलतों तसें वागावें. मग महंताला शोभेल असें वागणें सहजच अंगीं बाणते. 
युक्तिवीण साजिरा योग । तो दुराशेचा रोग ।
संगतीच्या लोकांचा भोग । उभा ठेला ॥ २४ ॥
२४) महंतपणाचा योग येणें उत्तम पण महंताच्या अंगीं वागण्याचे कौशल्य नसेल तर तो योग नाहीं तो दुराशेचा रोगच समजावा. अशा महंताची संगत करणार्‍या लोकांचा कांहींतरी भोगच उभा राहिला असें समजावे.  
ऐसें न करावें सर्वथा । जनास पावऊं नये वेथा ।
हृदईं चिंतावें समर्था । रघुनाथजीसी ॥ २५ ॥
२५) महंतानें लोकांना त्रास व दुःख होईल असें कधीहीं वागू नये. त्यानें आपल्या हृदयामध्यें श्रीरघुनाथाचे चिंतन करण्याचा अभ्यास ठेवावा.  
उदासवृत्तीस मानवे जन । विशेष कथानिरुपण ।
रामकथा ब्रह्मांड भेदून । पैलाड न्यावी ॥ २६ ॥
२६) विरागी व अनासक्त वृत्ति लोकांना आवडते. भगवंताची कथा व निरुपण त्यांना आवडते. म्हणून ब्रह्मांडाचा भेद करुन श्रीरामाची कथा त्याच्याहि पलिकडे नेऊन सोडावी. 
सांग महंती संगीत गाणें । तेथें वैभवास काय उणें ।
नभामाजी तारांगणें । तैसे लोक ॥ २७ ॥
२७) अशा सर्व गुणांनी मंडित महंतपणा असून त्यामधें संगीताची, गायनाची जोड असेल तर मग वैभवाला कमी पडणार नाहीं. चंद्राभोवती जशा तारा जनतात, त्याचप्रमाणें अशा महंताभोवती लोक जमतात.    
आकलबंद नाहीं जेथें । अवघेंचि विश्कळित तेथें ।
येकें आकलेविण तें । काये आहे ॥ २८ ॥
२८) जो मनुष्य बुद्धिनें संपन्न नसतो, त्याच्याजवळ सगळी अव्यवस्थाच असते. जगांत एक हुषारी पाहिजे. हुषारीवाचून कशाला महत्व नाहीं.
घालून अकलेचा पवाड । व्हावें ब्रह्मांडाहून जाड ।
तेथें कैंचें आणिलें द्वाड । करंटपण ॥ २९ ॥
२९) आपल्या बुद्धीचे सामर्थ्य खूप वाढवावे. आपण ब्रह्मांडाहून विशाल होऊन जावें, इतका बुद्धिचा विकास करावा. असें झाल्यावर त्या ठिकाणीं नतद्रष्ट करंटेपणा उरणारच नाहीं.  
येथें आशंका फिटली । बुद्धि येत्नीं प्रवेशली ।
कांहींयेक आशा वाढली । अंतःकर्णी ॥ ३० ॥
३०) अशा रीतीनें मूळ शंकेचे येथें निराकरण झालें. प्रयत्न करायला हवा. हें बुद्धीला पटलें. त्यामुळें आपल्याला भाग्याचे दिवस येतील अशी आशा अंतःकरणांत उदय पावली.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे येत्नसिकवणनाम समास नववा ॥
Samas Navava Yatna Shikavan
समास नववा यत्नशिकवण 


Custom Search

No comments: