Friday, April 20, 2018

MayaPanchakam मायपंचकम्


Adi Shankaracharyas Spiritual Stotras


मायापंचकम्
निरुपमनित्य निरंशकेऽप्यखंडे, 
मयिचिति सर्वविकल्पनादिशून्ये ।
घटयति जगदीशजीवभेदम् ,
अघटितघटनापटीयसी माया ॥ १ ॥ 
१) निरुपम म्हणजे उपमाशून्य, नित्य, निरंश, अखंड, जगदादि सर्व विकल्पनाशून्य, ज्ञानस्वरुप, परब्रह्मरुप जो मीं, त्या माझ्याठिकाणीं अघटितघटना करण्यांत कुशल जी अनिर्वचनीय माया, तीं जगत् , ईश्र्वर व जीव असा भेद दाखविते.
श्रुतिशतनिगमान्तशोधकान् 
अप्यहह धनादिनिदर्शनेन सद्यः ।
कलुपयति चतुष्पदाद्यभिन्नान् 
अघटितघटनापटीयसी माया ॥ २ ॥ 
२) अनेक श्रुति व वेदवाक्यें यांचा शोध करणारे महान् विद्वान, पण आचार्य म्हणतात -- अरेरे ! काय करावें ! किंचित् धनलाभ अगर मान प्राप्त होण्याचा समु प्राप्त झाला असतां आपली विद्वत्ता विसरुन पशुतुल्य वर्तन करण्यास तयार होतात, म्हणजे वेदशास्त्राविरुद्ध वर्तन करण्यास तयार होतात; ब्रह्मदेवादिकांनाहि मोह पाडणारी व अघटित घटना करणारी माया काय करणार नाही ? वाटेल तें करील.
सुखचिदखंडविबोधमद्वितीयम् ,
वियदनलादि विनिर्मिते नियोज्य ।
भ्रमयति भवसागरे नितान्तम् ,
अघटितघटनापटीयसी माया ॥ ३ ॥  
ब्रह्म ( आत्मा ), सुखरुप, चिद्रूप, अखंड, ज्ञानरुप व अद्वितीय आहे, पण माया आपल्या अंगच्या अद्भुत शक्तीनें त्या आत्म्यापासून आकाश, वायु, तेज, जल व पृथ्वी या पंचभूतांची उत्पत्ति करिते पण ती भूतें परस्परांची वैरी असल्यामुळें एकमेकांचा नाश करतील म्हणून त्यांचा नियामक जो अंतर्यामी ईश्र्वर त्याचीहि उत्पत्ति करते, म्हणजे शुद्ध ब्रह्माला मायेच्या आध्यात्मिक संबंधानें ईश्र्वरभाव येतो; ( ब्रह + माया + आभास = ईश्र्वर ). तात्पर्य, ईश्र्वरत्वरुपान्तर्गत माया जगताचें उपादानकारण असून, आभास निमित्तकारण आहे व तोच आभास मायेचा नियामक आहे. द्वैतीकपिल सांख्यमताप्रमाणें माया स्वतंत्र जगत् कर्ती नसून परतंत्र म्हणजे ईश्र्वराधीन आहे. त्या ईश्र्वराला आपल्या स्वरुपाचा केव्हांहि भ्रम नाही म्हणून तो नित्य मुक्त आहे. सर्व पदार्थांना जाणतो म्हणून सर्वज्ञ, व सर्वशक्तिमान म्हणून स्वतंत्र जगत्कर्ता आहे; अल्पज्ञ, अल्पशक्तिमान व पराधीन असतो त्यास जीव असें म्हणतात. पारमार्थिक दृष्टीनें जीवाचे ठिकाणी अल्पज्ञत्वादि धर्म नाहीत, परंतु अविद्येनें त्याच्या ठिकाणीं प्रतीत होतात, अविद्याकृताअल्पज्ञात्वादिकांची जी आत्म्याच्या ठिकाणीं भ्रांन्ति तेंच जीवाचें जीवत्व होय. अशी ही अद्भुत व मोहकारी माया, या जीवाला भवसागरामध्यें अविरत भ्रमण करावयास लावतें.  आचार्य म्हणतात, या मायेची अद्भुत व मोहकारी शक्ति कशी आहे ? हें काय सांगावें ! ती अघटित घटना करण्यांत कुशल आहे हें खरें.
अपगतगुणवर्णजातिभेदे ,
सुखचिति विप्रविडाद्यहंकृतिं च ।
स्फुटयति सुतदारगेहमोहम् 
अघटितघटनापटीयसी माया ॥ ४ ॥  
४) ज्या ब्रह्माच्या ( आत्म्याच्या ) ठिकाणीं गुण, जाति, वर्ग इत्यादि भेद नाहीं. व्यवहारांत या शब्दाचा हा अर्थ आहे अशा संकेताच्या ज्ञानानें अर्थाचा प्रत्यय येतो. त्यावांचून कोणताहि शब्द आपल्या अर्थाचा प्रत्यय आणून देतो असें दिसत नाहीं. यास उदाहरणः गाय, अश्र्व इत्यदिकांचे ज्ञान गोत्व व अश्र्चत्व या जातीनें होतें, शिजवितो, पठन करतो यांचे ज्ञान शिजविणें, पठन करणें या क्रियांवरुन होते; पांढरा, काळा इत्यादिकांचे ज्ञान गुणावरुन होते. तसेंच धनी, गोमान, इत्यादि ज्ञान धन व गाय यांच्याशी असलेल्या संबंधावरुन होतें. अगोत्रं , अवर्णं इत्यादि श्रुती ' ब्रह्म ' जातिमान नाहीं असें सांगते, म्हणून सदादि शब्दांचें वाच्य नाही.' निर्गुण ' इत्यादि श्रुति ब्रह्म निर्गुण आहे असें सांगते म्हणून गुण शब्दानें त्याचें वर्णन करितां येत नाही; ' निष्कलं निष्क्रियं शांतं ' ही श्रुति ब्रह्म ब्रह्म निष्क्रिय आहे असे प्रतिपादन करते. म्हणून ब्रह्म क्रिया शब्दाचे वाच्य नाहीं;  ' एकमेवाद्वितीयम् ' ही श्रुति ब्रह्म एकच आहे असें प्रतिपादन करतें. तास्तव त्याचा कोणाशी संबंधच होत नाहीं असें श्रुति सांगतें. ' यतो वाचो निवर्न्तते , ' ' साक्षी चेता केवलो निर्गुणश्र्च ' इत्यादि श्रुति ब्रह्म अद्वितीय व अविषय आहे असें सांगतात. मग त्याचा संबंध अन्य वस्तूशी कसा होणार कारण तत्वतः अन्य वस्तु नाहींच असा श्रौतसिद्धान्त आहे. असो. तसेंच  हें ब्रह्म सुखस्वरुप व ज्ञानस्वरुप आहे. अशा अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणीं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इत्यादि जाति दाखविणारी स्थूल, सूक्ष्म, कारण हीं तीन शरीरें व त्या त्या शरीराच्या ठिकाणीं अहंकार उत्पन्न करविणारी, तसेंच पुत्र, स्त्री, मित्र इत्यादिविषयक मोहांत पाडणारी ही अद्भुत शक्ति मोहकारी माया काय करणार नाहीं ? ती अघटित घटना करणारी असून ब्रह्मादि देवांनाही मोह पाडणारी आहे. 
विधिहरिहरविभेदमप्यखंडे ,
बतविरचय्य बुधानविप्रकामम् ।
भ्रमयति हरिहरभेदभावान् ,
अघटितघटनापटीयसी माया ॥ ५ ॥ 
५) ही माया आपल्या अद्भूतशक्तीनें एक, एव व अद्वितीय आत्म्याचे ठिकाणीं ईश्र्वरभाव दाखविते. व नंतर त्याच ईश्र्वराचे ठिकाणीं ब्रह्मदेव, विष्णु व शंकर असें भाव दाखविते. म्हणजे सत्वगुणप्रधान विष्णु, रजोगुणप्रधान ब्रह्मदेव व तमोगुणप्रधान शंकर या देवतांना उत्पन्न करते, व जगताची उत्पत्ति, स्थिति व लय हीं कामें त्यांच्याकडे नेमून देते. शास्त्रपरिचय ज्यांना उत्तम प्रकारचा आहेअशा महान पंडितांनाही शंकर, विष्णु व ब्रह्मदेव या देवता परस्परभिन्न आहेत अशा भ्रमांत पाडून त्यामध्यें आपापसांत कलह करावयास लावते. आचार्य म्हणतात, मायेची अघटित घटना कशी आहे याची मनानेंही कल्पना करतां येणार नाहीं. अशा प्रकारची अद्भुत मोहशक्तिवान् जी माया तिच्या सपाट्यांतून सुटावें अशी इच्छा असणार्‍या मुमुक्षूनें सर्वभावानें ईश्र्वराला शरण जाणें हाच उत्तम व सोपा मार्ग आहे



Custom Search

No comments: